हाया सोफिया : जेव्हा एका चर्चचं रुपांतर मशिदीमध्ये करण्यात आलं...

हाया सोफिया

फोटो स्रोत, Reuters

बायझॅन्टिन सम्राट जस्टिनिअनच्या आदेशावरून सहाव्या शतकात ही वास्तू बांधण्यात आली होती आणि जवळपास 1000 वर्षं ती जगातलं सगळ्यांत मोठं कॅथिड्रल (चर्च) होतं. हाया सोफिया युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. आणि आता तिचं रुपांतर एका मशिदीमध्ये करण्यात आलं आहे.

इस्तंबुलमधल्या हाया सोफियाचं रुपांतर पुन्हा मशिदीत करण्याच्या निर्णयाने आपल्याला दुःख झाले आहे, असं पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं होतं.

ऑटोमन साम्राज्याने 1453मध्ये जेव्हा इस्तंबुलवर ताबा मिळवला तेव्हा हाया सोफियाचं रूपांतर मशिदीत करण्यात आलं. 1930 च्या दशकात ही वास्तू एक म्युझियम बनली. पण तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी या वास्तूची मशीद करण्याचे आदेश दिले.

हाया सोफिया

फोटो स्रोत, Getty Images

तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष रिसिप तय्यीप एर्दोगान यांनी निवडणुकीच्या प्रचारात हाया सोफियांचं मशिदीत रूपांतर करू, असं आश्वासन दिलं होतं.

हाया सोफियाला मशीद म्हणून घोषित करावं ही टर्कीतल्या कडव्या इस्लामिक लोकांची अनेक वर्षांची मागणी आहे, पण विरोधी पक्षातल्या काही धर्मनिरपेक्ष लोकांनी याला विरोध केला आहे. आता हाया सोफियाचं पुन्हा मशिदीत रूपांतर करण्याचे जे प्रयत्न सुरू झाले त्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर टीकेची झोड उठली आहे.

इस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रमुखांनी या निर्णयाला विरोध केला आहे. ग्रीस देशात लाखो इस्टर्न ऑर्थोडॉक्स धर्माचे अनुयायी असल्याने या देशानेही या निर्णयाचा विरोध केला आहे.

तुर्कस्थानच्या सांस्कृतिक मंत्री लिना मेंडोनी यांच्यावर 'टोकाच्या राष्ट्रवादी आणि धार्मिक कट्टरतावादी' भावनांना खतपाणी घातल्याचा आरोप होतोय. आंतरराष्ट्रीय विरोधांकांचं म्हणणं आहे की, युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय कमिटीच्या, ज्यात अनेक देशांच्या सरकारांचे प्रतिनिधी सहभागी असतात, मान्यतेशिवाय युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या दर्जात बदल केला जाऊ शकत नाही.

युनेस्कोचे उपसंचालक अर्नेस्टो ऑटोन रामिरेज यांनीही मान्य केलं की अशा स्थळांच्या दर्जात बदल करायचा असेल त्याला सार्वत्रिक मान्यता लागते. युनेस्कोने याबाबत टर्कीला पत्र लिहिलं आहे पण अजून टर्कीचं उत्तर आलं नसल्याचंही रामिरेज यांनी स्पष्ट केलं.

हाया सोफियाचा इतिहास

हाया सोफिया ही ऐतिहासिक इमारत इस्तंबुलच्या फेथ डिस्ट्रिक्ट या भागात आहे. ही भव्य वास्तू बांधण्याचे आदेश जस्टिनिअन (प्रथम) याने इसवी सन 532मध्ये दिले होते.त्यावेळी या शहरावर बायझॅन्टिन साम्राज्याचं,ज्याला रोमन साम्राज्य असंही म्हटलं जातं,राज्य होतं आणि या शहराचं नाव होतं कॉन्स्टॅन्टिनोपल. हे भव्य चर्च बांधण्यासाठी भूमध्य समुद्रापलिकडून वास्तूविशारद आणि साहित्य आणलं गेलं होतं.

हाया सोफिया

फोटो स्रोत, Getty Images

या वास्तूचं बांधकाम 537मध्ये पूर्ण झालं. त्यानंतर हे कॅथिड्रल ऑर्थोडॉक्स चर्चचं मुख्य स्थान बनलं. इथेच बायझॅन्टिन साम्राज्यातल्या सम्राटांचे राज्याभिषेक होत. हाया सोफिया कॅथिड्रल जवळपास 900वर्षं इस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चचं मुख्यालंय होतं. अपवाद फक्त 13व्या शतकाचा जेव्हा युरोपियन आक्रमकांनी कॉन्स्टॅटिनोपलची नासधुस केली होती. 1453 मध्ये सुलतान मेहमुद (दुसरा)याच्या नेतृत्वाखाली ऑटोमन साम्राज्याने कॉन्स्टॅटिनोपलचा ताबा मिळावला आणि या शहराचं नाव पडलं इस्तंबुल.ऑटोमन साम्राज्याने बायझॅन्टिन साम्राज्याचा कॉन्स्टॅटिनोपलमधून खातमा केला.मेहमुद दुसरा याने हाया सोफियात बदल करून मशिदीत रूपांतर केलं.

ऑटोमन वास्तुविशारदांनी या वास्तूत असणारी ऑर्थोडॉक्स चिन्हं काढून टाकली किंवा त्यावर प्लॅस्टर केलं.त्यांनीच या इमारतीमध्ये मिनार बांधले.इस्तंबुलमधल्या निळ्या मशीद बांधली जायच्या आधीपर्यंत,म्हणजे साधारण1616पर्यंत हाया सोफियाच शहरातली मुख्य मशीद होती.

पहिल्या महायुद्धानंतर 1918मध्ये ऑटोमन साम्राज्याचा अंत झाला. इथली जमीन मित्रराष्ट्रांनी वाटून घेतली. पण तरीही यातून टर्कीच्या राष्ट्रवादी लोकांनी एकत्र येत आधुनिक टर्कीचा पाया रचला.

आधुनिक टर्कीचे जनक आणि टर्की धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनल्यानंतर झालेले पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा केमाल अतातुर्क यांनी हाया सोफियाचं रूपांतर एका म्युझियमध्ये करावं असा आदेश दिला. 1935 साली हाया सोफिया लोकांसाठी पुन्हा खुली झाली आणि आज टर्कीच्या सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे.

हाया सोफियाचं महत्त्व

आपल्या 1500 वर्षांच्या इतिहासात हाया सोफिया धार्मिक,राजकीय आणि अध्यात्मिक घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिलेली आहे.

कट्टर इस्लामिक लोकांची मागणी आहे की या वास्तुचं रूपांतर पुन्हा मशिदीत करा. त्यांनी हाया सोफिया बाहेर 1934सालच्या कायद्याविरूद्ध अनेकदा निदर्शनंही केली आहेत.या कायद्यानुसार हाया सोफियात कोणताही धार्मिक विधी किंवा प्रार्थना करायला बंदी आहे.

ब्लू मॉस्क

फोटो स्रोत, Getty Images

राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी या मागणीला समर्थन दिलं आहे.मागच्या वर्षी स्थानिक निवडणुकांसाठी प्रचार करताना त्यांनी भाषणात म्हटलं होतं की, 'हाया सोफियाचं म्युझियममध्ये रूपांतर करणं घोडचूक होती. 'त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना या वास्तुचं पुन्हा मशिदीत रूपांतर करायला काय करावं लागेल याची चाचपणी करायला सांगितलं होतं असं म्हटलं जातंय.

इस्टर्न ऑर्थोडॉक्सचे प्रमुख पॅट्रिआर्च बार्थोलोमेव,ज्यांना इसुमेनिकल पॅट्रिआर्च ऑफ कॉन्स्टॅन्टिनोपल असंही म्हटलं जातं,अजूनही इस्तंबुलमध्ये राहातात.या निर्णयामुळे लाखो ख्रिश्चनांच्या भावना दुखावतील आणि दोन्ही समाजांमध्ये तणाव उत्पन्न होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनी 'हाया सोफिया आजवर वेगवेगळ्या धर्मांना जोडणारा पूल म्हणून काम करत होती,त्याला या निर्णयाने बाधा येईल,' असं म्हटलं आहे.

पण टर्कीचे परराष्ट्र मंत्री मेल्वत कावुसोग्लू यांनी, "आम्ही आमच्या देशात आमच्या स्थावर मालमत्तेचं काय करतो हा आमचा प्रश्न आहे. यात ग्रीस किंवा कोणालाही काही म्हणण्याचा अधिकार नाही," असं टर्किश टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे.

हेही नक्की वाचा

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)