T20 World Cup 2022 चं वेळापत्रक जाहीर, भारताचा पहिला सामना पुन्हा पाकिस्तानविरुद्धच

यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मागच्या वर्ल्डकप स्पर्धेप्रमाणेच यंदाच्या वर्षीही भारताचा समावेश पाकिस्तानसोबतच्या गटात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही भारताचा सलामीचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच होणार आहे.

नवनियुक्त कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा पहिलाच विश्वचषक स्पर्धा असल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता प्रचंड मोठी आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज (21 जानेवारी) टी-20 क्रिकेट वर्ल्डकप 2022 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळवण्यात येईल.

सर्वप्रथम 16 ऑक्टोबरपासून स्पर्धेचे पात्रता फेरीतील सामने खेळवण्यात येतील. त्यानंतर मुख्य स्पर्धेस 22 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडीज आणि स्कॉटलंडसह सहयोगी संघांपैकी पात्र ठरणाऱ्या इतर 4 संघांमध्ये पात्रता फेरी खेळवण्यात येईल.

यामधून 4 संघ पुढच्या फेरीत म्हणजेच सुपर 12 फेरीत जातील.

स्पर्धेच्या मुख्य लढती (सुपर 12) या 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. पहिला सामना 16 ऑक्टोबर रोजी यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सिडनी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.

भारताची पहिली लढत पाकिस्तानविरुद्ध 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

भारताचा समावेश या स्पर्धेत सुपर 12 फेरीत 'ब' गटात करण्यात आलेला आहे. या गटात भारत, पाकिस्तानसह दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांचा समावेश आहे. त्याशिवाय पात्रता फेरीतील अ गटातील दुसरा संघ (A2) आणि ब गटातील पहिला संघ (B1) या गटात समाविष्ट होईल.

सुपर 12 फेरीच्या 'अ' गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान यांच्यासह A1 आणि B2 या संघांचा समावेश असणार आहे.

वर्ल्डकप स्पर्धेची उपांत्य फेरी 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी होईल. पहिला सामना सिडनी क्रिकेट स्टेडियमवर तर दुसरा सामना अॅडलेडच्या ओव्हल स्टेडियमवर होईल. या स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर होईल.

भारताचे सामने

भारत विरुद्ध पाकिस्तान - मेलबर्न - 23 ऑक्टोबर 2022 - वेळ सायंकाळी 7 वाजता

भारत विरुद्ध A2 - सिडनी - 27 ऑक्टोबर 2022 - वेळ सायंकाळी 6 वाजता

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - पर्थ - 30 ऑक्टोबर 2022 - वेळ सायंकाळी 7 वाजता

भारत विरुद्ध बांगलादेश - अॅडलेड - 2 नोव्हेंबर 2022 - वेळ सायंकाळी 6.30 वाजता

भारत विरुद्ध B1 - मेलबर्न - 6 नोव्हेंबर 2022 - वेळ सायंकाळी 7 वाजता

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)