You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीलंका: गृहयुद्धाच्या 10 वर्षानंतरही बेपत्ता आहेत फादर फ्रान्सिस
श्रीलंकेतलं गृहयुद्ध संपून आता एक दशक लोटलं आहे. मात्र या युद्धात आपले कुटुंबीय तसंच मित्र गमावलेल्या हजारो नागरिकांच्या मनात युद्धाच्या काळ्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. ही कहाणी आहे फादर फ्रान्सिस यांची.
श्रीलंकेत जवळपास तीन दशकं चाललेला रक्तरंजित संघर्ष 18 मे 2009 रोजी संपुष्टात आला. या संघर्षात जवळपास लाखभर लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. तर हजारो जण अजूनही बेपत्ता आहेत.
श्रीलंकेत सुरू असलेला हा संघर्ष वांशिक होता. तिथल्या अल्पसंख्याक तामीळ लोकांना स्वतंत्र तामीळ राष्ट्र म्हणजे 'ईलम' हवं होतं आणि त्यासाठी त्यांनी सशस्त्र लढा दिला. या बंडखोरांनी लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ ईलम (LTTE) ही संघटना स्थापन केली.
LTTE किंवा लिट्टे नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संघटनेच्या बंडखोरांना तामीळ टायगर्स किंवा तामीळ वाघ म्हटलं जायचं. या तामीळ वाघांनी श्रीलंकेच्या सैन्याला लक्ष्य केलं. या दोघांवरही सामान्य नागरिकांवर बेसुमार अत्याचार केल्याचे आरोप झाले.
युद्ध समाप्तीच्या काळात एका तामीळ कॅथलिक पादरींच्या सांगण्यावरून जवळपास 360 बंडखोरांनी शरणागती पत्करली. यात लहान मुलांचाही समावेश होता. त्यातला सर्वात लहान मुलगा तर जेमतेम दोन वर्षांचा होता. हे सर्वजण युद्ध समाप्तीच्या दिवशी सैन्याच्या ट्रकमध्ये बसून गेले. मात्र ते पुन्हा कधीच परतले नाही.
फादर फ्रान्सिस स्वतंत्र तामीळ राष्ट्राचे खंदे पुरस्कर्ते होते. मात्र त्यांनी कधीच हातात शस्त्र उचललं नाही.
व्हॅटिकनला तीन पानी पत्र
गृहयुद्ध संपण्याच्या आठ दिवस आधी त्यांनी व्हॅटिकनला एक तीन पानी पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी एकाकी पडल्याची भावना व्यक्त करत मदतीची विनंती केली होती.
एका खंदकातून त्यांनी हे पत्र लिहिलं होतं. त्या ठिकाणी आज युद्धात मृत्युमुखी पडलेल्या तामिळी नागरिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ रक्ताने माखलेल्या हाताचं एक स्मारक उभारण्यात आलं आहे.
बीबीसीने प्रतिक्रियेसाठी व्हॅटिकनशीही संपर्क साधला. मात्र त्यांचं उत्तर अजून आलेलं नाही. 10 मे 2009 रोजी पाठवलेल्या पत्रात फादर फ्रॅन्सिस लिहितात...
परमपवित्र पोप बेनेडिक्ट सोळावे यांस...
तामीळ राष्ट्राचा नायनाट करण्यासाठी श्रीलंकेच्या सरकारनं युद्ध पुकारलं आहे. हे नरसंहार करणारं युद्ध आहे.
विषारी आणि धोकादायक वायूंनी प्रदूषित झालेल्या या हवेत तान्ही बाळं, लहान मुलं, स्त्रिया आणि वृद्धांच्या दुःख आणि वेदनांचे चित्कार भरले आहेत.
सध्या सुरू असलेल्या युद्धाविषयी आपली मतं प्रभावीपणे आणि परखडपणे मांडण्याचं शहाणपण आणि धाडस श्रीलंकेतल्या चर्चकडे नाही, हे दुर्दैवी आहे.
या पत्रामुळे श्रीलंकेच्या सरकारचा रोष मी ओढावून घेत आहे आणि त्यामुळे मला ठार करून त्याचा सूड घेतला जाईल, याची मला कल्पना आहे. तुमच्या पवित्र आशीर्वादाच्या प्रतीक्षेत.
जी. ए. फ्रान्सिस जोसेफ
तामीळ वाघांच्या पराभवानंतर नेमकं काय घडलं?
एव्हाना तामिळी वाघांचा जवळपास पराभव झाला होता. हे पत्र लिहिल्याच्या काही वेळानंतर फादर फ्रान्सिस हजारो तामीळ स्त्री-पुरुष आणि लहान मुलांसोबत बंडखोरांचा गढ असलेल्या, मात्र आता सरकारच्या ताब्यात गेलेल्या श्रीलंकेतल्या ईशान्य भागातल्या वत्तुवागल पुलावरून निघाले.
प्रत्यक्षदर्शी सांगतात, की ते जेव्हा जात होते तेव्हा त्या पुलाखालच्या नदीतल्या पाण्यात मृतदेहांचा खच होता आणि या मृतदेहांच्या रक्तानं नदीतलं पाणी लाल झालं होतं.
त्या दिवसानंतर आजपर्यंत फादर फ्रान्सिस यांचे मित्र आणि सहकारी यांच्यासह हजारो नागरिक युद्धात बेपत्ता झालेले हजारो लोक कुठे गेले, याचं उत्तर मागण्यासाठी उत्तर मोर्चे काढत राहतात.
यातले अनेक मोर्चेकरी हे युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात ज्या तीन लाख तामीळ नागरिकांना एका चिंचोळ्या किनारपट्टीच्या भागात पाठवण्यात आलं होतं त्यातले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार युद्धाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये या तीन लाख तामीळ नागरिकांपैकी जवळपास चाळीस हजार लोकांना ठार करण्यात आलं तर अनेक जण जखमी झाले.
मात्र श्रीलंका सरकारनं नेहमीच ही गोष्ट फेटाळून लावली आहे. सुरुवातीला तर संयुक्त राष्ट्रांनी जेवढा आकडा सांगितला त्याच्या एक चतुर्थांश लोकच मारले गेल्याचं श्रीलंकन सरकारचं म्हणणं होतं. जे शरण आले त्यांना ठार करण्यात आलं नाही, असा दावा सैन्याने केला होता.
नव्वद वर्षांचे मोझेस अरुलानंदन फादर फ्रान्सिस यांचे चुलत भाऊ आहेत. फादर फ्रान्सिस यांच्या जाण्याने पुरते खचून गेलेले मोझेस यांनी स्थानिक कोर्टासोबतच संयुक्त राष्ट्रातही याचिका दाखल केली होती. मात्र, दोन्ही ठिकाणी त्यांच्या पदरी निराशाच पडली.
"त्यांची काळजी करणं आणि रडणं एवढंच आम्ही करू शकतो," ते सांगत होते. "आमचे घनिष्ठ संबंध होते. ते माझ्या सख्ख्या भावासारखे होते. त्यांच्या आई-वडिलांचे ते एकुलते एक होते आणि फ्रान्सिस कॉलेजमध्ये रहायचे तेव्हा त्यांची आई एकटीच होती. मी तिला सगळी मदत करायचो."
कोण आहेत फादर फ्रान्सिस?
फादर फ्रान्सिस यांनी उत्तर श्रीलंकेतल्या जाफनामधल्या सेंट पेट्रिक्स कॉलेजमधून शिक्षण घेतलं. कॅथलिक पुजारी म्हणून निवड झाल्यानंतर ते याच शाळेत इंग्रजीचे शिक्षक म्हणून गेले. पुढे प्राचार्य झाले. त्यांच्या आयुष्यातला बराचसा काळ त्यांनी वर्ग खोल्या, कॉलेजचा परिसर आणि शाळेची क्रिकेट टीम ज्या मैदानावर खेळायची तिथेच घालवला.
त्यांचे माजी विद्यार्थी सांगतात, की फादर फ्रान्सिस शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखत. आजही या कॉलेजमध्ये त्यांचा वारसा पुढे सुरू आहे. शाळेतल्या ग्रंथालयात त्यांचं मोठं कट आऊट लावण्यात आलं आहे.
अरुलानंदन यांना आजही अश्रू अनावर होतात. ते सांगतात, "ते कुठे आहेत, कसे आहेत, हे कळावं यासाठी मी रोज देवाकडे प्रार्थना करतो."
फादर फ्रान्सिस सरकारी सुरक्षा दलांचे मोठे टीकाकार होते. मात्र, बंडखोरांनी केलेल्या अत्याचाराविषयी त्यांनी कधीच एक शब्दही काढला नाही.
स्वतंत्र राष्ट्राच्या आपल्या लक्ष्यासाठी तामिळी बंडखोरांनी ठरवून केलेल्या हत्या, सामूहिक हत्या आणि आत्मघातकी हल्ले अशा क्रूर तंत्राचा वापर केला. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार 2002 ते 2007 दरम्यान तामिळी वाघांनी जवळपास 6,000 मुलांना बळजबरीने संघटनेत सामील करून घेतले होतं आणि त्यातली 1,300 मुलं आजही बेपत्ता आहेत.
युद्धाच्या शेवटच्या आठवड्यात हजारोंच्या संख्येने बंडखोर आणि सामान्य नागरिक मोठ्या मैदानात उभारलेल्या लष्करी चेक पॉईंटमध्ये आपल्या भाग्याचा काय फैसला होतो, याची वाट बघत थांबले होते.
जयाकुमारी कृष्णकुमार हिचं LTTE मध्ये महत्त्वाचा सदस्य असलेल्या एकाशी लग्न झालं होतं. तोदेखील फादर फ्रान्सिस यांच्या सोबतच बसमध्ये चढला होता. शरण आलेल्या सर्वांची फादर फ्रान्सिस यांनी एक यादी बनवल्याचं त्या सांगतात.
त्या सांगतात, "सर्वात आधी माझे पती चढले. त्यानंतर खूप जण चढले आणि सर्वात शेवटी फादर फ्रान्सिस चढले. आपल्या पांढऱ्या झग्याचा सैन्याचे जवान आदर ठेवतील, अशी त्यांची अपेक्षा होती. ते घाबरलेले होते. मात्र, सर्व ठीक होईल असा विश्वास त्यांना होता आणि आपण त्यांच्यासोबत गेलो तर आपणही सुखरूप राहू असा विश्वास इतर तामिळी नागरिकांना होता."
बेपत्ता झालेल्यांचे कुटुंबिय न्यायाच्या प्रतीक्षेत
श्रीलंकेवरील संयुक्त राष्ट्रांच्या समितीतल्या तज्ज्ञ यास्मीन सुका सांगतात, "ही एकमेव अशी घटना आहे ज्यात मोठ्या प्रमाणावर लोक बेपत्ता झाले होते."
बेपत्ता झालेल्यांचे कुटुंबीय सांगतात त्यांना न्यायालयाकडून कोणताही न्याय मिळाला नाही.
बेपत्ता झालेल्यांबाबत सरकार अपयशी ठरल्याचं यास्मीन सुका यांचं मत आहे. त्या म्हणतात, "एकदा शरणागती पत्करल्यानंतर सामान्यपणे मानवाधिकार कायद्याखाली त्यांना संरक्षण मिळायला हवं होतं. शरण आलेल्यांना आदराची वागणूक मिळते आणि त्यांच्या जीवाला धोका नसतो."
बेपत्ता झालेले सर्वजण युद्ध गुन्ह्याचे बळी ठरले असू शकतात, ही गोष्ट श्रीलंकेच्या लष्कराने कायम फेटाळून लावली आहे.
सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर सुमित आटापट्टू म्हणतात, "सैन्यापुढे शरणागती पत्करलेल्यांना ठार करण्यात आलं नाही, याची खात्री बाळगा." तसंच आज कुठलाही बंडखोर तुरुंगात नसल्याचंही ते सांगतात.
"संयुक्त राष्ट्रांसह अनेक परदेशी प्रतिनिधींनी स्वतः येऊन आमच्या कॅम्पची पहाणी केली आहे. श्रीलंकेत कुठलाच अंडरग्राउंड तुरुंग नाही. जे शरण आले किंवा अतिरेकी विचारसरणीसाठी ज्यांना अटक झाली, त्यांची सर्व माहिती उपलब्ध आहे."
फादर फ्रान्सिस कुठे आहेत?
अनेक वर्षांच्या आंतरराष्ट्रीय दबावानंतर अखेर सरकारने 2017 साली बेपत्ता नागरिकांसंबंधी एक विभाग सुरू केला. बेपत्ता असलेल्या हजारो नागरिकांना शोधून काढण्याचं मोठं काम, या विभागावर सोपवण्यात आलं आहे.
या विभागाला आजवर एकाही माणसाला शोधण्यात यश आलेलं नाही. मात्र, आपण प्रयत्न करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
"फील्डवर जाऊन आम्ही लोकांना शोधतोय असं म्हणून काम होतं नाही. अशा पद्धतीने काम होत नसतं. शोध घेणं, याद्या बनवणं, डेटाबेस तयार करणं, या सर्व प्रक्रियांना वेळ लागतो," असं या विभागाचे प्रमुख सालिया पिएरिस यांचं म्हणणं आहे.
दुसरीकडे ज्यांची माणसं बेपत्ता आहेत त्यांना दुःख आणि आशा दोन्ही लागून आहेत. बेपत्ता असलेल्यांच्या बायका आजही कपाळावर कुंकू लावतात. लहान मुलं आजही वडिलांची वाट बघत आहेत.
शिवाय, फादर फ्रान्सिस यांचाही शोध लागेल, अशी आशा प्रत्येकालाच आहे. किमान त्यांचं काय झालं, हे एक ना एक दिवस नक्की कळेल, असं त्यांना वाटतं.
मोसेस अरुलानंदन म्हणतात, "सत्य एक ना एक दिवस नक्की समोर येईल."
(एलेन जंग, लुईस अॅडम्यू आणि स्वामीनाथन नटराजन यांचा रिपोर्ट)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)