एलिझाबेथः आपण राणी होणार आहोत, हे लहानग्या एलिझाबेथला कधी कळलं?

पोर्ट्रेट - तत्कालीन डचेस ऑफ यॉर्क, राजकुमारी मार्गारेट, ड्यूक ऑफ यॉर्क-राजा जॉर्ज VI आणि राजकुमारी एलिझाबेथ

फोटो स्रोत, Universal History Archive/Getty Images

फोटो कॅप्शन, पोर्ट्रेट - तत्कालीन डचेस ऑफ यॉर्क, राजकुमारी मार्गारेट, ड्यूक ऑफ यॉर्क-राजा जॉर्ज VI आणि राजकुमारी एलिझाबेथ

लहानपणी राणी दुसरी एलिझाबेथ यांना त्यांच्या राजेशाही भवितव्याची फारशी चुणूक मिळालेली नव्हती. घोड्यांशी व कुत्र्यांशी खेळण्यात त्यांचं बालपण गेलं, पुढे काय होऊ घातलंय याची छाया त्यांच्या या बेफिकीर बालपणावर नव्हती.

येत्या शनिवारी (12 फेब्रुवारी) त्या राणी झाल्याच्या घटनेचा सत्तरावा वर्धापनदिन आहे. तरुण युवराज्ञी एलिझाबेथची तुलना आधुनिक काळातील युवराज्ञी- योर्कच्या दुसऱ्या स्थानावरील ड्यूकची (1926 साली 'बेर्टी', आता प्रिन्स अँड्र्यू) मुलगी- बिएट्रिस हिच्याशी केली जात असे.

त्यामुळे ब्रिटिश राजसत्तेचा मुकुट त्यांच्याकडे येण्याची कोणतीही शक्यता नव्हती. त्यावेळच्या ब्रिटिश राष्ट्रकुलातील व साम्राज्यातील 50 कोटी रहिवाशांवर त्या राज्य करतील, असा विचारही तेव्हा त्यांच्या मनात येणं शक्य नव्हतं.

त्यामुळे त्यांचे काका डेव्हिड, राजे आठवे एडवर्ड यांनी जगाला व त्यांच्या कुटुंबाला चकित करणारा एक निर्णय घेतला आणि परिस्थिती नाट्यमयरित्या बदलली.

डेव्हिड यांनी वॉलिस सिम्पसन या त्यांच्या घटस्फोटित अमेरिकी प्रेयसीशी लग्न करून राजसिंहासनावरचा अधिकार सोडून दिला. त्यामुळे दहा वर्षांची एलिझाबेथच थेट या सिंहासनाची वारसदार ठरली. त्यांचे वडील प्रिन्स अल्बर्ट यांनी राजे सहावे जॉर्ज ही उपाधी घेतली आणि त्यांची मोठी मुलगी आता त्यांची वारसदार झाली.

1926 मध्ये लहानपणीची राजकुमारी एलिझाबेथ त्यांची आजी राणी मेरीसोबत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1926 मध्ये लहानपणीची राजकुमारी एलिझाबेथ त्यांची आजी राणी मेरीसोबत

पण तरुण युवराज्ञी खरोखरच याबाबतीत इतकी अजाण होती का?

'पापा राजा होणार आहेत,' असं एलिझाबेथने मार्गारेट रोझ या त्या वेळी सहा वर्षांच्या असणाऱ्या स्वतःच्या बहिणीला सांगितलं. डिसेंबर महिन्यातला तो दिवस होता. पिकॅडिलीमधील त्यांच्या घराबाहेर अचानकच जयघोष करणारी गर्दी जमा झाली होती.

"म्हणजे तू राणी होणार का?" मार्गारेटने विचारलं.

"होय", एलिझाबेथ थंड सुरात उत्तरली. "बहुधा तसंच होईल."

"बिच्चारी", मार्गारेट थट्टेत म्हणाली. त्यांनीच हा किस्सा 1980च्या दशकारंभी एलिझाबेथ लाँगफोर्ड यांना सांगितला होता. पण दोन दशकांनी इतिहासकार बेन पिमलॉट या संदर्भातील आठवण सांगताना मार्गारेट यांनी हा विनोद वगळला. उलट, नवीन वारसदार एलिझाबेथ या नाट्यमय उन्नतीबद्दल फारशी उत्साहात नव्हती, "तिने परत त्याचा उल्लेख केला नाही," असं मार्गारेट यांनी पिमलॉट यांना सांगितलं.

तर, दहा वर्षांच्या युवराज्ञी एलिझाबेथला काय कळलं? आणि कधी कळलं?

राणी दुसरी एलिझाबेथ यांनी स्वतःच्या भवितव्याचा एक नमुना त्यांचे लाडके आजोबा राजे पाचवे जॉर्ज (1865-1936) यांच्या रूपात पाहिला होता. एलिझाबेथ त्यांना 'ग्रँडपा इंग्लंड' असं संबोधत असत. राजेशाही घडामोडींचं सार राणीने लहानपणीच कसं जोखलं होतं, याचा अंदाज यावरून येतो.

1929 मध्ये टाइम मॅगझिनच्या मुखपृष्ठावर राजकुमारी एलिझाबेथ

फोटो स्रोत, Time Magazine

फोटो कॅप्शन, 1929 मध्ये टाइम मॅगझिनच्या मुखपृष्ठावर राजकुमारी एलिझाबेथ

पाचवे जॉर्ज यांच्याकडे "कोणतीही सामाजिक प्रतिभा नव्हती, वैयक्तिक आकर्षणमूल्य नव्हतं, बौद्धिक ताकद नव्हती," असं त्यांचे अधिकृत चरित्रकार जॉन गोअर कबुल करतात. "त्यांच्याकडे कोटीबाजपणा किंवा उत्तम गोष्ट सांगण्याची हातोटीही नव्हती."

वेगळ्या शब्दांत सांगायचं तर, वृद्ध राजे पाचवे जॉर्ज त्यांच्या बहुतांश प्रजाजनांसारखे होते. पण टिकून राहण्याची- आणि प्रतीकात्मकतेची तीव्र जाण त्यांना होती

राजघराण्याचं सेक्स-कोबर्ग-गोथा हे जर्मन मूळ असणारं आडनाव 1917 साली टाकून देण्याचं काम पाचव्या जॉर्ज यांनीच हुशारीने केलं. त्यामुळे राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांनी अनन्यसाधारण दीर्घ व देदिप्यमान कारकीर्दीत दाखवलेल्या कौशल्यांबद्दल जगाला कौतुक वाटणं, स्वाभाविकच आहे. 'हाऊस ऑफ विंडसर'च्या संस्थापकांकडून त्यांना प्रत्यक्षच या कौशल्यांचं बाळकडू मिळालं होतं.

समुद्राची आवड असणाऱ्या पाचवे जॉर्ज यांनीच आपल्या नातीला 'लिलिबेट' हे टोपणनाव दिलं. त्यानुसार एप्रिल 1929मध्ये टाइम मॅगझिनच्या मुखपृष्ठावर दुसऱ्या एलिझाबेथचं छायाचित्र झळकलं तेव्हा सोबत 'युवराज्ञी लिलिबेट' असं लिहिलेलं होतं. (पाचवे जॉर्ज या टोपणनावाचं स्पेलिंग Lilibet असं करत असत, पण पुढे ते lilybet असं रूढ झालं).

आपल्या तीन वर्षांच्या नातीला भेटीसाठी घेऊन यावं, असा आग्रह वृद्ध राजे पाचवे जॉर्ज यांनी 1929च्या वसंतात धरला. फुप्फुसावर गंभीर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आराम करण्यासाठी ते ससेक्सच्या समुदकिनाऱ्यावर बॉग्नर रेगिस इथे राहत होते. या परिस्थितीतून बरं होण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी उपकारक ठरतील असं त्यांचं म्हणणं होतं. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे नातीची भेट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 'त्यांना सिगारेट ओढायला दिली जावी.'

आपली नात भविष्यात ब्रिटिश सिंहासनावर विराजमान व्हावी, अशी आशा पाचव्या जॉर्ज यांनी पहिल्यांदा 1929 साली व्यक्त केली.

"तुझा भाऊ कधीच राजा होणार नाही, बघ तू," असं ते लिलिबेटच्या वडिलांना म्हणाले.

तरुण राजकुमारी आणि तिचे आजोबा किंग जॉर्ज यांचा कलाकार सीई टर्नर यांनी 1929 मध्ये बोग्नोर रेगिसमध्ये काढलेला हा फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तरुण राजकुमारी आणि तिचे आजोबा किंग जॉर्ज यांचा कलाकार सीई टर्नर यांनी 1929 मध्ये बोग्नोर रेगिसमध्ये काढलेला हा फोटो

"हे किती हास्यास्पद आहे, असं आम्हाला तेव्हा वाटलं होतं, आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि हे 'नॉनसेन्स' बोलणं चाललंय असाच विचार आमच्या दोघांच्याही मनात होता," असं राणीच्या आईने नंतर सांगितलं होतं.

आपला सर्वांत मोठा मुलगा डेव्हिड आपला आणि दुसरी वारसदार असणाऱ्या बेर्टीचा घातपात करेल, अशी चिंता पाचव्या जॉर्जना वाटत होती. स्वतः पाचवे जॉर्ज फुफ्फुसातील वाहिन्या कोंडल्याने जर्जर झालेले होते.

तोतरं बोलणारे ड्यूक ऑफ यॉर्क अर्थात प्रिन्स बेर्टी राजसत्तेची जबाबदारी पेलवू शकणार नाहीत, अशी काळजी या वृद्ध राजाला वाटत होती, त्यामुळे लहानग्या लिलबेटवर सिंहासनावर बसण्याची संधी लादली जाण्याची शक्यता होती. या घडामोडींमध्ये पाचव्या जॉर्जचा तिसरा मुलगा, ग्साउसेस्टरचा ड्यूक हेन्री (1900-1974) हा तर्कशुद्ध विचार करणारा व स्थिरवृत्तीचा होता.

तर, अजून बालवयीन असणाऱ्या एलिझाबेथला सिंहासनावर बसवून काका हेन्रीच्या मार्गदर्शनाखाली राजशकट हाकलं जावं, अशी शक्यता आजारपणातून सावरू पाहणाऱ्या राजाच्या मनात आली असावी. पण त्या वेळी सरकारी तिजोरीचे चँसेलर असणारे (आणि नंतर राणीचे पहिले पंतप्रधान झालेले) विन्स्टन चर्चिल यांनीही लहान एलिझाबेथला भावी राणी करण्याला पाठिंबा दिला असावा.

आपली पत्नी क्लेमेन्टाइनला लिहिलेल्या पत्रात विन्स्टन म्हणतात, "लहान युवराज्ञी म्हणजे एक विशेष व्यक्तिमत्व आहे. तिचा वावर अधिकार दाखवणारा असतो आणि वयाच्या मानाने ती खूपच चिंतनशील असल्याचंही दिसतं."

आजारावर मात करू पाहणाऱ्या आपल्या आजोबांसोबत वाळूचे किल्ले बांधणाऱ्या एलिझाबेथने राजाकडून काही राजेशाही शिष्टाचारही आत्मसात केले असावेत.

पाचव्या जॉर्जची सत्ता 1936 साली समाप्त झाली, तेव्हा लहानग्या एलिझाबेथला अनाहूतपणे लोकांकडून पाठवल्या जाणाऱ्या भेटवस्तू आणि सार्वजनिक कार्यक्रमांमधील उपस्थितीसाठी तिला येणारी निमंत्रणं इतक्या पटींनी वाढली होती की, योर्कच्या एलिझाबेथच्या या सर्व कामकाजाची जबाबदारी घेण्यासाठी एक मदतनीस नियुक्त करावी लागली.

1920च्या दशकाअखेरीला विंडसर कॅसलमध्ये युवराज्ञी एलिझाबेथ (जन्म 21 एप्रिल 1926) हिला बाबागाडीत बसवून 'चेंजिंग ऑफ द गार्ड' समारंभ दाखवण्यासाठी आणण्यात आलं होतं.

राजसत्तेच्या ग्रंथपाल ओवेन मोर्सहेड लहानग्या एलिझाबेथसोबत होत्या. या वेळी कमांडिंग ऑफिसरने या बाबागाडीतील एलिझाबेथकडे पाहूनही सॅल्यूट ठोकला होता.

"परमिशन टू मार्च ऑफ, प्लीज, मॅम?" असं तो म्हणाला.

बाबागाडीत बसलेल्या युवराज्ञीने डोकं पुढे झुकवलं आणि हाताने पुढे जाणअयाची परवानगी दिली, अशी आठवण मोर्सहेड नोंदवतात.

इतक्या लहान वयात या मुलीने आपल्या आजोबांना 'ग्रँडपा इंग्लंड' असं संबोधून त्यांच्या राष्ट्रीय भूमिकेचं वजन जोखलं होतं आणि त्यात तिला स्वतःच्या भवितव्याचीही काही चाहूल लागली असावी.

1932 मध्ये न्यूफाउंडलँडच्या सहा सेंट स्टॅम्पवर तरुण राजकुमारी एलिझाबेथ
फोटो कॅप्शन, 1932 मध्ये न्यूफाउंडलँडच्या सहा सेंट स्टॅम्पवर तरुण राजकुमारी एलिझाबेथ

समोरच्या जवानांच्या तुकडीला आपण डोकं नि हात हलवून दाखवले की ते पुढे जातात, हे पाहिल्यावर तीन वर्षं वयाच्या मुलीच्या मनावर कोणता परिणाम होत असेल? विशेषतः आपल्या भव्यदिव्य जगण्याचे संकेत नंतरही मिळत राहिल्यावर तिच्या मनात काय होत असेल?

युवराज्ञी एलिझाबेथचा चौथा वाढदिवस झाला तेव्हा, 1930च्या उन्हाळ्यात मादाम तुसाँ संग्रहालयात तिचा पोनी बांधलेल्या रूपातला मेणाचा पुतळा विराजमान झाला.

दोन वर्षांनी न्यूफाउन्डलँडमध्ये सहा सेंटच्या स्टॅंपवर युवराज्ञीचं छायाचित्र छापलं गेलं. आणि दक्षिण ध्रुवाजवळ 'प्रिन्सेस एलिझाबेथ लँड' या साडेतीन लाख चौरस मैलांच्या प्रदेशात युनियन जॅक फडकावण्यात आला.

हा प्रदेश ऑस्ट्रेलियाच्या अधिकारात येत होता (या प्रदेशाचं क्षेत्रफळ संपूर्ण युनायटेड किंगडमपेक्षा एक लाख चौरस मैलांनी जास्त होतं).

सहा वर्षांची युवराज्ञी "कधीही कारमधून बागेत जात असली की, सर्व थरांमधील लोक हॅट व रुमाल उंचावतात", असं बेलफास्ट न्यूज लेटर या वृत्तपत्रात 1932च्या उन्हाळ्यात छापून आलं होतं.

एप्रिल 1933मध्ये सातव्या वाढदिवसावेळी युवराज्ञीने स्वतःच्या स्टेशनरीतले कागद वापरून लोकांना चहापानाचं निमंत्रण पाठवलं होतं, त्या वेळी निळ्या कागदावर राजेशाही मुकुटाच्या खाली कॅपिटल E एम्बॉस केलेला होता.

आपल्या मुलीचं चॉकलेट-बॉक्स पोर्ट्रेट काढण्यासाठी एलिझाबेथच्या आईवडिलांनी चित्रकार फिलिप द लास्लो यांना बोलावलं. 'ही लहान मुलगी अत्यंत बुद्धिमान व सुंदर आहे... ती प्रचंड लोकप्रिय आहे आणि सध्या ग्रेट ब्रिटनची भावी राणी म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं आहे."

1933 मध्‍ये कलाकार फिलीप डे लास्‍लो यांनी साकारलेले तरुण राजकन्‍येचे पोर्ट्रेट

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, 1933 मध्‍ये कलाकार फिलीप डे लास्‍लो यांनी साकारलेले तरुण राजकन्‍येचे पोर्ट्रेट

मे 1934मध्ये अमेरिकेत आलेल्या एका वृत्तातूनही याच मताला पुष्टी मिळते. भावी आठवे एडवर्ड "ज्या कामासाठी जन्मले होते त्यासाठी खूपच दुबळे" मानले जात होते, "युवराजाच्या निकटवर्तीयांच्या मते, राजा होणार असल्याबद्दल त्याला फारसा काही आनंद वाटत नाही." परिणामी, आता अल्पवयीन युवराज्ञीला "इंग्लंडच्या राजमुकुटाची थेट वारसदार म्हणून काटेकोरपणे प्रशिक्षण दिले जाते आहे."

अमेरिकेतल्या या बातम्यांकडे ब्रिटनमधील प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष केलं असलं, तरी युवराज्ञीची तरुण मदतनीस मेरियन क्रॉफर्डकडून अमेरिकी माध्यमांना ही माहिती मिळत असावी, अशी शक्यता आहे. क्रॉफर्ड "अतिशय सुंदर", "अतिशय चिकाटीची" व "अत्यंत स्कॉच वृत्ती"ची असल्याचं वर्णन केलं जात होतं.

लवकरच त्यांच्या तरुण सहकाऱ्यांनी त्यांना "क्रॉफी" असं संबोधायला सुरुवात केली. "लहान युवराज्ञी"ला वाढवतानाचे अनुभव कालांतराने क्रॉफर्ड यांनी पुस्तक रूपात प्रकाशित झाले आणि या प्रचंड खपलेल्या पुस्तकामुळे त्यांची बरीच अपप्रसिद्धी झाली. आपल्या मुलींना शाळेत कमी वेळ घालवावा लागावा, अशी राणी मेरीची इच्छा असायची आणि त्यासाठी राणीसोबत संगनमत करून आपण तिची इच्छा पूर्ण करायचो, हा आणि असे इतर काही खळबळजनक उल्लेख त्यांच्या पुस्तकात आहेत.

या दोन बहिणींच्या शिक्षणात अधिक काटेकोरपणा आणण्यासाठी क्रॉफर्ड व त्यांची आजी एकत्र प्रयत्नशील होत्या. युवराज्ञी एलिझाबेथने केवळ "सर्वोत्तम प्रकारची मुलांची पुस्तकं" वाचावीत, असं आजीला वाटत असे. तसंच टॉवर ऑफ लंडनला भेट देणं, इत्यादींसारख्या भावी राणीच्या "करमणुकी"ची स्वप्नही ती रंगवत होती.

"राणी मेरीइतकं दुसरं कोणी राजसत्तेला वाहून घेतलेलं असणं शक्यच नाही," असं त्यांची मैत्रीण ऐअर्लीची काउन्टेस सांगते. "आपल्या आवडत्या नातीमध्ये त्या भावी राणी पाहत होत्या."

1934 मध्ये मेरीसविले जर्नल-ट्रिब्यूनमध्ये छापलेल्या वृत्तपत्रातील स्टोरीची प्रतिमा. मथळा- "चाइल्ड प्रिन्सेस ट्रेन्ड टू रुल इंग्लड"

फोटो स्रोत, Marysvillle Journal-Tribune

फोटो कॅप्शन, 1934 मध्ये मेरीसविले जर्नल-ट्रिब्यूनमध्ये छापलेल्या वृत्तपत्रातील स्टोरीची प्रतिमा. मथळा- "चाइल्ड प्रिन्सेस ट्रेन्ड टू रुल इंग्लड"

दरम्यान, 'ग्रँडपा इंग्लंड' यांनी काही साधी ध्येयं समोर ठेवली होती. "मार्गारेट आणि लिलिबेट यांना लिहायला शिकवावं- एवढीच माझी आपल्याला विनंती आहे! माझ्या कोणत्याही मुलांना धड लिहिता येत नाही. सगळे एकसारखंच लिहितात. त्या लेखनात काहीएक स्वभावाचं प्रतिबिंब उमटलेलं असायला हवं," असं त्यांनी क्रॉफर्ड यांना सांगितलं होतं.

शतकभरापूर्वी आठ वर्षांच्या व्हिक्टोरिया राणीपेक्षाही आता या तरुण युवराज्ञीची राणी बनण्याची शक्यता जास्त असल्याचं परदेशांमधील वृत्तपत्रांमधून छापून येत होतं. व्हिक्टोरियाच्या बाबतीत ती चौथ्या मुलाची मुलगी होती आणि तिच्या पुढे दोन काका हयात होते. या सगळ्या मोठमोठ्या अपेक्षा कळत्या वयातील सजग एलिझाबेथपासून दूर राहिल्या नव्हत्या.

"मी कधी राणी झाले, तर रविवारी घोडेस्वारी करू नये, असा कायदा करेन. घोड्यांनाही आराम करू द्यायला हवा," असं एलिझाबेथ क्रॉफर्ड यांना म्हणाल्या होत्या.

राणी मेरींना यातील धोका दिसत होता. एकदा एका संगीताच्या कार्यक्रमाला मुलींना नेण्यात आलं, तेव्हा आपली ही नात उतावीळपणे बागडत असल्याचं पाहून राणी मेरीने तिला घरी जायचंय का असं विचारलं.

"ओह् नो, ग्रॅनी," असं उत्तर लहानग्या एलिझाबेथने दिलं, "शेवट होईपर्यंत आपण इथून जायचं नाही. बाहेर आपल्याला बघायला किती लोक थांबलेले असतील, त्याचा तरी विचार कर." त्यानंतर लगेचच आजीने मदतनीस महिलेला सूचना केली आणि ती मुलीला घेऊन टॅक्सीने घरी परतली.

आपल्या मोठ्या नातीला खुशामत करून घ्यायची सवय लागू नये, असं राणी मेरी यांना वाटत होतं. लोकशाही काळात भव्यदिव्य जगणं स्वीकारताना नम्रपणा, विनय आणि सेवाभाव या रूपातली किंमत राजघराण्यातील लोकांना मोजावी लागते, हे राणी मेरी यांना व त्यांच्या पतीला माहीत होतं.

कर्तव्य, हा त्यांचा परवलीचा शब्द होता आणि हा महत्त्वाचा धडा त्यांनी स्वतःच्या नातीलाही दिला. व्यवस्थेपेक्षा आपण कमी महत्त्वाचे आहोत, असं त्यांनी तिला सांगितलं. लिलिबेट एक सांघिक खेळाडू म्हणून मोठी होईल, अशी खातरजमा त्यांनी केली.

एकंदर सूचक संदर्भांचा विचार केला, तर प्रत्यक्षात सिंहासनावर येण्याच्या किमान तीन वर्षं आधीपासून, म्हणजे लिलिबेट सात वर्षांची असतानापासूनच तीच दुसरी एलिझाबेथ होणार असल्याची शक्यता वास्तवाला धरून असल्याचं संबंधितांना कळलं होतं.

2015 मध्ये ट्रूपिंग ऑफ द कलरमध्ये प्रिन्स विल्यम आणि राणीसोबत प्रिन्स जॉर्ज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2015 मध्ये ट्रूपिंग ऑफ द कलरमध्ये प्रिन्स विल्यम आणि राणीसोबत प्रिन्स जॉर्ज

युवराज विल्यम यांनीही त्यांचा मुलगा जॉर्ज सात वर्षांचा असताना त्याला अशा प्रकारचं आव्हानात्मक वास्तव सांगितलं होतं. आपल्या मुलाने तुलनेने सर्वसामान्य आयुष्याची शेवटची मोजकी वर्षं उपभोगून घ्यावीत, अशी विल्यम यांची इच्छा होती.

कदाचित एलिझाबेथ यांनाही सुरुवातीच्या वर्षांमध्ये या सर्वसामान्य जगण्याचा अनुभव आला असेल. त्यांना कर्णधार पदावर बसवण्यात आलं असलं, तरी आपण संघातील खेळाडू म्हणून सुरुवात केली होती, याचा त्यांना कधीच विसर पडला नाही.

दुसऱ्या एलिझाबेथ 1952 साली सिंहासनावर विराजमान झाल्या. त्यांच्या कार्यकाळातील पहिली तीन दशकं काहीशी रटाळ झाली, त्यानंतर 1980च्या दशकात युवराज चार्ल्स यांनी डायनाशी विवाह केला आणि शतकाच्या अखेरीला माध्यमांनी मोठ्या प्रमाणात ब्रिटनच्या राजघराण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. राणी दुसरी एलिझाबेथ यांना त्यांच्या आजीआजोबांनी लहानपणी दिलेले धडे या वेळी उपयोगी पडले.

चार्ल्स, डायना, कॅमिला, विंडसरमध्ये लागलेली आग, फर्गीसोबत अँड्र्यू, फर्गीशिवाय अँड्र्यू, आणि 2020 साली नातू हॅरी याने राजघराण्यापासून अनपेक्षितपणे घेतलेली फारकत, या सगळ्या चढउतारात राणीला स्थिर विनयामुळेच वाट काढता आली. वेळोवेळी संकटं येऊनही राजसत्ता त्यांच्या सुरक्षित हातांमध्ये टिकून राहिली.

त्यांची नर्म विनोदबुद्धीसुद्धा सहायक ठरली. 1992 साली विंडसरमधील आगीची घटना घडली, तसंच राणीच्या तीन मुलांची लग्न मोडली, तेव्हा लॅटिनचा आधार घेत त्या स्मितहास्य कायम ठेवत म्हणाल्या होत्या, 1992 हे वर्ष त्यांच्यासाठी Annus Horribilis (भयंकर वर्ष) ठरलं.

1936 मध्ये विंडसर येथे तरुण राजकन्या एलिझाबेथ आणि मार्गारेट त्यांच्या पालकांसह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1936 मध्ये विंडसर येथे तरुण राजकन्या एलिझाबेथ आणि मार्गारेट त्यांच्या पालकांसह

एकदा प्रिव्ही कौन्सिलच्या बैठकीत कामगार मंत्री क्लेअर शॉर्ट यांचा मोबाइल फोन वाजला, तेव्हा त्यांनी शरमेनं तो बंद केला, तेव्हा राणी दुसरी एलिझाबेथ म्हणाल्या होत्या, "ओह डिअर, आय होप इट वॉजन्ट एनीवन इम्पॉर्टन्ट?"

राजेशाही नाट्यात आपल्याला आघाडीची भूमिका निभावावी लागणार आहे, हे कळल्यानंतर तैलबुद्धीच्या व तीक्ष्ण निरीक्षण शक्ती असणाऱ्या दुसऱ्या एलिझाबेथने लवकरच या नाट्यातील विनोद हेरला असावा.

"आपण स्वतःला जास्त गांभीर्याने घ्यायला नको," असं त्या 1991 साली नाताळनिमित्त लोकांना संबोधित करताना म्हणाल्या होत्या. "आपल्यापैकी कोणाचीही शहाणपणावर मक्तेदारी नाही."

राजघराण्यातील एका आख्यायिकेनुसार, 1933 साली लिलिबेटने तिची बहीण मार्गारेट (जन्म 1930) हिला आत्मविश्वासाने सांगितलं होतं, "आय एम थ्री, यू आर फोर."

लहान मार्गारेट गोंधळली, पण तिला बेरीज करता येत होती, त्यामुळे ती म्हणाली, "नाही, तसं नाहीये. आय एम थ्री, यू आर सेव्हन!"

पण आपली मोठी बहीण वयाबद्दल बोलत नाहीये, तर वारसदारांच्या क्रमवारीतील एकमेकांच्या स्थानाबद्दल बोलतेय, हे थोड्या वेळाने मार्गारेटच्या लक्षात आलं.

डेव्हिड काका पहिले, पापा दुसरे, लिलिबेट तिसरी, आणि मार्गारेट चौथी, असा तो क्रम होता. जग ज्या दिशेने विचार करत होतं, तो विचार सात वर्षांच्या लिलिबेटने त्याच वेगाने करायला सुरुवात केली होती.

राज्यरोहणानंतर लिलिबेट दोन क्रमांनी पुढे गेली. आता आपण पहिल्या क्रमांकाचे वारसदार होऊ, अशी भीती समोर उभी ठाकल्यावर दहा वर्षांची युवराज्ञी "एखादा भाऊ व्हावा म्हणून उत्कटपणे प्रार्थना करत होती," असं तिची आजी लेडी स्टॅदमोअर यांनी म्हटलं होतं.

पण कोणीच लहान भाऊ मदतीला आला नाही. घोडे नि कुत्रे यांच्या वर्दळीत वाढलेल्या या लहान मुलीला आता 'ग्रँडमा इंग्लंड" होण्यासाठी- किंबहुना वेल्स, नॉर्दर्न आयर्लंड व स्कॉटलंड यांची "ग्रँडमा" होण्यासाठीसुद्धा- स्वतःला सज्ज करायचं होतं.

ब्रिटिश इतिहासकार व चरित्रकार रॉबर्ट लेसी यांनी ब्रिटनमधील आधुनिक सांविधानिक राजसत्तेचा विशेष अभ्यास केला आहे. त्यांनी लिहिलेलं 'मॅजेस्टी: एलिझाबेथ सेकंड अँड द हाऊस ऑफ विंडसर' हे पुस्तक 1977 साली प्रकाशित झालं. 2015 सालापासून नेटफ्लिक्सवरील द क्राउन या मालिकेसाठी ते इतिहासविषयक सल्लागार म्हणून काम करत आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)