कोरोना व्हायरस: या कारणांमुळे IPL लांबणीवर टाकण्याचा घ्यावा लागला निर्णय

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे,
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा मोसम लांबणीवर टाकण्यात आला आहे.
कल्पना करा, की IPLचे सामने सुरू आहेत. विराट कोहलीनं एकामागोमाग एक षटकार ठोकतोय पण स्टेडियम शांतच आहे. रोहित शर्मानं शतक ठोकलं, पण एकही टाळी वाजली नाही. महेंद्रसिंग धोनीनं सामना जिंकून दिला, पण कुणी त्याच्याशी हातमिळवणी केली नाही.
यंदाच्या मोसमात काहीसं असंच चित्र दिसण्याची शक्यता क्रिकेट चाहत्यांना वाटते आहे. कारण आहे कोरोना व्हायरसचा उद्रेक.
हे सर्व होऊ नये म्हणून आयपीएलचे सामने 15 एप्रिलनंतर होतील असं बीसीसीआयने सांगितलं आहे.
सर्व खेळाडू, चाहते आणि सर्वच जनतेच्या आरोग्याचा विचार करून IPL सामने 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
29 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांमधल्या सामन्यानं आयपीएलच्या तेराव्या मोसमाची सुरुवात होणार आहे. पण मुंबईतच बुधवारी कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले. जागतिक आरोग्य संघटनेनंही या विषाणूची साथ जगभर पसरल्याचं जाहीर केलं आणि आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं.
IPLवर कोरोना व्हायरसचं सावट
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मोठ्या प्रमाणात गर्दी होईल अशा कार्यक्रमांचं आयोजन टाळावं अशा सूचना दिल्या आहेत, मात्र क्रीडा स्पर्धांच्या आयोजनावर थेट निर्बंध घातलेले नाहीत.
महाराष्ट्र सरकारनं यंदा आयपीएलचे सामने प्रेक्षकांविनाच खेळवले जावेत असं आवाहन केलं आहे.
IPL मध्ये परदेशी क्रिकेटर्सही मोठ्या संख्येनं सहभागी होतात. पण जगभरात वेगवेगळ्या देशांनी व्हिसा आणि विमानसेवांवर घातलेले निर्बंध पाहता, यंदाच्या मोसमात या खेळाडूंच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सध्या देशांत मोठ्या क्रीडा स्पर्धा भरवायच्या की नाही, हा निर्णय आयोजकांवर सोडण्यात आल्याचं म्हटलं आहे. "आमचा सल्ला आहे, की सध्याच्या परिस्थितीत आयोजन टाळावं. पण त्यांना स्पर्धा भरवायची असेल, तर तो त्यांचा निर्णय आहे. सध्या गरज नसताना प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे, पण खेळाडूंविषयी काही स्पष्ट निर्णय झालेला नाही."
बीसीसीआयची भूमिका काय आहे?
तर बीसीसीआयनंही अजून आयपीएलविषयी आपली भूमिका अधिकृतपणे मांडलेली नाही. पण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी इंडिया टुडेशी बोलताना म्हटलं होतंकी "ही स्पर्धा ठरल्याप्रमाणेच पार पडेल आणि बीसीसीआय कोरोना व्हायरससंदर्भातली आवश्यक ती सगळी काळजी घेईल."

फोटो स्रोत, Twitter
खबरदारी म्हणून सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या मालिकेत चाहत्यांसोबत हात मिळवणं टाळा, किंवा दुसऱ्यांचे फोन हातात घेऊन सेल्फी काढणं टाळा, अशा स्वरूपाच्या सूचना बीसीसीआयनं खेळाडूंना दिल्या आहेत. तसंच स्टेडियममध्ये प्रेक्षकांसाठी सॅनिटायझर्स उपलब्ध करून दिले जाणार असल्याचं एका प्रेस रिलीजद्वारा जाहीर केलं आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंडचे क्रिकेटर्सही अशाच उपाययोजना करत आहेत.
आयपीएलमध्ये गुंतलेली आर्थिक गणितं पाहता ही स्पर्धा थेट रद्द करावी लागणं बीसीसीआयला परवडणारं नाही. त्यामुळं सामने रद्द करण्याऐवजी ते प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा पर्याय स्वीकारला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
फुटबॉल, बास्केटबॉल, टेनिसवरही कोरोना विषाणूचं सावट
IPL विषयी कुठला निर्णय अजून झालेला नसला, तरी जगभरात बाकीच्या खेळातल्या काही महत्त्वाच्या स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अमेरिकेतली नॅशनल बास्केटबॉल लीग, स्पॅनिश ला लिगाचे पुढचे काही सामने आणि इंडियन वेल्स ओपन ही अमेरिकेतली टेनिस स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.
खेळांचे सामने अनेकदा मोठ्या स्टेडियम्समध्ये भरवले जातात, जिथे हजारो लोक एकत्र येतात. त्यामुळंच क्रीडा संघटना खेळांचे सामने रद्द करणे, किंवा पुढे ढकलणे किंवा प्रेक्षकांशिवाय खेळवणे अशा उपाययोजना करताना दिसतायत.
कोरोनाचा देशात होणाऱ्या क्रीडा स्पर्धांवर झालेला परिणाम
1. इंडिया ओपन बॅडमिंटन- 24 ते 29 मार्च, दिल्ली -रिकाम्या स्टेडियममध्ये
2. फेडरेशन कप नॅशनल ज्युनियर अॅथलेटिक्स-6 ते 8 एप्रिल, भोपाळ-लांबणीवर
3. फिबा- ऑलिम्पिक पात्रता 18 ते 22 मार्च, बेंगळुरू- लांबणीवर
4. फिफा वर्ल्ड कप क्वालिफायर- भारत वि. अफगाणिस्तान, 9 जून- लांबणीवर
5. संतोष करंडक फुटबॉल-फायनल राऊंड-14 ते 27 एप्रिल, ऐझॉल-लांबणीवर
6. इंडिया ओपन गोल्फ, गुरुग्राम, 19 ते 22 मार्च- लांबणीवर
7. पॅरा नॅशनल स्पर्धा, एप्रिल- लांबणीवर
8. नेमबाजी विश्वचषक स्पर्धा, नवी दिल्ली, 15 ते 25 मार्च-लांबणीवर
9. ISL- चेन्नई वि. कोलकाता, 14 मार्च, गोवा- रिकाम्या स्टेडियममध्ये




हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








