चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी सोहळा इतक्या उत्साहात का साजरा होतोय?

चीन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रतीक जाखड
    • Role, बीबीसी मॉनिटरिंग

सध्या चीनची मुख्य शहरं सजलेली दिसत आहेत. फटाक्यांची आतषबाजी आणि रोषणाई डोळे दिपून टाकणारी आहे. पण या सर्व उत्सवाचं कारण तुम्हाला माहीत आहे का?

सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी सोहळा 1 जुलै 2021 ला होत आहे. त्या निमित्ताने गेल्या 100 वर्षांत चीनने मिळवलेलं यश साजरं केलं जात आहे.

कम्युनिस्ट पक्ष चीनमध्ये अजूनही बळकट आहे. त्यामुळे गेले काही दिवस चीनमध्ये फक्त दोन मुद्द्यांवर चर्चा आहे - एक म्हणजे इतक्या प्रदीर्घ काळात कम्युनिस्ट पक्षाने स्वतःला कसं बळकट केलं आणि दुसरं म्हणजे या काळात या पक्षाने देशात लोकशाही येण्याची शक्यता तसंच साम्यवादाचं पूर्णतः पतन होण्याची शक्यता धुडकावून लावल्या.

नुकतंच चीनची अंतराळ मोहीम यशस्वी झाली. या घटनेला देशभक्तीशी जोडून पाहिलं गेलं. एका अंतराळवीराने असंही म्हटलं की पक्षाच्या 100 वर्षांच्या संघर्षात हा क्षण सोनेरी अक्षरांनी लिहिला जाईल.

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने लवचिक धोरण स्वीकारलं असलं तरी पक्षाचं पूर्ण लक्ष आपलं अस्तित्व टिकवण्याकडे आहे आणि म्हणूनच पक्ष सामान्य लोकांचा आपल्यावर असलेला विश्वास कायम राहावा यासाठी आटापिटा करतोय.

लोकांचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर सरकार आणि पक्षाची थोरवी सामान्य लोकांसमोर सतत गायला हवी. कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दीनिमित्त हेच केलं जातंय. या निमित्ताने आयोजित केलेल्या समारंभात भूतकाळाचा गौरव, वर्तमानातलं यश आणि भविष्यातल्या महानतेची स्वप्नं सादर केली जातील.

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या एकाधिकारशाहीचं कौतुक करण्यासाठी पक्षाचे नेते, कार्यकर्ते, परदेशी नागरिक, विचारवंत सगळ्यांना झाडून कामाला लावलं आहे.

अशात चीन 100 वर्षं जुन्या कम्युनिस्ट पक्षाच्या कोणत्या गोष्टीचं कौतुक सांगतोय?

लोकांची सेवा

सरकार हे सांगण्याचं प्रयत्न करतंय की कम्युनिस्ट पक्ष (CPC) सत्तेत आहे कारण पक्षावर लोकांचा अढळ विश्वास आहे, लोकांचं समर्थन आहे. हे समर्थन त्यांनी नागरिकांची सेवा करण्याच्या माध्यमातून मिळवलं आहे.

चीन

फोटो स्रोत, Getty Images

लोकसेवा या शब्दाचा वापर पहिल्यांदा माओ त्से तुंग यांनी 1944 साली केला होता. याला सीसीपीचं अनधिकृत घोषवाक्यही म्हटलं जातं. पण या घोषवाक्याचा वापर शी जिनपिंगच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढला.

आपल्या भाषणात जिनपिंग वारंवार म्हणतात की पक्षाने श्रीमंत लोकांची सोय पहायला नको तर सामान्य लोकांची सेवा करायला हवी. हेच पक्षाचं मूळ उदिष्ट आहे.

त्यांनी नुकतंच म्हटलं की कम्युनिस्ट पक्ष चीनच्या लोकांना आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. हे ठसवण्यासाठी प्रचारतंत्राचा वापरही केला जातोय.

सरकारी माध्यमं आणि वेबसाईट गेल्या काही काळात हार्वर्ड विद्यापीठाचं एक संशोधन प्रामुख्याने प्रकाशित करताहेत. त्यात असा दावा केलाय की चिनी नागरिक सरकारवर खुश आहेत. या अभ्यासाचा वापर करून कम्युनिस्ट पक्ष आपल्या सत्तेचं समर्थन करतेय.

वेगवेगळ्या माध्यमसंस्था भावनिक बातम्या प्रकाशित करताहेत. चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क आजकाल 'लोकांचा आपला माणूस' या नावाने एक सीरिज प्रसारित करतंय ज्यात लोकांसाठी काम करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या कथा दाखवल्या जात आहेत.

चीनच्या परराष्ट्र धोरणांचे उपमंत्री झी फेंग यांनी 14 जूनला परदेशी प्रतिनिधींना म्हटलं, "सीसीपीकडे कोणतीही जादूची कांडी नाहीये पण लोकांच्या इच्छा काय आहेत हे पक्षाला माहितेय आणि त्याप्रमाणे आम्ही आमची सुधारित धोरणं लागू करत आहोत. पक्ष आणि सर्वसामान्य लोकांमध्ये पाणी आणि माशासारखं नातं आहे."

पक्ष सर्वसामान्य माणसांसाठी किती कटिबद्ध आहे हे दाखवण्याठी पक्ष अजून एका गोष्टीकडे विशेष लक्ष देतोय. तरुणवर्ग आणि पक्षाचं नातं. ऐतिहासिकरत्या पक्षाचं आणि देशातल्या तरुणाईचे संबंध गुंतागुतींचे ठरलेत. दुसरीकडे तरुणवर्ग देशातला सगळ्यांत प्रभावशाली वर्ग आहे.

अर्थात तरुणांचा विश्वास संपादन करण्याची व्यूहरचना म्हणावी तशी यशस्वी झाली नाहीये कारण अनेक युवकांना वाटतं की समाजात प्रगतीच्या संधी कमी आहेत. या व्यतिरिक्त समाजात आर्थिक असमानताही वाढतेय.

इतिहासाचा आधार

कम्युनिस्ट शासन सतत लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सतत आपल्या गौरवशाली इतिहास आणि बलिदानाचे दाखले देत असतं. याचे दाखले सरकारी माध्यमांमध्ये सतत दिसतात.

या मुद्द्यावर पोस्टरबाजी होते, मोठमोठे बॅनर लावले जातात, फिल्म आणि टीव्ही सीरिजमध्येही याचे उल्लेख होतात.

चीन

फोटो स्रोत, Getty Images

सरकारी माध्यमं भूतकाळातल्या मिथकांविषयीही लोकांना माहिती देताहेत. सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआ 'क्रांतिकारकांच्या पाऊलखुणांचा पत्ता' नावाने विशेष कव्हरेज करतंय.

इतिहासाचं उदात्तीकरण करण्यासाठी डाव्या विचारसरणीशी संबधित असणाऱ्या ठिकाणी पर्यटनालाही चालना दिली जातेय. या ठिकाणांमध्ये कम्युनिस्ट पक्षाची संग्रहालयं आणि क्रांतिकारकांच्या स्मारकांचा समवेश होतो.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी फेब्रुवारी महिन्यात पक्षाचा इतिहास जाणून घ्या ही मोहीम सुरू केली होती. त्यांनी म्हटलं होतं की सगळ्या स्तरांमधल्या पक्ष कार्यकर्त्यांनी पक्षाच्या इतिहासातून शिकावं.

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचं अधिकृत नियतकालिक छ्युशीच्या ताज्या अंकात शी जिंगपिंग यांनी परत म्हटलंय की 'इतिहासच पक्षाच्या अविरत संघर्षांचं सर्वांत उत्तम पाठ्यपुस्तक आहे. त्याचा अभ्यास केला तर पक्ष आणि देश दोन्हीसाठी प्रेम आणि आस्था निर्माण होईल.'

शी जिनपिंग यांच्या सल्लागार तुकडीतले वँग हुनिंग यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं की नुकत्याच खुल्या झालेल्या संग्रहालयातून पक्षाचे सदस्य, अधिकारी आणि लोकांना हे समजायला मदत होईल की पक्ष इतका सक्षम का आहे, मार्क्सवादाचे सिद्धांत का यशस्वी आहेत आणि समाजवाद आणि साम्यवाद चीनमध्ये कसे हातात हात घालून चालतात.

अर्थात पक्षाच्या इतिहासावर लक्ष केंद्रित केलं जात असलं तरी हा पूर्ण इतिहास नाहीये तर कम्युनिस्ट सरकारने लोकांसमोर आणलेला संपादित इतिहास आहे.

सरकारच्या अधिकृत इतिहासाला आव्हान देणारी कोणतीही गोष्ट समोर येण्याबाबत शी जिनपिंग यांनी सतत इशारे दिलेत. गेल्याच महिन्यात पक्षाचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला म्हणून अधिकाऱ्यांनी 20 लाख पोस्ट डिलिट केल्या.

जनादेश

पक्षाने दीर्घकाळ आपल्या शासनाला वैध ठरवण्यासाठी आर्थिक विकास आणि सामाजिक स्थिरतेवर लक्ष केंद्रित केलंय. पक्षाच्या धोरणानुसार शासनाचं मूल्यांकन त्यांच्या कामावर आणि त्यांच्या कामातून काय निष्पन्न झालंय यावर केलं जातं.

चीन

फोटो स्रोत, Getty Images

पक्षाचे प्रसिद्ध विद्वान जँग वेईवेई यांनी नुकतंच चीनच्या पोलिट ब्युरोला संबोधित केलं होतं. त्यात त्यांनी 'स्वर्गासाठी जनादेश' या संकल्पनेचा उल्लेख केला. ही एक प्राचीन चिनी संकल्पना आहे ज्यात असं म्हटलं जातं की, 'राजाचा राज्य करण्याचा अधिकार त्याच्या शासन करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे.'

आणखी एका लेखात त्यांनी शासनाकडे लोकशाही विरूद्ध एकाधिकारशाही असं न पाहता सुशासन विरूद्ध कुशासन अशा नजरेने पाहावं असं म्हटलंय.

कम्युनिस्ट पक्षाची 100 वर्षं पूर्ण झाल्याच्या प्रसंगी सरकारी माध्यमांमध्ये सतत हे सांगतेय की पक्षाच्या नेतृत्वाखाली देशात आर्थिक चमत्कार झालाय आणि इतरही बाबींमध्ये उल्लेखनीय यश मिळालं आहे.

पक्षाचं वर्तमानपत्र पीपल्स डेलीच्या संपादकीय पानावर सरकारच्या दोन मोठ्या कामगिरींवषयी लिहिलंय ज्यात गरिबी आणि कोव्हिड-19 वर मिळवलेल्या यश अधोरेखित केलंय.

याबरोबरच परदेशी प्रतिनिधींची मतं मांडली जात आहेत, ज्यात जपानच्या माजी पंतप्रधानांपासून रशियाच्या विद्वानांचा समावेश आहे. कोव्हिड-19 ला चीनने कसं यशस्वीरीत्या हरवलं हे ठसवण्यासाठी अमेरिका आणि भारतातल्या परिस्थितीचं वर्णन केलं जातंय.

कामावर सरकारची क्षमता जोखा म्हणणाऱ्या सरकारसमोर कोणत्याही परिस्थितीत आणि काळात त्याच प्रकारचं काम करण्याचं आव्हान असतं कारण लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. चीनमध्ये वृद्धांची वाढती संख्या, व्यवस्थेतल्या त्रुची, सुधारणांचा अभाव आणि पर्यावरणीय प्रश्न अशी आव्हानं वाढत आहेत.

म्हणून सरकारी संदेश उदिष्ट पूर्ण करण्याऐवजी नागरिकांच्या सर्वांगिण विकास आणि नागरिकांचं जीवनमान उंचावणं यावर भर देत आहेत.

स्वतःत सुधारणा करण्याची क्षमता

कठीण काळामध्ये आव्हानांमधून उभं राहण्याची, बदलत्या परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आपली वृत्ती असल्याचंही कम्युनिस्ट पक्ष सांगत आला आहे.

चीन

फोटो स्रोत, Getty Images

लोकशाहीतले पक्ष छोट्या कालावधीतल्या फायद्यासाठी काम करतात पण कम्युनिस्ट पक्ष दीर्घकालीन दृष्टीकोनातून काम करत आहे आणि काळानुसार बदल करत आहे असा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात येतोय.

कोणत्याही चुकीचं खापर हे कनिष्ठ पातळीवरच्या लोकांवर फोडलं जातं आणि ज्येष्ठ पातळीवरच्या नेतृत्वाविषयी कोणतेही सवाल विचारले जात नाही. कोव्हिड -19च्या सुरुवातीच्या काळामध्ये झालेल्या चुकांचं खापरही खालच्या पातळीच्या अधिकाऱ्यांवर फोडण्यात आलं.

एका समारंभामध्ये चीनचे अधिकारी जू युशेंग यांनी देशाच्या राजकीय व्यवस्थेच्या गुणांविषयी एक व्हाईटपेपर प्रसिद्ध केला होता. अनेक पक्ष असणाऱ्या यंत्रणेमध्ये या पक्षांतल्या कट्टर स्पर्धेमुळे ज्या उणिवा निर्माण होतात, त्या कमतरता चीनच्या व्यवस्थेत निर्माण होणार नसल्याचं यात म्हटलं होतं.

चीनचे उप परराष्ट्र मंत्री शी फेंग यावर भर देत सांगतात, "पक्ष आपल्या चुका सुधारतो, स्वतःमध्ये बदल करतो, मग त्यामुळे कितीही वेदना झाल्या तरीही चालतात. सीसीपी सोव्हिएत संघासारखा कम्युनिस्ट पक्ष नाही."

सोव्हिएत संघाच्या पतनातून सीसीपीला धडा मिळाला. शी जिनपिंग यांनी नेहमीच त्यावेळच्या परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली आहे.

पक्ष गंभीर संकटात असताना 2012 मध्ये शी जिनपिंग यांनी पक्षाची कमान सांभाळली होती.

पक्ष त्यावेळी गटबाजी, अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचाराने त्रस्त होता. शी जिनपिंग यांनी पक्षात सुधारणा करण्यासाठी कठोर पावलं उचलली. त्यांनी पक्षशिस्त मोहीम राबवली. बैठकांमध्ये सामूहिक अभ्यासावर जोर दिला. तसंच आत्मपरीक्षण सुरू केलं.

भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी जिनपिंग यांचे प्रयत्न लोकांना आवडले. त्याला स्थानिक माध्यमांमध्येही चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

'चीनला महान बनवायचं आहे'

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडून राष्ट्रवादी विचारांचा उपयोग करून घेतला जातो. लोकांमध्ये राष्ट्रप्रेम वाढीस लागल्यावरच सीसीपीच्या प्रति त्यांची निष्ठा वाढीला लागेल, असं पक्षाला वाटतं.

चीन

फोटो स्रोत, Getty Images

याच विचारांनी पक्षाने चीनला एक महान राष्ट्र बनवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. शी जिनपिंग यांनी हे लक्ष्य 2049 पर्यंत पूर्ण करण्याचं ठरवलं आहे. याचदरम्यान लोकांना एक सामूहिक उद्देशही प्राप्त झाला.

याचा संदेशही स्पष्ट आहे.

पक्ष उत्तम पद्धतीने जगात चीनला पुढे आणत आहे. परदेशी शक्तींकडून चीनचं शोषण आणि अपमानाचा इतिहास आत सुधारला जात आहे.

याशिवाय देशात अराजकतेची परिस्थिती निर्माण होईल, पाश्चिमात्य देश पुन्हा देशाचं शोषण करू लागतील, असा विचार पक्षाला जनमनात पेरायचा आहे.

ग्लोबल टाईम्सने नुकत्याच एका संपादकीय लेखात लिहिलं, "सीसीपीच्या कणखर नेतृत्वाशिवाय चीनला कोणतंच भविष्य नाही. अमेरिका आपल्या सहयोगींसोबत मिळून चीनवर दबाव टाकेल, धमकावेल. त्यामुळे चीन एकटा पडून जाईल.

राष्ट्रवादी विचार वाढवण्यासाठी शी जिनपिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चीनला जागतिक केंद्राच्या स्वरुपात पुढे आणणं सुरू केलं आहे.

याचाच एक भाग म्हणून पूर्वेचा उदय होत आहे आणि पश्चिमेचा अस्त होत आहे, म्हणजेच चीनचा उदय तर अमेरिकेचा अस्त होत आहे, असा नॅरेटिव्ह लोकांमध्ये पोहोचवला जात आहे. तसंच परदेशी शत्रू चीनवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही लोकांच्या मनावर ठसवण्यात येत आहे.

नुकतेच चीनचे फ्रान्समधील राजदूत लू शाहेय यांनी म्हटलं होतं, "आम्ही आमच्या जन्मभूमीसाठी उभे असलेले लढवय्ये आहोत. चीनवर हल्ला करणाऱ्या वेड्या कुत्र्यांच्या रस्त्यात आम्ही उभे आहोत."

या आक्रमक वक्तव्यांनी देशाचे नागरीक खुश होऊ शकतात, पण त्याचा प्रभाव चीनच्या परराष्ट्र धोरणावर पडू शकतो.

आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनची नकारात्मक प्रतिमा बनू शकते.

पण, चीनची सरकारी माध्यमं देशातील कट्टर देशभक्तीच्या वातावरणाबाबत चिंताग्रस्त दिसत नाही.

चायना डेलीने नुकतंच त्यांच्या लेखात लिहिलं होतं, "20व्या शतकाच्या सुरुवातीला सीपीसीने चीनमध्ये एका अस्पष्ट, विखुरलेल्या आणि कोणत्याही समन्वयाशिवाय कम्युनिस्ट आंदोलनाची सुरूवात केली होती. आता एका शतकानंतर पक्ष एका संभाव्य महाशक्तीवर शासन करणाऱ्या वैश्विक शक्तीच्या स्वरूपात आपली पुढची वाटचाल करत आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)