रशिया-युक्रेन संघर्ष : युक्रेनच्या सीमेवर रशियाची अशी आहे लष्करी मोर्चेबांधणी

फोटो स्रोत, Reuters
- Author, डेवीड ब्राऊन
- Role, बीबीसी न्यूज
रशियानं युक्रेनच्या सीमेवर जवळपास 1 लाख 30 हजार सैनिक तैनात केले आहेत. त्यांच्याकडे रणगाडे, तोफा, दारुगोळ्यापासून ते हवाई शस्त्रांपर्यंत सर्वकाही आहे.
त्यात बेलारुसमधील लष्करी सरावात सहभागी होणाऱ्या 30 हजार सैनिकांचा आणखी समावेश झाला आहे.
युक्रेनवर कोणत्याही क्षणी हल्ला करण्यासाठी रशियाकडं पुरेसं सैन्य असल्याचं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
मात्र, रशियानं कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचं नियोजन करण्याची शक्यता नाकारली आहे.
सैनिक फिरतीवर
युक्रेनच्या सीमेजवळ कायमस्वरुपी तैनात असलेल्या सुमारे 35 हजार सैनिकांमध्ये आता संपूर्ण रशियातून येणाऱ्या सैनिकांचाही समावेश होत आहे.
सैनिक युक्रेनच्या पूर्वेला असलेल्या रोस्तोव्हमध्ये लष्करी सरावामध्ये सहभागी होत आहोत.
वाहून नेण्यास उशीर लागतील असे रणगाडे आणि जड शस्त्रं आता त्याठिकाणी आहेत.
रशियाच्या काही नव्या आलेल्या तुकड्यांनी इथं येण्यासाठी रशियाच्या पूर्वेच्या लांबून अंदाजे 4 हजार मैलांचं अंतर कापलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बहुतांश अंदाजानुसार युक्रेनच्या जवळपास असलेल्या रशियन सैन्याची संख्या ही एक लाख किंवा त्याच्या आसपास आहे. हा आकडा पूर्वीच्या 1 लाखावरून 1 लाख 30 हजारावर पोहोचल्याचं पाश्चिमात्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी म्हटलं आहे.
रशियानं युक्रेनच्या सीमेजवळ किंवा बेलारुसमध्ये त्यांचं जवळपास अर्ध लढाऊ सैन्य तैनात केलं आहे, असं युकेचे संरक्षण सचिव बेन वॅलेस म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
युक्रेननंही तशाच प्रकारचे आकडे समोर दर्शवले आहेत. त्यांनी 1 लाख 12 हजार भूदलाचे तर 18 हजार नौदल आणि हवाई दलाचे सैनिक तैनात केले आहेत.
युक्रेनच्या लुहान्स्क आमि दोनेत्स्क प्रांतांमध्ये रशियाच्या नियमित सैन्याव्यतिरिक्त युक्रेनच्या 15 हजार रशियन फुटीरतावादी असल्याचंही मानलं जात आहे. युक्रेनच्या मते मात्र हा आकडा त्यापेक्षा अधिक आहे.
अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं सैनिकांचा आकडा हा जवळपास 1 लाख 75 हजारापर्यंत वाढू शकतो, असं डिसेंबर महिन्यात सांगितलं होतं.
रॉयटर्स वॉत्तसंस्थेच्या वृत्तानुसार अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की, सीमेच्या भागामध्ये गेल्या दोन आठवड्यांमध्ये रशियाच्या बटालियनची संख्या ही 60 वरून 83 पर्यंत वाढली आहे. हे बटालियन ग्रुप म्हणजे यात लढाऊ सैनिकांबरोबरच, हवाई संरक्षण आणि रसद पुरवठा यांचा समावेश असतो, त्यात प्रत्येकी 800 जणांचा समावेश असतो.
काही पाश्चात्य विश्लेषकांनी केलेल्या युक्तीवादानुसार, सध्या रशियाकडे पूर्णपणे आक्रमण करण्यासाठी गरज असलेल्या सर्व गोष्टी नाहीत.
काही भागांमध्ये पूर्ण क्षमता असलेली फिरती रुग्णालयं नसल्याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.
काही अहवालांमधून अशी माहिती समोर आली आहे की, जखमींवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या रक्त आणि इतर वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्यावर लक्ष केंद्रीत केलं जात आहे. हे हल्ल्याची तयारी असल्याचं प्रतिक असू शकतं.
तर काही अहवालांनुसार हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेले दुरुस्तीचे वर्कशॉप आणि चिखल हटवणारी यंत्रंही काही भागामध्ये पोहोचली आहेत.

फोटो स्रोत, RUSSIAN DEFENCE MINISTRY
अनेक तज्ज्ञांना असं वाटतं की, पूर्णपणे हल्ला करणं आणि त्यानंतर संपूर्ण युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी सध्या असलेल्या सैनिकांच्या तुलनेत अधिक प्रमाणावर सैनिकांची आवश्यकता असणार आहे.
वरून दिसणारं दृश्य
तंबूंच्या रंगांवरून काहीवेळा सॅटेलाईट इमेजेसमध्ये सैनिकांची उपस्थिती लक्षात येऊ शकते.
ज्या तंबूंमध्ये सैनिक असतील ते उष्ण असतात आणि त्यांच्या छतावरील बर्फ वितळलेला असतो, त्यामुळं वरून ते गडद रंगाचे दिसतात.
काही युद्ध रणगाड्यांसह होत असलेला सरावही स्पष्टपणे दिसून येत आहे.
शस्त्रास्त्र तैनात असलेली वाहनं ही त्यांच्या आकारांवरून स्पष्टपणे पाहायला मिळू शकतात तसंच टायरच्या ट्रकच्या खुणा किंवा चिखल यामुळं वाहने येजा करत असल्याचं स्पष्ट होतं.
सॅटेलाईटमध्ये याठिकाणच्या (रशिया) हालचालींमध्ये वाढ झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतं. एका अंदाजानुसार जानेवारीच्या अखेरीस आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला आणखी 10 हजार सैनिक याठिकाणी आले असावेत.
त्यात भूदल आणि हवाई दलातील सैनिकांचा समावेश आहे, असं समजलं जात असून त्यातील काही तुकड्यांना सज्ज ठेवण्यात आलेलं आहे.
बेलारुसमधील सैन्य बांधणी
रशियानं बेलारुसबरोबर संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात केली असून तो 20 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
बेलारुसचे नेते अलेक्झांडर लुकाशेन्को हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना पाठिंबा देणारे आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
बेलारुसच्या सीमेपासून युक्रेनची राजधानी किव ही 100 मैल म्हणजे 150 किमीपेक्षा कमी अंतरावर आहे. याठिकाणच्या सरावामुळं युक्रेनविरुद्धच्या मोहिमेचा सराव करण्याची संधी मिळू शकते, असं पाश्चिमात्य निरीक्षकांचं म्हणणं आहे.
नाटोचे सचिव जेन्स स्टोल्टेन्बर्ग यांनी बेलारुसमध्ये रशियाचे 30 हजार लढाऊ सैनिक आले असल्याचं म्हटलं आहे. शीत युद्ध संपल्यानंतरची ही रशियाची सर्वात मोठी लष्करी तैनात असल्याचंही ते म्हणाले.
सॅटेलाईट इमेजमध्ये बेलारूसमध्ये येल्स्कजवळ रशियन इस्कंदर ही आखूड पल्ल्याचे क्षेपणास्त्र आढळून आलं आहे. युक्रेनपासून ते 45 मैलपेक्षा (72 किमी) कमी अंतरावर ते आहे.
बेलारुसमध्ये तैनात असलेल्या रशियाच्या सैन्यामध्ये हवाई संरक्षण, युद्धसामग्री आणि वैद्यकीय मदतीचाही समावेश आहे.
रशियाची स्पेझनाथ या विशेष तुकड्याही सड्ड असल्याचं स्टोल्टेन्बर्ग यांनी म्हटलं आहे.
ल्युनिनेट्स एअरफिल्डवर सॅटेलाईटच्या मदतीनं अद्ययावत Su-25 ग्राऊंड अटॅक विमानांचे फोटो घेतले गेले आहेत.
समुद्रातील सैन्यबांधणी
रशिया अटलांटिकपासून पॅसिफिकपर्यंत जगभरात नौदल सराव करत आहे. फेब्रुवारीतही ते सुरू आहेत. त्यात खालील गोष्टींचा समावेश आहे.
- 140 जहाजं आणि सहाय्यक वाहनं
- 60 विमानं
- 10,000 सैनिक
रशियाच्या नौदलाची सहा जहाजं जी जानेवारी महिन्यात इंग्लिश चॅनलमधून गेली होती ती आता जानेवारीत पुन्हा काळ्या समुद्रात पोहचली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
ती युद्धातील मुख्य रणगाडे, सैनिक आणि शस्त्रं असलेली वाहनं वाहून नेण्यासाठी सक्षम आहेत.
रशियानं काळ्या समुद्रात क्षेपणास्त्र आणि गोळीबाराच्या सरावाला हवाला देत किनाऱ्यावर इशारा जारी केला आहे.
काही विश्लेषकांच्या मते, रशियाच्या लष्करानं जमीन आणि पाणी दोन्हीकडे लँडिंग करणं हे अत्यंत कठिण असेल. तसंच नौदलानं युक्रेनच्या भूदल सैन्याला पारंपरिक हल्ल्याच्या मार्गापासून दूर राखण्याचा प्रयत्न करणं हा दिखावा ठरू शकतो.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









