मुंबईच्या हमीदा बानोने पाकिस्तानात 20 वर्षे कशी घालवली?

फोटो स्रोत, Waliullah Maroof
- Author, शुमायला जाफरी आणि अमृता दुर्वे
- Role, बीबीसी प्रतिनिधी, इस्लामाबाद आणि मुंबईहून
20 वर्षांमागे भारतातली एक महिला अचानकच गायब झाली. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे ही महिला पाकिस्तानात असल्याचं समजलं.
या महिलेचं नाव आहे हमीदा बानो. दुबईमध्ये तुला स्वयंपाकिणीची नोकरी मिळवून देतो असं म्हणत एका रिक्रूटमेंट एजेंट 2002 मध्ये हमीदा बानोला भारत सोडायला लावलं.
हमीदा बानो सांगतात की, नोकरीचं आमिष देऊन मला फसवलं गेलं आणि मला पाकिस्तानात पाठवण्यात आलं.
हमीदा बानोचे कुटुंबीय मुंबईत राहतात. त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, ते गेले 20 वर्ष हमीदा बानोचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत.
शेवटी एका भारतीय आणि पाकिस्तानी व्यक्तीच्या मदतीने हमीदा बानोचा शोध लागला.
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी आणि भारतीय अशा दोन्ही नागरिकांना सीमा पार करण्यात अडचणी येत आहेत.
हमीदा बानो यांना पैशासोबतच स्थानिक माहिती नसल्यामुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला.
इतक्या वर्षांचा कालावधी लोटला मात्र हमीदा यांनी आपल्या मुलांना भेटण्याची आस काही सोडली नाही.
हमीदा बानो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या
पाकिस्तानमधील सामाजिक कार्यकर्ते वलीउल्लाह मारूफ यांनी जुलै महिन्यात हमीदा बानोंची मुलाखत घेतली. हमीदा बानोंची ही मुलाखत त्यांनी सोशल मीडियावर जशी टाकली तशा त्यांच्या आशा पल्लवित झाल्या.
मुंबईत राहणारे भारतीय पत्रकार खलफान शेख यांनी हा व्हिडिओ त्यांच्या वॉलवर शेअर केला. यातूनच त्यांना हमीदा बानोंच्या कुटुंबापर्यंत पोहोचणं शक्य झालं.

फोटो स्रोत, Aman SHaikh
या दोघांनीही बानो आणि त्यांची मुलगी यास्मिन शेख यांच्यात व्हिडिओ कॉलवरून भेट घडवून आणली.
या इमोशनल व्हिडीओ कॉलवर यास्मिन शेख आपल्या आईला विचारते, "कशी आहेस? तू मला ओळखलंस का? इतक्या वर्षात तू कुठे होतीस?"
यावर हमीदा बानो म्हणतात, "मला विचारू नकोस मी कुठं आहे? मी हे सगळं कसं सहन केलं? मला तुमची खूप आठवण येते. मी माझ्या इच्छेने इथं राहिलेले नाही, माझ्याकडे याशिवाय पर्याय नव्हता."
पाकिस्तानात 20 वर्ष कशी काढली?
मारूफला दिलेल्या मुलाखतीत हमीदा बानो सांगतात की, त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर त्यांच्या मुलांची सर्व जबाबदारी होती.
त्यांनी दोहा, कतार, दुबई आणि सौदी अरेबियामध्ये स्वयंपाकी म्हणूनही काम केलंय.
हमीदा सांगतात की, "2002 मध्ये त्यांनी दुबईमध्ये नोकरी मिळावी म्हणून एका रिक्रूटमेंट एजंटशी संपर्क केला होता."

फोटो स्रोत, Aman SHaikh
या महिलेने हमीदाकडे 20 हजार रुपये अॅडव्हान्स मागितले.
बानो त्यांच्या मुलाखतीत सांगतात, त्यांना दुबईऐवजी पाकिस्तानातील हैदराबाद शहरात आणण्यात आलं. तिथेच त्यांना तीन महिने कैदेत ठेवण्यात आलं.
त्यानंतर पुढच्या काही वर्षांत हमीदा यांनी कराचीमध्येच राहणाऱ्या एका व्यक्तीशी लग्न केलं. या व्यक्तीचाही कोव्हीड-19 साथीदरम्यान मृत्यू झाला.
सध्या हमीदा बानो आपल्या सावत्र मुलासोबत पाकिस्तानमध्ये राहतात.
यास्मिन सांगतात की, याआधी त्यांची आई परदेशात काम करायची तेव्हा नेहमी फोन करायची. मात्र 2002 मध्ये जसा त्यांनी भारत सोडला तसा कित्येक महिने फोनच आला नाही.
यास्मिन पुढे सांगतात की, "आम्ही या एजंटशी संपर्क केला तेव्हा ती म्हणाली की, तुमची आई अगदी ठीक आहे आणि तिला तुमच्याशी बोलायचं नाहीये. पुढे आम्ही या एजंटशी वारंवार संपर्क साधायचा प्रयत्न केला पण ती अचानकच गायब झाली."
हमीदा बानोचा शोध
वलीउल्लाह मारूफ हे पाकिस्ताच्या कराचीमधील स्थानिक मशिदीचे इमाम आहेत.
मारूफ सांगतात की, "साधारण 15 वर्षांपूर्वी या महिलेने (हमिदा बानो) आमच्या परिसरात एक दुकान सुरू केलं तेव्हाच मी तिला भेटलो असेन."
ते सांगतात, "मी तिला लहानपणापासून बघतोय. ती नेहमीच त्रासलेली दिसायची."
मागील अनेक वर्षांपासून मारूफ सोशल मीडियाच्या मदतीने अशा महिलांची मदत करत आहेत ज्यांची बांगलादेशातून तस्करी करून पाकिस्तानात आणलंय. या महिलांना त्यांच्या कुटुंबियांना भेटवण्याचं काम ते करतायत.
दुसऱ्या पतीच्या निधनानंतर हमीदा आपल्या सासूला सांगत होत्या की, मारुफला मलाही मदत करायला सांगा.

फोटो स्रोत, Waliullah Maroof
मारूफ सांगतात की, हमीदा बानोची कहाणी ऐकून ते भावूक झाले पण दोन देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे त्यांना थोडा संकोच वाटत होता.
मारूफ सांगतात, "माझ्या मित्रांनी मला सांगितलं की तू भारतापासून दूर राहावंसं, नाहीतर यातून बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागेल. पण हमीदा बानोची परिस्थिती बघून मला इतकं वाईट वाटलं की मी मदत करण्यापासून स्वतःला थांबवू शकलो नाही."
मारूफ पुढे सांगतात की, त्यांच्या या प्रयत्नासाठी ते कोणत्याही स्वरूपात आर्थिक मदत घेत नाहीत. या मुलाखतीत हमीदा बानोंनी आपल्या मुंबईच्या घरचा पत्ता आणि मुलांची नावं सांगितली होती.
त्यानंतर हमीदा बानोंचा हा व्हिडिओ भारतीय पत्रकार खलफान शेख यांनी शेअर केला. हा व्हिडीओ यास्मिन यांच्या 18 वर्षांच्या मुलाने पाहिला. यास्मिनच्या या मुलाने आपल्या आजीला पाहिलं देखील नव्हतं. कारण त्याचा जन्म हमीदा बानोंनी भारत सोडल्यावर झाला होता. पण यास्मिनने आपल्या आईला लगेच ओळखलं.
मारूफ सांगतात की, त्यांनी पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय. तसेच हमीदा बानो यांना भारतात नेण्यासाठी औपचारिक विनंती करण्यास सांगितलं आहे.
पण या सगळ्यात किती वेळ जाईल हे मारूफलाही माहीत नाही. पण हमीदा बानो आपल्या मुलांना भेटण्यासाठी डोळे लावून बसल्या आहेत.
त्या सांगतात की, "आपण आपल्या मुलांना पुन्हा कधी भेटू ही आशाच मी सोडली होती." सीमेपलीकडील परिस्थिती सुद्धा अशीच असल्याचं यास्मिन सांगतात.
त्या सांगतात, "आम्ही 20 वर्षांपर्यंत तिची वाट पाहिली. मी आता खूपच आनंदी आहे. जेव्हापासून मी तो व्हिडिओ पाहिलाय तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावरचं हसू कमीच होईन. ही एक वेगळीच फिलिंग आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








