You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशिया-युक्रेन संघर्ष: मुघलांनी राजपूतांबरोबर जे केलं तसं रशियाचं वर्तन-युक्रेनचे राजदूत #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. मुघलांनी राजपूतांबरोबर जे केलं तसं रशियाचं वर्तन- युक्रेनचे भारतातील राजदूत
"रशियाचा हल्ला हा नरसंहार आहे आणि मुघलांनी राजपूतांसोबत जे केले होते तसेच आहे," असं युक्रेनचे भारतातील राजदूत डॉ. इगोर पोलिखा म्हणाले.
"रशियाचा युक्रेनवरचा हल्ला म्हणजे भारताच्या इतिहासात मुघलांनी राजपूतांच्या केलेल्या नरसंहारासारखे आहे. पुतीनना युक्रेनवर हल्ला करण्यापासून रोखण्यासाठी सर्व संसाधनांचा वापर करा, असे पंतप्रधान मोदींसह जगातील सर्व प्रभावशाली नेत्यांना आमचे आवाहन आहे", असे पोलिखा म्हणाले. हिंदुस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे.
खारकीव्ह येथील हल्ल्यात ठार झालेल्या नवीन या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने संपूर्ण देशात शोक आहे. नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना पोलिखा यांनी नवीनचा उल्लेख केला. त्यांनी नवीनच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केवा.
नवीनच्या निधनाबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. पूर्वी लष्करी ठिकाणांवर हल्ले केले जात होते. पण आता हे हल्ले नागरी भागातही केले जात आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी रशियावर केला.
2. आजपासून निम्मं राज्य निर्बंधमुक्त
राज्यातील करोनाचा संसर्ग ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून मुंबई, नागपूर, पुण्यासह निम्मे राज्य निर्बंधमुक्त होणार आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्हयांतील निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत. त्यानुसार उपाहारगृहे, चित्रपट व नाट्यगृहे आदी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मुभा दिली जाईल.
राज्यात यापूर्वीच 1 फेब्रुवारीपासून सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, नाटय़गृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे.
तसेच लग्नसमारंभासाठी दोनशे तर अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवरील निर्बंध रद्द करण्यात आले आहेत. मात्र अजूनही राज्यात ब्युटी सलून तसेच केशकर्तनालय, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, वॉटर पार्क, उपाहारगृहे, नाटय़गृहे, चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचे बंधन आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, ठाणे, गोंदिया, चंद्रपूर, सांगली, पालघर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, भंडारा, वर्धा या जिल्ह्यांतील लसीकरण 70 टक्क्यांपेक्षा (दुसरी मात्रा) अधिक असल्याने तेथील निर्बंध मागे घेण्यात येतील.
मुंबईतील सर्व व्यवस्थापनाच्या, शिक्षण मंडळांच्या, माध्यमांच्या शाळा बुधवारपासून पूर्ण क्षमतेने भरणार आहेत. दोन वर्षांनंतर प्रथमच पूर्व प्राथमिकपासून सर्व वर्गाच्या शाळा सर्व उपक्रमांसहित सुरू होणार आहेत.
3. अमर-अकबर-अँथनीचं सरकार पायात पाय अडकून पडेल- रावसाहेब दानवे
"आम्हाला राष्ट्रपती राजवट आणण्याची अजिबात इच्छा नाही. हे अमर,अकबर,अँथनीचे सरकार आहे. पायात पाय अडकून पडतील", असं केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले.
ईडी, सीबीआय कारवाई फक्त आमच्यात काळात झाली का? लालूप्रसाद, मोदी, अमित शाह, कलमाडी, अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई झाली तेव्हा आम्ही होतो का काँग्रेस हे विसरलेत का? असा सवाल दावेंनी मलिकांच्या अकेवरून विचारलाय. तर हा आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहे. जर गुन्हेगार नसाल तर कोर्टात सिद्ध करा. तक्रारी येतात म्हणून तर चौकशी होते. असे ते म्हणाले. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली.
दाऊद प्रकरणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. बाळासाहेब ठाकरेंसारखी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेणं अपेक्षित आहे असं दानवे म्हणाले.
4. नवनीत राणांच्या तक्रारीवरून मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस
खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून अमरावती आणि मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्त यांना आयुक्तांना नोटीस देण्यात येणार आहे. लोकसभा सचिवालयात 9 मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. पोलिसांनी जबरदस्तीने थांबवून अपशब्द वापरले, असा आरोप नवनीत राणांनी केला आहे.
15 नोव्हेंबर 2020 रोजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी पोलीस वाहनात खासदाराला बसवून नेल्याने आणि मुंबईला जात असतांना जबरदस्तीने थांबविणे सोबतच पोलीसांनी अपशब्द वापरल्याचं खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
अमरावती जिल्ह्यात 2020 मध्ये प्रचंड पावसामुळे शेतीचं खूप नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई आणि वीजबिल 50 टक्के माफ करावं अशी मागणी केली होती. आमदार रवी राणांनी शेतकऱ्यांना घेऊन 13 नोव्हेंबर 2020 ला अमरावती-नागपूर महामार्ग मोझरी येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी तिवसा येथे टायरची जाळपोळ केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.
5. नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
भाजप नेते किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांनी केलेला अटकपूर्व जामीन आज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक भागवत यांनी हा निर्णय दिला. काल नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पू्र्ण झाली होती. ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी सोमय्यांसाठी युक्तिवाद केला होता. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नील सोमय्या आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांचे संबंध आहेत असा त्यांचा आरोप होता. यावेळी 'बाप बेटे दोनो जेल मे जाएंगे' असे वक्तव्य राऊत यांनी केले होते.
यानंतर नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला. काल नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावार सुनावणी पूर्ण झाली. आज न्यायालयानेत्यांचा अर्ज फेटाळ्यानंतर नील सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)