वरिष्ठांच्या मते, कर्मचारी घरून काम कमी करतात - मायक्रोसॉफ्टचं सर्वेक्षण

- Author, सिमोन जॅक
- Role, बिझनेस एडिटर
घरून काम करतानाच्या कार्यक्षमतेबाबत बॉस आणि कर्मचारी यांच्यात मतभिन्नता असल्याचं मायक्रोसॉफ्टच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
घरून काम करणं ऑफिसमध्ये राहण्याइतकंच फायदेशीर आहे का, याविषयी बॉस लोकांना चिंता आहे. 87% कर्मचाऱ्यांना ते घरातून अधिक कार्यक्षमतेनं काम करतात असं वाटतं. पण 80% बॉस या मताशी असहमत आहेत.
मायक्रोसॉफ्टच्या या सर्वेक्षणात 11 देशांमधील 20 हजारांहून अधिक कर्मचार्यांना प्रश्न विचारण्यात आले.
मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी बीबीसीला सांगितलं की, बॉस आणि कर्मचाऱ्यांमधील हा मतभेद दूर करणं आवश्यक आहे. कारण आता कामाची ठिकाणं ही कोरोना साथीच्या अगोदरच्या सवयींमध्ये पुन्हा परतण्याची शक्यता धूसर आहे.
नाडेला सांगतात की, "आमच्याकडे असलेला सर्व डेटा दाखवतो की 80 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना वाटतं की ते खूप प्रोडक्टिव्ह आहेत. पण त्यांच्या बॉसेसना असं वाटत नाही. याचा अर्थ अपेक्षा आणि वाटणं यामध्ये मोठा फरक आहे."
ऑफिसपासून दूर काम करण्याचं वाढतं प्रमाण?
नाडेला आणि मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या लिंक्डइनचे बॉस रायन रोस्लान्स्की दोघेही म्हणतात की, इतिहासातील कामाच्या पद्धतींमध्ये कदाचित सर्वांत मोठ्या बदलाशी कंपन्या सध्या झुंज देत आहेत.
लिंक्डइनवर जाहिरात केलेल्या दूरस्थ काम असलेल्या (ऑफिसपासून पूर्णपणे बाहेरून करायचे काम) नोकर्यांची संख्या कोरोना साथीच्या काळात वाढली आहे.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "लिंक्डइनवर लाईव्ह असणाऱ्या जवळपास 14 किंवा 15 दशलक्ष नोकऱ्यांपैकी 2% लोक कोरोनाआधी दूरस्थ पद्धतीनं काम करत होते. काही महिन्यांपूर्वी हे प्रमाण 20 टक्क्यांवर आलं आणि आता ते 15 टक्क्यांवर आलं आहे."
मजुरांची तीव्र टंचाई असताना कंपन्यांना कर्मचारी भरती करण्यासाठी आणि उत्साही कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. नाडेला यांच्या म्हणण्यानुसार, यात खुद्द मायक्रोसॉफ्टचाही समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"आमच्याकडे 70 हजार लोक होते जे कोरोना साथीच्या काळात मायक्रोसॉफ्टमध्ये दाखल झाले. त्यांनी कोरोनाच्या काळातील दृष्टीकोनातूनच एकप्रकारे मायक्रोसॉफ्टला पाहिलं. आणि आता जेव्हा आम्ही पुढच्या टप्प्यांबद्दल विचार करत आहोत, तेव्हा त्यांचा पुन्हा हुरूप वाढवणं, त्यांची पुन्हा नियुक्ती करणं, त्यांना सामाजिक संबंधांसाठी तयार करणं आवश्यक आहे."
मायक्रोसॉफ्टचे कर्मचारी 50 टक्क्यांपर्यंत घरून काम करू शकतात. त्याहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्थापनाची मंजुरी आवश्यक असते.
काही कंपन्या नवीन कामकाजाची व्यवस्था आणि अपेक्षा यांचं संतुलन राखण्यासाठी संघर्ष करत आहेत.
सप्टेंबरपासून आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात परत येण्यासाठी सांगणाऱ्या अॅपल कंपनीला यासाठी विरोध केला जात आहे. तर टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी ई-मेल पाठवून कार्यालयात आठवड्यातून 40 तास काम करण्याची मागणी केली आहे. "कार्यालयात उपस्थित न राहिल्यास तुम्ही राजीनामा दिला आहे असं आम्ही समजू," असं ते म्हणाले आहेत.
"कोरोना साथीची सुरुवात झाल्यापासून अभूतपूर्व संख्येनं लोकांनी नोकऱ्याही बदलल्या आहेत. 1997 नंतर जन्मलेल्या (जनरेशन झेड) कर्मचाऱ्यांची नोकरी बदलण्याची शक्यता जवळपास दुप्पट दिसून आली आहे.
"फेरबदलांच्या या काळात 50 % लिंक्डइन सदस्य दरवर्षी नोकर्या बदलत असल्याचं आम्ही पाहिलं. यात जनरेशन झेड 90% वर होतं," असं या सर्वेक्षणातून दिसून येतं.
2030 पर्यंत संपूर्ण कर्मचार्यांपैकी जवळपास 30% जनरेशन झेडचे सदस्य असतील, त्यामुळे व्यवस्थापकांनी त्यांना समजून घेणं आवश्यक आहे, असं लिंक्डइनचे बॉस सांगतात.
मायक्रोसॉफ्ट यासाठी काही प्रयत्नही करत आहे. भूतकाळात कर्मचार्यांनी ज्या प्रकारे काम केलं होतं त्याप्रमाणे कंपनीच्या तरुण कामगारांना संस्थेशी आपलेपणाची भावना आणि शिकण्याची क्षमता निर्माण करण्यावर कंपनी लक्ष केंद्रित करत आहेत.
उदाहरणार्थ, कंपनीचं नवीन व्हिवा सॉफ्टवेअर. याद्वारे नवीन कर्मचारी थेट वरिष्ठ व्यवस्थापकांशी संपर्क साधू शकतात. ऑनलाइन शिक्षण आणि वैयक्तिक फोटो शेअर करण्यासाठी यात अनुमती देण्यात आली आहे. कंपनीच्या इंट्रानेट साइटप्रमाणे कामाच्या नवीन जगताशी जुळवून घेण्यासाठी कंपन्यांची धडपड सुरू आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








