‘भारतीय लष्करात मी 30 वर्षं देशसेवा केली, मी परदेशी कसा असू शकतो?’

"29 मे ची रात्र माझ्या आयुष्यातली काळी रात्र होती. पोलीस रात्री 8 वाजताच्या सुमारास मला घेऊन गोलपाडा डिटेंशन सेंटरला पोहोचले. जेलमध्ये पाऊल टाकताच मी थरथरायला लागलो. मी सैनिक आहे, पण माझ्यासमोरच्या परिस्थितीमुळे मी कोलमडून गेलो."

"सैन्यामध्ये अभिमानाने काम करत असतानाचे ते दिवस मला पुन्हा पुन्हा आठवत होते. माझ्याकडून अशी काय चूक झाली की मला तुरुंगात टाकलं, हेच मला समजत नव्हतं. माझं ब्लड प्रेशर वाढलं. त्या रात्री मी खूप रडलो."

डिटेन्शन सेंटरमधले आपले अनुभव सांगताना भारतीय लष्करामध्ये 30 वर्षं सेवा करणारे निवृत्त सुभेदार मोहम्मद सनाउल्लाह अगदी केविलवाणे होतात.

निवृत्त सैनिक असणारे सनाउल्लाह हे परदेशी नागरिक असल्याचं कामरूप ग्रामीण जिल्ह्यातल्या एका फॉरेनर्स ट्रायब्युलन (एफटी) कोर्टाने 23 मे रोजी जाहीर केलं.

यानंतर 29 मे रोजी त्यांना अटक करून गोलपाडा तुरुंगातल्या डिटेंन्शन सेंटरमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. 11 दिवस तुरुंगवास भोगल्यानंतर 8 जून रोजी त्यांना गुवाहाटी हायकोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला, आणि सनाउल्लाह बाहेर आले.

"गोलपाडा तुरुंगात मला खोली क्रमांक 3 मध्ये ठेवण्यात आलं होतं. परदेशी नागरिकांसाठी तुरुंगामध्ये कोणतीही वेगळी व्यवस्था नाही. माझ्या सेलमध्ये इतर कैदीही होते. मी आयुष्यात यापूर्वी कधीच अशा प्रसंगाला सामोरं गेलो नव्हतो. 30 वर्षं मी देशाची सेवा केली आणि मला हा दिवस पहावा लागला. जेलच्या आत एक वेगळीच दुनिया आहे. इच्छा असूनही मी त्यातून बाहेर पडू शकत नव्हतो," 52 वर्षांच्या मोहम्मद सनाउल्लाह यांनी बीबीसीला सांगितलं.

"दोन दिवस मी तुरुंगातल्या कोणाशी बोललोही नाही. मी फक्त माझा आणि माझ्या कुटुंबाचा विचार करत होतो. या दोन-तीन दिवसांत मला खूप थकवाही आला होता. मी वैद्यकीय तपासणी करून घेतली. सैन्यातल्या दिवसांच्या आठवणींमधून मला शक्ती मिळत होती. सैन्यामध्ये आम्हाला प्रत्येक अडचणीचा सामना करायला शिकवलं जातं. मी देशाच्या सीमेवर उभं ठाकत देशाचं संरक्षण केलं आहे. मी हार मानणार नाही. मी भारतीय आहे आणि माझ्या देशातच मी राहणार. या कायदेशीर लढाईतून मला न्याय मिळेल असा मला विश्वास आहे.''

'माझ्यासारखे तिथे अनेक जण होते'

गोलपाडा डिटेंशन सेंटरमध्ये अनेक परदेशी नागरिक असल्याचं सांगत सनाउल्लाह म्हणतात, "40 फुटांच्या खोलीमध्ये मला जवळपास 45 कैद्यांच्यासोबत ठेवण्यात आलं होतं. संध्याकाळी 6 वाजता आम्हाला खोलीमध्ये बंद केलं जायचं. एक बोचरं पातळ कांबळं अंथरून जमीनीवर झोपावं लागे. दिवसा मला असे काही कैदी भेटायचे ज्यांनाही परदेशी नागरिक घोषित करत जेलमध्ये बंद करण्यात आलं होतं"

ते म्हणतात, "त्यांच्या वेदना ऐकून मी माझं दुःख विसरायचो. तिथे असेही लोक आहेत जे गेली 10 वर्षं तुरुंगात आहेत. त्यांना भेटायलाही आता कोणी येत नाही. घर-कुटुंब, मुलं सगळ्यांची वाट लागली. काही कैद्यांना तर हेही माहीत नाही की आता त्यांचं काय होणार. तुरुंगातून बाहेर कसं पडायचं, याविषयी ते माझा सल्ला मागत होते. बहुतेक कैदी अशिक्षित आहेत आणि कोर्टात केस लढण्यासाठी त्यांच्याकडे पैसेही नाहीत."

पण 'अवैध परदेशी नागरिक' असल्याचं ठरवत आसाममध्ये डिटेंशन सेंटरमध्ये डांबण्यात आलेल्या लोकांना सर्शत जामीन देण्याची परवानगी गेल्याच महिन्यात सुप्रीम कोर्टाने दिली आहे. असे कैदी जे तीन वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त काळापासून डिटेंशन सेंटरमध्ये आहेत, त्यांना एक लाख रुपयांचे दोन जामीन बाँड सादर केल्यानंतर सोडता येऊ शकतं, असं सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

सुटका झाल्यानंतर आपला पूर्ण पत्ता या कैंद्यांना द्यावा लागेल आणि सुरक्षित डेटाबेससाठी बायमेट्रिक माहितीही द्यावी लागेल. याशिवाय त्यांना दर आठवड्याला एकद्या पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागेल.

आपल्या सेवेदरम्यान सनाउल्लाह जम्मू-काश्मीर, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, मणीपूर, पंजाब, आंध्र प्रदेश आणि दिल्लीत तैनात होते. ऑगस्ट 2017मध्ये ते सैन्याच्या इलेक्ट्रॉनिक्स एण्ड मेकॅनिकल इंजिनिअर कोअरमधून निवृत्त झाले.

आपल्या भारतीय नागरिकत्त्वाबद्दल सनाउल्लाह म्हणतात, "21 मे 1987रोजी मी सैन्यात भरती झालो. सैन्यामध्ये भरती करताना सगळी कागदपत्रं तपासली जातात. माझ्याकडे 1931च्या खैराजी पट्टा पद्धतीने वडिलांच्या नावावर असलेली जमीन होती. आधी हा खैराजी पट्टा तात्पुरता असायचा पण नंतर 1957मध्ये आम्हाला कायमची जमीन देण्यात आली. याशिवाय 1966च्या मतदार यादीमध्ये माझ्या वडिलांचं नाव आहे. माझ्याकडे मॅट्रिक झाल्याचं प्रमाणपत्र आहे. मी परदेशी कसा असू शकतो?''

जर तुमच्याकडे नागरिकत्त्वासाठीची सगळी कागदपत्रं होती, तर ती ट्रायब्युनलला दाखवली का नाही?

याचं उत्तर देताना सनाउल्लाह म्हणतात, "2008-09मध्ये माझ्याविरोधात मी परदेशी असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, हेच मला माहीत नव्हतं. गेल्या वर्षी पहिल्यांदाच मी ट्रायब्युनलसमोर हजर झालो. आता या सगळ्या प्रकरणाचा तपास करताना कोणाकडून चूक झाली, याबाबत मी आता काही बोलू शकत नाही, कारण हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. कोर्टावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि मला कोर्टाकडून न्याय मिळणार हे मला माहीत आहे."

आता शेजाऱ्यांपासून ते मीडियापर्यंत सगळ्यांचीच सनाउल्लाह यांच्या घरी ये-जा आहे. 30 वर्षं सैन्यामध्ये असणाऱ्या व्यक्तीला परदेशी नागरिक जाहीर करण्यात आल्याबद्दल सगळेच आश्चर्य व्यक्त करत आहेत.

मोहम्मद सनाउल्लाह यांना जामीन मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाला काहीसा दिलासा मिळालाय, पण यापुढच्या कायदेशीर लढाईच्या विचाराने ते चिंतीत आहेत.

'जे झालं, त्याचा विचार कधी मनातही आला नव्हता'

28 मेच्या घडामोडी आठवत त्यांच्या पत्नी सनीमा बेगम म्हणतात, "माझे पती सैन्यात होते आणि आता बॉर्डर पोलिसांचं काम करत होते. म्हणूनच त्यांना पकडून कोणीतरी घेऊन जाईल, असं कधी मनातही आलं नव्हतं. त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून घेई पर्यंत मला कोणत्याही प्रकारचं टेन्शनही आलं नव्हतं. अख्खी रात्र जेव्हा हे घरी आले नाहीत, तेव्हा मला काळजी वाटायला लागली. पोलिसांनी त्यांना अटक केल्याचं मला दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी सांगितलं. हे ऐकून मी थरथरायला लागले. मी त्यांना भेटायला गेले, पण पोलिसांनी जास्त बोलू दिलं नाही. ते त्यांना गोलपाडाला घेऊन गेले."

"आमच्यासोबत हे खूपच वाईट झालं. तुम्हीच विचार करा. रमझानचा महिना सुरू होता. मी रोजे ठेवले होते. मुलं रडत होती. सगळ्या घरातलं वातावरण गंभीर झालं होतं. देशाची सेवा करणाऱ्या माणसाला तुरुंगात टाकलं. आता त्यांना फक्त जामीन मिळालाय. यापुढे कायदेशीर लढा द्यावा लागेल. त्यासाठी पैसा लागेल. पण माझा कोर्टावर विश्वास आहे. ते माझ्या नवऱ्याला सोडतील."

आसाममध्ये घडलेलं सनाउल्लाह यांचं हे प्रकरण एकमेव नाही. याशिवाय संपूर्ण राज्यामध्ये अनेक सैनिक आणि माजी सैनिकांबद्दलची अशी प्रकरणं उघडकीला आलेली आहेत, ज्यांना आपलं भारतीय नागरिकत्त्व सिद्ध करण्यास सांगण्यात आलं आहे.

याआधी 2017मध्ये सनाउल्लाह यांचा एक मामेभाऊ मोहम्म अजमल हक यांना फॉरेनर्स ट्रायब्युनलने 'संदिग्ध नागरिक' असल्याची नोटीस पाठवली होती. मोहम्मद अजमल हक हे देखील सैन्यामध्ये 30 वर्षं नोकरी केल्यानंतर 2016मध्ये ज्युनिअर कमीशन ऑफिसर (जेसीओ) पदावरून निवृत्त झाले आहेत.

मोहम्मद सनाउल्लाह यांची रवानगी डिटेन्शन सेंटरमध्ये करण्यात आल्याबद्दल त्यांची मोठी मुलगी शहनाज अख्तर म्हणते, "मी माझ्या बाबांना सैन्याच्या वर्दीमध्ये देशसेवा करताना पाहिलं आहे. त्यांच्यासोबत असं व्हायला नको होतं. भारतीय सैन्यामध्ये काम केलेल्या व्यक्तीला परदेशी असल्याचं जाहीर करणं ही काळीज पिळवटणारी गोष्ट आहे. मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे."

"ते सैन्यात नोकरी करत असताना मी त्यांच्यासोबत अनेक ठिकाणी राहिले. लोक विचारतात की नॉर्थ ईस्टमध्ये असं का घडतंय. सैन्यात काम केलेल्या माणसालाच तुरुंगात डांबलं जातंय. मग सामान्य माणसाचे तर किती हाल होत असतील." ती म्हणते.

"प्रशासनातील त्रुटींमुळेच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे. माझ्या वडिलांच्या प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी चंद्रमल दास यांच्यामुळेच आज आम्हाला हा दिवस पहावा लागतोय."

सनाउल्लाह प्रकरणातले तपास अधिकारी चंद्रमल दास यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्या तथाकथित साक्षीदारांच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला त्यांचं असं म्हणणं आहे की आपण अशी साक्ष कधी दिलेलीच नाही.

900 लोकांना परदेशी नागरिक घोषित केलं

चंद्रमल दास गेल्या वर्षी बॉर्डर पोलिसांच्या नोकरीतून निवृत्त झाले. पण फॉरेनर्स ट्रायब्युनलच्या 23मेच्या निकालानंतर एनडीटीव्ही वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितलं, की ज्या व्यक्तीचा तपास केला ते मोहम्मद सनाउल्लाह नसून सनाउल्लाह होते. ही प्रशासनाकडून झालेली चूक असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सनाउल्लाह यांच्या प्रकरणामध्ये तथाकथितपणे साक्ष देणारे कुरआन अली, सोबाहान अली आणि अमजद अली हे सगळेजण आसाममधल्या कामरूप जिल्ह्यातल्या कलाहीकाश गावचे रहिवासी आहे. पण आपण तपास अधिकारी असणाऱ्या चंद्रमल दास यांच्यासोबत कधी बोललोच नसल्याचं आता या तिघांचंही म्हणणं आहे.

परदेशी नागरिक प्रकरणाच्या सुनावणीसाठी यावेळी आसाममध्ये 100 ट्रायब्युनल सुरू आहेत. ज्या व्यक्ती विरोधात प्रकरण दाखल करण्यात आलेलं आहे ती परदेशी आहे की नाही हे फॉरेनर्स ट्रायब्युनलमध्ये नेमणूक करण्यात आलेले अधिकारी इथे विदेशी अधिनियम, 1946च्या नियमांनुसार ठरवतात.

अवैधरित्या प्रवास करणाऱ्यांना ओळखण्यासाठी स्थापना करण्यात आलेल्या या फॉरेनर्स ट्रायब्युनलने आतापर्यंत 900 लोकांना 'परदेशी नागरिक' ठरवलेलं आहे. यानंतर या लोकांना राज्यातल्या सहा विविध डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं. यातले बहुतेक सगळेजण बंगाली भाषक मुसलमान किंवा हिंदू आहेत.

मोहम्मद सनाउल्लाह यांचं प्रकरण संवदेशनशील आणि गंभीर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये फॉरेनर्स ट्रायब्युलनपासून ते पोलिसांच्या पातळीवर जी कारवाई करण्यात आली, त्यामुळे अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.

बॉर्डर पोलिसांनी सनाउल्लाह यांना नोकरीतून कायमचं काढून टाकत त्यांचा युनिफॉर्म परत घेतलाय. आता सगळ्यांचं लक्ष आहे ते गुवाहाटी हायकोर्टाकडे. देशाच्या सैन्यामध्ये काम करणारा हा माणूस येत्या काही काळात स्वतःला भारतीय नागरिक सिद्ध करू शकतो की नाही, हे आता पाहायचं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)