रबरी लिंग: आशा सेविकांना किट देण्याबाबत डॉक्टरांचं काय म्हणणं आहे?

सेक्स किंवा लैंगिक आरोग्याबद्दल बोलताना अनेक लोकांना अवघडल्यासारखं होतं. पण त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या पातळीवर प्रयत्न सुरू असतात. कुटुंब नियोजनाबद्दल ग्रामीण भागात जनजागृती करणाऱ्या आशा ताईंच्या किटमध्ये एक रबरी लिंग असल्यामुळे एकच गोंधळ उडालाय. पण हे प्रकरण नेमकं काय आहे? हे पहिल्यांदाच घडलंय का? आशा कर्मचाऱ्यांना अशी किट्स देण्यामागे नेमकी भूमिका काय होती?
Accredited Social Health Activist म्हणजे आशा कर्मचारी. खेडोपाडी राहणाऱ्या लोकांना आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचवणं हे त्यांचं प्रमुख काम असतं. आशा ताईंच्या किटमध्ये रबरी लिंग दिल्याची गोष्ट आणि त्यावरचे आक्षेप बुलडाणा जिल्ह्यातून समोर आले.
आशा ताईंच्या किटमध्ये 'रबरी लिंग' कसं दिलं?
आशा कर्मचाऱ्यांनी काय काय कामं करायची याची यादी खुद्द केंद्र सरकारने दिली आहे. त्यात महिलांना प्रसूतीबद्दलची माहिती देणे, गर्भनिरोध आणि लैंगिक आजारांबद्दल माहिती पुरवणे हे सुद्धा काम आहे.
कुटुंब नियोजन आणि लैंगिक आजारांबद्दल जनजागृती करण्यासाठीच्या प्रशिक्षणासाठी हे किट आशांना दिलेलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
याबद्दल बुलडाणा जिल्ह्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे सांगतात, "या किटच्या माध्यमातून लोकसंख्या नियंत्रण, लैंगिक आजारांच्या बाबतीत जागृती. जसं आपण पाहिलं हेपटायटिस बी, सिफिलीस हे लैंगिक संसर्गातून पसरणारे आजार आहेत हे कमी होण्यात याचा फायदा होईल. स्वच्छता पाळून अशाप्रकारचे आजार नियंत्रित करण्यातही, रोगप्रसार कमी करण्यासाठीही या किटचा उपयोग होईल."

फोटो स्रोत, Getty Images
पण भाजपचे अनेक नेते यावरून ठाकरे सरकारला लक्ष्य करताना दिसतायत. बुलडाणा जिल्ह्याचे आमदार आकाश फुंडकर यांनी मागणी केलीय की सरकारने ही किट्स मागे घ्यावी आणि महिलांची माफी मागावी अन्यथा भाजप राज्यभर आंदोलन करेल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही 'सरकारने लिंगपिसाटांचा उच्छाद मांडलाय' अशी टीका केलीय आणि आशा सेविकांचे तळतळाट घेऊ नका असंही म्हटलंय.
रबरी लिंग आशा सेविकांच्या किटमध्ये यापूर्वीही असायचं का?
आता याबद्दल एक तक्रार अनेकांनी बोलून दाखवली ती म्हणजे आशा सेविकांनी अशाप्रकारे एक रबरी लिंग घेऊन खेडोपाडी कसं फिरायचं? लैंगिक आरोग्य किंवा लैंगिक विषयांबद्दल जिथे मुळातच दबक्या आवाजात बोललं जातं तिथे असं करणं शक्य आहे का? याबद्दल पुण्यातल्या एका आशा सेविकेने बीबीसी मराठीला सांगितलं की अशाप्रकारचं किट यापूर्वीही वापरलं जात असे.

नाव न सांगण्याच्या अटीवर त्या म्हणाल्या, "कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम जेव्हापासून सुरू झालाय तेव्हापासून हे किट मिळतं आहे. डेमो दाखविण्यासाठी ते किट दिलं आहे. ते किट वापरण्यासाठी देण्यात येत नाही. ए एन एम (नर्सेस) आणि आशा वर्कर महिलांना किटच्या सहाय्याने कुटुंबनियोजनासाठी समुपदेशन करतात. या किटबाबत प्रशिक्षणात सर्व शिकवलेलं असतं. पहिल्यापासून प्रशिक्षण देण्यात येतं. पुणे जिल्ह्यात तरी आशा वर्कर्सना या किटबाबत काही तक्रार नाही."
'आरोग्य कर्मचाऱ्यांनी संकोच करून कसं चालेल?'
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "हे पहिल्यांदाच घडलं आहे असं नाही. कुटुंब नियोजनासाठी जगजागृती निर्माण व्हावी यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत राज्यभरात 25 हजार किट्स वाटली गेली आहेत आणि आणखी 40 हजार किट्स वितरित केली जाणार आहेत. तसंच ही किट्स सार्वजनिकरीत्या वापरण्याची नाहीत. लोकांना लैंगिक आरोग्याबद्दल समजवून देण्यासाठी त्यांच्याशी खासगीत बोलत असताना ही किट्स वापरायची आहेत. जर आशा कर्मचाऱ्यांना संकोच वाटत असेल तर त्यांना ती वापरण्याची सक्ती नाही."
भाजपकडून जे आक्षेप घेतले जात आहेत त्याबद्दल बोलताना डॉ. पाटील म्हणाल्या, "यात संकोच वाटण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे जर असा संकोच बाळगतील तर कसं होईल?" असंही त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
यावरून होणारी राजकीय टीका आपण बाजूला ठेवू या. पण लैंगिक आजारांबद्दल जागृती आणि त्यापासून बचाव हा एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय आहे. अशाप्रकारच्या साधनांचा वापर त्यासाठी करणं हे कितपत फायदेशीर असतं? याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सेक्सोलॉजिस्ट डॉ. सागर मुंदडा अशाप्रकारे डेमो देण्यासाठी मॉडे्ल्सचा वापर करण्याचं समर्थन करतात. ते म्हणतात, "तज्ज्ञांकडून आशा ताईंचं याबाबतीत प्रशिक्षण गरजेचं आहे, नुसती मॉडेल्स देऊन उपयोग नाही. आशा ताई ज्या भागात काम करतात त्या ग्रामीण भागांमध्ये अशिक्षित मंडळी मोठ्या प्रमाणात असतात. अशा ठिकाणी डेमोच्या माध्यमातून लोकांना या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजवता येऊ शकतात."
"या गोष्टीकडे जरा खुल्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल. यातून चुकीच्या धारणा पसरतील असा विचार करणं बरोबर नाही. कारण जर खुलेपणाने बोललं गेलं तर लोकांना गोष्टी नीट समजतात. जर लैंगिक गोष्टींबद्दल मोकळेपणाने चर्चा झाली नाही तर त्यातून चुकीची माहिती पसरण्याचा धोका जास्त असतो."
लिंगाचं रबर मॉडेल प्रशिक्षणासाठी वापरण्यावरून प्रसूतितज्ज्ञ डॉ. निखिल दातार म्हणतात, "याचा चांगला वापर लैंगिक शिक्षण, कुटुंब नियोजन या बाबतीत माहिती देताना करता येऊ शकतो. अनेकांना निरोध कसा वापरावा हे नक्की माहीत नसते. चुकीच्या वापरामुळे नको असलेली गर्भधारणा होते. त्यामुळं हे समजण्यासाठी याचा वापर करता येईल. याबाबत सुरू झालेला वाद हा निष्कारण आहे. आरोग्य सेवकांना लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी याचा फायदा नक्कीच होईल."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








