पुणे : 22 कुत्र्यांसोबत कोंडून ठेवलेल्या 11 वर्षीय मुलाची पुणे पोलिसांनी कशी केली सुटका?

कुत्री

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिनिधिक छायाचित्र
    • Author, मानसी देशपांडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

एका 11 वर्षांच्या मुलाला त्याच्या आई-वडिलांनीच 22 कुत्र्यांसोबत कोंडून ठेवलं होतं, त्याची पुणे पोलिसांनी सुटका केली आहे. या मुलाच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली असून सध्या हा मुलगा सामाजिक कार्यकर्त्यांच्या देखरेखीत आहे.

पुण्यातल्या कोंढवा भागातल्या एका सोसायटीमधून नुकताच एक धक्कादायक प्रकार उघडकीला आला. एका फ्लॅटमधून जवळपास 20-22 कुत्र्यांसोबत कोंडून ठेवलेल्या एका 11 वर्षाच्या मुलाची सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी सुटका केली.

सतत कुत्र्यांच्या सान्निध्यात राहून या मुलाच्या मानसिकतेवरही परिणाम झाल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

हे दाम्पत्य रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना घरात आणत असे आणि त्यांच्यासोबतच राहत असे. यांच्याविरोधात त्या सोसायटीकडून आधी पोलिसांमध्ये तक्रारीही करण्यात आल्या होत्या. यावेळी मात्र शेजाऱ्यांनी चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधला.

अनेक कुत्र्यांसह एक मुलगा बाल्कनीत दिसतो, तिथे अस्वच्छता असेत आणि तो मुलगा अस्वस्थ दिसतो, असं शेजाऱ्यांनी कळवले.

जेव्हा प्रत्यक्ष जाऊन याची शहानिशा केली गेली तेव्हा असं आढळलं की एक बेडरुम फ्लॅटमध्ये जवळपास 22 कुत्री होती. मुलगाही तिथेच होता.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

"आम्हाला एका चाईल्ड हेल्पलाईनकडून माहिती मिळाल्यानंतर आम्ही मदत पाठवली आणि घराचा दरवाजा उघडला. 22 ते 23 कुत्री घरात होते आणि मुलगाही होता. ते दाम्पत्य घराला बाहेरुन कुलूप लावून गेले होते. तेवढ्यात ते परत आले.

"ते रस्त्यावरची कुत्री त्यांनी उचलून आणतात. त्या कुत्र्याचंही पालन पोषण नीट होत नव्हतं. सोसायटीनेही आधी आमच्याकडे तक्रारी दिल्या होत्या," अशी माहिती सरदार पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक कोंढवा पोलीस ठाणे यांनी दिली.

या दाम्पत्याला अटक केल्याचंही त्यांनी सांगितलं.

त्या मुलाला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आला आहे. बाहेरच न पडल्यामुळे त्या मुलाच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याचं प्रथमदर्शनी आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याच्यावर वैद्यकीय उपचारही करण्यात येणार आहेत.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

"घरात अतिशय अस्वच्छता होती. मुलावर काही मानसिक परिणाम झाल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. त्या मुलाला आणि पालकांना पोलीस स्टेशनमध्ये आम्ही घेऊन गेलो. बालकल्याण समितीलाही यासंदर्भात आम्ही माहिती दिली होती," असं ज्ञानदेवी चाईल्डलाईनच्या अनुराधा सहस्त्रबुद्धे यांनी ही माहिती दिली.

लहान मुलांचं आरोग्यदायी संगोपन होण्यासाठी कशा पुरक वातावरणाचाही गरज लागते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. लहान मुलांना जर कोंडून ठेवलं जात असेल, त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क नसेल तर त्याचा परिणाम त्यांच्या जडणघडणीवर होणं स्वाभाविक आहे असं निरिक्षणही त्यांनी नोंदवलं.

"मुलांच्या जडणघडणीमध्ये अनेक गोष्टींची आवश्यकता असते. त्यांना कोंडून ठेवणं हा कधीही चांगला पर्याय असू शकत नाही. एकटं असणं, घरातल्या घरात असणं यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होणारच. अशा परिस्थितीमध्ये बाकीच्यांशी कसं वागावं हे त्यांना कळणार नाही," असं लहान मुलांच्या समुपदेशक वसुधा देशपांडे कोरडे यांनी सांगतिलं.

जास्त काळ प्राण्यांसोबत राहून त्यांच्यासारख्या सवयी लागतात का, असं विचारलं असता वसुधा यांनी सांगितलं की या प्रश्नाचं उत्तर थेट देता येणार नाही. पण जर एखादी व्यक्ती बाकीच्या माणसांच्या संपर्कात जास्त राहत नसेल तर तिच्या समाजशीलतेवर त्याचा निश्चित परिणाम होऊ शकतो असं त्या म्हणाल्या.

लहान मुलांच्या योग्य वाढीसाठी त्यांना सुरक्षित वातावरण मिळणं आवश्यक आहे असं डॉ. रोहन जहागीरदार यांना वाटतं.

"या परिस्थितीमध्ये आधी त्या मुलाच्या शारिरिक आणि मानसिक स्थितीचा आढावा घ्यायला हवा. यातून सावरण्यासाठी मुलांना सुरक्षित वातावरणाची गरज असते. त्यांना सुरक्षित वाटेल असं आजू बाजूचं वातावरण असावं. थेरपी आणि औषधोपचारही आवश्यक आहेत. सगळ्यात महत्त्वाच म्हणजे यानंतर अशाप्रकारची गोष्ट परत कधीच घडू नये याची काळजी घेणं आवश्यक आहे. लहानपणी मनावर झालेल्या आघातांमधून सावरण्यासाठी हे आवश्यक आहे," असं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रोहन जहागीरदार यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)