इसरा बिलगिच: एर्तरुलच्या अभिनेत्रीची 'ब्रा'ची जाहिरात, पाकिस्तानात उडाला गोंधळ

फोटो स्रोत, Instagram
एर्तरुल गाजी या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये हलीमे सुल्तान म्हणजेच राणीची भूमिका साकारणारी टर्किश अभिनेत्री एसरा बिलगिचने एका इनर गार्मेंट कंपनीची जाहिरात केली आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर गोंधळ उडाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
महिलांच्या अंतर्वस्त्रांची एक 36 सेकंदांची जाहिरात आहे. यामध्ये मॉडेल एका प्रसिद्ध ब्रँडच्या 'ब्रा'चं प्रमोशन करताना दिसून येते. याच जाहिरातीवरून पाकिस्तानात सध्या गोंधळ उडालेला आहे. पाकिस्तानी नागरिक सोशल मीडियावर या जाहिरातीवर जोरदार टीका करत असल्याचं दिसून येत आहे.
पाकिस्तानी सोशल मीडिया युझर्सचा आक्षेप जाहिरातीपेक्षाही जास्त मॉडेलवर आहे. कारण या जाहिरातीतील मॉडेल दुसरी तिसरी कुणी नसून इसरा बिलगिच ही आहे.
मूळची टर्कीची असलेली इसरा बिलगिच ही एक मॉडेल तसंच अभिनेत्रीही आहे. तिने टर्की येथील 'दिरलिस एर्तरुल' (एर्तरुल गाजी) या मालिकेत हलीमे सुल्तान यांची भूमिका केली होती. टर्की आणि परिसरातील ऑटोमन साम्राज्यावर आधारित याची कहाणी आहे. पाकिस्तानात हा शो प्रचंड लोकप्रिय आहे.
बिलगिचने सदर जाहिरात तीन दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रसिद्ध केली. इन्स्टाग्रामवर या जाहिरातीला दहा लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले. तसंच साडेसात हजारांपेक्षाही जास्त युझर्सनी ही जाहिरात शेअर केली. यापैकी बहुतांश कॉमेंट्स हे पाकिस्तानी युजर्सचे आहेत.
इसरा बिलगिच कोण आहे?
एर्तरुलची गाजीची प्रेमिका आणि नंतर पत्नीची भूमिका बजावणाऱ्या बिलगिचचा जन्म 1992 मध्ये टर्कीची राजधानी अंकारा येथे झाला.

फोटो स्रोत, Instagram
तिने हेजतेप युनिव्हर्सिटी येथून पुरातनशास्त्राची पदवी प्राप्त केली. नंतर अंकारा येथील बिलकिनेत युनिव्हर्सिटी येथून आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयात पदवी मिळवली. आता ती सध्या कायद्याचं शिक्षण घेत आहे.
दिरलिस एर्तरुल मालिकेत हलीमे सुल्तान ही तिची पडद्यावरची पहिलीच भूमिका होती. याच भूमिकेने बिलगिचला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

फोटो स्रोत, facebook
2018 साली तिने एर्तरुलमध्ये काम करणं सोडून दिलं. यानंतर तिने एका चित्रपटात काम केलं. सध्या रामो नामक एका क्राईम थ्रिलर सिरीजमध्ये ती मुख्य भूमिकेत आहे.
हलीमे सुल्तानची भूमिका ही आपल्याला मिळालेली सर्वाधिक कठीण आणि जबरदस्त संधी होती, असं बिलगिचने म्हटलं होतं.
इसरा बिलगिचने 2017 मध्ये टर्कीच्या राष्ट्रीय फुटबॉल संघातील खेळाडू गोखान तोरे याच्याशी विवाह केला होता.
पण दोनच वर्षांत 2019 मध्ये त्यांचं वैवाहिक नातं संपलं आहे.
'हलीमे तुम्हाला लाज वाटली पाहिजे'
समीर खान यांनी लिहिलं, "तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्हाला जर स्वतःला 'ब्रा'मध्ये दाखवायचं होतं, तर हलीमे यांची भूमिका तुम्ही करायची नव्हती."
पाकिस्तानी युझर्सकडून बिलगिचचं ट्रोलिंग केलं जाण्याची ही काय पहिलीच वेळ नाही.
हलीमेची भूमिका आणि बिलगिचचं वैयक्तिक आयुष्य जोडून तिच्यावर यापूर्वीही अनेकवेळा निशाणा साधण्यात आला आहे.
चश्मिश शेख नामक अकाऊंटवरून लिहिलं गेलं, "हलीमे, हा काय प्रकार झाला?"
अशाच प्रकारे हम्माद नामक एका वापरकर्त्याने म्हटलं, "आता ही कसली जाहिरात करताय हलीमेताई?"

फोटो स्रोत, TRTERTUGRUL
दुसऱ्या एका युझरने लिहिलं, "हलीमेताई, असं करू नका, आम्हाला वाईट वाटतं."
बिलालने विनोद करत म्हटलं, "मी पाकिस्तानींची प्रतिक्रिया पाहत आहे."
पण पाकिस्तानी युझर्सकडून फक्त टीका होतेय, असंही नाही. काही पाकिस्तानी नागरिक ट्रोलिंग न करण्याचं आवाहन करत आहेत.
याशिवाय, परदेशातील काही वापरकर्तेही पाकिस्तानी युझर्सना नकारात्मक कॉमेंट्स करण्यापासून रोखत आहेत.

फोटो स्रोत, TRTERTUGRUL
डेनिस मार्क यांनी लिहिलंय, "प्रिय पाकिस्तानी मित्रांनो, हे पाकिस्तान नाही, टर्की आहे. महिला जाहिरातींमध्ये अशा प्रकारचा पोशाख करू शकतात. नाराज होऊन उगाच चुकीच्या कॉमेंट्स करू नका."
ट्विटरवर नजर टाकल्यास तिथंही अशाच प्रकारची परिस्थिती आहे. किंबहुना यापेक्षा जास्त आक्रमक कॉमेंट्स तिथं वाचायला मिळत आहेत.
आमना जावेद यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "या सगळ्या कॉमेंट्समधील सर्वांत मजेदार कमेंट्स म्हणजे, 'तुम्हाला जर पैसेच पाहिजे आहेत, तर पाकिस्तानकडून घ्या.' असं एका युझरने म्हणणं होय."
त्यांनी पुढे लिहिलं, "पाकिस्तानी पुरुष मंडळी इसराला लज्जास्पद वागणूक देत आहेत, कारण त्यांनी सेट केलेल्या महिलाविषयक आदर्शांपासून ती वेगळी झाली आहे."

फोटो स्रोत, Twitter
फातिमा नामक एका युझरने लिहिलं, "मी पैज लावते, पाकिस्तानी कंपन्यांसोबत काम केल्यामुळे तसंच पाकिस्तानात आपला शो प्रदर्शित केल्याबद्दल ती पश्चाताप करत असेल."
पण ताहीर नामक एका युझऱने म्हटलं, "तुमच्याकडे नेहमीच एखाद्या गोष्टीकडे न पाहण्याचा पर्याय उपलब्ध असतो. इसरा मॉडेलिंग करते, ते तिचं काम आहे. मग तिच्या जाहिराती पाहून तुम्ही चिंताग्रस्त का होता?"
याच प्रकारे, पाकिस्तानातील प्रसिद्ध टीव्ही आणि रेडिओ होस्ट अनुशे अशरफ यांनी म्हटलं, "पुरुष बिलगिचला अनफॉलो का करत नाहीत? तुम्हीच तुमचे डोळे का बंद करत नाही?"

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








