भारतीय विद्यार्थिनीनं पाकिस्तानी मैत्रिणीसाठी लिहिलेली पोस्ट झाली व्हायरल

स्नेहा बिस्वास

फोटो स्रोत, SNEHA BISWAS / LINKEDIN

एका भारतीय तरुणीनी आपल्या पाकिस्तानी वर्गमैत्रिणीसाठी लिहिलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टचं सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसून येतं.

या दोन्ही विद्यार्थिनी हार्वर्ड बिझनेस स्कूल येथे शिक्षण घेत आहेत. या पोस्टमधील छायाचित्रात दोन्ही विद्यार्थिनींनी आपापल्या देशांचा झेंडा हातात धरून पोझ दिल्याचं दिसून येतं.

स्नेहा बिस्वास असं या फोटोतील भारतीय तरूणीचं नाव आहे. आपल्या पोस्टमध्ये ती लिहिते, "पाकिस्तानी विद्यार्थिनीशी मैत्री केल्यानंतर माझे अनेक पूर्वाग्रह नाहीसे झाले. शेजारी देशाबद्दल खूप साऱ्या गोष्टी समजूनही घेता आल्या."

सध्या भारतात पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटपटूंवर बंदी घालण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमध्येही भारतीय चित्रपटांवर बंदी आहे.

त्यामुळे आगळ्यावेगळ्या अशा या दोन मैत्रिणींच्या पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसतो.

एका व्यक्तीने या फोटोवर कमेंट करताना म्हटलं, "आम्ही एकमेकांमध्ये भिंत बांधून टाकली आहे. ती पाडणं हेसुद्धा आपल्याच हातात आहे."

दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटलं, "दोन्ही मैत्रिणींची मैत्री आयुष्यभर टिकून राहावी. सीमेच्या दोन्ही बाजूंकडील मुलींमध्ये या गोष्टीने बदल घडावा."

हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असलेली स्नेहा बिस्वास ही एक उद्योजक तरुणी आहे. तिने आपल्या पाकिस्तानी वर्गमैत्रिणीबाबतची पोस्ट लिंक्ड इन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिली होती. पण ही पोस्ट करताना स्नेहाने आपल्या पाकिस्तानी मैत्रिणीचं नाव मात्र लिहिलेलं नाही.

हार्वर्ड विद्यापीठ

फोटो स्रोत, Getty Images

पोस्टमध्ये स्नेहा म्हणते, "मी एका छोट्याशा शहरात लहानाची मोठी झाले. पाकिस्तान आणि त्याबद्दलचं माझं ज्ञान अतिशय तुटपुंजं होतं. पुस्तकं आणि माध्यमं यांच्या माध्यमातूनच मला त्याविषयी माहिती मिळायची. त्यातही पूर्वाग्रहदूषित माहितीचाच यामध्ये भरणा होता.

"यानंतर हॉर्वर्डमधील पहिल्याच दिवशी इस्लामाबादमधील माझ्या या मैत्रिणीला मी भेटले. तेव्हापासूनच तिच्याशी माझी जवळची मैत्री झाली आहे. आम्ही चहा आणि बिर्याणीचा आस्वाद घेत अनेक गप्पा मारल्या. तिच्या पार्श्वभूमीबद्दल अनेक गोष्टी मला समजून घेता आल्या. एका कॉन्झर्व्हेटिव्ह पाकिस्तानी कौटुंबिक पार्श्वभूमीत तिची वाढ झालेली असली तरी तिच्या कुटुंबाने तिच्या स्वप्नांना नेहमीच प्रोत्साहन दिलं."

स्नेहा पुढे लिहिते, "आपला आपल्या देशाबद्दलचा अभिमान मजबूत असला तरी लोकांमधील प्रेमाला भौगोलिक सीमा कधीच नसते. सीमा आणि ठिकाणं ही मनुष्यांनी बनवलेली आहेत."

अशा प्रकारे, स्नेहाच्या पोस्टमध्ये दोन देशांमधील बंधनं तोडून टाकण्याबाबत सांगण्यात आलं आहे. येत्या 14 आणि 15 ऑगस्ट रोजी अनुक्रमे पाकिस्तान आणि भारताचा स्वातंत्र्यदिन आहे. या पार्श्वभूमीवर स्नेहाने केलेल्या या पोस्टची चर्चा होणार नाही, तरच नवल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)