रशिया-युक्रेन लढाई : 'नो फ्लाय झोन' म्हणजे काय? झेलेन्स्की यांनी याबद्दल मागणी का केली आहे?

युक्रेनमध्ये 'नो फ्लाय झोन' जाहीर करावा, असं आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी त्यांच्या अलीकडच्या अनेक व्हीडिओंमधून केलं आहे.

किव्हमध्ये नैऋत्य दिशेला असणाऱ्या विनित्स्या शहरात नागरी विमानतळ पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचंही त्यांनी एका व्हीडिओमध्ये सांगितलं. जगभरातील नेत्यांनी युक्रेनमध्ये 'नो फ्लाय झोन' जाहीर करावा, असं आवाहन त्यांनी या वेळी परत केलं.

इथल्या माणसांचा जीव वाचवणं, ही जगभरातील नेत्यांची मानवी जबाबदारी आहे, असं झेलेन्स्की यांनी सदर पोस्टमध्ये म्हटलं होतं.

ते म्हणाले, "तुम्ही याबाबत काही पावलं उचलली नाहीत आणि आम्हाला संरक्षणासाठी लढाऊ विमानंही पुरवली नाहीत, तर आम्ही हळू-हळू मारलं जावं, अशीच तुमचीही इच्छा असल्याचा निष्कर्ष निघू शकतो."

युक्रेनच्या आकाश हद्दीत 'नो फ्लाय झोन' जाहीर करायला 'नाटो'च्या सदस्य देशांनी आत्तापर्यंत नकार दिला आहे.

अमेरिका आणि पाश्चात्त्य मित्र राष्ट्रांनी आपापला जबाबदारीचा वाटा उचलला, तर युक्रेन रशियाच्या आक्रमकतेचा पूर्णतः प्रतिकार करू शकतो, किंबहुना रशियाला हरवूही शकतो, असं झेलेन्स्की यांनी सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं होतं.

रशियावर ज्या उद्देशाने निर्बंध लावले गेले आहेत, त्यांची दिशा योग्य आहे, असं झेलेन्स्की यांनी एक्सियोस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले, "रशियातील अनेक बँकांना स्विफ्ट यंत्रणेतून वगळण्याचा निर्णय झालेला आहे. शिवाय, युक्रेनला जास्त संख्येने स्टिंगर क्षेपणास्त्रं, रणगाडाविरोधी अस्त्रं पुरवण्याचाही निर्णय योग्य दिशा सूचित करणारा आहे. त्याचप्रमाणे पाश्चात्त्य देशांनी युक्रेनमधील महत्त्वाच्या भागांवर नो फ्लाय झोन जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे."

"आम्ही रशियाचं आक्रमण थोपवू शकतो आणि जगासमोर ते सिद्धही करू शकतो. पण आमच्या सहकारी देशांनीही आपापली भूमिका निभावायला हवी," असं त्यांनी सांगितलं.

परंतु, 'नाटो'ने झेलेन्स्की यांची ही मागणी शुक्रवारी अधिकृतरित्या नाकारली.

'नाटो'ने 'नो फ्लाय झोन'ची मागणी नाकारली

'नो फ्लाय झोन' जाहीर करण्यात आला तर 'नाटो' देश आणि रशिया यांच्यात थेट संघर्ष सुरू होईल आणि यातून उद्भवणारी मानवी हानी भयंकर असेल, असा इशारा नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोलेनबर्ग यांनी आधीही म्हटलं होतं.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीसुद्धा स्पष्टपणे सांगितलं आहे की, अशा पद्धतीची काही कारवाई करण्यात आली, तर ते रशियावरील आक्रमण मानलं जाईल.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडनसुद्धा अशा रितीने 'उड्डाणबंदी क्षेत्र' जाहीर करण्याच्या बाजूचे नाहीत, असं अमेरिकी अधिकाऱ्यांनी अलीकडे स्पष्ट केलं आहे.

नाटो देशांनी 'नो फ्लाय झोन' जाहीर करण्यास नकार देऊन युक्रेनवरील शहरांवर आणि गावांवर बॉम्बवर्षाव करायला रशियाला हिरवा कंदीलच दाखवला आहे, असं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे.

युक्रेनवरील विशिष्ट भागांवर उड्डाणबंदी जाहीर करायला 'नाटो'ने नकार दिल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्की यांनी 'नाटो'वर टीका केली, आणि यातून 'नाटो'चा 'कमकुवतपणा' व 'ऐक्याचा अभाव' दिसून येतो असंही ते म्हणाले.

पाश्चात्त्य सहकारी देशांनी उघडपणे युक्रेनचं समर्थन केलं आहे आणि युक्रेनमधील विध्वंस त्यांनाही दिसतो आहे, तरीसुद्धा हे देश 'नो फ्लाय झोन' लागू करायला नकार का दितायंत?

'नो फ्लाय झोन' म्हणजे काय?

कोणाही देशांनी युक्रेनमध्ये उड्डाणबंदी क्षेत्र लागू केलं, तर तो देश युक्रेनमधील युद्धात सहभागी असल्याचं मानलं जाईल, असं रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एयरोफ्लोट या सरकारी विमान कंपनीच्या फ्लाइड अटेंडेन्टसोबतच्या बैठकीत सांगितलं.

पुतीन म्हणाले, "अशा दिशेने कोणी पाऊल उचललं, तर युक्रेनमधील सशस्त्र बंडखोरीत संबंधित देश सहभागी आहेत, असं मानलं जाईल."

साध्या शब्दांत सांगायचं तर, एखाद्या विशिष्ट प्रदेशात विमानांना उड्डाणासाठी बंदी घालण्यात आली, तर त्या भागाला 'नो फ्लाय झोन' असं संबोधलं जातं.

संवेदनशील ठिकाणांच्या संरक्षणासाठी हा पर्याय वापरला जाऊ शकतो. सरकारी निवास, खेळ सुरू असलेली ठिकाणं, किंवा एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचं स्थळ, इत्यादी ठिकाणी उड्डाणबंदी क्षेत्र लागू केलं जातं. पण या पर्यायाचा वापर तात्पुरताच असतो.

लष्करी कारवाई संदर्भात बोलायचं तर, 'नो फ्लाय झोन' जाहीर केल्यानंतर त्या विशिष्ट प्रदेशातून कोणतंही विमान प्रवास करू शकत नाही. आक्रमणापासून किंवा पाळतीपासून संरक्षणासाठी हा मार्ग स्वीकारला जातो. पण हा निर्णय सैन्य घेतं, त्यामुळे एखादं विमान ही बंदी मोडत असेल तर ते पाडण्याचं काम केलं जातं.

त्यामुळे युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांच्या मागणीचा अर्थ असा होतो की, युक्रेनच्या हवाई हद्दीत रशियाचं विमान दिसलं, तर सैन्यदलं- विशेषतः 'नाटो'च्या फौजा त्या विमानाला थेट लक्ष्य करतील आणि गरज पडल्यास ते विमान नष्ट करतील.

पाश्चात्त्य राष्ट्रं यासाठी तयार का नाहीत?

'नाटो'च्या सैन्यदलांनी रशियन विमानाला किंवा शस्त्रास्त्रांना लक्ष्य केलं, तर त्यातून युद्ध आणखी भीषण रूप घेण्याची शक्यता निर्माण होईल. अशा परिस्थितीत हा संघर्ष अधिक भागांमध्ये पसरत जाण्याचा धोका असेल.

'नाटो'चे सरचिटणीस स्टोल्टेनबर्ग शुक्रवारी म्हणाले, "आम्ही असा काही निर्णय घेतला, तर त्यातून मोठ्या संघर्षाला चिथावणी दिल्यासारखं होईल. यात इतरही अनेक देश सहभागी होतील आणि मोठी मानवी जीवितहानी होईल."

त्यामुळे एका पाठोपाठ एक रशियावर निर्बंध लावणारी पाश्चात्त्य राष्ट्रं व संघटना 'नो फ्लाय झोन' लागू करायला मात्र तयार नाहीत. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धात 'नाटो'ने थेटपणे सहभागी होऊ नये, असं पाश्चात्त्य देशांचं एकंदरित मत आहे. जमिनीवरून किंवा हवेतून कशाही रितीने 'नाटो'ने या युद्धात सहभागी होऊ नये, अशी या देशांची भूमिका दिसते.

अमेरिकेचे माजी हवाई दल जनरल फिलीप ब्रिडलोव यांनी 'फॉरोन पॉलिसी' या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटल्यानुसार, "हे नो फ्लाय झोन आहे, एवढंच बोलून थांबता येत नाही. तिथे प्रत्यक्ष विमानांच्या उड्डाणाला बंदी लागू करावी लागते."

जनरल ब्रिडलोव 2013 ते 2016 या काळात 'नाटो'मध्ये सर्वोच्च सहायक कमांडर राहिले होते. युक्रेनमध्ये 'उड्डाणबंदी क्षेत्र' लागू करण्याच्या मागणीचं समर्थन करणं हा 'नाटो'साठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी अतिशय गंभीर निर्णय असेल, असं ते म्हणतात.

ते पुढे सांगतात, "असं काही केलं तर त्यातून पूर्ण युद्धाला आमंत्रण दिल्यासारखं होईल."

रशियन विमानं टिपायची कारवाई केली तर संपूर्ण युरोपात युद्ध सुरू होईल त्यामुळे 'नो फ्लाय झोन'च्या मागणीचं समर्थन आपण करत नसल्याचं ब्रिटनचे संरक्षण मंत्री बेन वॉलस यांनी स्पष्ट केलं आहे.

अमेरिकेनेही अशाच प्रकारचं कारण देऊन युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांची ही मागणी फेटाळली आहे.

शिवाय, रशियासोबतचा संघर्ष आणखी वाढवण्यातून अण्वास्त्रांचा धोकाही वाढण्याची शक्यता आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या देशातील आण्विक शक्ती 'स्पेशल अलर्ट'वर ठेवली आहे, त्यामुळे हा धोका अधिक गंभीर ठरतो. त्यांचं हे पाऊल जगभरात चिंता वाढवणारं ठरलं आहे.

परंतु, जाणकारांच्या म्हणण्यानुसार, या युद्धात युक्रेनच्या बाजूने इतर कोणा देशाने सहभागी होऊ नये, यासाठी बहुधा पुतीन यांनी अण्वास्त्रं सज्ज ठेवली असतील. याचा अर्थ ते अण्वास्त्रं वापरण्याचा संकेत देतायंत, असं मानता येणार नाही.

पण महायुद्ध होण्याची छोटीशी शक्यता निर्माण झाली, तरी अणुयुद्धाबाबतचा धोका आणखी वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये नो फ्लाय झोन लागू करणं ठिणगीसारखं ठरू शकतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)