पग हा 'टिपिकल डॉग' नाही असं का म्हणतात? तो इतर कुत्र्यांपेक्षा वेगळा का?

फोटो स्रोत, Getty Images
पग जातीच्या कुत्र्यामध्ये गंभीर प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या असतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांना 'टिपिकल डॉग' संबोधता येणार नाही, असं एका संशोधनात सांगण्यात आलं आहे.
युकेमधील रॉयल व्हेटेरिनरी कॉलेजकडून हे संशोधन करण्यात आलं होतं. पग जातीच्या कुत्र्याचं आरोग्य हे इतर कुत्र्यांच्या तुलनेत अतिशय नाजूक असतं, असं या संशोधनातून समोर आलं.
4308 पग आणि 21835 बिगर-पग कुत्र्यांवर हे संशोधन करण्यात आलं.
युकेमधील पग्जना वर्षातून एक किंवा दोन वेळा आजारपण येतं. इतर कुत्र्यांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे.
ब्रॅकिसेफिलीक किंवा ब्रॅकी जातीची कुत्रे म्हणजेच पग, बुलडॉग किंवा बॉक्सर कुत्र्यांना त्यांच्या विशिष्ट अशा दिसण्यामुळे ओळखलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या काही वर्षांत पग जातीच्या कुत्र्यांची लोकप्रियता प्रचंड वाढल्याचं दिसून आलं. केनेल क्लबमधील नोंदींनुसार 2005 पासून ते 2017 पर्यंत ही वाढ पाच पटींनी झाली.
पग आणि आरोग्य समस्या
पग हे वर्षातून सरासरी 1.9 वेळा आजारी पडतात. इतर कुत्र्यांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. पण यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच कारण नाही, अशी प्रतिक्रिया युनिव्हर्सिटी ऑफ कँब्रिजमध्ये पशू तज्ज्ञ म्हणून काम पाहणाऱ्या डॉ. मिफॅन्वी हिल यांनी दिली.
त्या म्हणतात, "या कुत्र्याचं वैशिष्ट्य म्हणजे, याची कवटी लहान आहे, पण इतर अवयव त्या तुलनेत मोठेच आहेत. त्यांचा मेंदू हा एका छोट्याशा डबीत ठेवल्याप्रमाणे असतो. त्याचा आकारही खूप लहान असतो. त्याशिवाय तिथल्या इतर पेशीही लहानच असतात."
याच कारणामुळे पग्जना श्वास घेण्यासंदर्भात तसंच त्वचा आणि पाठीबाबत आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. ब्रॅक्रिसेफिलिक ऑबस्ट्रक्टिव्ह एअरवे सिंड्रोम हा श्वासाशी संबंधित आजार होण्याची शक्यता पग्जमध्ये 54 टक्के जास्त असते.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. हिल सांगतात, "पग कुत्र्यांची श्वसनयंत्रणाही लहान आकाराची असते. एका छोट्या स्ट्रॉप्रमाणे त्याचा आकार असतो. यामुळे साधा श्वास घेण्यातही पगला प्रचंड कष्ट करावे लागतात.
त्या पुढे म्हणतात, "आपल्यासमोर पग कुत्र्यांची एक प्रतिमा असते. त्यांचा चेहरा पाहता ते जणू काही हसत आहेत, जीभ बाहेर काढून मजा घेत आहेत, असं आपल्याला वाटू शकतं. पण तसं काहीही नाही. पग्जना त्यांच्या नाकाने नीट श्वास घेता येत नसल्यामुळे तोंडाने श्वास घ्यावा लागतो."
याशिवाय पग जातीच्या कुत्र्यांना त्वचेच्या समस्याही खूप येतात. याविषयी डॉ. हिल म्हणतात, "पग कुत्र्यांच्या चेहऱ्यावर प्रमाणापेक्षा जास्त त्वचा असते. याचाच त्यांना त्रास होतो. यामुळे त्वचेचा संसर्ग होणं, कोरडेपणा आणि खाज यांच्यासारख्या समस्या नेहमी उद्भवतात."
इतकंच नव्हे तर आकर्षक वाटणाऱ्या त्यांच्या शेपटीत मालफॉर्म्ड व्हर्टेब्रा नामक विकार होतो. यामुळे मणक्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता निर्माण होते.
या संशोधनात भाग घेणारे सहायक प्राध्यापक डॉ. डॅन ओनिल यांनीही याविषयी माहिती दिली.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात, "शरीरातील अवयवांच्या आकारातील विसंगतीमुळेच पग कुत्र्यांना या समस्यांना तोंड द्यावं लागतं. पण आपल्याला त्यांना पाहून क्यूट वगैरे वाटतं. त्यामुळे आपण फक्त आवडीपोटी त्यांना पाळण्याऐवजी त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे."
"पगमध्ये येणाऱ्या आजारपणांमुळेच आम्ही लोकांना त्यांना पाळण्यासाठी न घेण्याचा सल्ला नेहमी देतो," असं ब्रिटिश व्हेटेरेनरी असोसिएशनचे प्रमुख जस्टीन शोटन यांनी सांगितलं.
आपण काय करू शकतो?
याविषयी डॉ. हिल म्हणतात, "लोक सद्भावनेने पग पाळतात, मात्र त्यांना पाळत असताना काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
मालकांनी पगकडे बारीक लक्ष ठेवावं, त्याचा श्वासोच्छवास योग्य पद्धतीने सुरू आहे किंवा नाही, तो जास्तच वेगाने दम किंवा उसासे घेत आहे का, तो श्वास घेताना जास्त आवाज करतोय का, या गोष्टींकडे लक्ष द्यावं.
"उन्हाळ्याच्या दिवसांत पग कुत्र्यांना जास्त त्रास होतो. त्यामुळे त्यांना थंड ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी. त्यांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढू देऊ नये," असं डॉ. हिल यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








