रशिया-युक्रेन युद्धामुळे भारत-चीन संबंध सुधारणार का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पद्मजा वेंकटरमण
- Role, बीबीसी मॉनिटरिंग
रशिया - युक्रेन युद्धामध्ये भारताने घेतलेली भूमिका चीन सतत त्यांची अधिकृत निवेदनं आणि माध्यमांद्वारे प्रसारित करतोय. भारताने स्वतंत्र धोरण अवलंबल्याचं सांगून चीन भारताचं कौतुक करतोय.
युक्रेनवरच्या हल्ल्यांबाबत भारत आणि चीनचं धोरण एकसमान असून भारत चीनला आपल्यासोबतचे संबंध सुधारण्याची संधी देण्याची शक्यता असल्याचं चिनी माध्यमं म्हणत आहेत.
2020मध्ये गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीपासून दोन्ही देशांतला तणाव वाढलेला आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी भारत दौऱ्यावर आले होते. युक्रेनमध्ये तात्काळ युद्धबंदी व्हावी यावर 25 मार्चला या दौऱ्यादरम्यान भारत आणि चीनने एकमत मांडलं. गलवान खोऱ्यातल्या हिंसाचारानंतर भारत दौऱ्यावर येणारे वांग यी हे पहिले महत्त्वाचे अधिकारी आहेत.
पण सीमावादाचा मुद्दा भारत दोन्ही देशांमधल्या एकूण संबंधांपासून आपण वेगळा करणार नसल्याचं भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितलंय.
पण आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनने घेतलेली भूमिका वैध ठरावी म्हणून भारताने युक्रेनबद्दल घेतेली भूमिका जगाला वारंवार सांगणं चीन सुरूच ठेवेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.
भारताच्या परराष्ट्र धोरणांचं कौतुक
पाश्चिमात्य देश चीनवर दोन प्रकारे दबाव आणतायत. चीनने रशियाच्या कारवाईवर टीका करावी अशी मागणी केली जातेय, तर दुसरीकडे चीनने रशियासोबतचे आपले चांगले संबंध वापरत युक्रेनमधलं युद्ध संपुष्टात आणण्याासाठी मदत करावी, असाही दबाव आणण्यात येतोय.
चीनमधल्या सरकारी माध्यमांनी भारताबद्दल नरम भूमिका घेतलीय. रशियाने केलेल्या हल्ल्याची निंदा न करता चीनमधली माध्यमं धोरणात्मक पवित्रा घेतायत.

फोटो स्रोत, ANI
युक्रेन पेचामुळे भारतावर 'आपली 'सन्मानजनक' पत पुन्हा मिळवण्यासाठी पश्चिमेसोबतच्या संबंधाबद्दल पुन्हा एकदा विचार करण्याची पाळी आली आहे' असं ग्लोबल टाईम्स या चीनमधल्या सरकारी वर्तमानपत्राने 16 मार्चला म्हटलंय.
रशियाकडून सवलतीच्या किंमतीमध्ये तेल विकत घेण्याच्या भारताच्या निर्णयाचंही चीनच्या माध्यमांनी समर्थन केलंय.
'रशियासोबत भारताने केलेला तेल व्यवहार वैध असून त्याविषयी थयथयाट करू नये,' असा इशाराही चीनमधल्या माध्यमांनी अमेरिकेसह इतर विरोधक देशांना दिलाय.

फोटो स्रोत, TWITTER/@SPOKESPERSONCHN/GLOBAL TIMES
वांग यी यांच्या भारत दौऱ्यानंतर ग्लोबल टाईम्सने संपादकीय लिहिलं, "युक्रेन प्रश्न हा भारत - चीनच्या समान उद्दिष्टांचा आरसा आहे. यामुळे भारत आणि चीनच्या संबंधांमधली एकरूपता समोर आली."
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत 25 मार्चला झालेल्या बैठकीमध्ये वांग यी म्हणाले, "ज्यावेळी चीन आणि भारत एकमुखाने बोलतील तेव्हा जग त्यांचं म्हणणं ऐकेल. चीन आणि भारतादरम्यानच्या सहकार्याकडे जगाचं लक्ष असेल."
पण वांग यी यांनी या बैठकीदरम्यान युक्रेनविषयीच्या धोरणांचा उल्लेख केला नाही.
मॉस्कोवर आंतरराष्ट्रीय निर्बंध असूनही रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या 'आत्मनिर्भर भारताचं' कौतुक काही दिवसांपूर्वीच भारतातले चीनचे अधिकारी शी फे यांनी ट्विटरवर केलं होतं. पण चीनमध्ये ट्विटर ब्लॉक आहे.
'क्वॉड'चं महत्त्वं कमी करण्यासाठी युक्रेन संकटाचा वापर
चीन एकीकडे भारताच्या धोरणांचं कौतुक करतोय, तर दुसरीकडे भारताने क्वॉड म्हणजेच क्वाड्रिलॅटरल अलायन्ससोबतच्या संबंधांविषयी पुनर्विचार करावा असाही सल्ला चीनकडून सतत दिला जातोय. क्वॉड देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि भारत सहभागी आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये चीनमधल्या सरकारी माध्यमांनी क्वाडच्या सदस्य देशांवर जोरदार टीका केली.
जपानचे पंतप्रधान फुमिओ किशीदा 19 मार्चच्या त्यांच्या दौऱ्यादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या युक्रेनबद्दलच्या पवित्र्यावरून झुकवण्यात अपयशी झाल्याचं ग्लोबल टाईम्सने त्यांनी चिनी आणि इंग्रजी आवृत्ती म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
भारताने अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानप्रमाणे रशियावर निर्बंध न लावल्याने क्वॉडचा पाया डळमळीत झाल्याचं या वर्तमानपत्राने शिंघुवा युनिव्हर्सिटीच्या नॅशनल स्ट्रॅटेजी इन्स्टिट्यूटच्या रिसर्च डायरेक्टर कियान फेंग यांचा संदर्भ देत म्हटलंय.
भारत अमेरिकेच्या 'हो ला हो' म्हणण्यासाठी कटिबद्ध नसल्याचं 'चायना डेली' या सरकारी इंग्रजी वर्तमानपत्राने म्हटलंय. याच लेखामधून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावरही टीका करण्यात आलीय.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधाचा प्रस्ताव अमेरिकेने मांडला. यामध्ये भारताने मतदान न करण्यावरही ग्लोबल टाईम्सने ऑस्ट्रेलिया आणि भारताची तुलना केली आहे.
या वर्तमानपत्राने म्हटलंय, "ऑस्ट्रेलिया जितकं वॉशिंग्टनच्या आज्ञा पाळतं, तितकं मोदी सरकार पाळत नाही. भारताने आपल्या देशाचं हित आणि भविष्यातल्या लष्करी उद्दिष्टांना डोळ्यांसमोर ठेवून थंड डोक्याने आपली दिशा ठरवली आहे."
'क्वॉड'चा प्रभाव कमी करण्यासाठी बीजिंग युक्रेनच्या मुद्द्याचा वापर करत असल्याचं भारतातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
भारत - चीन सख्य वाढणार का?
चीनमधल्या माध्यमांनी भारताच्या धोरणांचं कौतुक करणं किंवा वांग यी यांचं अचानक भारतात येणं हे दोन्ही देशांमधले संबंध सुधारत असल्याचे संकेत आहेत. 21 मार्चला चीनमध्ये विमान दुर्घटना झाली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून याविषयी दुःख व्यक्त केलं होतं. चीनमधल्या माध्यमांनी याचीही बातमी दिली.
पण हे संबंध सुधारत असल्याचे संकेत दोन्ही बाजूंनी मिळत असूनही भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी वांग यी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत एक गोष्ट स्पष्ट केली होती, "2020 नंतर चीनने अधिक सैन्य तैनात केल्याने जो तणाव निर्माण झालेला आहे तो साध्या संबंधांनी संपुष्टात आणता येणार नाही."
NDTV या वृत्तवाहिनीने याविषयीची बातमी दिली होती.

फोटो स्रोत, ANI
दोन्ही देशांतले संबंध सुधारण्याच्या मार्गांतल्या अडथळ्यांचा उल्लेखही काही चिनी तज्ज्ञांनी केला आहे. रशियाच्या बाबत भारत आणि अमेरिकेचं धोरण अगदी वेगवेगळं असलं तरी चीनला 'संतुलित आणि नियंत्रित' ठेवण्याबाबत दोघांचं एकमत असल्याचं शांघाय इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधले स्कॉलर लियु जॉन्गई यांनी म्हटलंय.
युक्रेनबाबत भारत आणि चीनचं धोरण समान असल्याचं चीन येत्या काळात जगासमोर आणत राहील असंही तज्ज्ञांना वाटतं.
शांघाय इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीज मधले संशोधक झाओ गानचेंग म्हणाले, "जग एका महत्त्वाच्या वळणावर आलेलं आहे आणि भारतासह सगळ्या दक्षिण आशियातल्या देशांचं युक्रेनबाबत एकसमान धोरण आहे. चीनला याच मुद्द्यावर समर्थन मिळवण्याची गरज आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








