रशिया-युक्रेनवर युद्धाचे ढग

फोटो स्रोत, UK Government
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी
कोरोनाच्या उद्रेकाबरोबरच जगाने मागच्या दोन वर्षांत काही जागतिक संघर्षही पाहिले. सुदान, येमेन आणि लिबियामध्ये झालेली नागरी युद्ध… अफगाणिस्तानमध्ये पुन्हा आलेली तालिबानी राजवट… गाझा पट्टीत इस्रायल आणि पॅलेस्टिनमध्ये झालेला संघर्ष…अशी काही ठळक उदाहरणं देता येतील.
भारत आणि चिनी सैन्यामध्येही सीमेवर भांडण सुरू आहेच. त्यातच आता रशिया आणि युक्रेनवर युद्धाचे ढग जमू लागले आहेत.
यावेळी अमेरिका, ग्रेट ब्रिटन आणि चीनबरोबरच अख्ख्या जगाने या परिस्थितीची दखल घेतलीय. कारण, समजा युद्ध झालंच तर परिणाम या सगळ्यांवर होणार. पण, रशिया खरंच युद्धाच्या वाटेवर आहे का आणि युद्ध झालं तर त्याचा जगावर आणि भारतावर काय परिणाम होणार आहे?
रशिया-युक्रेन सीमेवर काय सुरू आहे?
रशिया युक्रेनमध्ये आपलं सैन्य घुसवणार का, हा सध्या जगाला पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियाला इशारा तर दिला आहेच.
शिवाय अमेरिकेनं नेटोला मदत लागली तर आपल्या 8,500 तुकड्या संभाव्य युद्धासाठी सज्ज ठेवल्यात. ब्रिटनही प्रत्यक्ष मदत करणार आहे आणि जर्मनीने आपली वैद्यकीय टीम तयार ठेवलीय.
नेटो म्हणजे नॉर्थ अँटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनने आपली कुमक रशिया-युक्रेन सीमेवर पाठवलेली आहे. समस्त पाश्चात्य देश आणि नेटो युक्रेनच्या बाजूने उभे राहताना दिसत आहे.
पण, रशिया युद्ध सुरू करेल असं त्यांना का वाटतं?
कारण, मागच्या आठवड्यापासून रशियाने युक्रेनच्या सीमेवर चक्क एक लाख सैनिकी तुकड्या तैनात केल्या आहेत. यात रणगाडे, मोठा शस्त्रसाठा याबरोबरच हवाई हल्ल्याची सिद्धताही दिसते आहे.

काही सॅटलाईट चित्रांवरून रशियाची तयारी आपल्याला समजू शकते.
19 जानेवारीला मॅक्सरने दिलेली ही सॅटेलाईट इमेज. इथं उजवीकडे दिसतायत ते सैनिकी सामान वाहून नेणारे ट्रक आहेत. आणि डावीकडे तैनात आहेत युद्धात वापरली जाणारी चिलखती वाहनं…
या आणखी एका चित्रात बर्फ वितळल्यानंतर आपल्याला रशियन सैन्याचे तंबू अगदी स्पष्ट दिसतायत. या चित्रात बर्फावर टायरच्या खुणा आहेत. आणि दोन ट्रकही दिसतायत. याचा अर्थ इथं सैनिकी हालचाली सुरू आहेत. म्हणजे हे तळ सक्रिय आहेत.
मागच्या आठवड्यात रशियन संरक्षण विभागानेही ट्विटरवर काही फोटो टाकले आहेत. यातले काही रणगाडे 4000 मैलांचा प्रवास करून पूर्व रशियातून युक्रेन सीमेजवळच्या रोस्टोव या रशियन तळावर पोहोचले आहेत.
35000 च्या वर सैनिक युक्रेन सीमेवर या आधीच तैनात होते. आता त्यांची संख्या वाढून एक लाख झाल्याचा पाश्चात्य देशांचा अंदाज आहे.
एवढं सगळं असताना रशियाचं म्हणणं आहे की, त्यांना कुठलाही हल्ला करायचा नाही. त्यांची युद्ध तयारी सुरू आहे, जो सैन्याच्या नियमित अभ्यासाचा भाग आहे.
उलट नेटोनं आपलं सैन्य सीमेवर तैनात करण्याला त्यांचा विरोध आहे. आणि त्यांनीच युद्धजन्य परिस्थिती निर्माण केल्याचा रशियाचा आरोप आहे. .
पाश्चात्य देश रशियाविरोधात का एकवटले?
27 जानेवारीला पॅरिसमध्ये झालेल्या आठ तासांच्या चर्चेनंतर रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्धविरामाचा निर्णय झालाय. पण, या चर्चेदरम्यानही रशिया नेटो सैन्य तैनातीबद्दल आक्रमक होता. त्यामुळेच काहीतरी भांडण उकरून काढून ते युद्ध सुरू करतील अशी भीती पाश्चात्य देशांना वाटते.

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये भांडणाचा मुख्य मुद्दा आहे तो युक्रेनने मागितलेल्या नेटो सदस्यत्वाचा. युक्रेनला नेटोचं सदस्यत्व हवं आहे. आणि रशियाला युक्रेननं नेटोचा भाग होणं अजिबात मान्य नाही.
नेटो हे पाश्चात्य देश आणि अमेरिकेनं उभारलेलं लष्कर आहे. या देशांनाही रशियाची ढवळाढवळ नको आहे. म्हणूनच हे देश युक्रेनच्या बाजूने मजबूत उभे आहेत. रशिया-युक्रेन संघर्ष त्यामुळे सगळ्यांच्याच प्रतिष्ठेचा बनलाय. त्याचबरोबर जगावर आणि भारतावरही संभाव्य युद्धाचे मोठे परिणाम होऊ शकतात.
युद्ध झालं तर जगावर, भारतावर काय परिणाम होतील?
युद्ध झालंच तर जगावर होणारे परिणाम हे महागाई, शेअर बाजारातली घसरण आणि तेलाच्या किमती आणखी वाढण्यात होणारए.
अन्नधान्य महाग होईल - आधीच कोव्हिडमुळे जगभर महागाई वाढलीय. त्यातच आता काळ्या समुद्रातून धान्य आणि खासकरून गव्हाची वाहतूक अडकेल. आणि त्यामुळे ही महागाई आणखी वाढेल. युक्रेन आणि रशिया दोघेही देश गव्हाचे सगळ्यांत मोठे निर्यातदार देश आहेत. तसंच तिथून मकाही निर्यात होतो.

नैसर्गिक वायू आणि तेल - एकटा रशिया अख्ख्या युरोपची 35 टक्के नैसर्गिक वायूची गरज भागवतो. त्यामुळे युद्ध झालंच तर जगातल्या वीज उद्योगावर त्याचा मोठा परिणाम होईल. तेलाच्या किमतीही वाढतील.
शेअर बाजार, चलन आणि बाँड मार्केट - जगभरातले शेअर बाजार, चलन विनिमय दर आणि बाँड मार्केटवरही युद्धाचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. अनेक जागतिक बँकांनी रशियाला मोठ्या प्रमाणात कर्ज दिलंय. आणि अर्थातच, युद्ध झालं तर बाँड मार्केट घसरणार आहे.
थोडक्यात या युद्धाचा दूरगामी परिणाम जगावर होऊ शकतो. म्हणूनच सगळे सतर्क आहेत. आता भारतावर काय परिणाम होऊ शकतो आणि भारताची सध्याची भूमिका काय आहे समजून घेऊया.
आंतरराष्ट्रीय विषयांचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांच्या मते, आताच्या परिस्थितीत युद्ध झालं तर भारताला महागाई सारख्या मुद्यांबरोबरच राजनयिकदृष्ट्याही ते परवडणारं नाही.
"रशियाला पाश्चात्य देशांचा विरोध जसा वाढेल तसा हा देश चीनला जवळ येईल. आणि हे भारताला नको आहे. चीनबरोबर सीमेवर सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी रशियाने चीनवर दबाव आणावा असा भारताचा प्रयत्न आहे. रशियाकडून भारत शस्त्रास्त्रंही खरेदी करतो. पण, आता जर चीन रशियाच्या जवळ आला तर भारतासाठी ते अडचणीचं ठरू शकतं," असं देवळाणकर यांना वाटतं.
रशिया-युक्रेन युद्ध नको अशीच भारताची भूमिका आहे.
पण, सध्या रशियन सीमेवर मात्र जोरदार घडामोडी घडत आहेत. तर अमेरिका रशियाविरोधातल्या मोर्चेबांधणीत भारताच्या सहभागाची अपेक्षा धरून आहे. त्यामुळे येणारे दिवस हे रशिया आणि युक्रेनबरोबरच अख्खं जग आणि भारतासाठीही महत्त्वाचे आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









