बोरिस जॉन्सन: UKचे पंतप्रधान, जे एकेकाळी लंडनचे महापौर होते

12 डिसेंबर रोजी युकेतल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. आज युकेतले निकाल लागले आहेत. 650 खासदार असलेल्या संसदेत काँझर्व्हेटिव्ह पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत 326 चा आकडा पार केला आहे.

सध्या असलेल्या कलानुसार काँझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 363 जागा येतील असं सांगितलं जात आहे. विरोधी पक्ष लेबर पार्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांची संख्या कमी होऊन 200 हून खाली जाण्याची शक्यता दिसत आहे.

याचाच अर्थ असा की सध्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

लंडनचे महापौर राहिलेले बोरीस जॉन्सन हे या पदासाठीचे प्रबळ दावेदार जरी मानले जात असले, तरी अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नेतृत्त्वाखाली आपण काम करणार नसल्याचं म्हटलं आहे.

काँझर्व्हेटिव्ह पक्षाला बहुमत मिळाल्यावर युकेचा युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असं मत बीबीसीच्या राजकीय संपादक लॉरा क्युएन्सबर्ग यांनी केला आहे.

या निवडणुकीत लेबर पक्षाला 191, लिबरल डिमोक्रॅट्सला 13, SNP पार्टीला 55 तर नव्यानेच स्थापन झालेल्या ब्रेक्झिट पक्षाला शून्य खासदार मिळण्याची शक्यता एक्झिट पोलनं वर्तवली होती.

कोण आहेत बोरिस जॉन्सन?

बोरिस जॉन्सन हे माजी परराष्ट्र सचिव आहेत. ब्रेक्झिटविषयीची थेरेसा मे यांची धोरणं न पटल्याने ते कॅबिनेटमधून बाहेर पडले होते.

2008 ते 2016 या काळात ते लंडनचे महापौर होते.

गेल्या महिन्यामध्ये जॉन्सन हे या निवडणुकीसाठीच्या अंतिम दोन उमेदवारांपैकी एक ठरले. जेरेमी हंट यांनी जॉन्सन यांना कडवी टक्कर देण्याचं म्हटलं असलं तरी जॉन्सन यांना दोघांपैकी प्रबळ दावेदार मानलं गेलं. कारण होतं - ब्रेक्झिटविषयीची या उमेदवारांची भूमिका.

बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडावं यासाठीच्या 'Vote Leave' मोहिमेचं नेतृत्त्वं केलं होतं. तर ब्रेक्झिटसाठीचा निर्णय घेण्यासाठी झालेल्या मतदानामध्ये जेरेमी हंट यांनी 'Remain' म्हणजेच युरोपियन युनियनमध्ये ब्रिटनने रहावं असं मतदान केलं होतं.

कर्न्झर्व्हेटिव्ह पक्ष ही युरोपियन युनियनमधून ब्रिटनने बाहेर पडावं या मताचा आहे. आणि हंट नुकतेच या मतप्रवाहामध्ये सामील झालेले असले तरी आपला भावी नेता हा पूर्णपणे या मताचा असावा असं अनेक टोरी सदस्यांना वाटतंय.

म्हणूनच नेता निवडीसाठीच्या मतदानादरम्यान याचा फायदा बोरिस जॉन्सन यांना झाला असल्याचा अंदाज आहे.

बोरिस जॉन्सन यांनी आतापर्यंत अनेक पदं भूषवली, आणि जवळपास प्रत्येक वेळी ते वादात सापडले आहेत.

2004मध्ये ते 'स्पेक्टॅटर मॅगझिन'चे संपादक असताना त्यांना लिव्हरपूलमध्ये जाऊन माफी मागावी लागली होती. केन बिगले या ब्रिटीश कंत्राटदाराला ओलीस धरुन त्याची इराकमध्ये हत्या करण्यात आली होती. लिव्हरपूलच्या लोकांनी यावर जरा जास्तच प्रतिक्रिया दिल्याचं मत जॉन्सन यांनी मासिकातून व्यक्त केलं होतं. त्याबद्दल त्यांना माफी मागावी लागली.

लेबर पक्षाच्या केन लिव्हिंगस्टन यांना हरवत ते 2008मध्ये पहिल्यांदा लंडनचे महापौर झाले. लंडनमधल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधून प्रवास करताना दारु पिण्यावर जॉन्सन यांनी बंदी आणली. शिवाय शहरामध्ये सायकल भाडेतत्त्वाने देणारी योजना सुरू केली जी - बोरिस बाईक्स नावाने ओळखली जाते.

2011मध्ये लंडनमध्ये दंगली झाल्या त्यावेळी ते सुटीवर होते आणि लंडनमध्ये परतण्यासाठी त्यांनी उशीर केल्याची टीका सुरुवातीला त्यांच्यावर करण्यात आली होती

2012मध्ये ते पुन्हा लंडनचे महापौर झाले आणि लंडन ऑलिम्पिक्सच्या आयोजनामध्ये त्यांचा सहभाग होता. या दरम्यानचा सगळ्यात चर्चिला गेलेला क्षण म्हणजे युकेला पहिलं सुवर्णपदक मिळाल्यानंतर तो विजय साजरा करणारे बोरिस जॉन्सन झिप लाईनच्या वायरवर अडकले आणि लोंबकळत राहिले.

2015मध्ये ते खासदार झाले आणि 2016मध्ये पंतप्रधान झालेल्या थेरेसा मे यांनी त्यांची परराष्ट्र सचिवपदी नेमणूक केली. युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजूने त्यांनी केलेला प्रचार लक्षात घेता त्यांना हे पद देण्यात आलं असावं, अशी चर्चा त्यावेळी होती.

ब्रिटीश - इराणी नागरिक असणाऱ्या नाझनीन झगारी-रॅटक्लिफ यांना इराणमध्ये अटक करण्यात आली. त्यावेळी त्या तिथे सुटीवर गेल्या असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण त्या इराणमध्ये पत्रकारांनी शिकवत असल्याचं विधान जॉन्सन यांनी केलं. त्याबद्दल त्यांना नंतर माफी मागावी लागली. यानंतर इराणमध्ये नाझनीन यांना जजसमोर सादर करण्यात आलं आणि त्यांच्यावर इराणच्या राजवटीविरोधात प्रचार करण्याचा आरोप लावण्यात आला.

सौदी अरेबिया मध्य-पूर्वेमध्ये छुप्या युद्धात सामील होत असल्याची टीका जॉन्सन यांनी केली. आणि त्याबद्दल त्यांना डाऊनिंग स्ट्रीटच्या कानपिचक्या सहन कराव्या लागल्या.

बुरखाधारी मुस्लिम महिला या 'लेटरबॉक्सेस' सारख्या (पत्राच्या पेटीसारख्या) दिसतात असा उल्लेख जॉन्सन यांनी 2018मध्ये डेली टेलिग्राफमधल्या त्यांच्या लेखात केला. त्यानंतरही त्यांच्यावर मोठी टीका झाली होती.

ब्रेक्झिटसाठीच्या मोहीमेचं त्यांनी नेतृत्त्वं केलं पण 2013मध्ये याच बोरिस जॉन्सन यांनी डेली टेलिग्राफमध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्याने युकेचे प्रश्न सुटणार नसल्याचं म्हटलं होतं.

ब्रेक्झिटविषयीच्या धोरणांवरूनच थेरेसा मे यांच्याशी बोरिस जॉन्सन यांचे मतभेद झाले आणि त्यांनी मे यांच्या मंत्रीमंडळातून राजीनामा दिला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)