You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ब्रेक्झिटला विरोध करत बोरिस जॉन्सन यांच्या वडिलांनी उचललं 'हे' पाऊल
ब्रिटन अधिकृतपणे युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यानंतर आता आपण फ्रान्सचं नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करणार असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे वडील स्टेनली जॉन्सन यांनी म्हटलं आहे.
फ्रान्सच्या आरटीएल रेडिओला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रेक्झिटच्या मोहिमेचं नेतृत्व केलं होतं आणि पंतप्रधानपदी रुजू होताच अवघ्या सहा महिन्यात ब्रिटनला युरोपीय महासंघापासून स्वतंत्र करून दाखवलं. मात्र, त्यांचे वडील स्टेनली जॉन्सन यांचा ब्रेक्झिटला विरोध आहे.
2016 साली झालेल्या सार्वमत चाचणीतही त्यांनी ब्रिटनने युरोपीय महासंघासोबत राहवं, बाहेर पडू नये, या बाजूने मत दिलं होतं.
युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या काही तास आधी प्रसारित करण्यात आलेल्या या मुलाखतीत स्टेनली जॉन्सन यांनी फ्रान्सचं नागरिकत्त्व स्वीकारण्यामागची कारणं सांगितली.
ते म्हणाले, "याचा अर्थ मला फ्रेंच व्हायचं आहे, असा नव्हे. तर जे माझ्या जवळ आहे तेच मला पुन्हा प्राप्त करायचं आहे."
आपल्या आईचा जन्म फ्रान्समध्ये झाला आणि एका फ्रेंच आईचा मुलगा असल्या कारणाने 'मी कायम एक युरोपीय असेन', असं स्टेनली यांनी या मुलाखतीत सांगितलं.
80 वर्षांचे स्टेनली यांची 1979 साली युरोपीय संसदेत निवड झाली होती. त्यावर्षी पहिल्यांदा थेट निवडणूक झाली होती. त्यानंतर त्यांनी युरोपीय कमिशनसाठी काम केलं.
याच कारणामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बालपणीची काही वर्ष ब्रसेल्समध्ये घालवली.
ब्रेक्झिट मुद्द्यावरून केवळ बोरिस जॉन्सन आणि त्यांचे वडील स्टेनली जॉन्सन यांच्यात मतभेद आहेत, असं नव्हे तर त्यांचे भाऊ आणि बहीण यांचाही ब्रेक्झिटला विरोध आहे.
ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या बहीण आणि पत्रकार रेचल जॉन्सन यांचाही ब्रेक्झिटला विरोध आहे. याच मुद्द्यावरून त्यांनी 2017 च्या निवडणुकीत कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचा राजीनामा दिला आणि लिबरल डेमोक्रेट्स पक्षात प्रवेश केला.
बोरिस जॉन्सन यांचे भाऊ आणि कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे खासदार जो जॉन्सन यांनीही याच कारणावरून 2018 साली मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)