रुबेल शेख : बांगलादेशी असल्याच्या आरोपावरून अटक केलेला व्यक्ती होता भाजपचा पदाधिकारी

भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष रुबेल जोनू शेख यांच्यावर बांगलादेशी असल्याचा आरोप करत मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

मुंबई पोलिसांचे डीसीपी पीओरओ एस. चैतन्य यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, "मालवणी पोलिसांनी एका बांगलादेशी नागरिकाला बेकायदेशीररित्या भारतात राहत असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

या माणसाची कागदपत्रं तपासल्यानंतर ती खोटी असल्याचं लक्षात आलं. त्यानंकर विदेशी कायद्याअंतर्गत या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे."

या प्रकरणानंतर काँग्रेसनं भाजपवर टीका केली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलंय की, "उत्तर मुंबईस्थित भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष बांगलादेशी असल्याचं समोर आलं आहे. हा भाजपचा संघ जिहाद आहे का, असं आम्ही विचारू इच्छितो. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत अमित शाह यांनी भाजपसाठी विशेष तरतूद केली आहे का? संपूर्ण देशासाठी वेगळा कायदा असतो आणि भाजपसाठी वेगळा कायदा."

दरम्यान, सोशल मीडियावर शेख आणि भाजप नेते गजानन कीर्तिकर यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

भाजपचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, रुबेल शेख यांना आम्ही उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्षपद दिलं होतं. मात्र त्यांच्याबद्दल कळल्यानंतर त्यांना पदावरून हटविण्यात आलं होतं. माझ्या ऑफिसमध्ये अनेकजण येतात. त्यांच्यासोबत फोटो काढले जातात.

गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण

भारतीय जनता पक्षाचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती आले आल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी (20 फेब्रुवारी) स्पष्ट केलं.

शेख याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व घेतल्याची तक्रार माझ्याकडे आली होती. त्या तक्रारीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे, असं अनिल देखमुख यांनी म्हटलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)