युक्रेन-रशिया वाद : युक्रेनमधले भारतीय विद्यार्थी रात्रभर चालून सीमेवर पोहोचले आणि...

फोटो स्रोत, ANAS CHAUDHARY
- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"तीन दिवसांपूर्वी सुरू झालेलं बॉम्बस्फोटांचं सत्र अजूनही थांबलेलं नाही. इतर लोकांप्रमाणेच अनेक भारतीय विद्यार्थ्यांनीही बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. एखाद्या बॉम्बस्फोटाचा आवाज ऐकू येतो, तेव्हा आमच्या छातीत धडधड सुरू होते. ही लढाई आमच्यापर्यंत पोहोचू नये, असं वाटू लागतं. पुढे काय होईल, कुणालाच काही माहिती नाही."
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये राहणारे आसिफ चौधरी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेले होते. तिथं खारकीव्ह येथे नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीचे ते विद्यार्थी आहेत.
भारतातील सुमारे 2 हजार विद्यार्थी या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असल्याचा अंदाज आहे.
अडकलेल्या काही विद्यार्थ्यांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने बाहेर काढण्यात आलं. पण हवाई हद्द बंद करण्यात आल्यामुळे अनेकजण तिथे अजूनही अडकलेले आहेत.
खारकीव्ह शहर पूर्व युक्रेनमध्ये रशियाच्या सीमेला लागूनच आहे. या शहरातही रशियाचा भीषण हल्ला सुरू आहे.
शहराच्या चारही बाजूंना युद्ध पेटलं आहे. स्थानिकांनी मोठ्या संख्येने हे शहर सोडलं आहे. पण इथं अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग उपलब्ध नाही.

फोटो स्रोत, ANAS CHAUDHARY
शनिवारी (26 फेब्रुवारी) काही वेळासाठी गोळाफेक बंद झाली होती. त्यावेळी अनस हे खाण्यापिण्याच्या गोष्टी घेण्यासाठी घराबाहेर पडले होते.
प्रशासनाने काही काळ आवश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती.
व्हीडिओ कॉलवर बीबीसीशी बोलताना अनस यांनी त्याठिकाणची परिस्थिती दाखवली.
एक-दोन दुकानं वगळता तिथली सगळी दुकाने बंद होती.
रस्त्यांवर सामसुम होती. रस्त्यावर प्रामुख्याने भारतीय विद्यार्थीच आढळून येत होते. हे सर्व विद्यार्थी किराणा सामान घेण्यासाठीच बाहेर पडले होते.
शहरातील मेट्रो स्टेशन हे बॉम्ब शेल्टर म्हणून वापरले जात आहेत. अनस यांनी एक मेट्रो स्टेशन दाखवलं.
याठिकाणी स्थानिकांनी आश्रय घेतला होता. यामध्ये लहान-मोठे सर्वच नागरिक होते.
लढाईला वेग आल्याने स्थानिकांना आपल्या घराकडे जाता येत नाही. भारतीय विद्यार्थ्यांसाठी तर परिस्थिती आणखी अवघड आहे.
खारकीव्हमध्ये शिक्षण घेत असलेले भारतीय विद्यार्थी युद्ध सुरू होण्यापूर्वीपासूनच बीबीसीच्या संपर्कात होते.
एका आठवड्यापूर्वी त्यांनी बोलताना सांगितलं की ते याठिकाणाहून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. पण ते शक्य झालं नाही.

फोटो स्रोत, ANAS CHAUDHARY
मूळचे हैदराबादचे असलेले तारिकसुद्धा यापैकीच एक आहेत. तारिक यांनी त्यावेळी सांगितलं होतं, "विमानाचं तिकीट चारपटीने महागलं आहे. 25-30 हजारांना मिळणारं तिकीट आता दीड लाखांच्या पार गेलंय."
तारिक भारतात परतण्याच्या प्रयत्नात होते. पण ते तिथून बाहेर पडू शकले नाहीत.
9 विद्यार्थ्यांच्या गटासोबत ते राजधानी कीव्हपर्यंत कसं तरी पोहोचले. पण इथून पुढे ते जाऊ शकले नाहीत.
शनिवारी (26 फेब्रुवारी) कीव्ह येथून बोलताना तारिक म्हणाले, आम्हाला एका फ्लॅटमध्ये आश्रय मिळाला आहे. आम्ही असलेल्या ठिकाणी युद्ध सुरू नाही. इथं सध्यातरी सगळे सुरक्षित आहोत. पण पुढे काय होईल, माहिती नाही."
तारिक आणि त्यांच्या मित्रांनी स्वतःला एका फ्लॅटमध्ये बंद करून घेतलं आहे. लाईट बंद करून खिडक्याही बंद केल्या आहेत. राजधानी कीव्हमध्ये सोमवारपर्यंत कर्फ्यू लावण्यात आलेला आहे.
गेल्या आठवड्यात त्यांनी सांगितलं होतं की, युनिव्हर्सिटी प्रशासन आणि भारतातून आणलेल्या एजंटने त्यांना मीडियाशी बातचीत न करण्याचा दबाव टाकला होता.
अभ्यास सुरू राहील, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या अनुपस्थितीची जोखीम पत्करून भारतात जायचं असेल, त्यांनी जावं, असं युनिव्हर्सिटीने म्हटलं होतं.

फोटो स्रोत, STANISLAV KRASILNIKOV
पण नंतर युक्रेनमधील परिस्थिती झपाट्याने बदलली. आता सगळे विद्यार्थी अडकल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
सध्या खारकीव्हमध्ये एक बंकरमध्ये राहत असलेले अनस सांगतात, "आमच्याकडच्या खाण्यापिण्याच्या वस्तू संपत चालल्या आहेत. आम्ही पाणी जमा करून ठेवलंय. काहीच उरलं नाही तर पाण्यावर आम्ही गुजराण चालवू. सध्याच्या परिस्थितीत खारकीव्हमधून बाहेर पडणं अवघड बनलंय."
अनस सांगतात, "भारत सरकारने युक्रेन आणि रशियासोबत चर्चा करून आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा, अशी आमची इच्छा आहे. पण आम्ही दूतावासाला फोन करतो, तेव्हा तिथून कोणतंही ठोस उत्तर मिळत नाही."
दुसरीकडे, भारतीय विद्यार्थ्यांना येथून बाहेर काढण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत, त्यासाठी आम्ही युक्रेनच्या सर्व शेजारी देशांसोबत संपर्कात आहोत, असं भारत सरकारने म्हटलं.
गेल्या दोन दिवसांत रोमानियामार्गे काही भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं. भारत सरकार हंगेरी, पोलंड आणि स्लोव्हाकियामार्गे विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे."
पण या देशांच्या सीमेपर्यंत पोहोचणं भारतीय विद्यार्थ्यांसाठी सोपं काम नाही. शेकडो विद्यार्थ्यांनी पोलंडला जाण्याचा प्रयत्न केला. पण सीमा बंद असल्यामुळे ते तिथंच अडकून पडले.

फोटो स्रोत, RAJAT JOHAL
उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांचा एक समूहसुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. मेरठमध्ये राहणारे रजत जोहाल आपल्या काही मित्रांसोबत पोलंड सीमेनजिक अडकून पडले आहेत.
ललीव्ह युनिव्हर्सिटीत वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या रजत यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "भारत सरकारच्या संदेशानंतर आम्ही पोलंड सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला. रस्त्यात परिस्थिती खूप बिकट होती. दुप्पट भाडं देऊन आम्ही सीमेकडे निघालो. पण ड्रायव्हरने 40 किलोमीटर आधीच आम्हाला उतरवलं तिथं लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
रजत म्हणतात, "इथं तापमान शून्यापेक्षा खाली आहे. रात्रभर आम्ही चालत होतो. कसं तरी 30 किलोमीटर चाललो. संपूर्ण रस्त्यात वाहतूक कोंडी होती.
रजत म्हणतात, "थंडीने माझं शरीर अखडलं होतं. थंडीनेच तर मरणार नाही ना, अशी भीती आम्हाला वाटत आहे. पोलंड पोहोचण्याच्या भीतीने आम्ही पुढे जात राहिलो. सीमेवर पोहोचल्यानंतर निराशाच हाती लागली. कारण भारतीय विद्यार्थ्यांसाठी सीमा बंद होती. पोलंडमध्ये आम्हाला प्रवेश दिला जात नव्हता."

फोटो स्रोत, Rajat johal
रजत आणि त्यांच्या साथीदारांनी सध्या सीमेजवळच्या एका शेल्टरमध्ये आश्रय घेतला आहे. "भारत सरकारने आपल्या अधिकाऱ्यांचं एक पथक पोलंड सीमेवर पाठवावं, जेणेकरून इथून बाहेर पडू इच्छिणाऱ्या लोकांची मदत करता येईल," असं आवाहन रजत यांनी केलं.
पोलंड बॉर्डरवरच थांबलेल्या मूळच्या हरिद्वारच्या विद्यार्थ्याने बीबीसीशी बोलताना म्हटलं, "इथं सगळ्यात अवघड परिस्थिती भारतीय विद्यार्थ्यांसाठीच आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नायजेरिया या देशांचे अधिकारी इथं उपस्थित आहेत. ते आपल्या देशातील विद्यार्थ्यांची मदत करत आहेत. पण भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एकही अधिकारी उपस्थित नाही."
युद्ध सुरू होण्यापूर्वी भारताचे सुमारे 20 हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये होते. युद्ध सुरू झाल्यानंतर आतापर्यंत तीन विमानं येथील विद्यार्थ्यांना घेऊन भारतात परतली.
प्रत्येक विद्यार्थ्याला बाहेर काढण्यात येईल, असा दावा भारत सरकारने केला आहे. पण इथं अडकलेल्या विद्यार्थ्यांचा जीव अजूनही अधांतरी आहे. शिवाय किती विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, किती विद्यार्थी अडकले आहेत, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.
युक्रेनमध्ये रविवारी (27 फेब्रुवारी) युद्धाच्या तिसऱ्या दिवशी भीषण लढाई सुरू होती. खारकीव्हमध्ये मोठे हल्ले होत होते. राजधानी कीव्हलासुद्धा घेराव टाकण्यात आला होता. लढाई गल्लोगल्ली पोहोचली आहे.
खारकीव्हच्या एका बंकरमध्ये लपलेले अनस म्हणतात, आमच्यासाठी प्रार्थना करा. आम्हाला तुमच्या प्रार्थनेची खूप गरज आहे."

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









