शेख हसीना यांनी हिंदुंच्या सुरक्षेवरून भारताला इशारा का दिला?

    • Author, शकील अनवर
    • Role, बीबीसी बांगला

बांगलादेशात दुर्गापूजा सणाच्या पार्श्वभूमीवर हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यानंतर दोन दिवसांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी गुन्हेगारांना कठोर शिक्षा करू आणि हिंदूंना सुरक्षा दिली जाईल असं पुन्हा एकदा म्हटलं.

शेख हसीना यांचं सरकार हिंदूंच्या सुरक्षिततेबद्दल सतत भूमिका घेत आहे, परंतु त्यांनी बुधवारी (13 ऑक्टोबर) हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न भारताच्या नेत्यांशी जोडला. बांगलादेशकडून करण्यात आलेल्या या वक्तव्याकडे अपवाद म्हणून पाहिलं जात आहे.

शेख हसीना यांनी म्हटलं, बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेबाबत भारतानेही सतर्क असले पाहिजे. भारतात असे काहीही घडू नये ज्याचा त्यांच्या देशावर आणि तिथल्या हिंदुंवर परिणाम होईल.

बांगलादेशचे माजी परराष्ट्र सचिव तौहिद हुसेन यांनी बीबीसी बांग्लाशी बोलताना सांगितलं की, बांगलादेशच्या सर्वोच्च नेतृत्वाने भारतात होणाऱ्या घटनांबाबत उघडपणे चिंता व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, "सर्वसाधारणपणे पाहिलं तर याप्रकरणात आमच्याकडे चर्चा होतात पण आम्ही अशाप्रकारे भारताला स्पष्ट संदेश देत नाही. भारतात सत्ताधारी भाजपमधील सर्वात शक्तिशाली व्यक्तीनेही बांगलादेशबद्दल अपमानास्पद भाषा वापरली होती, त्यावेळीही आम्ही इतकं उघडपणे बोललो नव्हतो.''

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शाह यांनी बांगलादेशातील अवैध स्थलांतरितांविषयी कडक भाषा वापरली होती. यावरुन बांगलादेशात खूप विरोध झाला. तरीही सरकारच्यावतीने जाहीरपणे भूमिका घेण्यात आली नव्हती.

म्हणूनच शेख हसीना यांनी घेतलेल्या भूमिकेकडे अपवाद म्हणून पाहिले जात आहे. अखेर शेख हसीना यांना भारताला नेमकं काय सांगू इच्छित आहेत?

तौहिद हुसेन याबाबत सांगतात, "त्यांचा संदेश स्पष्ट आहे. बांगलादेशने भारतातील जातीय घटनांवर स्पष्ट भाष्य केलं आहे. भारताने यावर लक्ष द्यावं असं शेख हसीना यांना म्हणायचं आहे. त्यांचे विधान पूर्णपणे खरं आहे, कारण 1992 मध्ये बाबरी विध्वंसानंतर काय घडलं हे आम्ही पाहिले आहे.''

अवामी लीगचे सरकार अस्वस्थ

2014 मध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यापासून भारतात धर्मनिरपेक्षतेच्या भवितव्याविषयी सतत चर्चा सुरू आहे. भारतात मुस्लिमांविरुद्ध भेदभाव केल्याच्या बातम्याही सातत्याने येत असतात. धार्मिक कारणांमुळे एका विशिष्ट समुदायातील लोकांना मारहाण झाल्याची अनेक उदाहरणं आहेत.

कट्टर हिंदुत्ववादी समर्थकांना सरकार प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही सरकारवर करण्यात येतो. मुस्लिम बहुल देश असलेल्या बांगलादेशातील निरीक्षकांचं यावर एकमत आहे की, अवामी लीग सरकार भारतातील कथित मुस्लिमविरोधी राजकारणामुळे अस्वस्थ आहे आणि याचा परिणाम बांगलादेशवर होतोय.

अवामी लीग स्वत: ला धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून पाहते आणि धार्मिक अतिरेक आणि धर्मावर आधारित राजकारणाची मुळे मजबूत होणार नाहीत याचा प्रयत्न करते. भारतात वादग्रस्त नागरी दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर गेल्यावर्षी बांगलादेशच्या किमान दोन मंत्र्यांनी भारताचा दौरा रद्द केला होता.

तौहिद हुसेन म्हणतात, "भारतात जातीय राजकारणाचा प्रसार अर्थातच अवामी लीग सरकारला अस्वस्थ करत असल्याचं दिसून येतं. शेजारील मोठ्या देशात धार्मिक अतिरेक वाढला की त्याचा परिणाम बांगलादेशवरही होईल, हे स्वाभाविक आहे. भारताची धर्मनिरपेक्ष रचना कमकुवत झाली आहे."

डिप्लोमेटिक संबंधांच्या कामानिमित्त तौहिद जवळपास नऊ वर्ष भारतात राहिले आहेत.

ते सांगतात, "बांगलादेशात गोष्टी आदर्श आहेत असं मी म्हणत नाहीये. इथेही जातीय राजकारण आहे. इथेही धर्मांध लोक आहेत. पण भारताची परिस्थिती आणखी बिकट आहे, असं मला वाटतं. भाजप सरकार देशात कायद्याच्या माध्यमातून जातीय विभाजनाची रेषा आखत आहे. असे करण्यात त्यांना यशही मिळालं आहे. बऱ्याच काळानंतर भारतात एक पक्ष उघडपणे जातीय राजकारणाला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे समाजातही जातीयवाद बळकट होत आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही."

भारत याला किती महत्त्व देईल?

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात दक्षिण आशियाई राजकारण शिकवणारे प्राध्यापक संजय भारद्वाज शेख हसीना यांच्या विधानाशी सहमत आहेत. भारताच्या राजकारणाचा थेट परिणाम बांगलादेशवर होतो, असं ते म्हणाले.

खरं तर दक्षिण आशियात धर्म, वंश, प्रदेश आणि वंशाधारित राजकारण नवीन नाही असंही ते सांगतात. भारताच्या जातीय राजकारणाचा बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर परिणाम होतो हे ते मान्य करतात.

भारद्वाज सांगतात, "बांगलादेशच्या राज्यघटनेत इस्लाम हा राजकीय धर्म आहे, पण शेख हसीना यांनी अल्पसंख्याकांच्या हक्कांवर काम केले आहे. भारतातील बहुसंख्याकवादाच्या राजकारणाचा परिणाम येथील अल्पसंख्याकांवर, मुस्लिमांवर झाला आहे.''

"भारताची लोकशाही अजूनही मजबूत आहे आणि भारत अद्याप हिंदू राष्ट्र बनलेला नाही. आणि नरेंद्र मोदी यांच्या सात वर्षांच्या राजवटीत मुस्लिमांना कोणताही मोठा धोका होता असे मला वाटत नाही,''

ते पुढे सांगतात, की भारत सरकारने शेख हसीना यांचा संदेश सकारात्मक दृष्टीने घ्यावा. भारताला बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे संरक्षण हवे असेल तर भारतातील अल्पसंख्याकांची सुरक्षितताही सुनिश्चित केली पाहिजे. मला वाटते की भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने हे समजून घेतले पाहिजे.

शेख हसीना यांच्या वक्तव्याला भाजप सरकार फारसे महत्त्व देणार नाही, असे बांगलादेशचे माजी परराष्ट्र सचिव तौहिद हुसेन यांना वाटते.

ते म्हणतात, "भाजपचा अजेंडा स्पष्ट आहे. जातीय राजकारण सत्तेसाठी आहे हे त्यांना माहीत आहे. सत्तेत येण्यापूर्वी भाजपने भारतात आर्थिक प्रगतीचे आश्वासन दिले होते. गुजरात मॉडेलचा दाखला दिला होता. पण काहीच घडलं नाही. आर्थिक आघाडीवर भाजपकडे करण्यासाठी काही आहे असे मला वाटत नाही. अशा परिस्थितीत धर्म हाच त्यांच्याकडे एकमेव आधार आहे."

शेख हसीना यांनी भारताकडे बोट दाखवून आपल्या देशात राजकीय लाभ घेतला, असं विश्लेषण तौहिद करतात. शेख हसीना भारताबाबत बोलताना मौन बाळगतात अशी त्यांची प्रतिमा होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)