You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हे बनावट केळं माणसाचं भविष्यातलं अन्न असेल
- Author, हेलेन ब्रिग्स
- Role, बीबीसी प्रतिनिधी
इथियोपियामध्ये आढळणारं 'एन्सेट' नावाचं फळ हवामान बदलाच्या या युगात एक नवीन सुपरफूड आणि जीवन रक्षक ठरू शकतं, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
नुकत्याच 'एनव्हायर्नमेंटल रिसर्च लेटर्स' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, तापमानवाढीच्या या जगात केळ्यासारखी ही प्रजाती 10 कोटींहून अधिक लोकांना अन्न पुरवू शकते.
इथियोपियाच्या बाहेर या वनस्पतीबद्दल फारशी माहिती नाही. तिथे या वनस्पतीची देठं खिचडी आणि पोळी बनवण्यासाठी वापरली जातात. मात्र, या वनस्पतीची केळीसारखी दिसणारी फळं खाण्यायोग्य नसतात.
हे पीक आफ्रिकेत फार मोठ्या प्रमाणावर घेतले जाऊ शकतं, असं या संशोधनातून दिसून आलं आहे. इथियोपियातील आवसा येथील हवासा विद्यापीठाचे डॉ. वेंडावेक अबेबे यांनी या प्रजातीचे वर्णन अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असं केलं आहे.
डॉ. अबेबे म्हणतात, "हे असे पीक आहे जे अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकासाच्या समस्येचं निराकरण करण्यात खरोखर महत्त्वाची भूमिका बजावू शकतं."
एन्सेटला 'बनावट केळी' असंही म्हणतात. ही केळीसारखीच एक प्रजाती असल्याचं सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत ते फक्त इथियोपियाच्या काही भागात वापरलं जातं.
त्याच्या देठांमध्ये आणि मुळांमध्ये भरपूर स्टार्च आढळतो. म्हणून, वनस्पतीच्या त्या भागांना उकळल्यानंतर मिळणारे घटक लापशी आणि ब्रेड बनवण्यासाठी वापरता येतात.
एन्सेटचं महत्त्व
एन्सेट इथियोपियातील मुख्य खाद्यपदार्थांपैकी एक आहे. येथील सुमारे 2 कोटी लोक अन्नासाठी या वनस्पतीवर अवलंबून आहेत.
हे इतर ठिकाणी उगवलं जात नसलं, तरी दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने जसजसे आपण पुढे जातो तसतसे या वनस्पतीचं फळ मोठं होत जातं. हे लक्षण पाहून लोकांचा असा विश्वास आहे की ही वनस्पती इतर भागात वाढवणं शक्य आहे.
कृषी सर्वेक्षण आणि मॉडेल्सच्या मदतीने शास्त्रज्ञांनी पुढील चार दशकांमध्ये एन्सेटमधील छुप्या शक्यतांचा अंदाज लावला आहे.
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, हे पीक आफ्रिकेतील सुमारे 10 कोटी लोकांच्या अन्नाची गरज भागवू शकतं. यामुळे इथियोपिया, केनिया, युगांडा आणि रवांडा यासह इतर आफ्रिकन देशांमध्ये अन्न सुरक्षेचा विस्तार होऊ शकतो.
रॉयल बोटॅनिक गार्डन्स, कीव येथील संशोधक डॉ. जेम्स बोरेल म्हणतात की, ज्या दिवसांमध्ये शेतं रिकामी असतात, त्यावेळी बफर पीक म्हणून एन्सेटची लागवड केल्यास अन्न सुरक्षा वाढू शकते.
डॉ. बोरेल म्हणतात, "या वनस्पतीमध्ये असे अनेक गुण आहेत ज्यामुळे ते एक अद्वितीय पीक ठरतं. कारण ते कोणत्याही हंगामात लावलं आणि कापलं जाऊ शकतं. हे एक बारमाही पीक आहे. म्हणूनच लोक त्याला 'भुकेपासून वाचवणारे झाड' असं म्हणतात."
नवीन पिके शोधण्याची गरज
इथियोपिया हा आफ्रिकेतील असा देश आहे, जिथे कॉफीसारख्या अनेक उपयुक्त वनस्पती विकसित झाल्या आहेत. हवामान बदलाचा आफ्रिका आणि त्यापलीकडे जाऊन प्रमुख अन्न पिकांच्या उत्पादनावर आणि विस्तारावर गंभीर परिणाम होण्याचा अंदाज आहे.
केवळ काही पिकांवर मानवाचं अवलंबित्व पाहता जगाला भुकेपासून वाचवण्यासाठी नवीन वनस्पतींचा शोध आता तीव्र होत आहे. आपण दररोज जेवढ्या कॅलरीज खातो त्यातील अर्धा भाग केवळ गहू, तांदूळ आणि मका यांतून पूर्ण होतो.
याविषयी डॉ. बोरेल सांगतात, "संपूर्ण जगात या घडीला ज्या प्रजातींचा वापर होत आहे, त्यात वैविध्य आणणं गरजेचं आहे. कारण आपण फार सिमीत गोष्टींवरच अवलंबून आहोत."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)