'मी भारताच्या शत्रूंना कुकरीने संपवलं, पण आता न्यायाच्या प्रतीक्षेत'

    • Author, रजनीश कुमार
    • Role, बीबीसी हिंदी, नेपाळच्या पोखराहून

भारतीय सैन्याती 1979 चे गोरखा बंड

  • 1979 मध्ये भारतीय लष्कराच्या 4/3 गोरखा रेजिमेंटमध्ये बंडाची घटना घडली. यामुळे 45 जवानांना शिक्षा झाली.
  • यातल्या प्रत्येकाने पाकिस्तानविरोधात 2 युद्धं लढली होती. पण आता त्यांची अवस्था वाईट आहे.
  • कोर्ट मार्शलनंतर इंद्र बहादूर गुरुंग यांनी विश्व हिंदू परिषदेत शस्त्र हाताळण्याचं प्रशिक्षण दिलं.
  • लेहमधील ऑफिसर्स मेसमध्ये गोरखांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचं हे प्रकरण होतं.

इंद्र बहादूर गुरुंग 1962 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले तेव्हा ते 20 वर्षांचे होते. ते 4/3 गोरखा रेजिमेंटमध्ये होते.

तीन वर्षांनंतर पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला आणि इंद्र बहादूर गुरुंग यांना लढाईसाठी जावं लागलं. त्यांनी अतिशय शौर्याने लढाईत सहभाग नोंदवला. सहा वर्षांनंतर 1971 मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानशी युद्ध झालं.

या युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाली. 1971च्या युद्धात इंद्र बहादूर गुरुंग यांनी बांगलादेशींना जलपाईगुडी इथं शस्त्रं वापरण्याचं प्रशिक्षण दिलं.

आता गुरुंग 82 वर्षांचे आहेत. ते नेपाळमधील पोखरा इथं राहतात.

गुरुंग सांगतात, "मी भारतीय सैन्यात होतो, याचा मला अभिमान वाटावा की स्वतःचा राग यावा, अशी माझी स्थिती आहे. माझ्यासाठी ही घुसमट बराच काळ चालली. पण आता कोणतीही अडचण नाही. आता मी स्वतःला विचारतो की, मी भारतीय सैन्यात का भरती झालो? माझ्या आयुष्याचे शेवटचे क्षण बाकी आहेत. पण मी मेल्यानंतरही माझा आत्मा न्यायासाठी भटकत राहील."

इंद्र बहादूर गुरुंग बोलत असताना त्यांच्या डोळ्यांतून पाणी येत होतं. जसं काही त्यांचे डोळे अनेक वर्षांपासून हे दु:ख व्यक्त करण्याची प्रतीक्षा करत होते.

गुरुंग सांगतात, "मी भारताला माझी मातृभूमी समजलं होतं. पाकिस्तानच्या विरोधात लढाईला गेल्यावर मी अनेकांना कुकरीनं संपवलं होतं. ती हिंमत केवळ नोकरी करायची म्हणून दाखवली नव्हती तर भारतीय लष्कराला आपलं भविष्य मानून मी ते काम केलं होतं. पण 1979 नंतरचं माझं आयुष्य केवळ मृत्यूची वाट पाहत आहे."

इंद्र बहादूर गुरुंग त्यांच्यासोबत फाईल्सचा एक संपूर्ण गठ्ठा ठेवतात. या फायली त्यांच्या लढ्याचा पुरावा आहेत. या फायलींमध्ये लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, नरेंद्र मोदी आणि माजी खासदार बैकुंठ लाल शर्मा यांची पत्रे आहेत.

यातील काही पत्रांमध्ये गुरुंग यांना न्याय देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. गुरुंग सांगतात की, "2017 मध्ये पंतप्रधान मोदी, तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद, तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या कार्यालयात गेले होते, पण ते कुणालाही भेटू शकले नाही."

1979 मध्ये काय झालं होतं?

8 जानेवारी, 1979. लेहमधील 4/3 गोरखा रेजिमेंटमध्ये प्रमोशन कॅडेटचा उद्घाटन सोहळा पार पडला. एकूण 45 जवान येणार होते. कर्नल ओ.पी. भाटिया त्यांना संबोधित करणार होते. पण, 7 जण गैरहजर असल्याची माहिती कर्नल भाटिया यांना मिळाली. फक्त 38 जण आले होते. कर्नल भाटिया खूप संतापले आणि जवानांना संबोधित न करता रागानं परत गेले.

कर्नल ओ.पी. भाटिया यांनी 7 जणांच्या अनुपस्थितीमुळे संपूर्ण तुकडीला शिक्षा केली. तुकडीतल्या सर्व 45 जवानांना तीन दिवस लेहपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाल्टी टॉप, कॅमल बॅक, यलो पॅचवर चढून जाण्यास सांगण्यात आलं. ही तीन शिखरं 17 हजार ते 19 हजार फूट उंचीवर आहेत. कर्नल भाटिया यांच्या या शिक्षेबद्दल तुकडीमध्ये प्रचंड नाराजी होती.

4/3 गोरखा रेजिमेंटमध्ये सुभेदार मेजर राहिलेले बी.बी. राणा यांनी बीबीसीला सांगितलं, "तुकडीतले जवान खूप संतापले होते. सुभेदार तुकडीच्या आई-वडिलांसारखे असतात. जवान माझ्याकडे येऊन तक्रार करत होते.

"कोणतीही चूक नसताना शिक्षा दिल्याचं ते सांगत होते. गैरहजर राहिलेल्या सात जणांना लष्कराच्या इतर कामात कामाला लावले होते. हे कुणीही जाणूनबुजून केलं नव्हते. कर्नल भाटिया यांना याविषयी सांगितलं होतं. पण तरीही त्यांनी ऐकलं नाही. हे आधी का सांगितलं नाही?, असं ते म्हणाले. पण हे सांगणं सुभेदाराचं नसतं," राणा सांगतात.

राणा पुढे सांगतात, "जवान त्यांच्या पहिल्या दिवसाची शिक्षा संपवून परत आले तेव्हा त्यांनी पाहिले की तीन कॅप्टन दर्जाचे अधिकारी क्लबमध्ये दारू पीत होते. 10 ते 12 जवान क्लबमध्ये घुसले आणि घोषणाबाजी करू लागले.

"सुभेदारालाही शिक्षा झाली, तर मग आम्ही तर कुणीच नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावेळी मीही क्लबमध्ये होतो. मी त्या जवानांना समजावून सांगितलं आणि शांतपणे परत जाण्यास सांगितलं. यामुळे 4/3 गोरखा रेजिमेंटची प्रतिमा खराब होईल असं मी त्यांना म्हटलं. त्यानंतर जवान तिथून निघून गेले. पण तोवर प्रकरण बिघडलं होतं," राणा सांगतात.

इंद्र बहादूर गुरुंग सांगतात, "एका जवानानं क्लबमध्ये टेबलावर बाटली फेकून मारली. 9 जानेवारीला ब्रिगेडियरसाहेब येत आहेत आणि लष्कराची परिषद होणार असल्याचं सांगण्यात आले. 10 जानेवारी रोजी लष्कराची परिषद झाली. यानंतर 22 जानेवारीला 73 जणांना अटक करण्यात आली.

"सगळ्यांचे जबाब नोंदवण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये 11 अधिकाऱ्यांचा समावेश होता. सगळ्यांकडून मनमानीपणे जबाब घेण्यात आला. आम्हाला हिंदी किंवा इंग्रजी येत नव्हतं. तसंच नेपाळी दुभाषी दिला नव्हता. आम्हाला 1 वर्ष, 9 महिने, 13 दिवस नजरकैदेत ठेवलं. कोर्ट मार्शलनंतर 3 जणांना जन्मठेप आणि 5 जणांना 10 वर्षांची शिक्षा झाली. 9 जणांना 7 वर्षांची शिक्षा झाली. 25 जणांना एनसीओच्या नोकरीतून बडतर्फ करण्यात आलं. 9 जणांना जेसीओच्या सेवेतून मुक्त करण्यात आलं."

बी. बी. राणा यांनाही कोर्ट मार्शलनंतर 16 जानेवारी 1981 नंतर नोकरीतून काढून टाकण्यात आलं. भारतीय सैन्यात बंडखोरी केल्याबद्दल राणा यांना बडतर्फ करण्यात येत असल्याचं डिस्चार्ज सर्टिफिकेटमध्ये नमूद करण्यात आलं.

25 एनसीओमध्ये इंद्र बहादूर गुरुंग यांचाही सहभाग होता. गुरुंग सांगतात, "आम्ही कुणाचंही नुकसान केलं नव्हतं. कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. फक्त सुभेदारानं घोषणाबाजी केली होती. ही घोषणा नेपाळी भाषेत होती - गोरखाली हो की होईन? 4/3 जीआर हो की होईन? म्हणजेच ते गोरखा आहेत की नाही आणि ते 4/3 गोरखा रेजिमेंटचे आहेत की नाही? असा त्याचा अर्थ होता.

"या घोषणेला लष्करी बंड म्हटलं गेलं. नॉर्दन जनरल लेफ्टनंट जगदीश सिंग यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली होती. पण त्यावर साउदर्न कमांडचे जीओसी आरडी हिरा यांची स्वाक्षरी घेण्यात आली. नॉर्दर्न कमांडनं चौकशी केली तेव्हा त्यात काहीही निष्पन्न झाले नव्हतं," गुरुंग सांगतात.

19 वर्षं भारतीय सैन्यात राहिल्यानंतर इंद्र बहादूर गुरुंग यांना कोर्ट मार्शलमध्ये बडतर्फ करण्यात आलं. 45 जणांच्या तुकडीतील सर्वांना काढून टाकण्यात आलं. कुणालाही पेन्शन मिळाली नाही.

जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या तीन लोकांपैकी बी.बी. राणा एक होते. ते जानेवारी 1981 ते 1989 पर्यंत तुरुंगात होते. ते 85 वर्षांचे झाले आहेत. गेल्या 12 वर्षांपासून ते अर्धांगवायूने आजारी आहेत. पण 1979 ची घटना ते अद्याप विसरलेले नाहीत आणि ते ही संपूर्ण घटना तपशीलात सांगतात. राणा 1955 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते.

त्यांनी काठमांडू येथील भारतीय दूतावासाच्या संरक्षण शाखेकडे आपल्या पेन्शनबाबत तक्रार केली. भारतीय दूतावासाच्या संरक्षण शाखेकडून मेजर पंकज सिंग यांच्या स्वाक्षरीचं एक पत्र जारी करण्यात आलं आहे. या पत्रात या माजी सैनिकांची मालमत्ता आणि कुटुंबीयांची माहिती मागवण्यात आली आहे. इंद्र बहादूर गुरुंग सांगतात की, आम्ही सर्व माहिती दिली होती, पण काहीच साध्य झालं नाही.

माहिती देऊनही काहीच का झालं नाही, असा सवाल मेजर पंकज सिंह यांना विचारला तेव्हा ते म्हणाले, "हे प्रकरण लष्करात बंडखोरी करण्याचं होतं. कोर्ट मार्शल झालं आणि सगळ्यांना दोषी ठरवण्यात आलं. त्यामुळे आता काहीच होऊ शकत नाही. जर कुणी त्यांच्या पेन्शनबद्दल तक्रार घेऊन आलं, तर आम्ही आमच्याकडून शक्य होईल तेवढी मदत करतो."

गोरखा रेजिमेंटमध्ये राहिलेले मेजर जनरल अशोक मेहता 1779 च्या या घटनेविषयी म्हणतात की, शिस्तभंगाची ही एक गंभीर घटना होती आणि सैन्य अशी प्रकरणं अत्यंत कठोरपणे हाताळली जातात.

जनरल मेहता सांगतात, "त्यांना कोर्ट मार्शलमध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं. कोर्ट मार्शलनंतर फार थोडे पर्याय उरतात. आमच्यावर अन्याय झाला अशी त्यांची बाजू असू शकते, पण त्यांना कोर्ट मार्शलमध्ये त्यांना शिक्षा झाली, हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. ते पाकिस्तानविरोधातल्या युद्धात सहभागी होते, त्याबदल्यात शिस्तभंगाच्या कोणत्याही प्रकरणात त्यांना सूट दिली जाऊ शकत नाही. त्यांनी राष्ट्रपतींकडे तक्रारही केली होती. राष्ट्रपतींनीही त्यांच्या मागण्या फेटाळून लावल्या होत्या."

एकांतवासात वृद्धापकाळ

सैन्यातून हकालपट्टी झाल्यानंतर इंद्र बहादूर गुरुंग नोकरीच्या शोधात होते. 1985 मध्ये त्यांना पुण्यात बजाजमध्ये नोकरी मिळाली. गुरुंग यांनी वर्षभर तिथं काम केलं. यादरम्यान ते विश्व हिंदू परिषदेच्या संपर्कात आले.

गुरुंग सांगतात की, 1986 ते 2002 पर्यंत ते विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, आरएसएस आणि दुर्गा वाहिनीमध्ये शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देत राहिले. विहिंपच्या नेत्यांनी पेन्शन मिळवून देण्याचं आश्वासन दिल्यामुळे या संघटनांशी 16 वर्षे जोडला गेलो, असं ते सांगतात.

गुरुंग सांगतात, "इतकी वर्षे RSS आणि VHP साठी काम केलं. पेन्शन मिळेल, अशी अपेक्षा होती. 1999 मध्ये भाजपचं सरकारही स्थापन झालं. पण कुणीच आमचं ऐकलं नाही. सर्वांनी माझा वापर केला. मी 1986 मध्ये आलो तेव्हा गुजरात विहिंपचे नेते डॉ. विश्वनाथ वनिकर यांनी विचारलं होतं की, येथील हिंदू मुलं मुस्लिमांना का घाबरतात? त्यावर या मुलांना आत्मविश्‍वासाच्या प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असं मी त्यांना म्हटलं होतं."

"यानंतर मी त्यांच्या कार्यकर्त्यांना शस्त्रांचं प्रशिक्षण देऊ लागलो. पण हे प्रशिक्षण 1992 मध्ये बाबरी मशीद पाडण्याच्या तयारीचा एक भाग असल्याचं नंतर उघड झालं. बाबरी विध्वंसाच्या वेळी माझा विद्यार्थीही मारला गेला," गुरुंग सांगतात.

गुरुंग रडत रडत सांगतात, "पेन्शन तर मिळालीच नाही. पण या पेन्शनसाठी मी त्या लोकांसोबत जोडला गेलो जे मुस्लिमांचा द्वेष करत होते. पेन्शन न मिळाल्याच्या दुःखातून मी सावरलो असतो, पण ज्या लोकांना मी 16 वर्षे साथ दिली, त्या दुःखातून मी कधीच सावरणार नाही."

आता जेव्हा आरएसएसच्या कार्यालयात फोन करतो, तेव्हा कुणी बोलत नाही, असं ते सांगतात.

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांना गुरुंग यांच्या आरोपांबद्दल विचारलं असता ते म्हणाले, "नेपाळ हा भाग मिलिंद परांडे बघतात आणि ते याविषयी अधिक योग्य माहिती देऊ शकतील. "

आम्ही मिलिंद परांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही.

इंद्र बहादूर गुरुंग सांगतात, "मी 43 वर्षांपासून न्यायाच्या शोधात वेडा झालो आहे. बनारस जिल्हा न्यायालयात 5 वर्षे लढलो. 1986 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात गेलो. इथं 28 वर्षे लढा दिला. वकील पैसे घेत गेले. मुलं म्हणतात की, का यामागे लागला आहेस? लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. विहिंप आणि RSSच्या लोकांना भेटलो. मात्र कुठेही न्याय मिळाला नाही."

इंद्र बहादूर गुरुंग यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. पण यापैकी कुणीही नेपाळमध्ये राहत नाही. एक मुलगा दक्षिण कोरिया, दुसरा अमेरिका तर मुलगी हाँगकाँगमध्ये आहे. वयाच्या 85 व्या वर्षी एकटे राहणारे गुरुंग भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धाच्या अनेक कहाण्या सांगतात. RSS आणि VHP बद्दलचा त्यांचा अनुभव सांगतात.

गुरुंग म्हणतात, "मला भारताकडून पेन्शन मिळण्याची अपेक्षा नाही. पण मी माझ्या मुलांना शिकवलं की गोरखा शूर आहेत म्हणून ते सैन्यात जातील, या विचारातून बाहेर पडा. मी माझ्या एकाही मुलाला सैन्यात भरती होऊ दिलं नाही. देशभक्ती आणि राष्ट्रवाद ही सामान्य माणूस आणि मानवता यांना तोडणारी विचारसरणी आहे. आज जेव्हा मी सैन्यात शौर्यासाठी मिळालेली पदकं पाहतो, तेव्हा मला अभिमान वाटत नाही तर त्याचा राग येतो."

इंद्र बहादूर गुरुंग त्यांची फाईल कशीबशी व्यवस्थित लावतात.

ही गोष्ट केवळ गुरुंग यांची एकट्याची नाही

घम बहादूर पुन नुकतेच 79 वर्षांचे झाले आहेत. ते 1962 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले. 1965 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात सहभागी झाले. 1971च्या युद्धातही सहभागी झाले. त्यांना दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा युरोपला गेला असून पत्नीचा मृत्यू झाला आहे. आता ते मुलीसोबत राहतात. त्यांना ना स्वत:चं घर आहे, ना जागा.

नेपाळ सरकारकडून त्यांना 4 हजार रुपये वृद्धापकाळासाठीचं पेन्शन मिळतं आणि त्यातूनच खर्च भागवला जातो. त्यांनी 19 वर्षे 4 महिने भारतीय लष्करात सेवा बजावली. पूर्वी पगारही कमी असायचा आणि कशाचीच बचत होत नसे. जे काही पैसे शिल्लक होते ते केसच्या खटल्यामध्ये त्यांनी खर्च केले. घम बहादूर पुन आपला किस्सा सांगताना रडू लागतात.

"मी मृत्यूची वाट पाहत आहे. ज्या देशासाठी लढा दिला त्यानेच मला हे दिवस दाखवलेत. मी सीमेवर मारला गेलो असतो तर बरं झालं असतं," पुन सांगतात.

रुद्र बहादूर मल्ल नेपाळमधील श्यांगजा येथील आहे. वयाच्या 16 व्या वर्षी ते भारतीय सैन्यात दाखल झाले. रुद्र बहादूर देखील 4/3 गोरखा रेजिमेंटमध्ये मध्ये होते. तेही 1965 आणि 1971 मध्ये पाकिस्तानविरुद्ध युद्ध लढले.

श्यांगजापासून पोखरा 56 किलोमीटर अंतरावर आहे. प्रवासासाठी 550 रुपये भाडे लागतात. पण कर्ज घेऊन रुद्र बहादूर त्यांचं म्हणणं मांडायला आले होते.

रुद्र बहादूर सांगतात, "माझा कोणताही गुन्हा नव्हता पण तुकडीला झालेल्या शिक्षेत मी चिरडला गेलो. मी नेपाळचा असलो, तरी भारताला माझी मातृभूमी मानून सेवा केली होती. मी जीवाची पर्वा केली नाही. रेजिमेंटमध्ये कमिश्नर ऑफिसर होण्याचं माझं स्वप्न होतं. म्हणून मग मी अधिक उत्साहानं काम केलं. आताही मला रायफल मिळाली तरीही मी शत्रूशी लढायला तयार आहे."

रुद्र बहादूर मल्ल 31 जानेवारी 1962 रोजी भारतीय सैन्यात दाखल झाले. ते सांगतात, "1979 मध्ये एक नाटक झालं होतं. नाटक करणारा कर्नल ओ.पी .भाटिया होता आणि आम्हाला मात्र खलनायक ठरवण्यात आलं. कुकरीने किती तरी हलाल केलेत. पण या मेहनतीचं हे असं फळ मिळालं आहे."

रुद्र बहादूर मल्ल सांगतात, "मला पाच मुलं आहेत. सगळे मजुरी करतात. पत्नी आजारी आहे. माझा गुडघा काम करत नाही. मी 1984 मध्ये नेपाळला आलो. आयुष्याची शेवटची घटिका मोजत आहे. गोरखा रेजिमेंट 4/3 च्या 46 पैकी 22 जण मरण पावले. आता माझी पाळी आहे. माझ्यासारख्या दु:खी आणि गरिबाकडे कोण लक्ष देणार?

"लग्नाच्या वेळी सासरच्यांनी अंगठी दिली होती. विकावी लागली. अजून एक अंगठी उरली आहे, तीही कधी विकायची पाळी येईल माहिती नाही. कर्नल ओ.पी. भाटिया आम्हाला सतत शिवीगाळ करायचा. महाराज वीरेंद्र तुम्हाला खायला देत नाहीत, म्हणून तुम्ही इथे आला आहात, असं म्हणायचा. 19 वर्षे सैन्यात होतो आणि आज मात्र धान्याच्या एका दाण्यासाठी तरसत आहे."

1979 मध्ये ही घटना घडली नसती तर 4/3 गोरखा रेजिमेंटच्या सर्व जवानांना आज चांगली पेन्शन मिळाली असती. काही जवान कर्नल म्हणून निवृत्त झाले असते, तर काही कॅप्टन म्हणून. मात्र गेली 4 दशकांपासून त्यांना एकांतवासाचं आणि अपयशाचं जीवन जगावं लागत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)