एका पॉडकास्टने बदललं न्यायाधीशांचं मत, 23 वर्षांनंतर तरुणाची तुरुंगातून सुटका

अदनान सईद
फोटो कॅप्शन, अदनान सईद
    • Author, सॅम कॅब्राल आणि क्लॉडिया ऍलन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

आपल्या प्रेयसीच्या खुनाच्या आरोपाखाली 23 वर्षं शिक्षा भोगत असलेल्या अदनान सईदची सुटका करण्याचे आदेश अमेरिकेतील न्यायालयाने दिले आहेत.

ही घटना आहे 1999 सालची. हेय मिन ली ही अदनान सईदची प्रेयसी होती. पण तिचा खून करून मृतदेह जंगलात पुरल्याचे आरोप अदनानवर झाले आणि वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. आज अदनान 41 वर्षांचा आहे

मागचे अनेक वर्षं हा खटला सुरू आहे. या खटल्यात दोन वेगवेगळ्या व्यक्तींवर संशय असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला होता.

दरम्यान मागील आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या सुनावणीवेळी अदनानची शिक्षा संपवावी अशी विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली.

आता न्यायालयाच्या निर्णयानंतर सईदला नजरकैदेत ठेवलं जाईल. गेली 23 वर्षं तो तुरुंगात होता. मात्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता त्याच्या बेड्याही काढण्यात आल्या आहेत.

सईद

बाल्टिमोर सर्किट येथील न्यायाधीश मेलिसा फिन सुनावणी दरम्यान म्हणाल्या की, "सरकारी पक्षाने जो दावा केलाय त्यासाठी त्यांनी पुरावे सादर केलेले नाहीत. त्यामुळे न्याय आणि निष्पक्षता समोर ठेवून आम्ही अदनानची शिक्षा संपवतोय."

त्या पुढे असं ही म्हणाल्या की, "न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सईद निर्दोष ठरतो, असा अर्थ घेतला जाऊ नये."

याप्रकरणी नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

2000 साली खून खटल्यात न्यायालयाने अदनान सईदला दोषी ठरवलं होतं. सरकारी वकिलांनी अदनान सईदवर आरोप लावले होते की, सईद आणि ली एकाच वर्गात शिकत होते. सईदचं ली वर प्रेम होतं, पण ली ला सईद आवडत नव्हता. त्यामुळे सईदने लीची गळा दाबून हत्या केली. आणि एका मित्राच्या मदतीने ली चा मृतदेह बाल्टिमोरच्या लिकिन पार्कमध्ये पुरला.

या प्रकरणात अदनान आणि ली चं मोबाईल फोन लोकेशन एकच असल्याचं स्पष्ट झालं. त्याआधारे त्याच्यावर आरोप करण्यात आले.

हे प्रकरण घडून आज 20 वर्षं झाली. या कालावधीत सईदने कोर्टाकडे ज्या काही अपील केल्या होत्या त्या सर्व फेटाळण्यात आल्या. 2019 मध्येही त्याने एक अपील केलं होतं.

सईद

फोटो स्रोत, Getty Images

हे प्रकरण सुरूच होतं. पण याला प्रसिद्धी मिळाली ती 2014 साली. 2014 साली सईद आणि ली प्रकरणावर एक पॉडकास्ट आलं. हे पॉडकास्ट तब्बल 34 कोटीवेळा डाऊनलोड करण्यात आलं. 2019 मध्ये तर HBO या टीव्ही चॅनेलने यावर सीरिज आणली.

बाल्टिमोरचं सरकारी अॅटर्नी ऑफिस मागच्या अनेक वर्षांपासून या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. दरम्यान बुधवारी जेव्हा सुनावणी पार पडली तेव्हा डिफेन्स अॅटर्नीने हा खटला नव्याने सुनावणीस यावा अशी विनंती केली.

यावर सरकारी अॅटर्नीने आपली बाजू मांडताना म्हटलंय की, "या प्रकरणात 2 नव्या संशयितांची ओळख पटवण्यात आली असून 1990 पासून पोलीस या दोघांवर पाळत ठेऊन आहेत. त्यामुळे सईदला सुनावण्यात आलेली शिक्षा योग्य वाटत नाही."

आता सरकारी वकिलांनी ज्या दोघांवर संशय व्यक्त केलाय, त्यांची नावं उघड झालेली नाहीत. मात्र या दोघांवरही महिलांवरील अत्याचाराचे अनेक गुन्हे नोंद आहेत. तसेच त्यांना अशा प्रकरणांमध्ये शिक्षाही झालीय.

यातल्या एकाची तर लाय डिटेक्टर टेस्ट पण घेण्यात आली होती. मात्र तरीही त्याला आरोपी बनवता आलं नाही. कारण अमेरिकी न्यायालयात लाय डिटेक्टर टेस्ट पुरावा म्हणून सादर करता येत नाही.

सर्वाधिक हिट पॉडकास्ट

न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सईदला समर्थन देणाऱ्यांची गर्दी न्यायालयाबाहेर जमली होती. बरेच कॅमेरे तो क्षण टिपत होते. यावेळी सईदच्या समर्थकांनी मोठमोठ्याने घोषणा दिल्या.

सईद

फोटो स्रोत, Getty Images

न्यायालयाने हा निर्णय देण्यापूर्वी ली च्या भावाची योंग ली याची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. यात तो म्हणाला होता की, मी तपासाच्या विरोधात नाही. मात्र तपासकर्त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलाय.

योंग पुढे म्हणाला की, "रोज मला वाटतं की आज हे प्रकरण संपेल उद्या संपेल पण ते संपत नाहीये. माझा संयम संपत चालला आहे. माझ्यासाठी हे फक्त पॉडकास्ट नाहीये. तर ही खरी घटना आहे. सलग 20 वर्षं झालं आम्ही हे सोसतोय."

त्याचवेळी लीचे वडील म्हणतात की, जर दुसऱ्या कोणी त्यांच्या मुलीची हत्या केलीय तर त्यांना जाणून घ्यायचंय की नेमकं हे कोणी आणि का केलंय.

आता या हत्याकांडावर नवा एपिसोड आलाय. हा 13 वा एपिसोड ताज्या कायदेशीर बाबींवर आधारित असणार आहे.

या पॉडकास्टमुळे हेय मिन लीच्या हत्येकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. ऑडिओ फॉरमॅटमध्ये असलेली ही सीरिज मागच्या अनेक वर्षांतील सर्वाधिक हिट पॉडकास्ट सीरिज आहे.

या सिरीयल नंतर याप्रकरणावर बरेच शो सुद्धा आले. त्यामुळे या प्रकरणात सईदला जी शिक्षा झाली त्यावरही प्रश्न उपस्थित केले गेले.

अशा शोजमुळे थंड पडलेल्या प्रकरणाकडे लोकांचं लक्ष वेधलं जातं. अशा गोष्टी लोकांचं अटेन्शन मिळवतात. साहजिकच न्यायसंस्थेवरही याचा दबाव वाढतो.

अशीच एक पॉडकास्ट सीरिज आहे 'इन द डार्क'. ही सीरिज एका अमेरिकन कृष्णवर्णीयाला सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर आधारित आहे. या कर्टिस फ्लॉवर्सने एका श्वेतवर्णीय प्राध्यापकाविरोधात एकच गुन्हा सह वेळा केला होता.

अनेक विषयांवर चर्चा

यावर अमेरिकेच्या सुप्रिम कोर्टात खटला सुरू होता. न्यायालयाने आपल्या आदेशात ही शिक्षा वर्णद्वेषी असल्याचे म्हटलं. आणि कर्टिस फ्लॉवर्सला जवळपास 23 वर्षानंतर या गुन्ह्यातून मुक्तता मिळाली.

असाच एक खटला अॅलिस्टर विल्सनच्या हत्येशी संबंधित होता. 2004 साली स्कॉटलंडमधील नायर्न शहरात राहणाऱ्या अॅलिस्टरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

यावर बीबीसीने 2018 साली "द डोअरस्टेप मर्डर" नावाची पॉडकास्ट सीरिज केली. आजही या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश मिळालेलं नाही. मात्र या वर्षाच्या सुरुवातीला पोलिसांना एक नवी दिशा मिळाली. पोलिसांच्या मते, एका योजनेवरून वाद झाल्यामुळे हा खून झाला असावा.

एका ऑस्ट्रेलियन पुरुषाची पत्नी मागील 40 वर्षं बेपत्ता होती. पण तिचा खून झाला होता आणि हा खून तिच्या पतीनेच केल्याचं मागच्या महिन्यात उघड झालं.

लीनेट डाउसच्या हत्येप्रकरणी एक पॉडकास्ट रिलीज करण्यात आलं होतं.

"द टीचर्च पेट" या नावाच्या पॉडकास्टला जगभर प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर 2018 मध्ये लीनेटच्या खुनाच्या आरोपाखाली क्रिस डाउसनवर खटला भरण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू झाली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)