उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणीचे अंतराळातून घेतलेले फोटो प्रसिद्ध, काय आहे संदेश?

उत्तर कोरियाने 2017 नंतरची सर्वांत मोठी क्षेपणास्त्र चाचणी केल्याचं सरकारी माध्यमांनी सांगितलं आहे. यासंदर्भातील फोटो सुद्धा उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केले आहेत.

अंतराळातून काढलेल्या फोटोंमध्ये कोरियन द्वीपकल्पातील काही भाग आणि जवळपासचं क्षेत्र दिसून येत आहे. उत्तर कोरियाचं म्हणणं आहे की, ही ह्वासोंग-12 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र मध्यम अंतराचं आहे.

क्षेपणास्त्र 2,000 किलोमीटरवर पोहचल्यानंतर जपानच्या समुद्रात कोसळल, असं दक्षिण कोरिया आणि जपानचं म्हणणं आहे. दोन्ही देशांनी या क्षेपणास्त्रवर टीका केली आहे.

उत्तर कोरियाची या महिन्यातील ही सातवी चाचणी आहे.

क्षेपणास्त्र चाचणीचे हे फोटो त्यांची सरकारी वृत्तसंस्था केसीएनएने जारी केले आहेत. क्षेपणास्त्रामध्येच एक कॅमेरा बसवण्यात आला होता आणि त्यामाध्यमातूनच हे फोटो काढण्यात आल्याचं बोललं जात आहे.

दोन फोटो हे चाचणी दरम्यानचे आहेत आणि इतर फोटो क्षेपणास्त्र उंचावर जात असताना वरून घेण्यात आले आहेत.

जपान आणि दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार हे क्षेपणास्त्र 2000 किमीपर्यंत उंचीवर गेल्यानंतर सुमारे 30 मिनिटं हवेत होतं आणि 800 किमीचं अंतर पार करत ते जपानच्या समुद्रात कोसळलं.

संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र चाचण्यांवर कडक बंदी घातली आहे आणि त्यासाठी आर्थिक निर्बंधांचीही तरतूद केली आहे.

परंतु पूर्व आशियातील हा देश या निर्बंधांचं उघडपणे उल्लंघन करताना दिसतो. उत्तर कोरियाचे शासक किम जाँग उन आपल्या देशाची सुरक्षा मजबूत करण्याची भूमिका घेतात.

ही चाचणी रविवारी (30 जानेवारी) स्थानिक वेळेनुसार 07.52 (22:52 GMT) वाजता उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावर झाली असल्याचं दक्षिण कोरियानं म्हटलं आहे.

रविवारी झालेली चाचणी ही मध्यम पल्ल्याची बॅलेस्टिक मिसाईल (IRBM)ची होती असं, दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं म्हटलं आहे.

अमेरिकेनं इंडो पॅसिफिक कमांडच्या माध्यमातून एक निवेदन जारी केलं असून उत्तर कोरियानं अशा अस्थिरता निर्माण करणाऱ्या कृत्यांपासून दूर राहावं, असं म्हटलं आहे.

जानेवारी महिन्यात उत्तर कोरियानं समुद्रात काही कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे या दृष्टीनं उत्तर कोरियासाठी जानेवारी हा महिना अत्यंत व्यग्र महिना ठरला.

उत्तर कोरियात अलिकडच्या काळात झालेल्या क्षेपणास्त्र चाचण्या या 2017 मध्ये निर्माण झालेल्या तणावाची आठवण करून देणाऱ्या होत्या, असं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन यांनी म्हटलं.

त्यावेळीही उत्तर कोरियानं काही अण्वस्त्र चाचण्या केल्या होत्या. तसंच त्यांच्या सर्वांत मोठ्या क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. त्यापैकीदेखील काही क्षेपणास्त्र जपानवरून गेली होती.

2018 मध्ये किम जाँग उन यांनी अण्विक शस्त्रं आणि त्यांच्या सर्वांत लांब पल्ल्याच्या इंटरकाँटिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल (ICBMs)वर स्थगिती आणल्याचं जाहीर केलं होतं.

मात्र, 2018 मध्येच त्यांनी या स्थगितीला ते बांधील नसल्याचं म्हटलं होतं.

यापूर्वीच्या क्षेपणास्त्र चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं उत्तर कोरियावर जानेवारीच्या सुरुवातीला आणखी काही निर्बंध लादले होते. जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही देशांमधली चर्चा सध्या रखडली आहे.

ही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)