बांगलादेश : इस्लाम आता बांगलादेशातील राष्ट्रीय धर्म नसणार?

    • Author, सुबीर भौमिक
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

बांगलादेशातील सत्ताधारी अवामी लीग सरकारनं 1972 मधील धर्मनिरपेक्ष संविधान पुन्हा स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं राष्ट्रीय धर्म म्हणून इस्लामची मान्यता संपणार आहे. विशेष म्हणजे बांगलादेशात ईशनिंदेच्या मद्द्यावरून हिंदुंवर हल्ले होत असताना, हा निर्णय घेण्यात आला आहे.

13 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच शेकडो हिंदुंची घरं आणि अनेक मंदिरांची तोडफोड झाल्याचं समोर आलं आहे.

कट्टरतावादी इस्लाम समर्थकांनी आवामी लीग सरकारला या मुद्दयावरून धमकी दिली आहे. 1972 मधील धर्मनिरपेक्ष संविधान परत अंमलात आणण्याचं प्रस्तावित विधेयक संसदेत सादर केल्यास आणखी हिंसाचार होईल, असं सांगण्यात आलं आहे. 1988 मध्ये लष्कराची सत्ता असलेल्या एचएम इरशाद यांनी इस्लाम राष्ट्रीय धर्म असल्याचं जाहीर केलं होतं.

ढाका शहराचे माजी महापौर सईद खोकोन सारख्या आवामी लीगच्या काही नेत्यांनीही महिती मंत्री मुराद हसन यांच्या या घोषणेचा विरोध केला आहे. या घोषणेत त्यांनी बांगलादेश धर्मनिरपेक्ष देश असून राष्ट्रपिता शेख मुजीबुर रेहमान यांनी तयार केलेल्या 1972 च्या संविधानाला पुन्हा अंमलात आणणार असल्याची घोषणा केली होती.

''हा प्रकार आगीत तेल ओतण्याचं काम करेल,'' असं सईद खोकोन यांनी यावर प्रश्न उपस्थित करताना म्हटलं.

''आपल्या शरीरात स्वातंत्र्यसैनिकांचं रक्त आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला 1972 च्या संविधानाकडं परतावं लागेल. संविधान पुन्हा अंमलात आणण्यासाठी मी संसदेत बोलेल, कोणी बोललं नाही तरी मुराद संसदेत बोलणार,'' असं मुराद हसन म्हणाले.

''इस्लाम आपला राष्ट्रीय धर्म आहे, असं मला वाटत नाही. आम्ही 1972 चं संविधान पुन्हा अंमलात आणू. आपण विधेयक पंतप्रधान शेख हसिना यांच्या नेतृत्वात संसदेत मंजूर करू. लवकरच आपण 1972 चं धर्मनिरपेक्ष संविधान पुन्हा अंमलात आणू,'' असं मंत्री मुराद हसन यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात म्हटलं.

तसं झाल्यास आगामी काळात 90 टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या बांगलादेशचा राष्ट्रीय धर्म हा मुस्लीम नसेल.

घोषणेचा विरोध आणि हिंसाचाराची धमकी

जमात-ए-इस्लामी आणि हिफाजत-ए-इस्लाम सारख्या कट्टरतावादी समुहांच्या मौलवींनी असं विधेयक सादर झाल्यास, रक्तपात सुरू होईल अशी धमकी दिली आहे.

"इस्लाम राष्ट्रधर्म होता, आहे आणि असेल. या देशाला मुस्लिमांनी स्वातंत्र्य मिळून दिलं आणि त्यांच्या धर्माचा अपमान केला जाऊ शकत नाही. इस्लाम राष्ट्रीय धर्म राहावा, यासाठी आम्ही कोणतंही बलिदान द्यायला तयार आहोत," असं हिफाजतचे सरचिटणीस नुरुल इस्लाम जिहादी म्हणाले.

माजी महापौर खोकोन सारख्या आवामी लीगच्या नेत्यांनीही मुराद हसन यांच्या घोषणेचा विरोध केला आहे. या मुद्यावर पक्षांतर्गत सविस्तर चर्चा करण्यात आली नाही, असं ते म्हणाले.

'एवढी मोठी घोषणा करण्याइतपत मुराद हसन हे मोठे नाहीत, आणि जर, ते असं करत असतील तर त्यांना पंतप्रधान शेख हसिना यांचा पूर्ण पाठिंबा आहे,' असंही काही नेत्यांचं मतं आहे.

''एकिकडे देशात हिंदुंच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळला आहे. त्यात जर अशा प्रकारच्या घोषणेची शेख हसिना यांना माहिती नसती, तर त्यांनी नक्कीच मुराद हसन यांना फटकारलं असतं. पण तसं झालं नाही. त्यामुळं पंतप्रधान शेख हसिना यांचाही याला होकार आहे, असं मानणं योग्य ठरेल," असं मत आवामी लीगच्या एका ज्येष्ठ नेत्यांना नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केलं.

मुराद हसन यांनी 14 ऑक्टोबरला ही घोषणा केली. त्याच्या एका दिवसापूर्वीच मुस्लिम जमावानं कुमिल्ला, चांदपूर, फेनी, नौखाली आणि चितगांवमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ला केला. एक हिंदू देवतेच्या पायाजवळ इस्लाममधील पवित्र ग्रंथ कुराणाचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर हिंसाचार सुरू झाला होता.

हा हिंसाचार 23 जिल्ह्यांमध्ये पसरला. त्यामुळं पंतप्रधान शेख हसिना यांनी दंगलींवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीमा सुरक्षा दलातील जवान आणि एलिट रॅपिड अॅक्शन बटालियन (आरएबी) त्या तुकड्या पाचारण केल्या.

पोलिसांनी 350 पेक्षा अधिक दंगलखोरांना अटक केली आहे. त्यात कुराण हिंदू देवतेच्या पायाशी ठेवून फोटो व्हायरल केल्याचा आरोप असलेल्या दोन दुकानदारांचाही समावेश आहे.

त्यापैकी एक फोयाज अहमद आहेत. त्यांनी अनेक वर्षे सौदी अरेबियामध्ये नोकरी केली आणि, नंतर बांगलादेशला जाऊन व्यवसाय सुरू केला.

अवामी लीगनं बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी सारख्या मुस्लिम विरोधी पक्षांवर दंगली भडकावल्याचा आणि हिंदुंच्या दुर्गा पुजा या महत्त्वाच्या उत्सावाला गालबोट लावल्याचा आरोप केला आहे.

धर्मनिरपेक्ष देश कसा बनला मुस्लीम देश

"हिंदु देवतेच्या पायाशी जे कुराण ठेवण्यात आलं होतं, ते सौदी अरबमध्ये प्रकाशित झालं होतं. बीएनपीमधील मेयर मोनिरुल इस्लाम सक्कू आणि व्यावसायिक फोयाज यांनी इकबाल हुसेन यांच्या मदतीनं, ते ठेवलं होतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये इकबाल तसं करताना स्पष्ट दिसत आहेत. हा मुस्लिमांना चिथावणी देण्याचा प्रयत्न होता," असं आवामी लीगच्या कोमिल्ला महिला विंगच्या नेत्या आयेशा जमान यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

पाच वर्षांपूर्वी नासिरनगरमध्येही याच काळाच्या आस-पास सोशल मीडियाचा वापर करून अशा प्रकारचा फोटो व्हायरल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

1971 मध्ये बांगलादेश तयार झाला तेव्हा, याची ओळख धर्मनिरपेक्ष राष्ट्र अशी होती. त्याचा आधार बंगाली संस्कृती आणि भाषिक राष्ट्रवाद हा होता. त्या माध्यमातून पाकिस्तानच्या मुस्लीम रुढी, प्रथा संपुष्टात आल्या.

1972 मध्ये लागू करण्यात आलेल्या बांगलादेशच्या संविधानानं सर्व धर्मांना समान अधिकार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या चार वर्षांनी याठिकाणी पुन्हा हिंसक सत्तापालट झालं आणि देशाचे संस्थापक शेख मुजीबूर रेहमान यांची त्यांच्या कुटुंबासह हत्या करण्यात आली. केवळ विद्यमान पंतप्रधान शेख हसिना आणि त्यांची बहीण शेख रिहाना या दोन मुली बचावल्या.

लष्करी सत्तेचे प्रमुख असलेले जिया उर रेहमान आणि एच एम इरशाद यांनी जमात ए इस्लामी सारख्या मुस्लीम पक्षांना पाठिंबा दिला. त्यांनी निवडणूक आयोगासह नोंदणीची परवानगी दिली आणि इस्लाम धर्माला राष्ट्रीय धर्म जाहीर केलं.

"लष्करी शासनाला आवामी लीगची लोकप्रियता आणि महत्त्वं कमी करायचं होतं. त्यामुळं त्यांच्या विरोधात राजकीय शक्ती एकत्र करण्यास सुरुवात झाली. त्यांनी अवामी लीगच्या बंगाली राष्ट्रवादाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानप्रमाणे मुस्लीमधार्जिण्या राजकारणाचा पर्याय स्वीकारला. झिया आणि इरशाद दोघांनीही धार्मिक मुद्दा उचलून धरणारे पक्ष स्थापन केले,'' असं लष्करांनं सत्तापालट केली, त्याबाबत "मिडनाइट मॅसेकर" पुस्तक लिहिणारे, लेखक सुखरंजन दासगुप्ता म्हणाले.

''इरशाद यांना दारु पिणं आणि महिलांकडे असलेला ओढा यासाठी ओळखलं जात होतं. त्यांनी कधी प्रार्थनाही केली नसेल. त्यांनी काही कविता लिहिल्या. पण त्यांच्यासाठी इस्लाम ही एक राजकीय संधी होती. अगदी जिन्नांप्रमाणे. कारण जिन्नाही डुकराचं मांस खायचे आणि स्कॉच व्हिस्की प्यायचे. त्यांनीही क्वचितच नमाज पठण केलं असावं," असं मत आवामी लीगचे तरुण नेते आणि "डिजिटल बांगलादेश' चे आयोजक सुफी फारुख यांनी मांडलं.

''लष्कराची सत्ता असलेल्या दोन दशकांदरम्यान तसंच बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी आघाडीचं सरकार असताना (1991- 1996 आणि 2001- 2006) हिंदूंना प्रचंड अत्याचाराचा सामना करावा लागला. हजारो लोक भारतात शरण आले. बांगलादेशमध्ये 22 टक्के लोकसंख्या असलेले हिंदू 2010 च्या जनगणनेत 10 टक्क्यांपेक्षा कमी शिल्लक राहिले.

''मात्र, बांगलादेशच्या सांख्यिकी विभागानुसार, अवामी लीगच्या सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या कालखंडात हिंदुंची लोकसंख्या 12 टक्के एवढी झाली आहे. त्यावरून हिंदूंचं पलायन घटल्याचं स्पष्ट होतं.''

निवडणुकीच्या वेळी हिंदुंविरोधात हिंसाचार

देशातील मुस्लीम वातावरण निवडणुकांच्या काळात हिंदुंवर हल्ल्याचं कारण ठरतं, असं माजी माहितीमंत्री तराना हलीम यांचं म्हणणं आहे. ''दुर्गापूजेदरम्यान झालेल्या या हिंदुविरोधी हिंसाचाराचा त्याच संदर्भानं विचार केला जायला हवा. अफगानिस्तानात तालिबानच्या पुनरागमनानं मुस्लीम विचारसरणी असलेल्यांना प्रोत्साहन मिळालं आहे. मात्र, डिसेंबर 2023 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लीगचाच पुन्हा विजय होईल,'' असंही त्या म्हणाल्या.

''हा प्रकार लज्जास्पद आहे. आपण कोणत्याही स्थितीत हिंदूंचं संरक्षण करायला हवं,'' असं पंतप्रधानांचे विशेष सहकारी आणि सध्या ऑक्सफर्ड फेलो बॅरिस्टर शाह अली फराद म्हणाले.

कदाचित त्यामुळंच पंतप्रधान शेख हसिना यांनी 1972 मधील धर्मनिरपेक्ष संविधान पुन्हा अंमलात आणण्याची योजना आखली असावी.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)