ओसामा बिन लादेनची आई म्हणते 'तो एक चांगला मुलगा होता'

"ओसामा बिन लादेन लहानपणी लाजाळू आणि सभ्य मुलगा होता. पण विद्यापीठात असताना त्याला भडकावण्यात, त्याचा ब्रेनवॉश करण्यात आला, त्यामुळे तो बिघडला." हे आहेत अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या आईचे शब्द.

2011 साली लादेनचा मृत्यू झाल्यानंतर पहिल्यांदाच अलिया घानेम आपल्या मुलाबद्दल जाहीरपणे बोलल्या आहेत.

अलिया घानेम यांनी गार्डियन या ब्रिटिश वृत्तपत्राला सौदी अरेबियाच्या जेद्दाह स्थित राहत्या घरी मुलाखत दिली आहे. या कुटुंबानुसार त्यांनी 1999 मध्ये ओसामाला शेवटचं पाहिलं होतं, म्हणजे 9/11 हल्ल्यांच्या दोन वर्षं आधी. त्यावेळी तो अफगाणिस्तानात वास्तव्यास होता.

सुरुवातीला सोव्हिएत सैन्याशी लढण्यासाठी अफगाणिस्तानला आसोमा आला होता. मात्र 1999 पर्यंत त्याची ओळख जागतिक पातळीवरचा एक मोठा कट्टरवादी म्हणून निर्माण झाली होती.

आपला मुलगा कट्टरवादी झाल्याचं कळल्यानंतर काय भावना होत्या, या प्रश्नाचं उत्तर देताना अलिया म्हणाल्या, "आम्हाला खूप धक्का बसला होता. असं काही व्हावं, अशी माझी मुळीच इच्छा नव्हती. असं सगळं का त्याने उद्धवस्त करावं?"

त्यांचा मुलगा शिकताना 'मुस्लिम ब्रदरहूड संघटने'चा सदस्य झाला होता. त्यावेळी या संघटनेविषयी लोकांमध्ये विशेष कुतूहल होतं.

आजही बिन लादेन कुटुंब सौदी अरेबियातील प्रभावशाली कुटुंबांपैकी एक आहे. बांधकाम व्यवसायात त्यांनी मोठं नाव कमावलं आहे.

ओसामाचे वडील मोहम्मद बिन आवाद बिन लादेन यांनी ओसामाच्या जन्मानंतर तीन वर्षांनी अलिया घामेन यांना घटस्फोट दिला होता. त्यांना 50 पेक्षा जास्त मुलं होती.

9/11 च्या हल्ल्यानंतर काय झालं?

अलिया यांनी सांगितलं की 9/11च्या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने अख्ख्या कुटुंबाची चौकशी केली. त्यांच्या हालचाली आणि प्रवासावर बंधनं आली होती.

गार्डियनचे पत्रकार मार्टिन शुलोव या वृत्तात लिहितात की सौदी अरेबियाने त्यांना आलिया घानेम यांच्या मुलाखतीसाठी परवानगी दिली, कारण त्यामागे एक महत्त्वाचं कारण होतं. ओसामा हा सरकारी एजंट होता, असे आरोप आधी झाले होते. ते खोडून काढण्यासाठी आणि ओसामा हा बहिष्कृत होता, सरकारी एजंट नव्हता, हे स्पष्टपणे सांगण्यासाठी सौदी अरेबियाला ही मुलाखत महत्त्वाची होती.

हसन आणि अहमद हे ओसामाचे दोन भाऊ देखील या मुलाखतीच्या वेळी तिथे उपस्थित होते. 9/11च्या हल्ल्यात ओसामाचा सहभाग असल्याचं कळल्यावर त्यांना जो धक्का बसला त्याचं वर्णन त्यांनी केलं.

"लहानांपासून मोठ्यांपर्यंत, त्याच्यामुळे आम्हा सर्वांची मान शरमेनं झुकली होती. या सगळ्या प्रकाराचे गंभीर परिणाम होतील, याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. परदेशात असलेलं आमचं सगळं कुटुंब इथे परत आलं." असं अहमद यांनी या वृत्तपत्राला सांगितलं.

ओसामाचा या सगळ्यांत सहभाग होता, यावर 17 वर्षांनंतरही त्याच्या आईचा विश्वास बसत नाही. ती अजूनही आजूबाजूच्या लोकांना दोष देत असते, असंही अहमद यांनी सांगितलं.

लादेनचं आयुष्य

1957- सौदी अरेबियातील रियाध येथे जन्म झाला होता. तीन वर्षांनी त्यांचे पालक वेगळे झाले. 1969 साली वडिलांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू झाला. तो जेद्दाह येथे शिक्षणासाठी गेला, पण तिथून पुढे सोव्हिएत सैन्याबरोबर लढायला जाण्यासाठी अफगाणिस्तानला गेला. तिथे स्वत:ची एक वेगळी सशस्त्र संघटना उभी केली.

1988- अल-कायदा ची स्थापना केली. या शब्दाचा अर्थ 'तळ' असा आहे.

1989- सोव्हितने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यावर ओसामा सौदी अरेबियात परतला. सौदी अरेबियातून हकालपट्टी झाल्यानंतर तो आपल्या कार्यकर्त्यांबरोबर सुदानला गेला. तिथून पुढे अफगाणिस्तानला परतला.

1993- कौटुंबिक व्यवसायाच्या भागीदारीतून बिन लादेन कुटुंबाने त्याची हकालपट्टी केली. सौदी सरकारने त्याचं नागरिकत्व रद्द केलं.

1996- अमेरिकेच्या सैन्याविरुद्ध ओसामाने युद्ध पुकारलं.

1998- जगभरातल्या ज्यू आणि अमेरिकन लोकांच्या सामूहिक हत्याकांडाला धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून देणारा एक फतवा त्याने इतर इस्लामिक संघटनांच्या सहाय्याने जारी केला.

नैरोबी आणि दार-एस-सलामच्या अमेरिकन दूतावासानवरील भीषण हल्ल्यांमागे अल कायदा असल्याचं पुढे आलं. त्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातील त्याच्या अड्ड्यांवर हवाई हल्ल्यांचा आदेश दिला. यामुळे ओसामा आपल्या ठिकाणा सतत बदलू लागला.

2000- येमेनच्या एका बंदरावर असलेल्या USS Cole Destroyer या युद्धनौकेवर हल्ला केला. यात 17 अमेरिकन नाविक मारले गेले.

2001- ओसामाच्या 19 कार्यकर्त्यांनी अमेरिकेचे चार विमान हायजॅक केले. त्यापैकी दोन विमानांनी न्यूयॉर्कच्या दिशेने जाऊन वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्धवस्त केलं. तिसऱ्या विमानाने पेंटागॉनवर हल्ला केला तर चौथं विमान पेन्सिलव्हेनियामध्ये कोसळलं.

जवळजवळ 3,000 नागरिकांचा यात मृत्यू झाला. जॉर्ज W. बुश यांनी "लादेन जिवंत किंवा मृत पाहिजे" असा पुकारा देत अफगाणिस्तानवर हल्ला केला.

2002-2010- ओसामा 2001 मध्येच पाकिस्तानात पळाल्याचा संशय. ओसामाचे अनेक व्हीडिओ आणि फोटो अल-कायदा वेळोवेळी जारी केले. या पूर्ण काळात अमेरिका मात्र ओसामाचा शोधात.

2011- अमेरिकन नेव्ही सील्सने पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये एका घरावर छापा टाकला आणि ओसामाचा खात्मा केला. तिथे असलेल्या आणखी चार लोकांनाही या हल्ल्यात ठार केलं.

अमेरिकेच्या एका युद्धनौकेवर ओसामावर पारंपरिक इस्लामिक रीतीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार पार पाडले आणि त्याचा मृतदेह समुद्रात अज्ञात स्थळी नष्ट केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)