सेक्स पॉवर : 'हल्ली बरेच पुरुष निळी गोळी घेणं पसंत करतात कारण...'

जोडपं

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, होसाम फाजुला
    • Role, बीबीसी अरेबिक

ईजिप्तची राजधानी कैरोच्या मध्यभागी असणाऱ्या प्रसिद्ध बाब अल-शरिया चौकात रबी अल-हबाशी यांचं औषधांचं दुकान आहे. रबी अल-हबाशी वनौषधी बनवतात आणि त्या विकतात. आपल्या दुकानातलं एक खास औषध आम्हाला दाखवत ते म्हणाले, हे 'जादुई मिश्रण' आहे.

कामोत्तेजक म्हणजेच सेक्स पॉवर वाढवणारी औषधं ते बनवतात आणि त्यामुळे कैरोमध्ये त्यांनी चांगलं नावही कमावलं आहे. मात्र, गेल्या काही वर्षात ग्राहकांची गरज बदलत असल्याचं त्यांचं निरीक्षण आहे.

ते म्हणतात, "हल्ली बरेच पुरुष निळी गोळी (ब्लू पिल) पसंत करतात आणि परदेशी कंपन्या त्यांना ती गोळी पुरवतात."

अनेक अभ्यासांनुसार अरब तरुण वायग्रा म्हणून ओळखलं जाणारं सिल्डेनाफिल, वॉर्डेनाफिल (लेविट्रा, स्टॅक्सिन) आणि टाडालाफिल (सियालिस) सारखी औषधं वापरत आहेत.

ईजिप्तमध्ये कामोत्तेजना देणाऱ्या औषधांचा खप वाढला असल्याचे पुरावे असूनही तरुण उघडपणे ते स्वीकारत नाहीत. ईजिप्त आणि बहारिनच्या रस्त्यांवर बीबीसीने बातचीत केलेल्या तरुणांपैकी बहुतांश तरुणांनी आपण अशी काही औषधं घेतो, हे मान्यच केलं नाही.

इतकंच नाही तर त्याविषयी माहिती नसल्याचंही अनेकांचं म्हणणं होतं. खरंतर यात आश्चर्य वाटावं असं, काही नाही. अनेकांनी तर 'हा विषय नैतिकतेला धरून नसल्याचं' सांगत या विषयावर बोलणंही टाळलं.

दुकानदार
फोटो कॅप्शन, रबी अल हबाशी (दुकानदार)

2012 साली करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार अरब जगात नपुंसकतेवर औषध घेणाऱ्या देशामध्ये ईजिप्त दुसऱ्या क्रमांकावर आहे. सौदी अरेबिया पहिल्या स्थानी आहे.

'अल रियाध' या सौदी वृत्तपत्राने हा अहवाल प्रसिद्ध केला होता. या वृत्तानुसार सौदी अरेबियाने त्यावेळी कामेच्छा वाढवणाऱ्या औषधांवर एका वर्षात तब्बल दीड अब्ज डॉलर्स खर्च केले होते. त्यावेळी रशियाची लोकसंख्या सौदी अरेबियापेक्षा पाच पट जास्त होती. मात्र सौदी अरेबियामध्ये या गोळ्यांचा वापर रशियाच्या तुलनेत दहा पट जास्त होता.

अरब जर्नल ऑफ यूरोलॉजीने अलीकडेच एक अभ्यास केला. या अभ्यासात सहभागी झालेल्या तरुणांपैकी तब्बल 40% तरुणांनी आयुष्यात कधीतरी वायग्रासारखं औषध वापरलं होतं.

इजिप्तनेही या यादीत वरचं स्थान कायम ठेवलं आहे. 2021 च्या सरकारी आकडेवारीनुसार ईजिप्तमध्ये दरवर्षी 1 कोटी 27 लाख डॉलर्सची लैंगिक सुखासाठीच्या औषधांची विक्री होते. हे प्रमाण ईजिप्तच्या संपूर्ण फार्मास्युटिकल मार्केटच्या 2.8% इतकं आहे.

पुरुषांवरील सामाजिक दबाव

अर्थातच काहींना दीर्घकाळ कामसुख हवं असतं.

2014 साली सेक्स पॉवर वाढवणारं अल-फनकौश नावाचं औषध चॉकलेटच्या स्वरुपात ईजिप्तच्या किराणा दुकानांमध्ये दाखल झालं. एका इजिप्शियन पाउंडला हे एक चॉकलेट मिळायचं.

पण, बाजारात आल्यानंतर थोडेच दिवसात या चॉकलेटवर बंदी आली. हे चॉकलेट मुलांना विकलं जात असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आणि त्यानंतर सुरक्षा दलांनी चॉकलेट उत्पादकाला अटक करत चॉकलेटवर बंदी आणली.

पुरूष व्हायग्रा घेताना

फोटो स्रोत, Getty Images

तरुणांपेक्षा वृद्ध या औषधांचा जास्त वापर करतात, असा समज आहे. मात्र येमेनच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून 20 ते 45 वयोगटातले पुरूष हे औषध सर्वाधिक वापरत असल्याचं स्पष्ट होतं.

येमेनमध्ये गेली अनेक दशकं हुती बंडखोरांनी विद्रोही चळवळ उभारली आहे. 2015 पासून सौदीच्या नेतृत्त्वाखालील लष्करी युती आणि हुती बंडखोर यांच्यात गृहयुद्ध सुरू आहे. हे गृहयुद्ध सुरू झाल्यापासून तरुणांमध्ये वियाग्रा आणि सियालिसचा पार्टी ड्रग्स म्हणून वापर वाढल्याचं स्थानिक अहवाल सांगतात.

मात्र, ही औषधं 'उत्तेजक नाहीत' आणि बहुतेक केसेसमध्ये 'वृद्धांना येणाऱ्या समस्यांमध्ये' ती वापरली जात असल्याचं युरोलॉजी आणि रिप्रॉडक्टिव्ह सर्जरीचे ट्युनिशियाचे प्राध्यापक मोहम्मद स्फॅक्सी यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

दरम्यान, अरब तरुण या गोळ्यांकडे वळण्यामागे 'सांस्कृतिक पगडा' हे मोठं कारण असल्याचं पश्चिम आशियातील लैंगिकतेविषयक तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

व्हायग्रा

फोटो स्रोत, Getty Images

ईजिप्शियन-ब्रिटिश पत्रकार आणि 'Sex and the Citadel: Intimate Life in a Changing Arab World'च्या लेखिका शेरीन एल फेकी सांगतात, "या औषधांचा खप वाढण्यामागचं कारण कदाचित तरुण अरब पुरुषांना भेडसावणाऱ्या एका मोठ्या समस्येकडे बोट दाखवतं."

पश्चिम आशियातील लैंगिक समानतेवरील 2017 सालच्या सर्वेक्षणाचा दाखल देत एल फेकी म्हणतात, "या सर्वेक्षणात सहभागी जवळजवळ सर्वच पुरुषांना भविष्याची आणि ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करतील, याची काळजी वाटत होती. पुरुषांवरील सामाजिक दबावाविषयीही अनेकजण बोलले. तर सर्वेक्षणात सहभागी अनेक स्त्रिया "पुरुष आता कसे पुरुष राहिले नाहीत" याबद्दल बोलल्या."

त्या पुढे म्हणाल्या "पुरुष असणं म्हणजे प्रचंड दबावाखाली असणं. लैंगिक सामर्थ्याला पुरुषत्वाशी जोडून बघितलं जातं. त्यामुळे संभोगावेळी पुरुषाचा परफॉर्मंस कसा आहे, याचा बराच ताण इथल्या पुरुषावर असतो."

अरब जगात परफॉर्मंससंबंधी पुरुषांवर असलेल्या ताणामागे गैरसमज आणि पोर्नोग्राफीमुळे वाढलेल्या अपेक्षा ही महत्त्वाची कारणं असल्याचं एल फेकी सांगतात. त्या म्हणतात, "त्यामुळे तरुणांच्या मनात पौरुषत्वाविषयी भलत्याच कल्पना असतात."

ऐतिहासिक समज

लैंगिक गरजांसाठी औषधांचा वापर हा अरब समाजात मॉडर्न मानला जात असला तरी कामोत्तेजक औषधांचा वापर संपूर्ण अरब संस्कृतीच्या इतिहासाचा भाग राहिला आहे.

14 व्या शतकातील प्रसिद्ध इस्लामिक विद्वान आणि लेखक इब्न कय्यम अल-जावझिया यांनी त्यांच्या एका पुस्तकात लैंगिक इच्छा वाढवण्यासाठीच्या पाककृती दिल्या आहेत.

सेक्सः अरब देशांमधल्या 'कामसूत्रा'बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

फोटो स्रोत, Getty Images

शेरीन एल फेकी सांगतात की अरबी परंपरा आणि इस्लामिक वारशामध्ये "फार पूर्वीपासूनच असं मानलं गेलं आहे की स्त्रियांना लैंगिक इच्छा अधिक असते" आणि "स्त्रीला खुश ठेवण्यासाठी पुरुषाला त्याची लैंगिक कार्यक्षमता सुधारण्याची" गरज वाटते.

हा समज ऑट्टोमन साम्राज्यापासून असल्याचं दिसून येतं. सुलतान सेलीम प्रथम यांनी ईजिप्तवर 1512 ते 1520 या काळात राज्य केलं होतं. त्यांच्या कार्यकाळात लेखक अहमद बिन सुलेमान यांनी सुलतानच्या सांगण्यावरून 'Sheikh's Return To Youth' हे पुस्तक लिहलं होतं. हे पुस्तक म्हणजे लैंगिक उपचारांसाठी आणि स्त्री-पुरुषांमधली कामेच्छा वाढवण्यासाठीची औषधं आणि हर्बल पाककृतींचा विश्वकोश होता.

आज शेकडो वर्षांनंतरही अनेक तरुण अरब लैंगिक समाधानासाठीच्या औषधांकडे वळत आहेत आणि त्यांच्यासाठीची बाजारपेठही मोठी आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)