ब्रेक्झिट : प्रश्नांची मालिका आणि अधांतरी भवितव्य

ब्रेक्झिट संदर्भात ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी युरोपियन महासंघाशी केलेल्या कराराचे भवितव्य अजूनही अधांतरी आहे.

थेरेसा मे युरोपियन महासंघ आणि इतर युरोपियन नेत्यांच्या भेटी घेत असून सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ब्रेक्झिटसंबंधीच्या थेरेसा मे यांच्या प्रस्तावावर मंगळवारी (11 डिसेंबर) ब्रिटनच्या संसदेत मतदान होणार होते. मात्र थेरेसा मे यांनी हे मतदान सध्या तरी होणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

कारण विरोधी पक्षासोबतच काही सत्ताधारी खासदारांचाही यूकेने युरोपियन महासंघासोबत केलेल्या कराराला विरोध आहे. त्यामुळेच मतदान पुढे ढकलल्यानंतर थेरेसा मे यांनी डच पंतप्रधान मार्क रट आणि जर्मनीच्या चॅन्सेलर अंगेला मर्केल यांची भेट घेतली.

ब्रेक्झिटवर संसदेत चर्चेला सुरुवात झाली आहे. मजूर पक्षाचे खासदार आणि चेअर ऑफ द ब्रेक्झिट कमिटी हिलरी बेन यांनी म्हटलं की, "अॅटर्नी जनरल यांनी सभागृहात यावं आणि कायदेशीर अडचणी काय आहेत याबाबत सविस्तर चर्चा करावी. आमच्या हे लक्षात आलं आहे की आज दिलेलं वचन उद्या हवेत विरून जाऊ शकतं."

यूकेने महासंघासोबत केलेल्या करारातील वादग्रस्त मुद्दा हा नॉदर्न आयर्लंड आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंड यांच्यामधील सीमारेषेचा प्रश्न आहे. नॉदर्न आयर्लंड यूकेचा भाग आहे तर रिपब्लिक ऑफ आयर्लंड स्वतंत्र आहे. आयर्लंडने नॉदर्न आयर्लंडसोबतची सीमारेषा सील करण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत मे यांच्या 'ब्रेक्झिट प्लॅन'मधून नॉदर्न आयर्लंडला वगळावे लागेल.

याचाच अर्थ नॉदर्न आयर्लंड हा युरोपियन युनियनचा भाग राहील आणि उर्वरित यूके मात्र त्यातून बाहेर पडेल. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या यूके पूर्णपणे युरोपियन युनियनमधून बाहेर पडला असे म्हणतात येणार नाही. म्हणूनच ब्रिटनमधील खासदारांचा थेरेसा मे यांनी केलेल्या कराराला विरोध आहे. थेरेसा मे यांनी ब्रसेल्समधे अन्य नेत्यांसोबतच्या भेटीत हीच समस्या मांडली.

नॉदर्न आयर्लंड सीमारेषेविषयी आपल्याला अजून ठोस आश्वासन हवे आहे, जेणे करून संसदेमध्ये मतदानासाठी खासदारांची मनधरणी करता येईल, अशी भूमिका थेरेसा मे यांनी आपल्या ब्रसेल्स भेटीत मांडली आहे.

मात्र युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी युरोपियन युनियन यासंबंधी पुनर्वाटाघाटी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. अर्थात, यूकेला या करारावर मतदान घेणे सोपे जावे यासाठी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी युनियनच्या सदस्य देशातील नेत्यांना केले आहे.

'बॅकस्टॉप'च्या प्रश्नावर अडल्या वाटाघाटी

आता ब्रिटनशी ब्रेक्झिटसंबंधी होणारी चर्चा ही आयरिश सीमारेषेवरील 'बॅकस्टॉप'च्या मुद्द्यावरच होईल, हे युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र 'बॅकस्टॉप'च्या पर्यायालाही कडाडून विरोध होतोय. बॅकस्टॉप म्हणजे नॉदर्न आयर्लंड आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंडच्या सीमारेषेवर तात्पुरत्या स्वरूपात जकात व्यवस्था तयार करणे. जेणे करून आयरिश बॉर्डरवर चेक-पॉईंट्स उभारावे लागू नयेत.

अर्थात हा दीर्घकालीन उपाय नाही. यामुळे नॉदर्न आयर्लंडसाठी पूर्णपणे वेगळे नियम बनवले जातील आणि हा देशाच्या एकात्मतेसाठी धोका ठरू शकतो, या मुद्द्यावर ब्रिटनमधे 'बॅकस्टॉप'ला विरोध केला जात आहे. त्यामुळे थेरेसा मे यांची सर्व बाजूने कोंडी होताना दिसत आहे.

विरोधाची धार बोथट करण्यासाठी थेरेसा मे यांनी सोमवारी पक्षाच्या खासदारांना स्पष्ट केले, की 'बॅकस्टॉप'च्या मुद्द्यावर आश्वासक तोडगा काढण्यासाठी अन्य युरोपियन नेत्यांनी चर्चेची तयारी दाखवली आहे.

ब्रेक्झिटसंबंधीच्या करारातील सर्व मुद्दे आम्हाला समजत नाहीत, तोपर्यंत बॅकस्टॉपच्या मुद्द्यावर ब्रिटनशी चर्चा होणार नसल्याचे आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी स्पष्ट केले आहे.

एकूणच सध्या तरी थेरेसा मे यांचा प्रस्ताव सहजगत्या प्रत्यक्षात येईल, असे दिसत नाही. संसदेत या प्रस्तावावर मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. पण जेव्हा मे यांचा प्रस्ताव ब्रिटिश संसदेत मांडला जाईल तेव्हा प्रस्तावाच्या विरोधात मतदान होईल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

कारण सत्ताधारी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार मजूर पक्ष, नॉदर्न आयरिश युनियनिस्ट पक्ष (द डीयुपी) आणि अन्य विरोधकांसोबत ब्रेक्झिट प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्याची शक्यता आहे.

खासदारांनी ही योजना फेटाळल्यास काय?

ही योजना फेटाळल्यास थेरेसा मेंविरोधात अविश्वास ठराव मांडला जाऊ शकतो. त्याबरोबरच ब्रिटनमधे अजून काय घडू शकते याबद्दल काही महत्त्वाच्या शक्यता पुढे येत आहेत.

• ब्रेक्झिटला पूर्णपणे नकार

• थेरेसा मे यांच्या प्रस्तावावर पुनर्मतदान

• युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी नव्याने वाटाघाटी

• पुन्हा निवडणूक

• अविश्वास ठराव

• ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे का, या मुद्द्यावर पुन्हा एकदा सार्वमत

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)