You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान : स्वप्नात ईशनिंदा पाहून महिलांनी केली शिक्षिकेची हत्या
- Author, अझीजुल्ला खान
- Role, बीबीसी उर्दू
पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात ईशनिंदेच्या मुद्द्यावरून एका शिक्षिकेची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून पुन्हा एकदा धार्मिक कट्टरवादाचा प्रश्न ऐरणीवर असल्याचं दिसतंय.
डेरा इस्माईल खान जिल्ह्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिकवणी घेण्यासाठी जात असलेल्या एका शिक्षिकेला तीन महिलांनी मदरशाच्या दरवाजाबाहेर अडवून तिची हत्या करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, डेरा इस्माईल खानमधील अंजुमाबाद भागात मंगळवारी सकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तीन महिला आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे. पीडितेच्या काकांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी एका मदरशात शिकवत होती. या मदरशातील व्यवस्थापकाने मंगळवारी सकाळी तिच्या काकांना फोन केला. संबंधित तरुणीवर जीवघेणा हल्ला झाला असून ती गंभीर अवस्थेत तशीच रस्त्यावर पडून असल्याचं व्यवस्थापकांनी तरुणीच्या काकांना सांगितलं. ही माहिती मिळाल्यानंतर तिच्या काकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, असं त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.
डेरा इस्माईल खान येथील पोलीस अधिकाऱ्यांनी (DPO) या संपूर्ण प्रकरणाबाबत पत्रकारांना माहिती दिली. मदरशाबाहेर तीन महिलांनी मिळून 21 वर्षीय या शिक्षीकेची हत्या केली, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
त्यांनी पुढं सांगितलं की, "या महिलांना तसंच त्यांच्या एका नातेवाईकाला मृत तरुणीने स्वप्नात ईशनिंदा केल्याचं दिसलं होतं. या कारणामुळेच त्यांनी त्या शिक्षिकेचा खून केला, असं प्राथमिक तपासात पुढे आलं आहे."
डीपीओंच्या म्हणण्यानुसार, "ही घटना खरंच स्वप्नामुळं घडली आहे की त्यामागे आणखी काही इतर कारणे आहेत, याचाही इतर बाजूंनी पोलीस तपास करत आहेत."
'मदरशामध्ये पोहोचल्यावर दिसलं पुतणीचा गळा चिरला होता'
मृत शिक्षिकेच्या काकांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, घटनेची माहिती मिळताच ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तिथं त्यांना दिसलं की, मदरशाच्या गेटजवळ त्यांची पुतणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तिचा गळा चिरला होता आणि ती निपचित पडून होती. ते पोहोचण्याच्या आधीच तिचा मृत्यू झाला होता.
मृत तरुणीच्या काकांच्या म्हणण्यानुसार, "त्यांना समजलं की नेहमीप्रमाणं त्यांची पुतणी रिक्षात बसून मदरशामध्ये पोहोचली, तेव्हा मदरशाच्या गणवेशात आधीच काही महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांनी तिच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून तिचा गळा चिरला. काकांच्या म्हणण्यानुसार, या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींमध्ये स्थानिक लोकांचाही समावेश होता.
मृत तरुणीच्या काकांना पुतणी आणि सदर महिला यांच्यातील वैराची माहिती नाही, असं त्यांनी पोलीस जबाबात म्हटलं आहे. पीडितेचे वडील आणि भाऊ परदेशात राहतात, त्यामुळे तिच्या काकांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली, असं ते म्हणाले.
मृत शिक्षिका शिकवत असलेल्या मदरशाचे व्यवस्थापक मौलाना शफीउल्ला यांनी बीबीसीला सांगितलं की, संबंधित तरुणी गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या मदरशात शिकवत होती.
तर आरोपी महिला दुसऱ्या मदरशाच्या विद्यार्थिनी आणि शिक्षिका आहेत, असा दावा शफीउल्लां यांनी केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांमध्ये दोन सख्या बहिणी आणि त्यांची एक चुलत बहीण असून त्यापैकी एक शिक्षिका आहे.
हत्येला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न
खैबर पख्तुनख्वा भागात घडलेल्या या घटनेला स्थानिक पातळीवर धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुध्दा केला जात आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या हत्येचं कारण ईशनिंदा असल्याचं सांगितलं जात असला तरी याची खात्री करू शकेल, असा एकही प्रत्यक्षदर्शी पुरावा सापडला नाही.
तसंच या प्रकरणाशी ईशनिंदेचा कोणताही संबंध असल्याचं मदरशाचे व्यवस्थापक मौलाना शफीउल्ला यांनी फेटाळून लावलं.
या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तपास सुरू झाला आहे. तसंच शिक्षिकेचं शवविच्छेदनही करण्यात येत आहे.
डेरा इस्माईल खान शहर आणि परिसरात यापूर्वी दहशतवादाशी संबंधित अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर आता या प्रकरणामुळे शहर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
शहरात काही काळ टार्गेट किलिंगच्या घटनांमध्येही वाढ झाली असून एका दिवसापूर्वी कुलाची परिसरात घराच्या दारात गोळीबार करून एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)