कोरोना व्हायरस: पुण्यातल्या बऱ्याच कंपन्यांनी निवडला वर्क फ्रॉम होमचा पर्याय

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वर्क फ्रॉम होमचा पर्याय तुम्ही निवडलात का?
    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात होत असल्यामुळे याला आटोक्यात आणण्यासाठी सर्वच देशांनी प्रयत्न सुरू केले आहेत. खासगी कंपन्यांनीही कोरोना व्हायरसचा प्रसार टाळण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे. पण यामुळे कामाच्या उत्पादकेतवर परिणाम जाणवू शकतो असा देखील सूर उमटत आहे.

कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय निवडला आहे.

गुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, हिताची, अपल, अॅमेझॉन, शेवरॉन, सेल्सफोर्स किंवा स्पॉटीफाय यांसारख्या काही कंपन्यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितलं आहे.

Presentational grey line
BBC
Presentational grey line

जागतिक आरोग्य संघटनेनेही बुधवारी कोरोना व्हायरस पँडेमिक असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे येणाऱ्या काही कालावधीसाठी प्रत्येक देशातील घरातून काम करण्याची सवय लोकांनी लावून घ्यावी लागेल.

भारतात वर्क फ्रॉम होमचा पर्याय चालेल का?

पण भारतात वर्क फ्रॉम होमचा पर्याय कितपत चालू शकतो, याबाबत बीबीसी मराठीने आयटीसह इतर क्षेत्रांतील लोकांशी बातचीत केली. वर्क फ्रॉम होमबाबत लोकांची मत-मतांतरे आहेत.

त्यामुळे कोरोना व्हायरसने निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी लोकांना घरातून काम करावं लागलं तर अशा वेळी काय करावं आणि काय करु नये, या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा बीबीसी मराठीने प्रयत्न केला.

आयटी कंपन्यांचं लवचिक धोरण

कौस्तुभ इतकूरकर पुण्याच्या खराडी परिसरातील एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत.

त्यांच्या मते, "आयटी क्षेत्रात वर्क फ्रॉम होमबाबत लवचिक धोरण असतं. पूर्वीपासूनच या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम करण्याची सोय उपलब्ध असते."

"एखाद्या कर्मचाऱ्याला विशिष्ट कारणासाठी घरातून काम करायचं असेल, तर त्यांनी आपल्या मॅनेजरकडे अर्ज करावा लागतो. योग्य कारण असेल तर मॅनेजर त्यांना परवानगी देतात. पण ते कारण तितकं महत्त्वाचं असलं पाहिजे."

कोरोना

फोटो स्रोत, EPA

"कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे बहुतांश आयटी कंपन्यांनी आधीपासूनच त्यांच्या कर्मचाऱ्यांना मेल केले आहेत. घरातून काम करण्याची तयारी ठेवण्यास त्यांनी सांगितलं आहे. यामध्ये वेगवान इंटरनेट, लॅपटॉप यांची उपलब्धता तपासून पाहिली जात आहे. कधी कधी कंपन्या या गोष्टी पुरवतात. पण कर्मचाऱ्यांनीही या सर्व सोयींनी सुसज्ज राहावं," असं कौस्तुभ यांनी सांगितलं.

'कामाचा वेग मंदावण्याची शक्यता'

ऑफिसमध्ये असताना कर्मचारी आपल्या मॅनेजरची कधीही भेट घेऊ शकतात. कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची संधी याठिकाणी भेटते. पण घरून काम करताना या गोष्टी शक्य नसतात. त्यामुळे संपर्क तुटू शकतो.

घरातून काम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र

याबाबत बोलताना खराडी परिसरातील एका आयटी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर काम करणारे शार्दूल व्यवहारे सांगतात, "कोरोना व्हायरस असो किंवा नाही, जर वर्क फ्रॉम होम करत असाल, तर आपल्या मॅनेजरसोबत नेहमीच संपर्कात राहणं अनिवार्य असतं."

"कंपनीने आपल्याला घरून काम करण्याची परवानगी दिल्यानंतर आपल्या मॅनेजरशी सतत चर्चा करून वेळोवेळी कामाचे अपडेट्स त्यांना देत राहणं गरजेचं असतं. गरज भासल्यास व्हीडिओ कॉलवर मिटींग घेण्यात येते. अशा वेळी संपर्कात राहिलं नाही, तर कामाचा वेग मंदावण्याची शक्यता असते."

'काही दिवसांपासून घरूनच काम'

"सध्या कोरोना व्हायरसचा प्रसार टाळण्यासाठी आमच्या कंपनीने घरून काम करण्याची परवानगी आधीपासूनच दिलेली आहे. मी सुद्धा सोमवारपासून घरूनच काम करत आहे," असं सॉफ्टवेअर इंजिनिअर विराज मोटेगावकर सांगतात.

ऑफिस

फोटो स्रोत, Getty Images

"पण घरातून काम करत असताना पूर्णपणे कामावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आपला इंटरनेट स्पीड, मनापासून काम करण्याची तयारी या बाबी घरातून काम करताना महत्त्वाच्या असतात. त्यामुळे गांभीर्याने काम करत असल्यास कुठूनही काम करणं शक्य आहे," असं विराज सांगतात.

सगळंच काम घरातून शक्य नाही

कौस्तुभ इतकूरकर यांच्या मते, "आयटी कंपन्यामार्फत घरातून काम करण्याची सोय बऱ्याच कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते. पण हे सर्वच कर्मचाऱ्यांसाठी शक्य नाही. कर्मचाऱ्याचं पद, त्याचं काम, त्याच्यावर असलेली जबाबदारी या गोष्टींवर सगळं अवलंबून असतं."

"कंपनीची माहिती लिक होऊ नये, यासाठी कंपन्या काळजी घेत असतात. त्यामुळे कधी कधी एखादं काम करण्यासाठी आवश्यक असलेला अॅक्सेस हा कंपनीतच ठराविक कॉम्प्युटरवर मिळतो. विशिष्ट पदावरच्या लोकांनाच हा अॅक्सेस दिलेला असतो.

इतकूरकर पुढे सांगतात, "त्यामुळे या कामाची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तींना ऑफिसला जाणं भाग आहे. या व्यक्तींनी कोरोना व्हायरसपासून दूर राहण्याची जबाबदारी स्वतःहून घेतली पाहिजे. सध्या सरकारने कोरोना विषाणूपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी जारी केलेल्या सूचना पाळणं हाच या काळातला योग्य उपाय आहे असं मला वाटतं."

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त