पाकिस्तान आणि श्रीलंकेतलं संकट भारतासाठीही धोक्याची घंटा ठरू शकते, कारण...

    • Author, झुबैर अहमद,
    • Role, बीबीसी प्रतिनिधी.

शेजारी सगळं सुरळीत सुरू असेल तर आपल्या घरात शांतता नांदते, पण शेजारी अशांतता व अनिश्चितता असेल तर आपल्या घरातील चिंताग्रस्तता वाढते, असं म्हटलं जातं.

पाकिस्तानातील राजकीय संकट व श्रीलंकेत निर्माण झालेलं भीषण आर्थिक संकट यांमुळे भारताने चिंतित व्हायला हवं का?

श्रीलंका व पाकिस्तान इथल्या संकटांचा भारतावर परिणाम होणं स्वाभाविक आहे, असं तज्ज्ञ म्हणतात.

श्रीलंकेतील संकट आणि भारत

श्रीलंकेत काही संकटकारक परिस्थिती उद्भवली किंवा हिंसाचार झाला की तिथले तमिळ लोक तामिळनाडूला स्थलांतरित होत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव राहिला आहे.

श्रीलंकेत अनेक दशकं सुरू असलेल्या यादवी युद्धादरम्यान तिथले लाखो तमिळ भाषिक लोक भारताच्या आश्रयाला आले होते.

सध्या श्रीलंकेत प्रचंड गंभीर आर्थिक संकट निर्माण झालं आहे, त्यामुळे तिथले तमिळ नागरिक पुन्हा एकदा भारताच्या दिशेने स्थलांतर करत आहेत.

तमिळनाडूच्या चिंतेमध्ये वाढ

हा प्रश्न तमिळनाडूसाठी चिंतेचा आहे. 22 मार्च रोजी रामेश्वरमच्या किनाऱ्यावर दोन गटांमध्ये आलेले 16 श्रीलंकन तमिळ हा याचा एक दाखला होता.

अलीकडच्या काळात श्रीलंकेतून येणाऱ्या तामिळींच्या आकडेवारीविषयी भारत सरकारने अजून काही अधिकृत माहिती दिलेली नाही.

पण सरकारी सूत्रांनी दिलेल्या अंदाजानुसार, श्रीलंकेतील बिकट परिस्थितीमुळे भारताच्या आश्रयाला येणाऱ्या तमिळ लोकांची संख्या आगामी काळात वाढेल.

श्रीलंकेत परकीय चलनाचा खडखडाट आहे. त्यांना 51 अब्ज डॉलरांच्या परकीय कर्जाची परतफेड करण्यासाठी बरीच खटपट करावी लागते आहे.

लोकांचं कंबरडं मोडणारी महागाई आणि सतत खंडित होणारा वीजपुरवठा यांसोबतच श्रीलंकेत अन्नपदार्थ, इंधन व इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे.

या अस्थिर परिस्थितीत लोक मोठ्या प्रमाणात निदर्शनं करत रस्त्यावर उतरले असून श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी देशात आणीबाणी लागू केली.

भारताने मदतीचं आश्वासन दिलं

श्रीलंकेला आर्थिक व ऊर्जाविषयक संकटातून बाहेर येण्यासाठी इंधन, अन्नपदार्थ व औषधं विकत घेता यावीत, याकरता भारताने 1.5 अब्ज डॉलरहून अधिक अर्थसहाय्य केलं आहे.

गेल्या आठवड्यात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी तीन दिवसांचा श्रीलंका दौरा केला, तेव्हा भारत श्रीलंकन सरकारला मदत करत राहील, असं आश्वासन त्यांनी दिलं.

भारताकडून सहाय्य सुरू राहील, असं आश्वासन त्यांनी एका ट्वीटद्वारे दिलं.

या दौऱ्यावेळी जयशंकर यांनी श्रीलंकेचे तत्कालीन अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांच्याशी चर्चा केली. आर्थिक संकटातून बाहेर पडण्याकरता श्रीलंका भारतासोबत संयोजन करतो आहे, असं राजपक्षे म्हणाले.

परंतु, राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांचे बंधू व अर्थ मंत्री बासिल राजपक्षे यांना पदावरून हटवल्याची बातमी चार एप्रिलला आली. श्रीलंकेने एक अब्ज डॉलरांचं आणखी कर्ज मागितल्याचंही काही वार्तांकनांमध्ये म्हटलं आहे.

श्रीलंकेतील सद्यस्थिती

राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी अर्थमंत्रिपदी अली साबरी यांची नियुक्ती केली होती. रविवारी रात्रीपर्यंत अली साबरी यांच्याकडे न्याय मंत्रालयाची जबाबदारी होती. पण त्यांनीही एका दिवसात आपल्या नव्या पदाचा राजीनामा दिला.

पदावरून हटवलं जाण्यापूर्वी बासिल राजपक्षे आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून सहाय्य मिळवण्याकरता अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार होते.

देशातील सत्ताधारी 'श्रीलंका पोदुजना पेरामुना' (SLPP) आघाडीमध्ये बासिल यांच्या या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त होत होती.

गेल्या काही महिन्यांमध्ये बासिल यांच्यावर जाहीर टीका केल्याबद्दल महिंदा राजपक्षे यांच्या मंत्रिमंडळातील किमान दोन मंत्र्यांना पदांवरून हटवण्यात आलं होतं.

रविवारी रात्री महिंदा राजपक्षे यांच्या मंत्रिमंडळातील सर्व 26 मंत्र्यांनी राजीनामे दिले.

दरम्यान, श्रीलंकेतील केंद्रीय बँकेचे गव्हर्नर अजित निवार्ड यांनीसुद्धा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून मदत मिळवण्याच्या मुद्द्यावर अजित निवार्ड यांनी आदर्शवादी भूमिका घेतली आणि त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं.

भारत-श्रीलंका यांच्यातील व्यापार

श्रीलंकेतील खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारताने तिथे 40 हजार मेट्रिक टन डिझेल जवळपास चार वेळा पाठवलं. शिवाय, भारत लवकरच 40 हजार टन तांदूळसुद्धा श्रीलंकेला पाठवणार आहे.

भारत जागतिक व्यापाराच्या दृष्टीने कोलंबोतील बंदरावर अवलंबून आहे, कारण भारताच्या समुद्री जहाजवाहतुकीमधील 60 टक्के वाहतूक या बंदराद्वारे होते.

भारत हा श्रीलंकेच्या सर्वांत मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. मोठ्या संख्येने श्रीलंकन पर्यटक भारतात येतात.

भारत श्रीलंकेला वर्षाकाठी सुमारे पाच अब्ज डॉलरांची निर्यात करतो आणि भारताच्या एकूण निर्यातीमध्ये हा वाटा सुमारे 1.3 टक्के आहे.

भारताने श्रीलंकेतील पर्यटन, स्थावर मालमत्ता, उत्पादन, दळणवळण, पेट्रोलियम, इत्यादी क्षेत्रांमध्येही गुंतवणूक केली आहे.

श्रीलंकेत थेट परकीय गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये भारताचा वाटा मोठा आहे. अनेक मोठ्या भारतीय कंपन्यांनी श्रीलंकेत गुंतवणूक केली आहे.

अलीकडच्या वर्षांमध्ये श्रीलंका व चीन यांच्यातील जवळीक वाढली आणि चीनने श्रीलंकेतील अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली. पण श्रीलंकेत उपटलेल्या या नवीन संकटादरम्यान मात्र चीनकडून काही सहाय्य होताना दिसत नाही.

पाकिस्तानातील संकट आणि त्याचा भारतावरील परिणाम

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर वेळोवेळी टीका केली आहे.

पण भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव 2021 सालापासून सर्वांत कमी आला आहे, हीसुद्धा वस्तुस्थिती आहे.

भारतीय राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, काश्मीरमधील संघर्ष यशस्वीरित्या समाप्त व्हावा यासाठी पाकिस्तानी लष्कर इस्लामाबादमधील नवीन सरकारवर दबाव आणू शकतं.

सध्या पाकिस्तानात राजकीय अनागोंदी माजली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रस्तावानुसार संसद बरखास्त करण्यात आली आहे आणि त्यांनी निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांचं हे पाऊल देशद्रोही असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

आपल्याला पदावरून हटवण्यासाठी विरोधकांनी अमेरिकेशी संगनमत करून कारस्थान रचल्याचा आरोप पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध इम्रान खान यांनी केला नाही, तर युक्रेनमधील युद्धासंदर्भात पाकिस्तानने अमेरिकेची बाजू घ्यावी अशी पाकिस्तानी सैन्याची इच्छा होती.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या घडामोडींचा पाकिस्तान व अमेरिका यांच्यातील संबंधांवर परिणाम झाला आहेच, शिवाय पाकिस्तान राजनैतिक पातळीवर पाश्चात्त्य राष्ट्रांपासून दूर जात असल्याचंही दिसतं आहे.

बीबीसी हिंदीच्या 'ट्विटर स्पेस' या कार्यक्रमात राजकीय घडामोडींच्या विश्लेषक स्वस्ती राव म्हणाल्या, "राजनैतिक पातळीवर पाकिस्तान उर्वरित जगापासून दुरवण्यासाठी भारताला काहीच कष्ट घ्यावे लागले नाहीत. खुद्द पाकिस्ताननेच हा दुरावा निर्माण केला आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)