रशिया युक्रेन युद्ध : बायडन म्हणतात पुतिन 'वॉर क्रिमिनल', तर हे उद्गार अस्वीकार्ह - क्रेमलिनचं प्रत्युत्तर

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे 'वॉर क्रिमिनल' म्हणजे युद्धाचे गुन्हेगार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय. 1 अब्ज डॉलर्स मूल्याची शस्त्रास्त्रं युक्रेनला पाठवण्याचं अमेरिकेने जाहीर केलंय. तर बायडन यांचं हे विधान 'अस्वीकार्ह आणि माफ न करण्याजोगं' असल्याचं क्रेमलिनने म्हटलंय.

'रशियाने रासायनिक किंवा जैविक शस्त्रास्त्रांचा वापर युक्रेनमध्ये केल्यास त्याचे परिणाम होतील' असा इशारा आपण रशियाला दिल्याचं अमेरिकेने म्हटलंय.

जो बायडन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलिव्हन यांनी बुधवारी रशियन सिक्युरिटी काऊन्सिलचे जनरल निकोलाय पात्रुशेव्ह यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

जनरल पात्रुशेव्ह पुतिन यांच्या जवळच्या 3 सहकाऱ्यांपैकी आहेत आणि ते 1970च्या दशकापासून पुतिन यांच्यासोबत आहेत.

दरम्यान रशियाने युक्रेनच्या शहरांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत.

मारिओपोल शहरामध्ये रशियनाने एका थिएटरवर हल्ला केला. या थिएटरमध्ये सुमारे 1,000 - 1,200 लोकांनी आश्रय घेतला होता, असं मारिओपोल शहराचे महापौर सेर्हिय ओर्लोव्ह यांनी बीबीसीला सांगितलं.

या हल्ल्यामध्ये नेमके किती जण मारले गेले वा जखमी झाले याचा आकडा अजून माहिती नाही.

तर कीव्हमधल्या दोन बहुमजली इमारतीवर झालेल्या हल्ल्यामध्ये काहीजण जखमी झाले.

आतापर्यंत चार रशियन लष्करी अधिकाऱ्यांना मारल्याचा दावा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केलाय, पण या दाव्याची खातरजमा होऊ शकलेली नाही.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी बुधवारी व्हर्च्युअली अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये भाषण केलं. रशियावर आणखी निर्बंध घालावेत आणि युक्रेनवर नो फ्लाय झोन जाहीर करावा अशी मागणी झेलेन्स्कींनी केली. झेलेन्स्कींच्या भाषणानंतर अमेरिकन संसदेने त्यांना उभं राहून मानवंदना दिली.

यासोबतच झेलेन्स्की यांनी आणखी एक व्हीडिओ फेसबुकवर पोस्ट केलाय. यामध्ये ते म्हणतात, "रशिया एक दहशतवादी राष्ट्र झाल्याचं जगाने अधिकृतरित्या म्हटलं पाहिजे. रशियासोबतच्या वाटाघाटींमध्ये माझ्या मागण्या स्पष्ट आहेत : युद्ध थांबवा, सुरक्षा, प्रजासत्ताक, प्रादेशिक सीमा पूर्ववत करण्याची हमी द्या. आमच्या देशाला खऱ्या गोष्टींची हमी द्या, खरं संरक्षण द्या."

रशियावर आणखी निर्बंध आणि नो फ्लाय झोनच्या मागणीचा त्यांनी या व्हीडिओतही पुनरुच्चार केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)