रशिया-युक्रेन संकट: नाटोने पूर्व युरोपात पाठवली लढाऊ विमानं आणि युद्धनौका

रूस-यूक्रेन संकट

फोटो स्रोत, Getty Images

सोमवारी (24 जानेवारी) नाटोने पूर्वेकडील यूरोपमध्ये अतिरिक्त लढाऊ विमान आणि युद्धनौका तैनात करण्याची घोषणा केल्याने रशिया आणि पश्चिम देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.

दुसरीकडे, युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर आयर्लंडनेही आपल्या किनारी भागात युद्धसदृश परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.

अमेरिका आणि युरोपीय संघ प्रत्युत्तर देण्यासाठी कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत असल्याचं सांगतात.

रशिया शेजारील देश युक्रेनच्या सीमेवर जवळपास एक लाख सैनिक आणि हत्यारांना तैनात करत आहे. यामुळेही तणाव आहे. परंतु युक्रेनवर हल्ला करण्याची ही तयारी असल्याचं वृत्त रशियाने फेटाळलं आहे.

युक्रेनमध्ये रशियाकडून आक्रमणाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर युकेने युक्रेनमधल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना परत बोलावलं आहे.

युक्रेन, रशिया, अमेरिका, युके

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, युक्रेन-रशिया यांच्यातला संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.

ब्रिटिश अधिकाऱ्यांना धमक्या मिळालेल्या नाहीत, पण किव्ह इथल्या दूतावास कार्यालयातील निम्म्याहून अधिक मंडळी मायदेशी परतत आहेत.

व्हीडिओ कॅप्शन, रशिया - युक्रेन तणाव : युरोप गारठण्याशी रशियाचा काय संबंध? सोपी गोष्ट 520

रशियाकडून कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो या शक्यतेमुळे अमेरिकेने युक्रेनमधल्या आपल्या दूतावासातील नातेवाईकांना मायदेशी परतण्याचा आदेश दिला आहे.

अमेरिका आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

परंतु रशियाचा हल्ला होण्याची भीती असताना युक्रेन आणि युरोपीय संघाच्या परराष्ट्र धोरणाच्या दोन्ही प्रमुखांनी सांगितलं की, दूतावासांना परत बोलवण्याची सध्या शक्यता नाही.

रशियाने आपलं सैन्य पाठवलं तर अमेरिका आपल्या सहकारी देशांसोबत मॉस्कोवर मोठ्या प्रमाणात प्रतिंबध लावण्याच्या तयारीत आहे.

युरोपीय संघाचे सदस्य असलेल्या देशांनी रशियाला इशारा दिला आहे. गरज भासल्यास रशियाला काही दिवसांतच 'सडेतोड उत्तर' देऊ असं त्यांनी म्हटलं आहे.

अमेरिका नेतृत्त्व करत असलेल्या नाटो आघाडीने सांगितलं की, त्यांचे सदस्य असलेले देश पूर्वेकडील युरोपच्या सुरक्षा प्रणालीला दुरुस्त करण्यासाठी युद्धनौका आणि लढाऊ विमानं पाठवत आहेत.

डेनमार्क, स्पेन आणि नेदरलँड यांनही आपलं सैन्य सज्ज ठेवलं आहे.

नाटो आणि रशियामध्ये आरोप-प्रत्यारोप

नाटोचे प्रमुख जेंस स्टॉल्टेनबर्ग यांनी सांगितलं, "नाटो आपल्या सहकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते प्रत्येक पाऊल उचलण्यासाठी तयार आहे."

यावरून रशियाने नाटोने तणाव वाढवला असल्याचा आरोप केला आहे. नाटोने रशियाचे समर्थन करणाऱ्या फुटीरतावाद्यांवर युक्रेन सैन्याच्या हल्ल्याचा धोका वाढवला आहे असं त्यांचं म्हणणं आहे.

यात युक्रेनला सहभागी होण्यापासून रोखलं जावं आणि पूर्वेकडील युरोपातून त्यांच्या सदस्य देशांना पुन्हा बोलवावं अशी मागणी रशियाने नाटोकडे केली आहे.

युरोपचे परराष्ट्र धोरण प्रकरणांचे प्रमुख जोसेप बोरेल यांनी सांगितलं की, कीव्ह येथून राजदूतांना पुन्हा बोलवण्याचे सध्यातरी कोणतेही नियोजन नाही.

रशियासोबत चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. परिस्थितीला नाट्यमय रूप देण्याचं काहीही कारण नाही, असंही ते म्हणाले.

युरोपीय संघ अमेरिका आणि इतर सहयोगी देशांसोबत रशिया विरोधात प्रतिबंध लावण्याच्या योजनेवर यासाठी काम करत आहे की, त्यांच्याकडून कोणत्याही लष्करी कारवाईची शक्यता टळावी.

डेन्मार्कच्या परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य

डेन्मार्कचे परराष्ट्र मंत्री जेप्पे कोफोड यांनी सांगितलं, "आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधांना प्रतिक्रिया देण्यासाठी तयार आहोत यात कोणतीही शंका नाही. असे प्रतिंबध जे यापूर्वीही कधीही पाहिले नसतील."

परंतु युरोपीय संघाच्याही स्वत:च्या काही अडचणी आहेत. 27 सदस्य देशांचे रशियासोबतचे संबंध वेगवेगळे आहेत आणि त्यांचा स्वतंत्र दृष्टीकोन आहे. अशा परिस्थितीत सामूहिक कारवाईसाठी एका समान निर्णयापर्यंत पोहचण्याचं आव्हान युरोपीय संघासमोर आहे.

युरोपचे आर्थिक केंद्र मानला जाणारा जर्मनी यापूर्वीच युक्रेनच्या टीकेचा मध्यबिंदू आहे. जर्मनीने युक्रेनमध्ये आपलं सैन्य पाठवण्यास नकार दिला होता आणि ग्लोबल स्विफ्ट पेमेंट सिस्टममधून रशियाला वेगळं करण्याच्या मागणीबाबत ते संभ्रमावस्थेत होते.

दरम्यान, जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अन्नालिना बाएरबॉक यांनी स्पष्ट इशारा दिला की, रशियाने आणखी आक्रमकता दाखवली तर युरोप कठोर पावलं उचलेल. तसंच युक्रेनला आर्थिक समर्थन देणार असल्याचंही आश्वासन त्यांनी दिलं आहे.

रशियाला ब्रिटनचा इशारा

युरोपीय संघाच्या प्रमुख उर्सुला वॉन डेरलेयेन यांनी असं म्हटलं आहे की, युक्रेनसाठी 1.2 अब्ज युरो आपत्कालीन आर्थिक मदत पॅकेजसाठी काम करत आहे.

2020 च्या उत्तरार्धात युरोपियन युनियन सोडलेल्या ब्रिटनने आठवड्याच्या शेवटी आरोप केला की, मॉस्को कीवमध्ये रशियन समर्थक नेत्याला सत्तेवर आणण्याच्या योजनेवर काम करत आहे.

सोमवारी (24 जानेवारी) पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियाला इशारा दिला की, युक्रेनवर हल्ला केल्यास त्याला नव्या चेचन्याशी सामना करावा लागू शकतो. नव्वदच्या दशकात रशियाला चेचन्यावर ताबा मिळवण्यासाठी रक्तरंजित संघर्ष करावा लागला होता.

अटलांटिक समुद्राच्या आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात रशियाच्या लष्करी सरावाला आयर्लंडनेही सावधपणे प्रत्युत्तर दिले आहे. आयर्लंड नाटोचा सदस्य नाही आणि ज्या ठिकाणी रशिया व्यायाम करणार आहे ते ठिकाण आयर्लंडच्या नैऋत्य किनार्‍याजवळ आहे.

युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याच्या धोक्याने 2014 च्या आठवणींना उजाळा दिला आहे जेव्हा मॉस्कोने युक्रेनपासून क्रिमिया घेतले होते.

युक्रेन आधीच देशाच्या पूर्वेकडील भागात रशियन समर्थित बंडखोर गटाशी लढा देत आहे. गेल्या 8 वर्षात या युद्धात 13 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)