थेरेसा मे: कणखर पण अपयशी नेता?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

एका कुटुंबातली सगळी भावंडं एका मोठ्या घरात एकत्र राहायचं ठरवतात. एका पिढीनंतर त्यातला एकजण वेगळं व्हायचं ठरवतो. सगळ्यांना धक्का बसतो, पण ते हा निर्णय मान्य करतात.

घराची पुन्हा वाटणी करण्याची वेळ येते. पण ती कशी करायची? वेगळं होणाऱ्या भावाच्या मुलांमध्येच जायचं की नाही यावर एकमत नसतं. पण आता ठरलं, म्हणजे घर तर सोडावं लागणारच. मग जाताना काय घेऊन जायचं, काय मागे ठेवायचं याच्यावरून वाद होऊ लागतात. तेव्हा त्या भावाच्या कुटुंबातलीच एक आजी वाटाघाटींसाठी पुढाकार घेते. सर्वांना तिचा आदर वाटतो.

तिच्यावर दोन जबाबदाऱ्या असतात. त्या भावाच्या मुलांमधली भांडणं मिटवणं, आणि त्यांना सर्वांना घरातून बाहेर एक वेगळी चूल मांडून देणं. पण शब्दाला शब्द लागत जातो, हा तिढा कसा सोडवायचा, कुणाला कसं समजवायचं, हे आजीला कळेनासं होतं. तिला सगळं झेपेल का याविषयी कुणाला खात्री वाटत नाही. शेवटी ती हार मानते आणि माघार घेते.

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याबाबतीत जे घडलं ते काहीसं असंच आहे. थेरेसा 2016 साली अनपेक्षितपणे ब्रिटनच्या पंतप्रधान बनल्या होत्या. पण अवघ्या तीन वर्षांत त्यांना राजीनामा द्यावा लागला.

शुक्रवारी लंडनच्या 10 डाऊनिंग स्ट्रीट इथल्या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. "मी या देशाची दुसरी महिला पंतप्रधान होते, पण शेवटची नक्कीच नाही. देशाचं पंतप्रधानपद भूषवणं माझ्यासाठी अत्यंत गर्वाची गोष्ट आहे," असं म्हणताना मे यांच्या डोळ्यातून अश्रू आले.

येत्या पाच जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप ब्रिटनच्या भेटीवर जाणार आहेत. सात जूनपर्यंत थेरेसा मे सत्तेवर राहतील. त्यानंतर कंझर्व्हेटिव्ह पक्ष नव्या नेत्याच्या निवडीची प्रक्रिया सुरू करेल.

'ब्रेक्झिट'आधीच एक्झिट

राजकारण्यात सर्वोच्च पदावर पोहोचल्यावरही किती वेगवेगळ्या पातळींवर संघर्ष करावा लागू शकतो, लोकांना एकत्र आणण्यासाठी किती कौशल्य वापरावी लागतात आणि तरीही कधीकधी अपयशच येते. थेरेसा मे यांची कारकीर्द त्याचंच उदाहरण ठरू शकते.

जून 2016 मध्ये जनमत चाचणीत ब्रिटनच्या जनतेनं 'ब्रेक्झिट'च्या बाजूनं कौल दिला, म्हणजे ब्रिटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडावं असा धक्कादायक निर्णय घेतला होता. त्यानंतर तेव्हाचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी राजीनामा दिला. अडचणीच्या त्या वेळेस थेरेसा मे कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या (हुजूर पक्ष) आणि देशाच्या नेतृत्वासाठी पुढे सरसावल्या.

एक कणखर महिला पंतप्रधान म्हणून इतिहासात नाव नोंदवण्याची संधी आणि इच्छाशक्ती त्यांच्याकडे होती. त्यासाठी त्यांनी मेहनतही घेतली. जनमत चाचणीनं दिलेल्या धक्क्यातून ब्रिटनला आपण सावरू शकू, असा विश्वास त्यांना वाटला होता.

सर्वांना मान्य असेल असा ब्रेक्झिट करार पास होत नाही, तोवर आपण मागे हटणार नाही असा निर्धार थेरेसा यांनी दाखवला होता. पण तीन वर्ष सातत्यानं प्रयत्न करूनही त्यांना यश आलं नाही. त्यामुळं 'ब्रेक्झिट'आधीच पंतप्रधानपदावरून थेरेसा मे यांना 'एक्झिट' घ्यावी लागते आहे.

तीन वर्ष तारेवरची कसरत

थेरेसा मे यांच्या चिकाटीला विरोधकांनीही दाद दिली आहे. एकदा नाही, दोनदा नाही, तर तीनवेळा थेरेसा मे यांनी मांडलेला कराराचा प्रस्ताव ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहानं म्हणजे 'हाऊस ऑफ कॉमन्स'नं नाकारला. तरीही मे यांनी प्रयत्न सोडले नाहीत.

त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आधी पक्षातील नेत्यांनी आणि मग संसदेत अविश्वास ठराव आणण्यात आला, पण दोन्ही वेळा मे यांना सत्ता राखण्यात यश आलं.

जनमत चाचणीत ब्रेक्झिटच्या बाजूनं कौल लागला, पण हा जनाधार विभागलेला होता. त्यामुळं ब्रिटननं वेगळं व्हायचं की नाही, यावरून मे यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षातही दोन वेगळे मतप्रवाह होते.

स्वतः मे यांनी ब्रेक्झिटविषयी आपली भूमिका आधी स्पष्टपणे मांडली नव्हती. ब्रिटननं युरोपियन युनियनमध्ये राहावं असं त्यांचं वैयक्तिक मत होतं. पण जनतेनं ब्रेक्झिटचा कौल दिल्यामुळं त्याचा आदर राखला पाहिजे, असं त्यांना वाटत होतं.

ब्रिटनमधल्या दुभंगलेल्या राजकीय परिस्थितीत दोन्ही बाजूंना समजून घेणारा नेता, त्यातही महिला पंतप्रधान असल्यानं मे यांच्याविषयी आश्वासक चित्र निर्माण झालं होतं. पण दुभंगलेल्या ब्रिटनला एकत्र आणायचं, एकत्र ठेवायचं आणि बाहेरच्या जगाशी वाटाघाटी करायच्या हे काम कुणासाठीही सोपं नव्हतंच.

नेहरू, वाजपेयींएवढं मोठं आव्हान

थेरेसा मे यांच्यासमोरचं आव्हान किती कठीण होतं? हे समजून घ्यायला दोन भारतीय पंतप्रधान- पंडित जवाहरलाल नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयींचं उदाहरण पाहता येईल.

1947 मध्ये फाळणीनंतर भारताला एकसंध ठेवण्याचं, आणि अनिश्चित वातावरणात पहिलंवहिलं सरकार चालवण्याचं आव्हान नेहरूंसमोर होतं. तर एनडीएच्या काळात वाजपेयी यांनाही विविध विचारांच्या लोकांना एकत्र घेऊन चालायचं होतं.

पण नेहरू आणि वाजपेयी, दोघांकडेही असलेल्या दोन गोष्टी थेरेसा मे यांना मिळवता आल्या नाहीत. जनतेचा विश्वास आणि पक्ष किंवा आघाडीतील लोकांची साथ.

थेरेसा मे यांचं कुठे चुकलं?

थेरेसा यांना आपल्याच पक्षातील लोकांचा विश्वास जिंकता आला नाही. एका मर्यादित गटाबाहेर त्यांना फारसा पाठिंबा नव्हता. खासदार किंवा नेत्यांसोबत कामापलिकडे त्या फार मिसळत नसत. त्यामुळं

त्यात कंझर्व्हेटिव्ह पक्षातच नेतृत्त्वासाठीची चढाओढ पाहता मे यांना जणू घरातच विरोधकांचा सामना करावा लागला.

थेरेसा मे यांना लोकांचं समर्थनही मिळवता आलं नाही. त्या पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या त्या पक्षातील लोकांनी निवड केल्यावर. त्यांच्या नेतृत्त्वाखाली 2015 सालची निवडणूक झाली नव्हती.

आपल्या नेतृत्त्वावर वारंवार उठणारं प्रश्नचिन्ह मिटवण्यासाठी त्यांनी 2017 साली निवडणूक घेतली, ज्याचा परिणाम मात्र उलटाच झाला. कंझर्व्हेटिव्ह पार्टीला आधीपेक्षा कमी जागा मिळाल्या आणि बहुमतासाठी मे यांना नॉर्दन आयर्लंडच्या पक्षासोबत डेमोक्रॅटिक युनियनिस्ट पक्षासोबत आघाडी करावी लागली.

आधीच एकट्या पडलेल्या मे त्यामुळं आणखीनच दबावाखाली आल्या. मग तिसऱ्यांदा करार पास करण्यात अपयश आलं आणि एकामागोमाग मंत्र्यांनी राजीनामे दिल्यावर अखेर मे यांना पायउतार व्हायचा निर्णय घ्यावा लागला.

स्वप्नाची अखेर

थेरेसा मे यांनी कॉलेजच्या दिवसांत असतानाच ब्रिटनची पहिली महिला पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, असं त्यांची मित्रमंडळी सांगतात. पण 1979 मार्गारेट थॅचर यांनी तो मान मिळवला. त्यानंतर 2016 साली ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर विराजमान होणाऱ्या थेरेसा मे या दुसऱ्या महिला राजकारणी ठरल्या.

राजकारणात येण्याआधी त्या बँक ऑफ इंग्लंडसाठी काम करायच्या. कॅमेरून सरकारमध्ये त्या होम सेक्रेटरी म्हणजे गृहमंत्री पदावर होत्या.

मग पंतप्रधान झाल्यावरही ब्रिटनमधल्या दक्षिण आशियाई वंशाच्या समुदायाशी जवळीक साधण्याचा आणि भारतासोबतचे संबंध दृढ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भारतीय नसतानाही पँट-सूटइतक्याच सफाईनं साडीमध्ये वावरणं हे थेरेसा मे यांना उत्तम जमायचं.

पर्यावरणापूरक निर्णय, घरगुती हिंसाचाराविरोधात कठोर कायदा, वर्णभेद दूर करण्याचे प्रयत्न, अशा काही मुद्द्यांवर थेरेसा मे यांनी काम केलं. पण ब्रेक्झिट या एका शब्दानंच त्यांची कारकीर्द झाकोळून टाकली. ब्रिटनला युरोपातून बाहेर पडण्यासाठी योग्य करार करण्यात अपयशी ठरलेल्या पंतप्रधान हीच ओळख त्यांच्या वाट्याला आली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)