You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बोरिस जॉन्सन अडचणीत: ‘लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधानांच्या घरी पार्ट्या हे नेतृत्वाचं अपयश’
'कोरोना नियमावलीचा भाग म्हणून नागरिकांवर कठोर निर्बंध लागू असताना 10, डाऊनिंग स्ट्रीट अर्थात पंतप्रधानांच्या निवासस्थानी पार्टी होणं हे नेतृत्वाचं अपयश आहे', असे ताशेरे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सू ग्रे यांनी आपल्या अहवालात ओढले.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निवासस्थानी कोरोना लॉकडाऊन काळात पार्टी झाली होती. मुळात याला परवानगीच द्यायला नको होती असं सू ग्रे यांनी म्हटलं आहे.
ग्रे यांनी 16 विविध कार्यक्रमांची चौकशी केली, काहींचा याआधी उल्लेखही करण्यात आला नव्हता. 20 मे 2020 रोजी ब्रिंग युअर ओन बूझ नावाचा कार्यक्रम डाऊनिंग स्ट्रीट गार्डन इथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी माफी मागितली आहे. 13 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या कार्यक्रमाचीही पोलीस चौकशी करत आहेत.
युकेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांवर कठोर निर्बंध लादण्यात आले होते. याचदरम्यान सरकारी निवासस्थानी म्हणजेच 10, डाऊनिंग स्ट्रीट इथे झालेल्या पार्टीसाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संसदेत माफी मागितली आहे. सू ग्रे या प्रशासकीय अधिकाऱ्याने यासंदर्भात अहवाल सादर केला.
बोरिस यांचं वर्तन निलाजरेपणाचं असून त्यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, "ग्रे यांचा अहवाल पडताळणीतून समोर आलेले निष्कर्षांचा स्वीकार करतो. माझ्याकडून चूक झाली आहे.
आपण आरशात पाहायला हवं आणि शिकायला हवं. जे काही घडलं ते नियमांच्या चौकटीत राहून होतं असं म्हणता येणार नाही".
डाऊनिंग स्ट्रीट आणि कॅबिनेट ऑफिस ज्या पद्धतीने चालवलं जातं त्यात आता बदल करण्यात येणार आहे ज्यामुळे परिस्थिती बदलेल असं त्यांनी सांगितलं.
सरकारच्या ध्येयधोरणांमध्ये सुधारणेसाठी येत्या काही दिवसात महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात येणार आहे. डाऊनिंग स्ट्रीट इथे जे घडलं त्यासंदर्भात माझी माफी पुरेशी नाही असंही जॉन्सन म्हणाले.
विरोधी पक्ष जॉन्सन यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. जॉन्सन यांचं वर्तन बेशरमपणाचं आहे असं लेबर पार्टीचे नेते कीर स्टार्मर यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान आणि या घोटाळ्याशी संबंधित सगळी माणसं स्वत:ला आणि कार्यालयाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार आणि जनता यांच्यात असलेलं विश्वासाचं नातं त्यांनी तोडलं आहे.
ब्रिटनच्या माजी पंतप्रधान थेरेसा यांनी संसदेत सांगितलं की कोव्हिडच्या नियमावलीमुळे नागरिकांवर विविध स्वरुपाचे प्रतिबंध होते. पंतप्रधान या नियमांचं पालन करतात का हे जाणण्याचा नागरिकांना अधिकार आहे.
सू ग्रे यांच्या अहवालानुसार डाऊनिंग स्ट्रीट इथे नियमांचं पालन करण्यात आलं नाही. पंतप्रधान जॉन्सन यांना नियमांविषयी माहिती होतं का त्यांनी नियमांकडे दुर्लक्ष केलं असा सवाल त्यांनी केला.
बोरिस जॉन्सन यांनी यापूर्वीही मागितलेली माफी
पंतप्रधान होण्यापूर्वी बोरिस जॉन्सन हे माजी परराष्ट्र सचिव होते. ब्रेक्झिटविषयीची थेरेसा मे यांची धोरणं न पटल्याने ते कॅबिनेटमधून बाहेर पडले होते.
2008 ते 2016 या काळात ते लंडनचे महापौर होते.
बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडावं यासाठीच्या 'Vote Leave' मोहिमेचं नेतृत्त्वं केलं होतं. तर ब्रेक्झिटसाठीचा निर्णय घेण्यासाठी झालेल्या मतदानामध्ये जेरेमी हंट यांनी 'Remain' म्हणजेच युरोपियन युनियनमध्ये ब्रिटनने रहावं असं मतदान केलं होतं.
बोरिस जॉन्सन यांनी आतापर्यंत अनेक पदं भूषवली, आणि जवळपास प्रत्येक वेळी ते वादात सापडले आहेत.
2004मध्ये ते 'स्पेक्टॅटर मॅगझिन'चे संपादक असताना त्यांना लिव्हरपूलमध्ये जाऊन माफी मागावी लागली होती. केन बिगले या ब्रिटीश कंत्राटदाराला ओलीस धरुन त्याची इराकमध्ये हत्या करण्यात आली होती. लिव्हरपूलच्या लोकांनी यावर जरा जास्तच प्रतिक्रिया दिल्याचं मत जॉन्सन यांनी मासिकातून व्यक्त केलं होतं. त्याबद्दल त्यांना माफी मागावी लागली.
लेबर पक्षाच्या केन लिव्हिंगस्टन यांना हरवत ते 2008मध्ये पहिल्यांदा लंडनचे महापौर झाले. लंडनमधल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधून प्रवास करताना दारु पिण्यावर जॉन्सन यांनी बंदी आणली. शिवाय शहरामध्ये सायकल भाडेतत्त्वाने देणारी योजना सुरू केली जी - बोरिस बाईक्स नावाने ओळखली जाते.
2011मध्ये लंडनमध्ये दंगली झाल्या त्यावेळी ते सुटीवर होते आणि लंडनमध्ये परतण्यासाठी त्यांनी उशीर केल्याची टीका सुरुवातीला त्यांच्यावर करण्यात आली होती
2012मध्ये ते पुन्हा लंडनचे महापौर झाले आणि लंडन ऑलिम्पिक्सच्या आयोजनामध्ये त्यांचा सहभाग होता. या दरम्यानचा सगळ्यात चर्चिला गेलेला क्षण म्हणजे युकेला पहिलं सुवर्णपदक मिळाल्यानंतर तो विजय साजरा करणारे बोरिस जॉन्सन झिप लाईनच्या वायरवर अडकले आणि लोंबकळत राहिले.
2015मध्ये ते खासदार झाले आणि 2016मध्ये पंतप्रधान झालेल्या थेरेसा मे यांनी त्यांची परराष्ट्र सचिवपदी नेमणूक केली. युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजूने त्यांनी केलेला प्रचार लक्षात घेता त्यांना हे पद देण्यात आलं असावं, अशी चर्चा त्यावेळी होती.
ब्रिटीश - इराणी नागरिक असणाऱ्या नाझनीन झगारी-रॅटक्लिफ यांना इराणमध्ये अटक करण्यात आली. त्यावेळी त्या तिथे सुटीवर गेल्या असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण त्या इराणमध्ये पत्रकारांनी शिकवत असल्याचं विधान जॉन्सन यांनी केलं. त्याबद्दल त्यांना नंतर माफी मागावी लागली. यानंतर इराणमध्ये नाझनीन यांना जजसमोर सादर करण्यात आलं आणि त्यांच्यावर इराणच्या राजवटीविरोधात प्रचार करण्याचा आरोप लावण्यात आला.
सौदी अरेबिया मध्य-पूर्वेमध्ये छुप्या युद्धात सामील होत असल्याची टीका जॉन्सन यांनी केली. आणि त्याबद्दल त्यांना डाऊनिंग स्ट्रीटच्या कानपिचक्या सहन कराव्या लागल्या.
बुरखाधारी मुस्लिम महिला या 'लेटरबॉक्सेस' सारख्या (पत्राच्या पेटीसारख्या) दिसतात असा उल्लेख जॉन्सन यांनी 2018मध्ये डेली टेलिग्राफमधल्या त्यांच्या लेखात केला. त्यानंतरही त्यांच्यावर मोठी टीका झाली होती.
ब्रेक्झिटसाठीच्या मोहीमेचं त्यांनी नेतृत्त्वं केलं पण 2013मध्ये याच बोरिस जॉन्सन यांनी डेली टेलिग्राफमध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्याने युकेचे प्रश्न सुटणार नसल्याचं म्हटलं होतं.
ब्रेक्झिटविषयीच्या धोरणांवरूनच थेरेसा मे यांच्याशी बोरिस जॉन्सन यांचे मतभेद झाले आणि त्यांनी मे यांच्या मंत्रीमंडळातून राजीनामा दिला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)