पाकिस्तान महापूर : 'या महापुरात होतं नव्हतं तेवढं सगळं वाहून गेलं..'

पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे आलेल्या महापुरात आतापर्यंत लहान मुलांसह 1 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांचे संसार वाहून गेले असून लोक बेघर झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर बीबीसीच्या दोन प्रतिनिधींनी या पूरग्रस्त भागाची पाहणी करून संबंधित रिपोर्ट सादर केला आहे.

नौशेरा, उत्तर पाकिस्तान

सिकंदर किरमानी

उत्तरेकडील नौशेरा शहराच्या रस्त्यांवरून जाताना स्थानिक लोक त्यांच्या घरांकडे परतत असल्याचं दृश्य दिसलं. आपल्या घरांची पाहणी करण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी हे लोक परतत आहेत.

रस्त्यांवर छातीएवढं पाणी साचलं आहे. त्यामुळे आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी लोक रबरी ट्यूबचा वापर करत आहेत. तर काही जण पाण्यातूनच पुढे सरकत आहेत.

मुलाला खांद्यावर बसवून आपल्या घरापर्यंत पोहोचलेले इमादुल्ला आचाऱ्याचं काम करतात. त्यांनी आपल्या घरी पोहोचल्यावर पाहिलं तेव्हा त्यांना चिखलाचा गाळ आपल्या सामानावर साचलेला दिसला. हे सगळं सामान आता उपयोगाचं राहिलं नसल्याचं ते सांगतात.

बीबीसीशी बोलताना इमादुल्ला सांगतात, 'आमच्या मुलांव्यतिरिक्त आता आमच्याकडे काहीच उरलेलं नाहीये.'

पाणी साचलेल्या रस्त्यांवरून दोन महिला एकमेकांना आधार देत, एकमेकींचा हात धरून पुढे जात होत्या. त्या त्यांच्या घराच्या दिशेने निघाल्या होत्या. पण पुढे खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं.

त्या घोळक्यात असलेला एकजण म्हणाला, "आमचं घर उभं आहे की पडलंय ते आम्हाला माहीतच नाही. आता ते आम्ही पुन्हा बांधू याचीही आम्हाला खात्री नाही. आता आम्ही एका शाळेत आसरा घेतलाय. देव बघतोय आमच्याकडे पैसेही नाहीयेत."

या पावसाने मोठा हाहाकार माजवला आहे. देशात हजारो घरं उद्ध्वस्त झाली आहेत. तर लाखो लोक बेघर झाले आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार जवळपास 10 अब्ज डॉलर्स इतकं नुकसान झाल्याची शक्यता आहे. या पावसाचा फटका पिकांनाही बसला असून यामुळे पाकिस्तानात अन्नधान्याच्या टंचाईची चिंता निर्माण झाली आहे.

अनेक बेघर लोकांनी कॅम्पमध्ये आसरा घेतला आहे. हे कॅम्प नौशेरापासून जवळच लावण्यात आले आहेत. या ठिकाणाहून बरेच जण आपल्या भागाकडे लक्ष ठेवून आहेत जेणेकरून पाणी उतरताच ते आपल्या घरांकडे परतू शकतील.

महापुराचा तडाखा रोजिना आणि त्यांच्या कुटुंबाला बसला आहे. रोजिना यांना सात मुलं आहेत. आपल्या मुलांना सोबत घेऊन त्या परिस्थितीशी लढा देत आहेत. त्या सांगतात, "हे इतकं वेदनादायी आहे की हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत."

दरवर्षी पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस पडतो. मात्र यावेळी बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टी झाली. नेहमीपेक्षा जास्त पाऊस यावर्षी पडला.

सरकारमधील काही मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, "आताचा पाऊस ही या दशकातील सर्वात मोठी अतिवृष्टी आहे. जागतिक उत्सर्जनात पाकिस्तानचं उत्सर्जन कमी प्रमाणात असूनही आम्हाला हवामान बदलाची किंमत मोजावी लागते आहे."

यासंबंधी परदेशी पत्रकारांसाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. उन्हाळ्याच्या सुरुवातीला पूर आला तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे आरोप पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी यावेळी फेटाळून लावले.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की, "आम्ही आमच्या अनुभवातून नक्कीच शिकू. आज आमच्या पडत्या काळात जागतिक समुदायाने आमच्या पाठीशी उभं राहायला हवं. आमच्या गरजा आणि आम्हाला मिळालेली मदत यात मोठं अंतर आहे."

सईदाबाद, दक्षिण पाकिस्तान

पुमझा फिहलानी

पाकिस्तानच्या काही भागांमध्ये पाऊस थांबला असला तरी मोठ्या प्रमाणावर हानी सुरूच आहे. उत्तरेत आलेला पूर आता दक्षिणेकडे वळला असून या भागात राहण्यासारखी परिस्थिती नाहीये.

या पुरात लाखो घरं उद्ध्वस्त झाली, लाखो लोक बेघर झाले आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सईदाबादमधल्या अनेक लोकांनी रस्त्यांच्या कडेला आसरा घेतलाय. हा रस्ता जिथं संपतो तिथं कंबरेएवढं खोल पाणी साचलं आहे.

काही अंतरावरून त्यांची घरं दिसत आहे. तर काही ठिकाणी पाणी घरांच्या खिडक्यांपर्यंत पोहोचलं आहे.

इथंच बानुल यांच्याशी भेट झाली. आपल्या 15 मुलांसोबत त्यांनी तिथल्याच एका तंबूत आसरा घेतलाय. या 15 मुलांमध्ये काही भाचे आहेत तर काही पुतणे. या पुरातून त्यांची मुलं वाचली याचा त्यांना आनंद आहे. पण आता या मुलांना खाऊ काय घालायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आ वासून उभा आहे.

बानुल सांगतात, "मागचा आठवडा झाला आम्ही इथंच राहतोय. आमच्याकडे घर नाहीये, नुसत्या तंबूत किती वेळ राहणार. आम्ही आमचा जीव वाचवलाय मात्र आम्हाला मदतीची नितांत गरज आहे.

"आम्ही शेतकरी आहोत. आमच्या शेतात कापूस मक्याचं पीक होतं. पीक काढणीला आलं होतं पण आता पूर आला आणि या पुरात सगळं उद्ध्वस्त झालंय. आमच्याकडे आता काहीच उरलं नाही, अन्नही नाही."

या कच्च्या रस्त्यावरून कधी कधी उपाशीपोटीचं फिरावं लागतं. इथं जेव्हा फूड ट्रक येतो तेव्हा तो अवघ्या काही क्षणात रिकामा होतो. प्रत्येकालाच खायला मिळतं असं नाही.

मदत पुरवताना तिथल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येतोय. मदत पुरवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध नाहीयेत.

मुख्य रस्त्यांपासून दूर अंतरावर असणाऱ्या लोकांना मदत पुरवताना अडचणी येत आहेत कारण आधीच कच्चे असलेले रस्ते आता पाण्याने भरले आहेत.

आंतरराष्ट्रीय मदत आल्यास ती पूरग्रस्त लोकांपर्यंत पोहचवताना कर्मचाऱ्यांची दमछाक होणार आहे. रस्ते खराब आहेत आणि हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले असताना त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवायची कशी हा मोठा प्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे उभा आहे.

पण आता या लोकांच्या सर्व आशा त्यांना मिळणाऱ्या मदतकार्यावरच आहेत. दुःखाची गोष्ट अशी की त्यांच्याकडून पुराने आधीच खूप काही हिरावून घेतलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)