बोरीस जॉन्सन यांचं पद सुरक्षित, 59 टक्के मतं मिळवत जिंकला विश्वासदर्शक ठराव

युकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. हुजूर पक्षाच्या खासदारांचं बहुमत जॉन्सन यांच्या पारड्यात पडलंय.

जॉन्सन यांना 59 टक्के मतं मिळाली आहेत. याचाच अर्थ आता पुढचं वर्षभर तरी जॉन्सन यांच्या नेतृत्वाला आव्हान मिळणार नाही.

एकूण खासदारांपैकी 211 खासदारांनी जॉन्सन यांच्या बाजूने मतदान केलं, तर 148 खासदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं.

बोरीस जॉन्सन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकणं ही 'निर्णायक' गोष्ट असल्याचं म्हटलं.

त्यांनी म्हटलं की, हा परिणाम अतिशय चांगला आणि खात्रीशीर आहे. हा निकाल म्हणजे माध्यमांमध्ये सुरू असलेल्या उलटसुलट गोष्टी मागे टाकत पुढे जाण्याची संधी आहे.

या निकालामुळे जॉन्सन यांचं पद सुरक्षित राहिलं असलं तरी विश्लेषकांच्या मते त्यांच्या विरोधात ज्या पद्धतीनं असंतोष दिसला त्यावरून त्यांचं नेतृत्व तितकंस सशक्त राहिलं नसल्याचं दिसत आहे.

माजी पंतप्रधान थेरेसा मे यांनाही 2018 साली विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी त्यांच्या बाजूने 63 टक्के मतं पडली होती. अर्थात, सहा महिन्यांनी थेरेसा मे यांना ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यावाच लागला होता. बोरीस जॉन्सन यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी तुलनेनं कमी आहे.

बोरीस जॉन्सन यांनी 2019 साली पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारली होती.

रविवारी (5 जून) महाराणी एलिझाबेथ यांच्या राज्यारोहण सोहळ्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमादरम्यानच बोरीस जॉन्सन यांना अविश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागू शकतं हे स्पष्ट झालं होतं.

कोरोनाच्या कठीण काळात पंतप्रधानांनी केलेल्या पार्ट्यांसंबंधीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर जॉन्सन यांच्या विरोधातील खदखद वाढली होती.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना अविश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागू शकतं अशा चर्चा सुरू असतानाच सोमवारी (6 जून) सर्व खासदार वेस्टमिन्स्टरला आले होते.

हुजूर पक्षाच्या काही खासदारांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं की, या आठवड्यात मतदान होऊ शकतं. कारण लॉकडाऊनमधील पार्टीच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांकडे सातत्यानं राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

वाणिज्य मंत्री पॉल स्कली यांनी चॅनल फोरशी बोलताना म्हटलं होतं की, "जरी अविश्वासाचा ठराव आला तरी जॉन्सन त्याचा आत्मविश्वासाने सामना करतील आणि विरोधकांना हरवतील."

ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी ग्रँट शाप्स यांनीही बीबीसीशी बोलताना म्हटलं की, आपल्या स्वतःच्याच खासदारांमध्ये पंतप्रधान विश्वास मत गमावणार नाहीत.

मध्यावधी विश्रांतीसाठी खासदार त्यांच्या मतदारसंघात परतल्यापासून दहा दिवसांमध्येच आपलं पंतप्रधानपद वाचवण्यासाठी जॉन्सन यांना संघर्ष करावा लागू शकतो अशा चर्चांना सुरुवात झाली होती.

अविश्वास प्रस्ताव मांडला जाण्यासाठी हुजूर पक्षाच्या 54 खासदारांनी सर ग्रॅहम ब्रँडी यांच्याकडे तशी मागणी करणारं पत्र देणं गरजेचं असतं.

जवळपास 28 खासदारांनी जाहीरपणे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी पायउतार व्हावं अशी मागणी केली होती.

वाणिज्य मंत्री पॉल स्कली यांनी म्हटलं होतं की, "जरी अविश्वासाचा ठराव आला तरी जॉन्सन त्याचा आत्मविश्वासाने सामना करतील आणि विरोधकांना हरवतील. पण जे काही होईल, आपल्याला पुन्हा एकदा प्रशासनाकडे लक्ष द्यायला हवं. लोकांकडून आपल्या ज्या अपेक्षा आहेत, त्या गोष्टींवर काम करायला हवा...दोन वर्षांपूर्वी काय झालं याकडे मागे वळून पाहायला नको."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)