टर्कीने बदललं आपलं नाव, आता हा देश ओळखला जाईल 'या' नावाने

टर्की

फोटो स्रोत, @MEVLUTCAVUSOGLU

    • Author, टीफनी वर्थहायमर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

रिब्रँडिंग हा शब्द अनेकदा कानावर आला असेल. बऱ्याचदा मोठे मोठे ब्रँड्स आपलं नाव बदलतात. ताजं उदाहरण म्हणजे फेसबुकच्या मुख्य कंपनीचं नाव मेटा केलं गेलं.

पण कधी एखाद्या देशाने आपलं नाव बदलल्याचं ऐकलं आहे? नुकतंच असं झालं आहे.

टर्की (तुर्की, तुर्कस्तान) देशाने आपलं नाव बदलून तुर्किये असं केलंय. म्हणजे याचा मराठी उच्चार तुर्किये शब्दाच्या जवळपास जाणारा आहे, तर याचं स्पेलिंग आता Türkiye असं असेल.

संयुक्त राष्ट्रातही या देशाचं नाव आता तुर्किये असेल. या देशाच्या अधिकृत विनंतीला मान्यता दिली आहे.

तुर्कियेच्या राष्ट्रपतींनी मागच्या वर्षी देशाचं रिब्रॅडिंग करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत आता अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची नावं बदलण्यात येतील.

"तुर्किये या नावातून टर्कीश लोकांची संस्कृती, मुल्यं आणि संस्कार यांचं योग्य दर्शन होतं," असं अध्यक्ष रेसीप तय्यीप एर्दोगान यांनी डिसेंबर महिन्यात म्हटलं होतं.

टर्कीश लोक आपल्या देशाला टर्कीये म्हणूनच संबोधतात पण तरीही इंग्रजी वळणाचा टर्की हा उच्चार बऱ्यापैकी प्रचलित आहे.

तुर्कियेचं सरकारी चॅनल टीआरटीने मागच्या वर्षी नाव बदलण्याची घोषणा झाल्यानंतर लगेच आपल्या नावातही बदल केला. तसंच हे नाव का बदललं हेही समजावून सांगितलं.

ऑडिओ कॅप्शन, ऐका गोष्ट दुनियेची पॉडकास्ट - धर्माचं राजकारण, महागाई आणि टर्कीच्या निवडणुका

टर्की किंवा तुर्किये हे नाव एका पक्ष्यावरून आलंय, जो पाश्चात्य सणांच्यावेळी, उदाहरणार्थ ख्रिसमस, नववर्ष आणि थँक्सगिव्हींगच्या वेळी खातात.

पण केंब्रिज इंग्लिश डिक्शनरीत या शब्दाचा अर्थ 'तोंडावर आपटणं' किंवा 'मूर्ख माणूस' असा आहे याकडेही अनेकांनी लक्ष वेधलं.

आता या रिब्रँडिंग योजनेअंतर्गत निर्यात केल्या जाणाऱ्या उत्पादनांवर 'मेड इन तुर्किये' असं लिहिलं असेल तर पर्यटनाच्या जाहिरातींवर 'हॅलो तुर्किये' असं लिहिलं असेल.

टर्कीने बदललं आपलं नाव, आता हा देश ओळखला जाईल 'या' नावाने

फोटो स्रोत, Getty Images

नाव बदलण्याच्या कृतीला संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी याचं समर्थन केलंय तर इतरांचं म्हणणं आहे की, सध्याच्या आर्थिक आणीबाणीत लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे.

पण देशांनी आपली नावं बदलणं ही घटना दुर्मिळ नाहीये.

2020 मध्ये नेदरलँण्ड्सने आपलं हॉलंड हे नाव बाद केलं होतं. मॅसिडोनिया देशाने आपलं अधिकृत नाव उत्तर मॅसिडोनिया केलं होतं कारण त्यांचा ग्रीसशी वाद सुरू होता.

त्या आधी 2018 मध्ये स्वाझीलँडने आपलं नाव बदलून इस्वातिनी असं केलं होतं.

थोडं इतिहासात मागे जायचं ठरवलं तर बरीच उदाहरणं आहेत. जसं इराणचं नाव आधी पर्शिया होता, थायलंडला सयाम म्हणून ओळखायचे तर झिंब्बाव्वेचं जुनं नाव ऱ्होडेशिया होतं.

तुर्कियेने आपलं नाव बददलं आहे हे लोकांच्या कितपत पचनी पडेल हे पहायला थोडा काळ जावा लागेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)