युक्रेन-रशिया वाद : पुतिन यांची युक्रेनबाबत अंदाज बांधण्यात चूक झाली का?

    • Author, जॉन सिम्पसन
    • Role, वर्ल्ड अफेअर्स एडिटर

युक्रेननं युद्धाच्या पहिल्या आठवड्यात रशियाचा ज्याप्रकारे दृढनिश्चयानं सामना केला, ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अपेक्षेच्या अगदी विपरीत आहे.

रशियाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी जो अंदाज बांधला होता, त्यापेक्षा सध्याची परिस्थिती अगदी वेगळी आहे.

मात्र, ही केवळ युद्धाची सुरुवात असून आणखी धोकादायक आणि भयावह युद्धात त्याचं रुपांतर होण्याची शक्यता आहे.

रशिया हल्ल्यानंतर काही दिवसांतच कीव्हवर ताबा मिळवण्यात यशस्वी होईल, अशी आशा पुतिन यांना असणार आहे. पाश्चिमात्य देश घाबरून विभाजित होतील, आणि युक्रेनवर रशियाचा दावा मान्य करतील असा भरवसा रशियाला असेल. कारण रशिया त्याला त्यांचाच एक भाग असल्याचं समजतो.

पण, तसं झालं नाही. युक्रेन रशियासाठी अडचणीचं ठरलं आहे. तर पाश्चिमात्य देश आणि विशेषतः जर्मनीची प्रतिक्रियाही अपेक्षेपेक्षा अधिक तीव्र असल्याचं पाहायला मिळालं आहे.

या युद्धामुळं रशियाच्या अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पुतिन यांचा मोठा सहकारी समजल्या जाणाऱ्या चीनमध्येही याबाबत चिंता वाढल्या आहेत. कारण पाश्चिमात्य देशांचा चीनवरही राग निघू शकतो. त्यामुळंही चीनच्या अर्थव्यवस्थेला गंभीर नुकसान होऊ शकतं. त्यामुळं त्यानंही या हल्ल्यापासून स्वतःला दूर केलं आहे.

दुसरीकडं नेटोची शक्ती आणखी वाढू शकते. फिनलँड आणि स्वीडनही त्यांच्या सुरक्षेसाठी नेटोमध्ये सहभागी होऊ शकतात. युक्रेननं नेटोचं सदस्यत्व घेऊ नये म्हणूनच पुतीन यांनी या युद्धाला सुरुवात केली आहे. पण त्याउलट आता नेटोमध्ये अधिक देश सहभागी होऊ शकतात.

या सर्व गोष्टी व्लादिमीर पुतिन यांच्यासमोर अडचणी निर्माण करू शकतात. हा सर्व पुतिन यांच्या चुकीच्या अंदाजाचा परिणाम आहे. ते फार मोजक्या सल्लागारांवर विश्वास ठेवतात, जे केवळ त्यांच्या निर्णयाच्या बाजुनं होकारार्थी मान हलवतील. पण आता ते नव्या पर्यायांचा विचार करतील.

त्यांना जेव्हा अडवलं जातं, तेव्हा ते मागं हटण्यास नकार देतात आणि आणखी ताकदीनं प्रहार करतात. तसं करण्यासाठी त्यांच्याकडं शस्त्रंदेखील आहेत.

घातक शस्त्रांचा वापर

अमेरिकेतील युक्रेनच्या राजदुतांनी रशियाच्या लष्करानं आधीही थर्मोबेरिक शस्त्राचा वापर केला असल्याचा दावा केला आहे. या शस्त्राला 'व्हॅक्यूम बॉम्ब' देखील म्हटलं जातं. तो वातावरणातील ऑक्सिजन शोषून आणखी अधिक ऊर्जेसह मोठा स्फोट घडवतो.

अशा काळामध्ये राजदुतांकडून वेगवेगळ्या प्रकारचे दावे-प्रतिदावे केले जातात. पण युक्रेनच्या दिशेनं जाणारे रशियाचे थर्मोबेरिक रॉकेट लाँचरचे व्हीडिओही पाहायला मिळालेले आहेत.

खार्किव्हमध्ये सामान्य नागरिकांच्या विरोधात क्लस्टर बॉम्बचा वापर केल्याचंही पाहायला मिळालं आहे. या बॉम्बच्या स्फोटामुळं लहान-लहान टोकदार तुकडे बाहेर पडतात आणि आजूबाजूच्या लोकांना जखमी करतात.

2008 मध्ये एका आंतरराष्ट्रीय परिषदेत यावर बंदी घालण्यात आली होती. पण रशियानं त्यावर स्वाक्षरी केली नव्हती. क्लस्टर बॉम्बचा वापर ते आंतरराष्ट्रीय मानवी नियमांनुसारच करतील असा दावा रशियानं केला होता. पण, खार्किवच्या लोकांचा अनुभव वेगळाच असेल.

व्लादिमीर पुतिन यांनी धोकादायक शस्त्रांचा वापर करण्यात कधीही मागंपुढं पाहिलं नाही. त्यांनी 2006 मध्ये लंडनमध्ये केजीबीचे माजी एजंट अलेक्झांडर लितविनेंको यांच्या हत्यासाठी रेडिओअॅक्टिव्ह पोलोनियमच्या वापराला मंजुरी दिली होती, असंही म्हटलं जातं.

रशियन लष्कराची गुप्तचर संघटनेला आणखी एक माजी हेर सर्गेई स्क्रिपल यांना 2018 मध्ये ब्रिटनच्या सेल्सबरीमध्ये विषारी नर्व्ह एजंट नोविचोकद्वारे मारण्याची परवानगी दिली होती, अशीदेखील शक्यता आहे. याच नर्व्ह एजंटमुळंच एका महिलेचीही हत्या झाली होती.

सामान्य नागरिकांना धोका निर्माण झाला तरी पुतिन यांना त्यामुळं फारसा फरक पडत नाही, असं वाटतं. या हत्या अगदी नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात आल्या होत्या. मात्र, युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर होणारे हल्ले वेगळे आहेत. पण, त्यात एक साम्य आहे, ते म्हणजे रशियाच्या मोठ्या हितापुढं सामान्य नागरिकांच्या जीवाला किंमत नाही.

अणु हल्ल्याचा धोका

पुतिन युक्रेनवर विजय मिळवण्यासाठी अण्वस्त्रांचा वापर करण्यासाठी तयार आहे का? अशी शक्यता असू शकते, पण अनेक तज्ज्ञांच्या मते अद्याप स्थिती एवढी गंभीर झालेली नाही.

युक्रेनमध्ये बाहेरून कोणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर त्याला यापेक्षाही अधिक गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असं पुतिन यांनी आधीच स्पष्टपणे सांगितलं आहे.

जगामध्ये रशियाचा समावेश नसेल तर जगाचं अस्तित्व तरी का राहावं? असं, पुतिन यांनी अनेकदा म्हटलं आहे.

पण इतिहासाची पुनरावृत्तीही होऊ शकते. 1939 मध्ये जेव्हा स्टॅलिननं फिनलँडवर हल्ला केला होता तर काही दिवसांतच ते शस्त्रं टाकतील अशी त्यांना आशा होती. पण फिनलँडनं तीव्र प्रतिकार केला आणि रशियाच्या लष्कराचं प्रचंड नुकसान झालं.

शीतयुद्ध संपायला जवळपास एक वर्ष बाकी होतं. फिनलँडनं त्यांच्या ताब्यातील काही जमीन गमावली तरीही त्यांचं स्वातंत्र्य कामय राहिलं. युक्रेनमध्येही अशाचप्रकारे युद्ध संपेल अशी शक्यता आहे.

आता तर केवळ सुरुवात झाली आहे. युक्रेन सहा दिवसांपासून धाडसानं ठामपणे उभं आहे. पण ते रशियाला फार काळ अडवू शकतील असाही त्याचा अर्थ नाही.

पण युद्धाचा पहिला डाव बरोबरीत सुटला असं म्हणायला हरकत नाही. पाश्चिमात्य देशांची प्रतिक्रिया ही अपेक्षेपेक्षा अधिक तीव्र आणि प्रखर अशी समोर येत आहे. विशेषतः पुतिन यांना अपेक्षा होती, त्याहीपेक्षा अधिक तीव्र या प्रतिक्रिया आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)