युके रॉयल फॅमिली : शाही कुटुंबात कोण-कोण आहे? त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात?

प्रिन्स फिलीप

फोटो स्रोत, Reuters

ड्यूक ऑफ एडिंबरा प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं.

राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्यासोबतच्या त्यांच्या विवाहाला 73 वर्षं झाली होती आणि ते ब्रिटीश राजघराण्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ राजगादीवर असणाऱ्या व्यक्तीचे जोडीदार होते.

शाही कुटुंबात कोण कोण आहे?

राणी एलिझाबेथ (द्वितीय) या 1952मध्ये त्यांचे वडील राजे जॉर्ज (सहावे) यांचं निधन झाल्यापासून युकेच्या 'हेड ऑफ स्टेट' आहेत. इतर कोणत्याही ब्रिटीश राज्यकर्त्यांपेक्षा त्या सर्वाधिक काळ राजगादीवर आहेत. त्या इतर 15 कॉमनवेल्थ देशांच्याही 'हेड ऑफ स्टेट' म्हणजेच प्रमुख आहेत.

94 वर्षांच्या राणी एलिझाबेथ आणि त्यांचे दिवंगत पती प्रिन्स फिलीप यांना चार मुलं, आठ नातवंड आणि नऊ पतवंडं आहेत.

प्रिन्सेस एलिझाबेथ यांचा प्रिन्स फिलीप यांच्यासोबत 1947मध्ये विवाह झाला.

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, प्रिन्सेस एलिझाबेथ यांचा प्रिन्स फिलीप यांच्यासोबत 1947मध्ये विवाह झाला.

शाही कुटुंबातले इतर सदस्य :

  • प्रिन्स ऑफ वेल्स प्रिन्स चार्ल्स 72 वर्षांचे आहेत. डचेस ऑफ कॉर्नवॉल कमिला यांच्याशी त्यांचं लग्न झालंय. ते राणी एलिझाबेथ यांचे सर्वात ज्येष्ठ पुत्र असून राणींच्या निधनानंतर ते राजे होतील.
  • ड्यूक ऑफ केंब्रिज प्रिन्स विल्यम यांचा विवाह डचेस ऑफ केंब्रिज कॅथरीन यांच्याशी झालाय. विल्यम हे प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत.
  • विल्यम यांचे बंधू आहेत ड्यूक ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी. त्यांचं लग्न डचेस ऑफ ससेक्स मेघन यांच्याशी झालाय. गेल्यावर्षी या दोघांनी शाही कुटुंबाचे वरिष्ठ सदस्य म्हणून आपली पदं सोडली आणि आता ते अमेरिकेतल्या लॉस अँजेलिसमध्ये राहतात.
ब्रिटीश राजघराणं

शाही कुटुंबाचा सदस्य कोण होतं?

शाही कुटुंबाच्या सदस्य असणाऱ्या व्यक्तीसोबत विवाह करणारी व्यक्ती शाही कुटुंबाचा सदस्य होते. विवाहानंतर त्यांना टायटल (Title) - पदवी दिली जाते.

उदाहरणार्थ- 1981मध्ये प्रिन्स चार्ल्स यांच्याशी लग्न केल्यानंतर लेडी डायना स्पेन्सर या 'प्रिन्सेस ऑफ वेल्स' झाल्या.

पण मोनार्क (Monarch) होण्यासाठी म्हणजे राजगादीवर बसण्यासाठी तुमचा जन्म या शाही कुटुंबात झालेला असणं आवश्यक असतं.

राजगादीच्या वारसांमध्ये प्रिन्स चार्ल्स सगळ्यात पहिले आहेत. राजगादीच्या वारसा यादीत दुसरे आहे चार्ल्स यांचे थोरले मुलगे प्रिन्स विल्यम आणि त्यांचा मुलगा प्रिन्स जॉर्ज या वारसदार यादीत तिसरे आहेत.

शाही विवाहसोहळ्यांत काय होतं?

शाही विवाहसोहळे हे बहुतेकदा प्राचीन आणि भव्य जागांवर पार पडतात आणि या सोहळ्यांसाठी मोठी गर्दी होते.

1947 साली राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलीप यांचा विवाह वेस्टमिनिस्टर अॅबीमध्ये पार पडला. या अॅबीची निर्मिती इसवी सन 960 मध्ये करण्यात आली होती. ब्रिटीश संसद - हाऊस ऑफ पार्लमेंट याच्या शेजारीच आहे.

या विवाहाच्या जवळपास सहा दशकांनंतर 2011मध्ये याच अॅबीच्या बाहेर राणींच्या नातवाचं - प्रिन्स विल्यम यांचं कॅथरीन मिडलटन यांच्यासोबत लग्न होताना पहायला लोकांची गर्दी झाली होती.

विवाहानंतर ड्यूक आणि डचेस ऑफ केंब्रिज रथातून वेस्टमिनिस्टर अॅबीतून बकिंगहॅम पॅलेसला गेले.
फोटो कॅप्शन, विवाहानंतर ड्यूक आणि डचेस ऑफ केंब्रिज रथातून वेस्टमिनिस्टर अॅबीतून बकिंगहॅम पॅलेसला गेले.

शाही कुटुंबातल्या इतरांचा विवाह विंडसर कॅसलमधल्या सेंट जॉर्जेस चॅपलमध्ये झाला. हे चॅपल 900 वर्षांपेक्षा जास्त जुनं आहे.

इथे झालेल्या विवाहांमध्ये प्रिन्स हॅरी - मेघन मर्कल यांच्या 2018मधल्या विवाहाचाही समावेश आहे.

शाही कुटुंबात बाळाचा जन्म होतो तेव्हा काय होतं?

शाही कुटुंबातल्या अनेक ज्येष्ठ सदस्यांचा जन्म लंडनमधल्या सेंट मेरीज हॉस्पिटलमध्ये झाला आहे.

प्रिन्सेस डायनांनी तिथेच प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी यांना जन्म दिला, तर डचेस ऑफ केंब्रिज यांच्या तीन मुलांचा - प्रिन्स जॉर्ज (7), प्रिन्सेस शार्लट (5) आणि प्रिन्स लुई (2) यांचाही जन्म तिथलाच आहे.

प्रिन्स विल्यम यांच्या जन्मानंतर प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स, 1982

फोटो स्रोत, PA

फोटो कॅप्शन, प्रिन्स विल्यम यांच्या जन्मानंतर प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स, 1982

या दोघीही बाळांसोबत हॉस्पिटलमधून घरी जाताना त्यांचे त्यांच्या पती आणि बाळांसोबत हॉस्पिटलबाहेर फोटो काढण्यात आले होते.

शाही कुटुंब काय करतं?

ब्रिटीश सरकारला हर मॅजस्टीज गर्व्हमेंट (Her Majesty's Government) म्हणजेच 'महाराणींचं सरकार' असं म्हटलं जातं. पण राणींकडे राजकीय अधिकार जवळपास नाहीत.

आठवड्यातून एकदा राणी पंतप्रधानांची भेट घेतात. राणींचं स्थान या बैठकीतून सूचित होतं, पण धोरणं ठरवताना पंतप्रधानांना त्यांची परवानगी घ्यावी लागत नाही.

राणी आणि शाही कुटुंबाचे इतर सदस्य औपचारिक कार्यक्रमांना हजेरी लावतात.

कुटुंबाचे सदस्य त्यांच्या वतीने इतर देशांना भेटी देतात. उदाहरणार्थ- गेल्या मार्च महिन्यात राणींच्या वतीने ड्यूक आणि डचेस ऑफ केंब्रिज यांनी रिपब्लिक ऑफ आयर्लंडला औपचारिक भेट दिली होती.

ड्यूक आणि डचेस ऑफ केंब्रिज

फोटो स्रोत, Julien Behal

अनेक सदस्य हे चॅरिटीजचं प्रतिनिधीत्वं करतात आणि काहींनी स्वतःच्या परोपकारी संस्था सुरू केल्या आहे. ड्यूक ऑफ एडिंबरांनी सुरू केलेली तरुणांसाठीची पुरस्कार योजना यापैकीच एक.

सशस्त्र दलांशीही शाही कुटुंबातल्या सदस्यांचं जवळचं नातं आहे. प्रिन्स विल्यम यांनी रॉयल एअर फोर्समध्ये सेवा केली, तर प्रिन्स हॅरी लष्करात होते.

अफगाणिस्तानात लष्करी सेवेत प्रिन्स हॅरी

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, अफगाणिस्तानात लष्करी सेवेत प्रिन्स हॅरी

शाही सदस्य नेहमीच औपचारिक कर्तव्यं पार पाडतात का?

नाही, गेल्या वर्षी प्रिन्स हॅरी आणि डचेस ऑफ ससेक्स मेघन यांनी आपण वरिष्ठ पदांचा त्याग करत असून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी काम करणार असल्याचं जाहीर केलं.

या जोडप्याला प्रदान करण्यात आलेल्या मानद लष्करी पदव्या आणि ते काम करत असलेल्या संस्थांच्या जबाबदाऱ्या त्यांनी परत केली असल्याच्या वृत्ताला बकिंगहॅम पॅलेसने दुजोरा दिला. या जबाबदाऱ्या शाही कुटुंबातल्या इतर सदस्यांना वाटून देण्यात आल्या.

Prince Harry and Meghan

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स आता त्यांच्या मुलासोबत अमेरिकेत राहतात.

ड्यूक ऑफ यॉर्क प्रिन्स अँड्र्यू हे देखील त्यांच्या औपचारिक कर्तव्य जबाबदाऱ्यांपासून 2019मध्ये दूर झाले.

शाही कुटुंबाला पैसा कुठून मिळतो?

दरवर्षी युके सरकार राणींना सॉव्हरिन ग्रांट (Sovereign Grant) देतं.

क्राऊन्स एस्टेटच्या म्हणजे राणी एलिझाबेथ यांच्या स्वतंत्र व्यावसायिक प्रॉपर्टी व्यवसायातून मिळालेल्या आधीच्या दोन वर्षांच्या महसुलाच्या 25% ही रक्कम असते. या क्राऊन एस्टेटमध्ये 4,800 एकरांचं विंडसर ग्रेट पार्क आणि बर्कशरमधल्या अॅस्कॉट रेसकोर्सचा समावेश आहे. पण यामध्ये बहुतेक रहिवासी आणि व्यावसायिक प्रॉपर्टी आहेत.

2020-21 साठीची ही सोव्हरिन ग्रांट 85.9 दशलक्ष पौंड होती. याच्या मदतीने शाही कुटुंबं त्यांचं कर्तव्य पार पाडतं आणि त्यांच्या महालांची देखरेखही केली जाते.

प्रिन्स चार्ल्स यांना डची ऑफ कॉर्नवॉल (Duchy - ड्यूकच्या अधिपत्याखाली येणारा प्रदेश) मधून उत्पन्न मिळतं. यामध्ये विविध प्रकारची मालमत्ता आणि आणि आर्थिक गुंतवणुकीचा समावेश आहे. या माध्यमातून त्यांना गेल्या वर्षी 22.3 दशलक्ष पौंड मिळाले होते.

शाही कुटुंबातले सदस्य कुठे राहतात?

बकिंगहॅम पॅलेस हे राणी एलिझाबेथ यांचं लंडनमधलं अधिकृत निवासस्थान आहे.

राणींच्या अधिकृत वाढदिवस सोहळ्यादरम्यान शाही कुटुंबाचे सदस्य, बकिंगहॅम पॅलेस, 2019

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, राणींच्या अधिकृत वाढदिवस सोहळ्यादरम्यान शाही कुटुंबाचे सदस्य, बकिंगहॅम पॅलेस, 2019

बर्कशरमधल्या विंडसर कॅसल इथे त्या वीकेंड्स आणि इस्टरचा महिना घालवतात. पण जागतिक साथीच्या या संपूर्ण काळात त्या विंडसर कॅसलमध्येच होत्या. इथेच प्रिन्स फिलीप यांचं निधन झालं.

प्रिन्स चार्ल्स आणि डचेस ऑफ कॉर्नवॉल हे लंडनमध्ये असताना क्लॅरेन्स हाऊसमध्ये राहतात. हे घर बकिंगहॅम पॅलेसपासून अर्ध्या मैलापेक्षाही कमी अंतरावर आहे.

प्रिन्स विल्यम आणि डचेस ऑफ केंब्रिज कॅथरिन जवळच केन्सिंग्टन पॅलेसमध्ये राहतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)