'या' देशानं आपली अण्वस्त्रं नष्ट करण्याचा निर्णय का घेतला होता?

    • Author, एंजेल बरमूडेज़
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

24 मार्च 1993 रोजी दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्रपती फ्रेडरिक विल्यम डी क्लार्क यांनी एक गोष्ट मान्य केली. बराच काळ ही गोष्ट अफवा असल्याचं सर्व जगाला वाटत होतं.

आपला देश एका गुप्त प्रकल्पावर काम करत होता आणि त्यांनी अण्वस्त्रं मिळवली होती असं त्यांनी सर्व जगाला सांगितलं.

दक्षिण अफ्रिकेनं सहा अणुबाँब तयार केल्याचं त्यांनी संसदेत बोलताना सांगितलं.

हे बाँब नष्ट केले असून देशाचा अणू कार्यक्रम पूर्णपणे बंद केल्याचं त्यांनी सांगितलं.

दक्षिण अफ्रिका जुलै 1991मध्ये संयुक्त राष्ट्राच्या एनपीटी (न्यूक्लिअर- नॉन प्रोलिफरेशन ट्रिटी)मध्ये सहभागी झाला होता.

डी क्लार्क यांनी संयुक्त राष्ट्राच्या इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी ऑर्गनायजेशन (आयआय़ए)ला अणू विकास स्थळापर्यंत जाण्याची परवानगी दिली होती. त्या जागेला भेट देऊन आपण केलेले दावे पडताळून पाहू शकता असं त्यांनी सांगितलं.

या घोषणेमुळे एनपीटीमध्ये सहभागी होण्याआधी अण्वस्त्रं त्यागणारा दक्षिण अफ्रिका एकमेव देश बनला होता.

1990च्या दशकात युक्रेननेही अण्वस्त्रं नष्ट करण्यावर सहमती दाखवली होती, परंतु ही अस्त्रं त्यांना सोव्हिएट संघाकडून वारशात मिळाली होती.

पण दक्षिण अफ्रिकेने अणू बाँब कसे तयार केले आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न का केला हा प्रश्न उरतोच.

शांततेसाठी अणू कार्यक्रम

दक्षिण अफ्रिकेने 1948 साली कायदा तयार करुन अणू ऊर्जा मंडळाची स्थापना केली होती. अणू ऊर्जेतील संधी शोधणं हे त्याचं ध्येय होतं.

1960 च्या दशकाच्या सुरुवातील दक्षिण अफ्रिकेने संशोधन आणि विकासाची प्रक्रिया सुरू केली. राजधानी प्रिटोरियापासून सुमारे 40 किमी अंतरावर पेलिंडाबा येथे अणूप्रकल्प स्थापन केला गेला.

सुरुवातीच्या काळात या कार्यक्रमाचा हेतू शांतता हा होता. दक्षिण अफ्रिकेजवळ युरेनियमचा साठाही आहे. त्याच्या संवर्धनासाठीही काम सुरू करण्यात आलं.

1960 च्या दशकात सुरुवातीला मिळालेल्या यशामुळे उत्साहित झालेल्या सरकारने औद्योगिक स्तरावर काम करण्यासाठी एक पायलट प्रकल्प स्थापन केला.

1970मध्ये तत्कालीन पंतप्रधान बी. जे. वॉर्स्टर यांनी संसदेला या घडामोडींची माहिती दिली आणि देशाचा अणू कार्यक्रम शांततामय उद्देशांसाठी असल्याचं सांगितलं.

जर बाँब तयार करण्यात यश आलं तर सरकारने या गुप्त योजनेला परवानगी द्यावी असं 1974मध्ये एका अहवालात असं म्हटलं होतं. थोड्याच काळात ही योजना सैन्यासाठी अण्वस्त्रं तयार करण्यात रुपांतरित झाली.

संरक्षणासाठी अस्त्र

अण्वस्त्रं तयार करण्याच्या निर्णयाची सुरुवात 1974 झाल्याचं डी क्लार्क यांनी 1993 च्या आपल्या भाषणात स्पष्ट केलं होतं. याचं कारण अफ्रिकेत सोव्हिएट सैन्याने हातपाय पसरणं हे होतं.

कम्युनिस्ट देशांची संघटना वॉर्सा पॅक्टमुळे तयार झालेल्या अनिश्चित वातावरणामुळेही दक्षिण अफ्रिकेला अण्वस्त्र तयार करावी लागली.

अफ्रिकेतील बदलत्या घडामोडींमुळेही यावर परिणाम झाला.

पोर्तगालने अफ्रिकेतील आपल्या वसाहती सोडल्या होत्या. मोझांबिक आणि अंगोला स्वतंत्र झाले होते. तिथल्या यादवीने आंतरराष्ट्रीय स्वरुप घेतलं होतं.

डाव्या आणि भांडवलशाही शक्तींमध्ये शीतयुद्धाचं वारं वाहू लागलं होतं. प्रादेशिक संरक्षणाची स्थिती अस्थिर झाली होती.

अंगोलामध्ये क्युबाच्या सैनिकांची संख्या वाढली होती. आता संरक्षणासाठी शस्त्रांची गरज आहे असं दक्षिण अफ्रिकेला वाटू लागलं होतं.

परदेशी मदतीवर आपण अवलंबून राहू शकत नाही असं त्यांच्या राष्ट्रपतींनी संसदेत सांगितलं होतं.

वर्णभेदाच्या नीतीमुळे दक्षिण अफ्रिका आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडलेला होता. त्यामुळे त्यांच्या शस्त्र खरेदीवर बंधनं घालण्यात येत होती.

या कारणांमुळे दक्षिण अफ्रिकेची स्थिती नाजूक झाली होती. तसेच अणू ऊर्जा क्षेत्रातही तो एकाकी पडत झालला होता.

अमेरिकेने अणू ऊर्जेसंदर्भातील माहितीचं दक्षिण अफ्रिकेशी आदान-प्रदान करण्यावर बंदी घातली होती. जे देश एनपीटीमध्ये सहभागी होणार नाहीत त्यांना हे तंत्रज्ञान देता येणार नाही असा एक कायदा अमेरिकेने 1978मध्य़े मंजूर केला होता.

शीतयुद्धाच्या काळात जग दोन गटात विभागलं गेलं होतं. तेव्हा दक्षिण अफ्रिकेला अमेरिका किंवा रशियापैकी कोणाचीही साथ मिळाली नाही.

1977 मध्ये दक्षिण अफ्रिका भूमिगत अणूचाचणीची तयारी करत होता तेव्हा अमेरिका आणि सोव्हिएट रशियाने एक्तर येत त्याला थांबवलं होतं.

धोक्याची जाणीव

या परिस्थितीमुळे आपण अणूबाँब तयार केला पाहिजे असं वाटून द. अफ्रिकेच्या सरकारने तीन टप्प्यातील अणू रणनितीला मंजुरी दिली.

प्रथम यात आण्विक क्षमतेबाबत अऩिश्चितता ठेवण्यात येणार होती. म्हणजे त्याला स्वीकारलंही जाणार नव्हतं किंवा नाकारलंही जाणार नव्हतं.

दुसऱ्या टप्प्यात दक्षिण अफ्रिकेला धोका निर्माण झाल्यावर ते लागू होणार होतं.

दक्षिण अफ्रिकेकडे अण्वस्त्रं आहेत याची जाणिव अमेरिकेसारख्या महाशक्तींना दाखवून द्यायचं होतं. त्यामुळे देशाला वाटणारा धोका नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदत मिळण्याची शक्यता होती.

जर धोका टळला नसता तर आपल्याकडे अण्वस्त्रं आहेत हे दक्षिण अफ्रिका सार्वजनिकरित्या मान्य करणार होतं. तसेच त्याचं भूमिगत परीक्षण करण्याचाही निर्णय घेण्यात येणार होता.

अर्थात त्याचा आक्रमक वापर होणार नाही हे निश्चित केलं होतं कारण तसं झालं असतरं तर आंतराष्ट्रीय पातळीवर मोठी प्रतिक्रिया व्यक्त झाली असती.

ही रणनिती लागू झाल्यावर द. अफ्रिकेने किमान 7 अणूबाँब तयार केले होते. त्यातला पहिला 1982 साली तयार झाला.

वास्तवात ही रणनिती पहिल्या टप्प्याच्या पुढे गेलीच नाही.

बाँब नष्ट करण्याचा निर्णय का घेतला?

राष्ट्रपती क्लार्क यांच्यामते हे बाँब नष्ट करण्याचं कारणं 1980 च्या दशकातील आंतरराष्ट्रीय राजकारणात होते. संसदेतील भाषणात त्यांनी क्यूबाने अंगोलामधून माघारी घेतलेले 50 हजार सैनिक, नामिबियाच्या स्वातंत्र्यासाठी झालेला त्रिपक्षीय करार यांचा उल्लेक केला. त्याशिवाय बर्लिनची भिंत पाडणं, शीत युद्धाची समाप्ती आणि सोव्हिएट रशियाचं विभाजन ही कारणंही सांगितली.

2017मध्ये त्यांनी द अटलांटिक ला दिलेल्या मुलाखतीत अणुबाँबच्या विरोधाची आपली कारणं सांगितली. ते म्हणाले, जे युद्ध ग्रामिण भागात लढलं जाणार होतं त्यासाठी असल्या बाँबची गरज नव्हती. काही तासांत एखाद्या शहराला पूर्ण नष्ट करणं याचा विचारही त्रासदासयक आहे. अणुबाँबला मी गळ्यात अडकलेल्या फासाप्रमाणेच समजायचो. जी गोष्ट वापरण्याचा विचार नाही अशी ती वस्तू होती. तसेच वास्तवात त्याचा वापर करणं पाशवी होतं. नैतिक रुपात त्याच्या वापराचं समर्थन करताच आलं नसतं.

1989 साली सत्तेत आल्यावर क्लार्क यांनी अणूकार्यक्रम थांबवायला सुरुवात केली. त्यात बाँब नष्ट करणे, अणूप्रकल्प नष्ट करणे यांचा समावेश होता. एनपीटीत सहभागी होण्याचे प्रयत्न सुरू झाले. अंतर्गत राजकारणात सुधारणा आल्या. वर्णभेद संपवला गेला. राजकीय बदलांमुळेच नंतर नेल्सन मंडेला यांच्याकडे सत्ता गेली.

आपल्या निर्णयामुळे इतर देशही अणुबाँब नष्ट करतील अशी अपेक्षा क्लार्क यांनी व्यक्त केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)