श्रीलंका आर्थिक आणीबाणी: चार नव्या नेत्यांना मंत्रिपदाची शपथ, राष्ट्रपतींच्या भावाला मंत्रिमंडळात नाही जागा

श्रीलंकेत आर्थिक संकटानंतर राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. महागाईच्या मुद्द्यावरून निदर्शनं झाल्यानंतर रविवारी रात्री श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिला होता.

त्यानंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंनी विरोधी पक्षातील नेत्यांना मंत्रिमंडळात सामील होण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानंतर चार नव्या मंत्र्यांना पदाची शपथ देण्यात आली आहे.

या नव्या मंत्रिमंडळात, राष्ट्रपतींचे भाऊ आणि मागील मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेले बासिल राजपक्षे यांना स्थान मिळाले नाही.

श्रीलंकेच्या राष्ट्रपती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की राष्ट्रपती राजपक्षेंनी संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वच पक्षांतील प्रतिनिधींना मंत्रिमंडळात सामील होण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून सर्वांना मिळून आर्थिक संकटावर मात करता येईल.

रविवारी रात्री श्रीलंकेच्या सर्व 26 मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. सभागृहाचे नेते आणि शिक्षण मंत्री दिनेश गुणावर्धने यांनी सांगितले की सर्व मंत्र्यांना राजीनामा दिला. त्यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण सांगितले नाही.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. देशामध्ये 36 तासांचा कर्फ्यू लावण्यात आलाय.

श्रीलंकेतील नागरिकांनी गुरुवारी, 31 मार्चला रात्रभर निदर्शनं केली. पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापटही झाली. राजधानी कोलंबोत पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

कोलंबोमध्ये रात्री 5 हजाराहून अधिक लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षेंच्या घराच्या दिशेनं मोर्चा काढला.

राष्ट्राध्यक्षांच्या घरावरच्या दिशेनं जाणाऱ्या आंदोलकांना थांबवताना पोलिसांसोबत झटापटही झाली. या निदर्शनातील 45 जणांना अटक करण्यात आली असून, या दरम्यान एक व्यक्ती गंभीर जखमी झालीय.

या सर्व गोंधळामुळे कर्फ्यू लावण्यात आला होता, मात्र नंतर तो हटवण्यात आला. शहरात पोलीस आणि सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षेंच्या घराच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यांवर जाळ्या लावण्यात आल्या आहेत.

श्रीलंका कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलाय. 2.2 कोटी लोकसंख्येचा हा देश आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अन्नधान्याचा तुटवडा आणि परिणामी त्यांच्या वाढत्या किंमतींमुळे श्रीलंकेतील नागरिक त्रस्त आहेत.

श्रीलंकेत मध्यरात्री काय झालं?

गुरुवारी, 31 मार्चला मध्यरात्री हजारो नागरिकांनी राजपक्षेंच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या घराच्या दिशेनं मोर्चा काढला. यात अनेक अज्ञात सोशल मीडिया अॅक्टिव्हिस्ट सहभागी होते.

आंदोलकांनी कोलंबोचे मुख्य रस्ते टायरची जाळपोळ करून रोखले. यादरम्यान आंदोलकांनी लष्कराच्या दोन बस आणि एका जीपलाही आग लावली. तसंच, पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक केली.

सुरक्षारक्षकांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रूधुराचे गोळे फेकले, वॉटर कॅननचा वापर केला. सुरक्षारक्षकांनी गोळीबार किंवा रबर बुलेटचा वापर केला की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

AFP वृत्तसेवा संस्थेच्या अधिकृत सूत्रांनुसार, या निदर्शनांदरम्यान राजपक्षे घरात नव्हते. मात्र, या आंदोलनाला हाताळण्यासाठी त्यांनी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

एका खासगी टीव्ही नेटवर्कने या आंदोलनाचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू केलं होतं. ते प्रक्षेपण तातडीनं रोखण्यात आलं. सरकारच्या दबावामुळेच हे झाल्याचं पत्रकारांचं म्हणणं आहे.

तसंच, राजपक्षे कुटुंबाच्या सर्व सदस्यांनी पदं सोडण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येतेय. अशी मागणी करणारे काही व्हीडिओ सोशल मीडियावरही शेअर केले जात आहेत.

ताकदवान राजपक्षे कुटुंब

निवृत्त बँकर आणि आंदोलनात सहभागी झालेले जगत लियानगे म्हणतात की, "मी या सरकारचं ओझं नाहीय. मी आर्थिकदृष्ट्या ठीकठाक आहे. मात्र, माझा पैसा काहीच कामाचा नाहीय. माझ्याकडे बराच पैसा आहे. मात्र, तो काहीच कामाचा नाहीय. कारण मी त्यानं काहीच खरेदी करू शखत नाही. मी पेट्रोल पंपावरून पेट्रोल खरेदी करू शकत नाही. जेव्हा माझ्या घरातील गॅस संपतं, तेव्हा सिलेंडर भरू शकत नाही. माझ्या मते, श्रीलंकेच्या इतिहासातील हा सर्वांत अंधारलेला काळ आहे. आम्ही आमच्याच पैशानं काही करू शकत नाही. आमचे नेते आम्हाला हात न लावताच आमची हत्या करतायेत."

श्रीलंकेतील राजपक्षे कुटुंब सर्वांत ताकदवान मानलं जातं. गोटाभाया राजपक्षेंचे मोठे भाऊ महिंदा राजपक्षे देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते राष्ट्राध्यक्षही होते.

त्यांचे छोटे भाऊ बासिल हे श्रीलंकेचे अर्थमंत्री आहेत. सर्वांत मोठे भाऊ चमल हे कृषिमंत्री आहेत आणि त्यांचे भाचे नमल हे देशाचे क्रीडामंत्री आहेत.

श्रीलंकेत महागाई इतकी का वाढली?

श्रीलंकेची अर्थव्यवस्था तीन क्षेत्रांवर सर्वाधिक अवलंबून आहे. पर्यटन, चहा आणि कापड उद्योग. कोव्हिडमुळे जगभरात लागलेल्या लॉकडाऊनचा या तिन्ही क्षेत्रांना जबरदस्त फटका बसला. पर्यटन क्षेत्राचा श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत जवळपास 10 टक्के वाटा आहे. पण पर्यटकांचा ओघ थांबला आणि टुरिझम इंडस्ट्रीला घरघर लागली.

भरीस भर म्हणजे सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध. याची श्रीलंकेला दुहेरी झळ लागली. श्रीलंकेत येणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी साधारण 25 टक्के रशिया आणि युक्रेनमधून येतात. हा आकडा रोडवलाय. श्रीलंकन चहाचा सर्वांत मोठा आयातदार रशिया आहे. या संघर्षामुळे ती आयात कमी झालीय.

या युद्धामुळे खनिज तेलाच्या किमतीही वाढतायत. त्यामुळे एकीकडे उत्पन्न कमी आणि दुसरीकडे खर्च वाढले अश्या कात्रीत श्रीलंका सापडलाय. पेट्रोल आणि रॉकेलच्या रागांमध्ये उभं राहिलेल्या 4 लोकांचा मृत्यू झालाय. त्यातले तीन वृद्ध होते. एकाचा मृत्यू तेव्हा झाला जेव्हा रांगेत उभ्या असलेल्या लोकांमधलं भांडण विकोपाला गेलं आणि लोकांनी सुरे काढून मारामारी सुरू केली.

पेट्रोल-डिझेलचा काळा बाजार होऊ नये म्हणून सरकारने पेट्रोल पंपावर लष्कराचे जवान तैनात केलेत. स्वयंपाकाच्या सिलेंडरसाठीही तासनतास रांगा लागतायत.

गोष्टी इतक्यावर थांबत नाहीत. श्रीलंकेच्या आर्थिक समस्यांची चिन्हं कोव्हिडपूर्वीच दिसायला लागली होती. त्यात 2019 साली सत्तेत आलेल्या राजपक्षे सरकारने लोकांची क्रयशक्ती म्हणजे खर्च करण्याची क्षमता वाढावी म्हणून टॅक्स कमी केला. यामुळे सरकारचं उत्पन्नही घटलं.

या सरकारने देशात रासायनिक खतांवर पूर्ण बंदी घालून फक्त सेंद्रीय खतं वापरून शेती करण्याचा नियम केला. घाईघाईने घेतलेल्या या निर्णयामुळे पीक कमी झालं आणि अन्नधान्य टंचाईची तलवार टांगली गेली.

श्रीलंकेवर असलेलं परकीय कर्ज हा सुद्धा देशासाठी एक चिंतेचा विषय आहे. एप्रिल 2021 पर्यंत श्रीलंकेवर 35 अब्ज डॉलर्सचं परकीय कर्ज होतं. त्यातलं जवळपास 10 टक्के कर्ज एकट्या चीनचं होतं. श्रीलंकेने काही पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी चीनकडून कर्ज घेतलं होतं. ते प्रकल्प फसले आणि श्रीलंका चीनचं कर्ज फेडू शकली नाही.

श्रीलंकेतल्या हंबनटोटा बंदराचं उदाहरण घ्या. यासाठी चीनने श्रीलंकेला 1.4 अब्ज डॉलर्सचं कर्ज दिलं. श्रीलंका ते फेडू शकला नाही, मग काय? चीनच्या एका खासगी कंपनीला 2017 साली हा प्रकल्प 99 वर्षांच्या लीजवर मिळाला. श्रीलंका पुन्हा चीनकडून अडीच अब्ज डॉलर्सचं कर्ज घेण्याच्या तयारीत आहे.

श्रीलंकेकडचा परकीय चलनाचा साठा, म्हणजे फॉरेक्स रिझर्व्ह कमी होऊन जानेवारी 2022 मध्ये 2.36 अब्ज डॉलर्सवर आलं होतं. त्यांना 2022 च्या वर्षात साधारण 7 अब्ज डॉलर्सचं कर्ज फेडायचं आहे. या दोन्ही आकड्यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे ते डिफॉल्टर होणार, कर्जबुडवे होणार ही भीती आहे. या सगळ्याचा परिणाम श्रीलंकन रुपयाच्या किमतीवरही झालाय.

एका भारतीय रुपयासाठी किंमत पावणेचार श्रीलंकन रुपये इतकी आहे. आणि एका अमेरिकन डॉलरसाठी 287 श्रीलंकन रुपये मोजावे लागतायत. रुपयाच्या घसरलेल्या किमतीमुळे त्यांना कुठलीही आयात करताना खूप भुर्दंड बसतोय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)