You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बोरिस जॉन्सन सरकार ‘या’ सेक्स स्कँडलमुळे अडचणीत आलं आहे?
फक्त एका महिन्यात दुसऱ्यांदा ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचं कॉन्झर्व्हेटिव्ह सरकार पुन्हा एकदा अडचणीत आलं आहे. आणि गंमत म्हणजे आधीच्या अविश्वास ठरावात त्यांना तारून नेणारे ख्रिस पिंचर यांच्यामुळेच हे घडलंय.
एका दिवसात ऋषी सूनक आणि साजिद जावेद या दोन महत्त्वाच्या मंत्र्यांनी राजीनामे दिलेत. असं युकेमध्ये नेमकं घडतंय काय? युके सरकारला अडचणीत आणणारे ख्रिस पिंचर नेमके कोण आहेत?
जून 2022 मध्ये बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात पहिल्यांदा अविश्वासदर्शक ठराव मांडला गेला तेव्हा निमित्त होतं कोरोना काळात त्यांच्या टेन डाऊनिंग स्ट्रीट या सरकारी निवासस्थानात झालेली पार्टी. या पार्टीमुळे अनेक मंत्री आणि सचिवांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे अशी पार्टी भरवणं हे बेजबाबदारपणाचं असल्याचा ठपका जॉन्सन यांच्यावर ठेवण्यात आला होता.
पण, हे विश्वासमत ते थोडक्यात जिंकले. ते जिंकून देताना जॉन्सन यांच्या बाजूने खासदारांची मतं वळवण्याचं महत्त्वाचं काम ख्रिस पिंचर या त्यांच्या खूप जवळच्या सहकाऱ्याने आणि तेव्हाच्या डेप्युटी चिफ व्हिपने केलं होतं.
पण, आता याच ख्रिस पिंचर यांच्या वर्तणुकीमुळे जॉन्सन अडचणीत आले आहेत. पिंचर स्वत: समलैंगिक विवाहाचे पुरस्कर्ते आहेत आणि 2017च्या नोव्हेंबरमध्ये ग्रेट ब्रिटनचे आघाडीचे रोईंग खेळाडू अॅलेक्स स्टोरी यांनी त्यांच्याविरोधात लैंगिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप केला होता.
स्टोरी हे पिंचर यांच्याच कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य आहेत. सतत नकार देऊनही दारूच्या नशेत असलेल्या पिंचर यांनी आपलं ऐकलं नाही, असं स्टोरी म्हणाले होते. त्यानंतर डिसेंबर 2017मध्ये आणखी एक खासदार टॉम बेनक्लिनसॉप यांनीही असाच आरोप केला.
ब्रिटिश संसदेचं कामकाज योग्य पद्धतीने चालवण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीवरच असा आरोप होणं ही गंभीर गोष्ट होती. त्यामुळे हे प्रकरण तेव्हा 'वेस्टमिन्स्टर सेक्श्युअल अॅलिगेशन्स' या नावाने खूप गाजलं होतं. याच प्रकरणांवरून जून 2022मध्ये त्यांनी व्हिप पदाचा राजीनामाही दिला होता. पण, त्यानंतर एका महिन्याने पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याबाबतीत एक विचित्र कबुली दिली आहे.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काय म्हटलंय-
पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले, "हो. मी हे मान्य करतो की, ती माझी चूक होती. आता विचार केला की मला कळतं, माझं वागणं चुकीचं होतं. आणि माझ्या निर्णयामुळे ज्यांना मनस्ताप झाला त्यांची मी माफी मागतो."
ख्रिस पिंचर यांच्याविरोधात अयोग्य वर्तनाची तक्रार असताना आणि तक्रार झाल्याचं माहीत असताना त्यांची व्हिपपदी नेमणूक केली ही गोष्ट आता बोरिस जॉन्सन यांनी उघडपणे मान्य केलीय आणि त्यावरूनच नवा वादंग माजला आहे.
जॉन्सन यांच्यानंतर पक्षातले दोन महत्त्वाचे नेते असलेले ऋषी सूनक आणि साजिद जावेद यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिले.
ते देताना सूनक म्हणाले की, 'विश्वास राहिलेला नसताना एकत्र काम करता येणार नाही.'
जावेद म्हणाले, 'माझ्या अंतर्मनाला मी या सरकारमध्ये काम करणं पटत नाही.'
जॉन्सन सरकार का अडचणीत आलं?
मागच्या काही महिन्यात बोरिस जॉन्सन यांना त्यांच्याच कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाकडून अनेकदा विरोध झालेला आहे. मंत्र्यांचं राजीनामा सत्रही सुरूच आहे. यामागची महत्त्वाची कारण अशी आहेत-
- कोरोना काळात पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेली ख्रिस्मस पार्टी आणि त्याची झालेली पोलीस चौकशी
- वाढते कर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीविषयी सरकारची धोरणं याला पक्षातूनच होत असलेला विरोध
- या सगळ्या घडामोडींमुळे त्यांचं मंत्रिमंडळ आणि विविध समित्यांमधून अनेक लोकांनी राजीनामे दिले आहेत. पक्षाचे उपाध्यक्ष बिम अॅफोलमी यांनी तर टीव्हीवर सुरू असलेल्या लाईव्ह कार्यक्रमातच राजीनामा जाहीर केला
- मागच्या महिन्यात झालेल्या दोन पोटनिवडणुकांमध्येही कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळेही जॉन्सन यांच्या नेतृत्वावर टीका होतेय.
मागच्या महिन्यात बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात आलेला अविश्वास प्रस्ताव हा पक्षांतर्गत म्हणजे कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाने आणलेला होता आणि त्यात 59% मतं मिळवून जॉन्सन यांनी एकदा आपली गादी वाचवली आहे. शिवाय पक्षाच्या घटनेप्रमाणे एकदा अविश्वास प्रस्ताव जिंकल्यानंतर पुढचं एक वर्ष अशा नेत्याविरोधात पुन्हा अविश्वास ठराव आणता येत नाही.
पण, आता पक्षाची घटनाच बदलण्याची मागणी होतेय. आणि महत्त्वाचं म्हणजे पक्षांतर्गत असलेला विरोध वाढत जाऊन पक्षाबाहेरही झिरपतोय. म्हणजेच लेबर आणि लिबरल पार्टींमध्येही जॉन्सन सरकारबद्दल असंतोष आहे. अशावेळी बोरिस जॉन्सन यांच्यासमोरचं संकट किती मोठं आहे याचं विश्लेषण केलंय बीबीसीचे राजकीय संपादक ख्रिस मेसन यांनी,
"पंतप्रधानपदी बोरिस जॉन्सन आणखी किती काळ राहू शकतील हे त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांवर आता अवलंबून आहे. म्हणजे आणखी काही मंत्री राजीनामे देतात का? किती मंत्री त्यांच्याबरोबर राहतात, यावर सगळं अवलंबून आहे. आणि त्यासाठी घोडामैदान जवळच आहे," असं बीबीसीचे राजकीय संपादक ख्रिस मेनन यांनी साविषयी सांगितलं.
बोरिस जॉन्सन यांनी अजूनही लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. इतक्यात राजीनामा देण्याचा त्यांचा विचार नाही. पण, ग्रेट ब्रिटनमध्येही हे सत्तानाट्य आणखी काही काळ गाजणार हे नक्की.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)