रशियावर लादलेले निर्बंध अविचारी आणि वेडेपणाचे-पुतिन

पुतिन, रशिया

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेले निर्बंध अविचारी आणि वेडेपणाचे आहेत असं मत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्यक्त केलं.

सेंट पीटर्सबर्ग इथे झालेल्या परिषदेत बोलताना पुतिन म्हणाले, रशियाच्या विरोधात ब्लिटक्रीग पद्धतीने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे प्रयत्न यशस्वी होणार नव्हते. रशियापेक्षा हे निर्बंध लागू करणाऱ्या देशांना हानीकारक आहेत असा इशाराही त्यांनी दिला.

पाश्चिमात्य देश रशियाला युक्रेनवरील आक्रमणासाठी शिक्षा देतानाच दुसरीकडे या युद्धाचा स्वत:च्या देशावर परिणाम कमीत कमी व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. रशियावर निर्बंध लागू केल्यामुळे युरोपियन युनियन 400 बिलिअन डॉलर्स गमावू शकतं असा दावा पुतिन यांनी केला.

युद्धामुळे युरोपीय देशांनी लागू केलेल्या निर्बंधामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो असं पुतिन यांच्याच अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं. रशियाच्या सेंट्रल बँकेचे गव्हर्नर एल्व्हिरा नबियुलिना यांनी सांगितल्याप्रमाणे देशाच्या जीडीपीपैकी 15 टक्क्यांना या निर्बंधाचा फटका बसू शकतो.

आम्ही युक्रेनवर आक्रमण केलेलं नाही- रशिया

रशियाने युक्रेनवर हल्ला चढवून जवळपास चार महिन्यांचा कालावधी लोटला. या काळात हजारो नागरिक मारले गेले, शहरच्या शहरं उध्वस्त झाली, लाखो युक्रेनियन नागरिकांना आपलं घरदार, देश सोडून परागंदा व्हावं लागलं.

संपूर्ण जगाने हे पाहिलं. मात्र रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅव्हरोव म्हणतात, "आम्ही युक्रेनवर आक्रमण केलेलं नाही."

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव

फोटो स्रोत, BBC

गुरुवारी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोणतीही भीडभाड न बाळगता हा दावा केलाय.

24 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं. त्यानंतर रशियाच्यावतीने फारच कमी लोकांनी मुलाखती दिल्या. सर्गेई लॅव्हरोव हे त्यांपैकीच एक आहेत.

आपल्या दाव्याचं समर्थन करताना सर्गेई लॅव्हरोव म्हणतात, "युक्रेनला नाटोमध्ये सहभागी करून घेणं गुन्हा आहे, हे समजावून सांगण्यासाठी पश्चिमात्य देशांनी आमच्यापुढे कोणताच पर्याय ठेवला नाही. शेवटी आम्हाला एक विशेष लष्करी ऑपरेशन जाहीर करावं लागलं. आम्हाला युक्रेनमधून नाझीवाद हटवायचा होता."

Sergei Lavrov talking to the BBC

मे महिन्यात तर सर्गेई लॅवरोव्ह यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची तुलना जर्मन हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरशी करून वादाला तोंड फोडले होतं. लॅवरोव्ह म्हणाले होते की, हिटलर आणि झेलेन्स्की दोघेही नाझी आहेत.

लॅवरोव्ह यांना मुलाखतीत युक्रेनच्या चेर्निहाइव्ह भागातील याहिदने या युक्रेनियन गावाविषयी सांगण्यात आलं. संयुक्त राष्ट्राने दिलेल्या अहवालात असं म्हटलं होतं की, या गावातील 360 रहिवाशांना रशियन सैन्याने 28 दिवस तळघरात डांबून ठेवलं होतं. यात 10 वृद्ध लोक मरण पावले.

यावर लॅव्हरोव्ह यांना विचारण्यात आलं की, तुम्ही अशा पद्धतीने नाझींशी लढत होता का?

यावर लॅव्हरोव्ह यांनी खेद व्यक्त केला आणि ते म्हणाले, "या पाश्चिमात्यांकडून पसरवल्या जाणाऱ्या बातम्या खोट्या आहेत."

मागील 18 वर्षांपासून लॅव्हरोव्ह हे आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियाचं प्रतिनिधित्व करतायतं. पाश्चिमात्य देशांनी रशियन व्यक्तींवर जे निर्बंध लादले आहेत त्यात लॅव्हरोव्ह आणि त्यांची मुलगीसुद्धा आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)