युरोपियन युनियनची ब्रेक्झिट कराराला संमती

20 महिन्यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर युरोपियन युनियनने ब्रिटनचं युरोपियन युनियनमधून बाहेर पडणं आणि त्यानंतरचे ब्रिटनसोबतचे संबंध यावरील कराराला मान्यता दिली आहे. या कराराला आता ब्रिटनच्या संसदेने मान्यता लागणार आहे.

ब्रसेल्स परिषदेत युरोपियन युनियन नेत्यांनी ब्रेक्झिटला संमती दिली आहे. युरोपियन युनियनचे मुख्य प्रशासक डोनाल्ड टस्क यांनी ही घोषणा केली.

ब्रसेल्स परिषदेत साधारण तासभर या विषयावर चर्चा झाली. 27 नेत्यांनी इंग्लंडच्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाला परवानगी दिली.

जिब्राल्टरसंदर्भातील स्पेनने असलेला आक्षेप मागे घेतल्यानंतर इंग्लंडचा युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा मार्ग सुकर झाल्याचे संकेत टस्क शनिवारी यांनी दिले होते.

युरोपियन युनियनच्या मान्यतेनंतर आता या कराराला इंग्लंडच्या संसदेची मंजुरी मिळणं अनिवार्य आहे. इंग्लंडमधील अनेक खासदारांचा या कराराला विरोध केला आहे.

टस्क यांनी ट्वीटरच्या माध्यमातून युरोपियन युनियनच्या मान्यतेबद्दल माहिती दिली.

या करारासाठी युरोपियन युनियन आणि इंग्लंड यांच्यात गेले 20 महिने वाटाघाटी सुरू होत्या.

इंग्लंड 29 मार्च 2019 रोजी युरोपियन युनियनमधून बाहेर पडणार आहे.

इंग्लंडची संसद डिसेंबर महिन्यात ब्रेक्झिटसंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे. अनेक खासदारांचा ब्रेक्झिटच्या कराराला विरोध आहे.

ब्रेक्झिटला पाठिंबा देण्याचं आवाहन इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी केलं आहे.

युरोपियन युनियनने काय ठरवलं?

ब्रेक्झिटबाबत युरोपियन युनियनने दोन मुद्यांवर सहमती दर्शवली.

  • ब्रेक्झिटमधून बाहेर पडण्यासंदर्भात 585 पानांचा इंग्लंडतर्फे सादर करण्यात आलेला मसुदा मान्य करण्यात आला. यामध्ये 39 अब्ज पौंडांचं Divorce Bill, नागरिकांचे हक्क, नॉदर्न आयर्लंडचा उल्लेख- व्यापाराबाबत चर्चा स्थगित झाल्यास आयर्लंड सीमा खुली ठेवण्याचा निर्णय.
  • इंग्लंड युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर एकमेकांदरम्यानचे संबंध कसे असतील तसंच सुरक्षेबाबत राजकीय घोषणा.

रविवारी युरोपियन युनियन सदस्यांनी औपचारिक मतदान केले नाही. सहमतीने हा निर्णय घेण्यात आला.

एक पानी मसुद्यात इंग्लंडच्या युरोपियन युनियनमधून सनदशीर मार्गाने बाहेर पडण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. भविष्यातही युरोपियन युनियन आणि इंग्लंड यांचे संबंध घनिष्ठ आणि चांगलेच राहतील, असंही नमूद करण्यात आलं.

"इंग्लंडचं युरोपियन युनियन सोडणं हे दुर्दैवी आहे," असं मत युरोपियन कमिशनचे अध्यक्ष जिन क्लाऊड जंकर यांनी व्यक्त केलं होतं. विभक्त होण्याची प्रक्रिया कधीही सहज नसते, असं सूचक विधानही त्यांनी केलं होतं.

"युरोपियन युनियनचे नेते इंग्लंडच्या निर्णयाबाबत फारसे आनंदी नाहीत हे त्यांनी स्पष्ट केलं. मात्र सध्याच्या परिस्थितीत हाच एकमेव पर्याय असल्याचं त्यांना वाटतं," असं बीबीसीच्या राजकीय संपादक लौरा क्युसेनबर्ग यांनी सांगितलं.

युरोपियन युनियनच्या नेत्यांची पुढची परिषद इंग्लंड संसदेने यासंदर्भात मतदान केल्यानंतर होईल.

पुढे काय होणार?

बहुतांश खासदारांनी पाठिंबा द्यावा यासाठी थेरेसा मे यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे.

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ब्रेक्झिटच्या मुद्यावर संसदेत होणाऱ्या मतदानापूर्वी थेरेसा इंग्लंडचा दौरा करणार आहेत.

असंख्य खासदारांनी कराराला पाठिंबा दिला नाही तर तीन शक्यता उद्भवतात. करार होणार नाही, पुन्हा वाटाघाटींसाठी प्रयत्न किंवा सार्वत्रिक निवडणुका.

ब्रेक्झिटप्रश्नी खासदारांचं मन वळवणं थेरेसा यांच्यासाठी कठीण असेल, असं बीबीसीच्या राजकीय संपादकांनी म्हटलं आहे. मात्र पुढच्या दोन आठवड्यात परिस्थिती बदलू शकते.

चॅन्सलर फिलीप हॅमंड कॅबिनेट मंत्र्यांच्या बरोबरीने काम करत आहेत, असं वृत्त संडे टाइम्सने दिलं आहे.

ब्रेक्झिट कराराला युरोपियन काऊंसिलची मान्यता मिळणंही आवश्यक आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)