बांगलादेश : हिंदूंवरील हल्ल्यांनंतरही भारत नरमाईची भूमिका घेत आहे, कारण...

    • Author, शुभज्योती घोष
    • Role, बीबीसी बांगला प्रतिनिधी

बांगलादेशात दुर्गा पूजेच्या मंडपात झालेल्या हल्ल्यानंतर अनेक हिंदू मंदिरं आणि घरांवर हल्ले झाले. यावेळी झालेल्या हिंसाचारात 7 जणांचा मृत्यू झाला.

बांगलादेशात आज जे काही होत आहे, त्याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. पण या सगळ्या दरम्यान भारताची भूमिका अचंबित करणारी आहे.

शेजारच्या देशात हिंदू समाजाची प्रार्थना स्थळं आणि घरांवर हल्ले झाल्यानंतरही भारतानं यावर दिलेली प्रतिक्रिया त्रोटक आहे.

भूतकाळात अशा घटना घडल्या तेव्हा भारतानं पीडित हिंदू आणि अल्पसंख्याकांना आपण त्यांच्यासोबत आहोत, हे सांगण्यासाठी दूतावासातील प्रतिनिधींना पाठवलं होतं. पण यावेळी असं काहीच करण्यात आलेलं नाहीये.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी उचललेल्या पावलांवर आपल्याला विश्वास आहे, असं भारतानं म्हटलं आहे.

भारतीय विश्लेषकांच्या मते, या परिस्थितीत शेख हसीना यांना अधिक खजील वाटू नये, म्हणून ते (भारतीय अधिकारी) अशी प्रतिक्रिया देत असेल, असं भारताला वाटत असावं.

भारताला शेख हसीना यांच्यावर विश्वास

भारताच्या या भूमिकेची तुलना भूतकाळातल्या भूमिकेशी केल्यास यात बराच फरक असल्याचं जाणवतं. यापूर्वी जेव्हा नासिनगर, सिल्हट, मुरादनगर भागात अशा घटना घडल्या होत्या, तेव्हा भारतानं यावर कठोर प्रतिक्रिया दिली होती.

इतकंच नाही, तर बांगलादेशमध्ये भारतीय दूतावासातील प्रतिनिधींनी हिंसाग्रस्त भागाची पाहणी केली होती आणि बांगलादेशमधील हिंदूंच्या अधिकाराविषयी स्पष्ट भूमिका मांडली होती.

याची तुलना जर गेल्या आठवड्यातील कुमिल्ला, चांदपूर, फेनी आणि चिटगांमधील हिंदू धार्मिक स्थळांवर जे हल्ले झाले आणि यात जे काही मृत्यू झाले, याविषयी केल्यास आता भारत खूप सांभाळून प्रतिक्रिया देत आहे.

आतापर्यंत भारतानं एक देश म्हणून या घटनांवर केवळ टिप्पणी केली आहे. 5 दिवसांपूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलं, "बांगलादेशातील प्रार्थनास्थळांवर हल्ला झाल्याच्या बातम्या आम्हीही पाहिल्या आहेत."

या वक्तव्यानंतर अरिंदम बागची यांनी आठवण करून दिली की, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंसेनंतर निर्माण झालेल्या स्थितीवर ताबा मिळवण्यासाठी सुरक्षादल तैनात केलं आहे.

बागची यांनी म्हटलं होतं, "सरकार आणि नागरी समाजाच्या पूर्ण सहकार्यानंतर दुर्गा पूजा संपन्न झाली आहे."

दुसरीकडे सत्ताधारी भाजपचे खासदार बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोकळेपणाने बोलत आहेत. याविषयी ते सोशल मीडियावरही लिहित आहेत. पण सरकारी पातळीवर याविषयी त्रोटक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.

भारताला चिंता आहे, पण...

दिल्लीस्थित थिंक टँक विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या फेलो श्रीराधा दत्त यांच्या मते, भारत बांगलादेशात होत असलेल्या घटनांमुळे चिंतेत तर आहे. पण या प्रकरणावर सार्वजनिक वक्तव्य देऊन बांगलादेशाला खजील करणं हा भारताचा उद्देश नाहीये.

त्या सांगतात, "शेख हसीना यांनी यापूर्वीच सांगितलं आहे की, याप्रकरणातील दोषींना माफ केलं जाणार नाही. पण, त्यांचं हे वक्तव्य सोडलं तरी भारताला असंच वाटतं की या स्थितीतून वाट कुणी काढू शकत असेल तर ते म्हणजे शेख हसीना."

श्रीराधा दत्ता यांच्या मते, "या सगळ्या गोष्टी पाहिल्या की, बांगलादेशाला अधिक खजील न करण्याचा भारताचा हेतू आहे. पण जिथवर मला माहिती आहे, भारताचे परराष्ट्र मंत्री आणि परराष्ट्र सचिव बांगलादेशातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. ते याविषयी काहीही वक्तव्य करत नसले तरी ते एकमेकांच्या संपर्कात आहेत."

त्या पुढे सांगतात, "भारत सरकारनं सार्वजनिकरित्या एक भूमिका घेतली आहे. भारत आता शेख हसीना अथावा तिथल्या नेतृत्वाविषयी मोकळेणानं बोलू शकतो. दोन्ही देशांच्या संबंधांत इतका मोकळेपणा आहे की, फोनवरही चर्चा होते. दोन्ही देशातील संपर्काचे हे माध्यम सक्रीय आहेत."

श्रीराधा दत्ता यांनी बीबीसीला सांगितलं, "याशिवाय बांगलादेशात थोड्या कालावधीच्या अंतरानंतर हिंदूंवर ज्यापद्धतीनं मोठ्याप्रमाणावर हल्ला झाला, तो अनपेक्षित होता. कुठेनाकुठे हे गुप्तचर यंत्रणांचं अपयश होतं आणि यामुळे भारतालाही झटका लागला."

त्या सांगतात, "आमच्या थिंकटँकमध्येही याविषयी खूप टीका होत आहे. इतका मोठा हल्ला झाला आणि कुणालाही याची कल्पनाही नव्हती. या हल्ल्याशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत."

सुनियोजित हल्ले?

बांगलादेशात हिंदूंविरोधात हिंसाचाराच्या घटना होत राहतात, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर हल्ला होणं ही बाब हा हल्ला पूर्वनियोजित असण्याकडे इशारा करते, असं श्रीराधा दत्त यांना वाटतं.

त्यांनी सांगितलं, "बांगलादेशात दुर्गा पूजा मंडप अथवा मंदिरांमधील तोडफोड नवीन नाही. पण यावेळेस जे झालं ते यापूर्वी कधीही झालं नव्हतं."

भारताचे माजी उच्चायुक्त पिनाकरंजन चक्रवर्ती या हल्ल्यामागे त्याच गोष्टी असल्याची शंका व्यक्त करतात, ज्यांची शंका भारताला आहे.

ते सांगतात, "बांगलादेशात जे काही झालं ते शेख हसीना यांच्याविरोधातल्या मोठ्या कटाचा भाग आहे आणि यामुळे भारत बांगलादेशाच्या बाजूनं उभा आहे."

हसीना यांच्याविरोधात कट

चक्रवर्ती पुढे सांगतात, भारत शेख हसीना यांच्याविरोधात सुरू असलेल्या या मोठ्या कटाविषयी जागरुक आहे.

त्यांनी सांगितलं, "सांप्रदायिक तेढ निर्माण करून शेख हसीना यांना कमजोर करणं, हा या कटामागचा उद्देश आहे. अशात जर भारतानं या घटनांची निंदा करणारं वक्तव्य केलं तर ती हसीना सरकारची निंदा होईल. यामुळे भारताचा कोणताच हेतू साध्य होणार नाही."

शेख हसीना यांनी या परिस्थितीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवावं, असा संदेश भारत नक्कीच त्यांना देश असेल, असंही चक्रवर्ती सांगतात.

ते पुढे सांगतात, "आम्ही शेख हसीना यांना जितकं ओळखतो, त्यावरून त्या या दिशेनं पावलं उचलतही असतील."

तालिबानच्या परत येण्याचा परिणाम

पिनाकरंजन चक्रवर्ती यांच्या मते, अफगाणिस्तानात तालिबान परत येणं आणि त्यात असलेल्या पाकिस्तानच्या भूमिकेनं बांगलादेशावर परिणाम झाला आहे.

त्यांनी म्हटलं, "अफगाणिस्तानात जे काही झालं, त्यामुळे बांगलादेशातल्या इस्लामिक कट्टरवाद्यांनाही बळ मिळालं असेल, यात काहीच शंका नाही. पाकिस्तानचाही या इस्लामिक कट्टरवाद्यांशी संबंध आहे."

चक्रवर्ती यांच्या मते, "एकीकडे ते (इस्लामिक कट्टरवादी) भारतविरोधी प्रपोगंडा वाढवण्याचं काम करत आहेत, तर दुसरीकडे ते शेख हसीना या भारताच्या जवळ आहेत, हेसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. यात नवीच काही नाही. फक्त गेल्या काही दिवसांपासून हे असे समूह बांगलादेशात पुन्हा डोकं वर काढत आहेत."

बांगलादेशात हिंदूंची प्रार्थनास्थळं आणि घरांवर हल्ले झाल्यानंतर हिंसक निदर्शनं झाली. यात सहभाग घेतलेल्यांनी हातांमध्ये फलक आणि पत्रकं घेतलेली होती. ज्यात शेख हसीना भारताच्या जास्तच जवळ असल्याचा आरोप करण्यात आला होता.

परराष्ट्र नीतीचे तज्ज्ञ सांगतात, बांगलादेशात कट्टरवाद्यांचा खात्मा करणं हे भारताचं ध्येय आहे आणि शेख हसीना यांच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय हे पूर्ण करता येणार नाही.

कदाचित याच कारणामुळे गेल्या 10 दिवसांत बांगलादेशात वेगवेगळ्या भागात शेकडो हिंदूंवर हल्ले झाले आहेत, पण भारत याविषयी फार काही बोललेला नाहीये.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)